ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

lock
महात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही.

महाराष्ट्रातल्या प्रबोधनयुगाच्या सुरवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि विशेषतः लोकहितवादी यांनी स्वजनांच्या अवनतीची जी कारणमीमांसा केली. त्यांनी सुचवलेले उपाय विशिष्ट भूमिकेतून होते. समाजाच्या शीर्षस्थानी असलेला स्वाभाविक नेता ब्राह्मण आहे. हा समाज सुधारला की त्याच्या अनुकरणातून बाकीचे लोक आपोआप सुधारतील, असे गृहितक त्याच्यामागे होतं. म्हणजेच ते या प्रश्‍नाकडे वरून खाली पाहत होते.

नवा दृष्टिकोन देणारे विचारवंत

महात्मा जोतिबा फुले यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या प्रश्‍नाकडे तळागाळातील, शूद्रातिशूद्र लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं. म्हणजेच ते समाजाच्या खालच्या स्तरातून पाहत होते. उच्च वर्णियांना चुचकारत किंवा त्यांच्यावर टीका करून त्यांना ताळ्यावर आणायचं, ते सुधारेपर्यंत वाट पाहायची आणि मग ते सुधारले की, इतरांनी त्याचं अनुकरण करायचं इथपर्यंत थांबायची जोतिरावांची तयारी नव्हती.

हेही वाचाः महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

महात्मा जोतीराव फुल्यांचा जन्म १८२७ मधे माळी कुटुंबात झाला. पेशव्यांच्या शेवटच्या काळात जातिनिर्बंध जास्त कडक झालेले. धनसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्ता या उच्चवर्णियांच्या हाती एकवटल्यामुळे तो वर्ग इतरांना तुच्छतेनं वागवत होता. गावठी शाळेत शिक्षण घेताना जोतीरावांच्या हुशारीमुळे गफार बेग मुन्शी या उर्दू पर्शियन शिकविणार्‍या शिक्षकाच्या पुढाकारानं त्यांचा इंग्रजी शाळेत प्रवेश झाला. शिक्षण घेताना आपली पत्नी सावित्रीबाईंनाही शिकवायला सुरुवात केली. 

अशिक्षितता हेच अधोगतीच कारण

इंग्रजी शाळेचं वातावरण, जोतिबा चौकसपणे पाहत होते. विद्येची महती इंग्रजी चालीरिती यांची माहिती होत होती. अस्पृश्य समाजाला मिशनरी कसे जवळ करतात, हे त्यांच्या निदर्शनाला आलं. तेव्हापासून डोक्यात कल्लोळ उठायला सुरुवात झाली. सर्व मानवी प्राणी अवयवानं आणि बुद्धिकौशल्यानं एक सारखे असताना काहीच लोक पिढीजात पवित्र कसे बनतात? शूद्र आणि ब्राह्मण हा भेद काय?, ब्राह्मणापेक्षा मी कुठंही कमी नाही, मग हा भेद कुठून आला? धर्माच्या ढोंगी ब्राह्मणांनी इतरांना किती यातना दिल्या? आम्हाला अज्ञानी का राहावं लागलं? असे प्रश्न त्यांना पडू लागले.

मग ते अमेरिकन विचारवंत थॉमस पेनची पुस्तकं वाचून धर्मचिकित्सा करू लागले. त्यावेळी त्यांना शूद्रातिशूद्र आणि महिला यांच्या अधोगती मागे अशिक्षितपणा, अविद्या कारण असल्याच समजल. यावर त्यांनी म्हटलंय, 

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।

जोतिरावांना लाभली सगळ्यांची साथ

बुधवार पेठेत मुलींची शाळा सुरु करताना, जोतिरावांना घरातूनही विरोध झालेला. यामुळे त्यांनी घर सोडलं पण काम सुरूच ठेवलं. त्यावेळी त्यांना सावित्रीबाईंची साथ मिळाली. सावित्रीबाई स्वतः शिकून मुलींना शिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या. लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं, दगड भिरकावले तरिही त्या डगमगल्या नाहीत. 

समाजाला फळं मिळवायची असतील, तर बीज म्हणून कुणाला तरी गाडून घ्यावं लागतं, त्याप्रमाणंच सावित्रीबाईंनी बिजाचं काम केलं. ब्राह्मणांच्या देखी अपवित्र असेल्या महिला आणि शूद्रांनाही शिक्षण मिळावं, यासाठीही जोतिरावांनी काम सुरू केलं. त्यामुळे तेव्हाच्या समाजानं आरडाओरडा सुरू केला. त्य़ावेळी त्यांच्या जिवालाही धोका होता, पण तरीही त्यांनी काम थांबवल नाही. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता’ हे तुकोबांचं वचन त्यांनी पाळलं. 

