वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

lock
जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख.

लेखक नेमकं आपल्या साहित्यात काय लिहितो, समाज एकसंध राहावा म्हणून आपल्या लेखनातून कोणती जोखीम तो पत्करतो याच्याशीही वाचक म्हणून आपलं देणंघेणं हवं. एवढी समज वाचक म्हणून आपली वाढत नसेल, तर आपला भवताल आणि आपलं जगणंही आपल्याला डोळसपणे वाचता आलं नाही असं समजायला हवं. याला आजची वाचन संस्कृतीबद्दलची उदासीनता जबाबदार असून त्याबद्दल काही प्रश्न पडताना त्याची उत्तरेही शोधायला हवीत.

वाचन साक्षर होण्याची गरज

दर काळात ग्रंथ वाचकांची संख्या कमीकमी होत जात असल्याचा आरोप होतो. पण ज्या काळात साहित्य ग्रंथ वाचलं जातं ते तरी समकालीन जीवनानुभव देणारं वाचलं जातंय का, हा खरा प्रश्न आहे. बहुसंख्येनं ग्रंथ वाचन करणं आणि त्याच्याशी आपल्या जगण्याचा अन्वयार्थ लावणं या अर्थानं आपल्याकडील वाचन संस्कृती फार श्रीमंत होती, असं म्हणणं फारच धाडसाचं ठरेल. बदलत्या जगण्याबरोबर साहित्य लेखनही बदलत.

हेही वाचाः पुस्तक माणसाला कसं घडवतं?

प्रगल्भ लेखक त्याच जगण्याला शब्दबद्ध करत पुढं त्याची कथा, कादंबरी, कविता करतो. पण अशा लेखनाला त्या त्या काळात सर्व स्तरातील वाचकांकडून प्रतिसाद मिळतोच असं नाही. त्यामुळं लेखकाबरोबर वाचकही प्रगल्भ होत जायला हवा. हे एकदा समजून घेतलं की अशा भाषा आणि त्या भाषेतल्या साहित्यप्रेमाच्या दिवसांचा तकलादूपणा काय असतो आणि तो फक्त राजकीय शायनिंग पुरताच कसा मर्यादित असतो हेही लक्षात येतं. त्यामुळेच ‘काय वाचलं पाहिजे, काय नको, याबाबत वाचकही साक्षर होण्याची गरज निर्माण झालीय.

वाचन हे वेळकाढू साधन बनू लागतं

ग्रंथवाचन म्हणजे त्या त्या काळाचं प्रश्न समजून घेणं आणि तो गुंता सोडवण्यासाठी माणूस म्हणून आपण अधिक समृद्ध होत जाणं. या विचारांची प्रक्रिया आपल्या डोक्यात वाचक म्हणून ग्रंथवाचन आधीपासूनच सुरू रहायला हवी किंवा आपण त्यासाठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेत असतो, एवढा तरी विचार आपल्या मनात पक्का झालेला असायला हवा. असं झालं नाही तर आपलं वाचन एक मनोरंजन ठरू शकतं.

हेही वाचा: सगळ्यांना आवडणारे, हवे हवेसे वाटणारे गो. मा. पवार

वाचनात आपल्या मनाची एकाग्रता जेवढी महत्त्वाची असते त्याहीपेक्षा कितीतरी पटीत आपण का वाचतो? कशासाठी वाचतो? त्यातून आपल्याला कोणता विचार स्वीकारायचा आहे इत्यादी विचार चिंतन महत्त्वाचं. मात्र तेच होत नसल्यानं वाचन हे एक वेळकाढू साधन बनून जातं. मग अशा प्रकारच्या वाचनातून हाती काहीच सापडत नसल्यामुळे वाचकाला एका ठरावीक मर्यादेनंतर ग्रंथ वाचनाच्या सवयीचा कंटाळाही येण्याची शक्यता असते.