हेही वाचाः वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

आठ मुलींनी सुरू झालेल्या शाळेची संख्या ४८ झाली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागल्या. जोतिबांनी मुलींच्या शाळेबरोबरच अस्पृश्यांसाठीही शाळा सुरू केलेली. या कार्यात त्यांच्या मित्रमंडळींनी बरीच मदत केली. एका मुस्लिमाने जागा दिली. लहुजी मातंग आणि ग्यानबा महार यांनी मुलं-मुली जमवली. सदाशिव गोवंडे यांनी पाट्या पुरवल्या. विष्णुपंत थत्ते यांनी शिकवायचं ठरवलं. 

अस्पृश्यांच्या अवनतीची मीमांसा करताना फुल्यांनी एकूणच भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासासंबंधी स्वतंत्र सिद्धांत ‘गुलामगिरी’ या पुस्तकातून मांडला. अस्पृश्यांना वर आणण्यासाठी इंग्रजी सत्तेची मदत घ्यायलाच हवी, असं म्हणणारे जोतिबा इंग्रजी सत्तेच्या आकर्षणात होते, असं म्हणता येणार नाही. 

कारण लहुजी वस्तादांकडे कुस्ती दांडपट्टा शिकून झाल्यानंतर त्यांना वाटायचं की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अशा तयार तरुणांची गरज आहे. जोतिबांनी शूद्रातिशूद्र लोकांसाठीही शाळा काढल्या. तसंच उच्च वर्गातल्या स्त्रियांवरच्या अत्याचारालाही तोंड फोडलं. नुसत्या चर्चा न करता प्रत्यक्ष कृती केली.

जोतिरावांचं भ्रूणहत्या रोखण्याचं काम

धर्म आणि धर्मगुरू यांचा अभ्यास केलेला म्हणून त्यांना यामागचा स्वार्थ समजला होता. धर्माच्या नावाखाली स्त्रियांवर अन्याय केला जात होता. सती जाण्याची प्रथा कायद्यानं बंद झाली होती. तरीही उच्च वर्गातले धर्ममार्तंड बायकांना चितेत ढकलत. यातून वाचलेल्या विधवांचे केस काढले जात. त्यांना अंधारात ठेवण्यात येई. पुरुष त्यांचा फाय़दा घेत. मग विधवा गरोदर राहिली म्हणून हेच पुरुष तिची धिंड काढत. यातूनच भ्रूणहत्या सुरु झाली.

हेही वाचाः शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

खोटा मुखवटा धारण केलेल्या समाजाला खरा चेहरा दाखवण्याचं काम जोतिरावांनी केलं. ज्या विधवांना पोटची पोरं मारावी लागत होती, त्यांना स्वतःच्याच घरात आसरा दिला आणि त्यांची बाळंतपणं केल. मुलांचं संगोपनही केलं. भ्रूणहत्या रोखण्यासाठी केलेलं काम पाहूनच पुढे महादेव गोविंद रानडे आणि उमिया शंकर यांनीही आश्रम पंढरपूरला सुरु केला. जोतिरावांनी तर जोतिरावांनी काशीबाई या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेऊन समस्त सुशिक्षित समाजाच्या नाकर्तेपणाला एक जोरदार थप्पडच लगावली.

सत्यशोधक समाज ही संपूर्ण क्रांती

एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आंदोलनं ही बहुधा धर्मकेंद्रित अशीच असायची. धर्म हे समाजाचं धारणातत्त्व असल्यामुळं समाज सुधारणा म्हणजे धर्मसुधारणा असं जणू समीकरणच झालं होतं. बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज काढला. महाराष्ट्रातील दादोबा पांडुरंगांनी परमहंस सभा स्थापन केली. परमहंस सभेला विरोध झाल्यामुळं थोड्याच दिवसात ती बंद पडली. 

परमहंस सभेतूनच प्रार्थना समाज आणि स्वतः फुल्यांचा सत्यशोधक समाज निघाले. प्रार्थना समाजाचं जातिभेदविषयक धोरण पुरेसं जहाल नव्हतं. लोकधर्माची, वारकरी शैलीची जोड देऊन जोतिबांनी जहाल धोरणाला मुरड न घालता २३ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाज स्थापन केला. 

महात्मा फुले ते महात्मा गांधी

सत्यशोधक समाजाचा त्यांनी सहा कलमी आराखडा तयार केला. ईश्‍वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार आणि सत्यरूप आहे. ईश्‍वराची भक्ती करण्याचा प्रत्येक माणसाला हक्क आहे. आईला संतुष्ट करण्यासाठी किंवा बापाला विनवण्यास जशी मध्यस्थ दलालाची जरुरी नसते. त्याचप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्‍वराची भक्ती करण्यासाठी या दलालांची आवश्यकता नाही. 

मनुष्य जातीनं श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी ठरतो. पुनर्जन्म, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत. ही भूमिका समोर ठेवून समाजातील उच्चनीचतेचा भेद नष्ट करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. 

सत्यशोधक समाजाची स्थापना ही एक संपूर्ण सामाजिक क्रांती होती. जोतिरावांची नुसता विचार न मांडता तो त्यांनी आचरणात आणला. एक पुनर्विवाह स्वतःच्या घरी घडवून आणला. सत्यशोधक समाजातर्फे हडपसरला एक शाळा उघडण्यात आली. अशा तर्‍हेनं गरीब मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली. महात्मा फुले ते महात्मा गांधी हा गुलामगिरीच्या मुक्ततेचा कालखंड म्हणता येईल. या कालखंडाच्या एका टोकाला फुले आहेत आणि दुसर्‍या टोकाला महात्मा गांधी आहेत. 

हेही वाचाः महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

या दोघाही महापुरुषांजवळ एक महान अस्र होतं, ते म्हणजे सत्याशी एकनिष्ठता. महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या तत्त्वाचा अवलंब केला, तर महात्मा फुले यांनी सत्यशोधन केलं. जोतिबांचं महात्म्य त्यांच्या सत्यउपासनेत आहे. ‘दुसर्‍याला दुःख देण्यात धर्म नसतो. ईश्‍वराच्या सत्यधर्मास ते मंजूर नाही,’ हे जोतिबांचं ठाम मत होतं. 

जोतिरावांचं इंग्रजी ऐकून साहेबही चकित

जोतिरावांनी इंग्रजी शिक्षण घेतलं. इंग्रजांचे चांगले गुणही उपयोगात आणले  परंतु हे करत असताना एक क्षणभरसुद्धा ते स्वदेशातल्या गरिबाला विसरले नाहीत. ड्यूक ऑफ कॅनॉटच्या पुणे भेटीच्या समारंभात जोतिबा शेतकर्‍याच्या वेषात आले. कमरेला लंगोटी, खांद्यावर घोंगडं आणि डोक्याला मुंडासं. प्रतिष्ठितांना वाटलं हा माणूस काय बोलणार? 

देशात मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आलेले फुले भाषणात म्हणाले, पॉव्हर्टी अ‍ॅण्ड इग्नोरन्स आर द कर्स ऑफ अवर कंट्री माय रिक्वेस्ट टू देअरफॉर टू कॅरी धिस हम्बल मेसेज टू यूअर काइंड मदर आय मिन हर ग्रेशियस मॅजिस्टिक क्विन विक्टोरिया ऑफ इंग्लंड. दॅट द सॅल्वेशन ऑफ धिस कंट्री लाइज इन एज्युकेशन. एज्युकेशन अ‍ॅण्ड नथिंग बट एज्युकेशन.

महात्मा फुल्यांचं अस्खलित इंग्रजी ऐकून ड्यूकसाहेब चकित झाले. हा काय बोलणार, असं त्यांना वाटलं. परंतु फुल्यांचं भाषण सुरू झालं आणि सभेत गांभीर्य निर्माण झालं. 

शेतकऱ्यांसाठी नवा काय कायदा पास केला

शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्‍नाविषयी जोतिरावांना विशेष आस्था होती. मराठेशाहीमधे शेतकरी शेती करतानाच शिपाईगिरी करत असल्यामुळे संपन्न होते. ब्रिटिशांच्या राज्यात मात्र शेतीवरच अवलंबून राहाव लागत होत. दुष्काळ, अज्ञान, अंधश्रद्धा, शेतसारा वसुली, या सगळ्यात शेतकर्‍यांची दैना झाली. शेतकर्‍यांची कैफियत जोतिरावांनी ‘शेतकर्‍यांचा असूड’ या पुस्तकातून मांडली.