वाचनातून जगण्याचा अर्थ 

कविता, कथा साहित्याचा प्रारंभ मौखिक परंपरेतूनच झाला. अनेक लोकगीतं मौखिक परंपरेतून शेकडो वर्षं आपल्यापर्यंत पोचत राहिली. आपल्याकडं शिक्षण आणि लेखन संस्कृती एकाचवेळी सुरू झाल्याची काही उदाहरणं सापडतात. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. मुक्ता साळवे या मुलीला गोणपटात बांधून तिच्या वडिलांनी सावित्रीबाईंच्या शाळेत आणलं. पुढं मुक्तानं बालपणीच निबंध लिहिला. डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर, पण प्रत्यक्षात डॉ. रखमाबाई सावे यांनी या देशात डॉक्टर म्हणून पहिली रुग्णसेवा केली.

मात्र वाचक म्हणून अनेकांना याची माहिती नसते. म्हणूनच वाचकांनी साक्षर होण्याची गरज निर्माण झालीय. आपल्या वाचनातून जे आपल्यापर्यंत येतं त्याला आपल्या जगण्याचा अर्थ लावता यायला हवा. हे या अर्थानंच असतं. ते लक्षात येत नसल्याने वयाच्या पन्नाशीनंतरही आपण १८, २० व्या वयात जे ठराविक लेखकांचं लेखन वाचत होतो अशाच लेखकांच्या कथा कादंबऱ्यांत वाचक म्हणून आपण अडकलेलो असतो.

आपण ज्या लेखकांचं लेखन वाचतो त्या लेखनातील जीवन जाणिवा आपल्या नाहीत. आपण फक्त वाचावं आणि ते त्यांचं जगणं आहे, असं संबोधून आपल्या जगण्याला त्या लेखन अनुभवाशी स्वतःला पडताळून पाहण्याची विचारप्रक्रिया आपल्यात आपल्याकडील वाचनसंस्कृती श्रीमंत होती म्हणणं धाडसाचं.

हेही वाचा: थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

वाचकाची लेखकाशी असलेली बांधिलकी

वाचन सुरू न ठेवणं म्हणजे वाचक म्हणून आपण आपल्यालाच पुनरुज्जीवित न करणं. वास्तविक वाचक म्हणून लेखकानं जे अनुभवविश्व लेखनात मांडलंय ते आपण समजून घेताना माणूस वेगवेगळ्या स्तरात जगत असता. त्या जगण्याच्या मुळाशी दु:ख, वेदना, अपार करुणा असल्याची भावना जोपर्यंत आपल्या मनात रुजण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवत नाही तोपर्यंत ते त्यांचं जगणं, असं म्हणून अमुक एका समाजाचं चरित्र आणि चारित्र्य म्हणूनच आपण त्या लेखनाकडे पाहत राहणार. वाचक म्हणून आपण घडत जाताना आपल्या मनात विविध प्रकारची विचार प्रक्रिया सतत चालू रहायला हवी.

यातूनच मग लेखकाच्या विचार संस्कृतीशी आपली बांधीलकी वाढत जाते. लेखकाची विचार संस्कृती म्हणजे लेखक प्रत्यक्ष लिहितो आणि त्या लिहिण्याची भूमिका जाहीरपणे घेतो याच्याशी आपलं वाचक म्हणून किंवा एक माणूस म्हणून काय नातं असतं असा प्रश्न सतत वाचकाच्या मनात निर्माण व्हायला हवा. तसा प्रश्न आपल्या मनात वाचक म्हणून निर्माण होत नसेल तर एकूण समाजाशी आपलं माणूस म्हणून काही देणंघेणं नाही, याचा ‘संधी कोपरा’ आपल्या मनात कुठेतरी दडून बसलाय, असं आपणच आपल्याला समजून सांगायला हवं.

वाचकानं काय विचार करून वाचावं? 

लेखकाची विचार संस्कृती ही एकूण माणसाकडून माणसाकडं जाणारी हवी. लेखकाच्या लेखनात त्याची बीजं दिसत नसतील आणि आपल्या लेखनातून लेखक भेदाच्या भिंती उभ्या करत असेल तर तो लेखक म्हणून दुबळा आहे असं बोट दाखवण्याची समजही वाचकांत वाढायला हवी.

लेखकाच्या विचार संस्कृतीशी वाचक म्हणून आपण बांधीलकी ठेवतो तेव्हाच आपल्यात अशी समज निर्माण होण्याची शक्यता असते. लेखकानं लिहावं, त्याने जाहीर भूमिका घ्यावी, त्याने समाजासाठी लढावं, आपलं काय त्याच्याशी? आपण त्याचं लिखित साहित्य वाचावं, त्यानं समाजातले अंतर्विरोध मांडले त्यातील प्रत्यक्ष जगण्याशी आपलं काही देणंघेणं नाही असं समजून आपण ग्रंथांचा आस्वाद घेत असू तर आपल्या मेंदूची इयत्ता पहिली ते पहिलीच राहिली असंच समजायला हवं.