जोतीरावांच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेचा इंग्रज सरकारलाही विचार करावा लागला आणि त्यांनी १८७९ मधे शेतीविषयक कायदा पास केला. नोकरशाहीचा लठ्ठ पगार, ब्रिटिशांचा लष्करी खर्च त्याच्यामुळे भारतीय उद्योजकांची पिछेहाट झालेली. यामुळेच शेतकर्‍यांना दारिद्र्य आलं, हे जोतिबांच निदान होत. 

हेही वाचाः 'हरी नरकेंच्या भाषणांवर बंदी आणा'

शेती, शेतकरी, शिक्षण या संदर्भात जोतिरावांनी सातत्यानं सरकारला सूचना केल्या. शाळांची तीन महिन्यातून एकदा तपासणी व्हावी. शिक्षणात सुधारणा होण्यासाठी अनुदान मिळावं. स्वतंत्र शिक्षणकर वसूल होतो पण शिक्षणावर खर्च होत नाही. त्याचबरोबर मुंबईतल्या दहा लाख मुलांना प्राथमिक शिक्षण मिळत नाही. बाराव्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं जावं. अशा सूचना जोतीरावांनी सरकारला केल्या. 

जोतीरावांनी आपलं ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अमेरिकेतल्या निग्रो गुलामांना मुक्त करणार्‍या सदाचारी आणि परोपकारी लोकांना अर्पण केलं. आर. एस. घाटगे या अस्पृश्य समाजातील सैनिकानं लिहिलंय की, देवानं आम्हाला मनुष्य जन्म दिला असला, तरी मनुष्यत्वाची ओळख जोतीरावांनी करून दिली. ते अगदी खरं आहे.

जोतीरावांचा निर्मिक कोण आहे?

निर्मिक म्हणजे ईश्‍वर. जोतिरावांनी विश्‍व निर्माणकर्त्यानं निर्मिक हा नवीन शब्द वापरला आहे. कारण जगातल्या ईश्‍वरवाचक सर्व शब्दांच्या पाठीमागे आराधना, भक्ती किंवा पूजा करण्याचं निरनिराळं कर्मकांड आहे. हे कर्मकांड व्यर्थ असून माणसामाणसात फूट पाडणारं आहे, असं त्यांचं ठाम मत होतं आणि म्हणून त्यांनी ईश्‍वरासाठी ‘निर्मिक’ हा शब्दप्रयोग केला.

आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने सगळ्याच स्त्रियांना आणि पुरुषांना सर्व मानवी हक्कांविषयी स्वातंत्र्य दिलंय. आपल्या या सूर्यमंडळासहीत पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे, तर विविध देशातील लोकांचे वैरभाव माजवून प्रत्येकामध्येच देशाभिमान आणि धर्माभिमानाचं खूळ व्यर्थ का माजवलं आहे? 

देशीवादाचे पहिले पुरस्कर्ते

समाजसुधारणा करण्याचा एक अत्यंत मूलगामी दृष्टिकोन फुल्यांनी दिला. सुधारणा म्हणजे समाजपुरुषाची वरवरची मलमपट्टी नव्हे, तर रोगाच्या मूळ कारणाला भिडून प्रसंगी शस्त्रक्रिया करून सडलेला भाग काढून टाकावा लागतो. फुल्यांचा मार्ग नुसता डागडुजीचा नव्हता तर आमूलाग्र क्रांतीचा होता. 

आजचे स्त्रीवादी, फेमिनिस्ट विचारवंत जे मुद्दे मांडतात ते फुल्यांनी दीड शतकापूर्वी मांडले होते, हे लक्षात घेतलं म्हणजे फुल्यांना द्रष्टे म्हणावंच लागतं. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात दलाल किंवा मध्यस्थ नको, हे सांगणारे फुले आज किती सार्थ ठरतात, हे खरंतर वेगळं सांगायची गरज नाही. 

पंडितांच्या परंपरेला आव्हान देत देशीवादाचा पहिला पुरस्कार करणारे महात्मा फुले हे वृत्तीनं वैश्‍विक होते. आज कधी नव्हे, इतकी वैश्‍विकता आणि स्थानिकता यांच्यात मेळ घालण्याची वेळ आली आहे. त्यासाठी फुले यांचे विचार नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

हेही वाचाः 

बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला

फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…