हेही वाचाः रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

वाचनसंस्कृतीसाठी आज तशा प्रकारचा भवताल निर्माण केला जातोय का? गांभीर्यानं विचार केल्यावर याचं नकारात्मक उत्तर येईल. उत्तराच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. त्याचा आपण वाचनप्रेमी म्हणून अधिक सखोल, सजगपणे विचार करण्याची गरज निर्माण झालीय. वाचन असो किंवा कोणतीही गोष्ट निव्वळ विचारांच्या पातळीवर स्वीकारायची असेल तर तसा भवताल असणं किंवा तो निर्माण करणं हे अतिशय गरजेचं असतं.

आपल्याकडे वाचन संस्कृती नाही

मराठी वाचन संस्कृतीचा एकूण इतिहास पाहता समाजाच्या सर्व स्तरात वाचनाचा जाणूनबुजून भवताल निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला गेलाय, असं काही दिसत नाही. समजा तसं झालं असतं तर आजही ग्रामीण भागात किंवा शहरी भागातही एकाद्या मोठ्या कुटुंबात अपवादात्मक नव्या पिढीतून एखादा वाङ्मयीन लेखन लिहू लागतो किंवा वाचनसंस्कृतीशी जोडून घेऊ पाहतो.

समाजाच्या इतर स्तरातून सोडून द्या, खुद्द त्यांच्याघरातूनच त्याला या सगळ्याच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. आपण मात्र याचा गांभीर्यानं विचार न करता ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढायला पाहिजे, असे म्हणत राहतो आणि दुसर्याग बाजूला एखाद्या गावात ग्रंथालय सुरू झालं असंल तर तिथे वाचकांची संख्या मात्र वाढली नाही, असा विरोधी सूर लावतो. 

हेही वाचा: नयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात?

वाचनसंस्कृती कशी निर्माण होईल?

आता प्रश्न असा राहतो की हा असा भवताल कसा बदलायचा? वाचनसंस्कृतीबद्दल ग्रामपातळीवर विविध कार्यक्रम राबवणं हा एक यातला नेहमीचाच भाग झालाय. परंतु असा प्रयत्न करून फार काही फरक पडलेला नाही. यासाठी आता वाचन संस्कृतीकडं जाण्यासाठी आधी विचारांच्या पातळीवर परस्पर संवाद वाढवत जाणं, ही गोष्ट सतत होत राहिली पाहिजे. म्हणजे जी मुलं शिकलेली आहेत, ज्यांना किमान दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडताहेत त्याबद्दल उत्सुकता आहे, अशांचा एक गट निर्माण करता येऊ शकतो.

हेही वाचा: फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री

असे काही गट एखाद्या भागात तयार झाले तर आठवड्यातून, पंधरा दिवसातून, किंवा महिन्याभरात एकत्र येऊन आजूबाजूच्या घटनांबद्दल चर्चा करतील. त्या घटनांवर वृत्तपत्रात किंवा माध्यमातल्या कुठल्याही ठिकाणी कसं विश्लेषण केलं गेलंय. याबद्दल त्या घटनेच्या मुळाशी जाऊन सविस्तर त्या गटांमधे साधकबाधक विचार मांडले जाऊ शकतात. यातून आजूबाजूला घडणार्याा बर्याम वाईट घटनांबद्दलची त्यांच्यात जाणीव निर्माण केली जाऊ शकते. यातून त्या गट पुस्तकाकडं आणि त्यातही तशा गंभीर घटनांवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथाकडं वळविणं सहज शक्य होईल.

शाळा, माध्यमिक विद्यालयं यांचा विचार करता येऊ शकतो. शैक्षणिक वाटचालीत वाचन संस्कृती विद्यार्थी जोडला गेला तर तो चांगला विचार करू शकतो. मानसिकता याच काळात घडू शकते. पण हा विचार आताच्या या शैक्षणिक पातळ्यांवर होताना दिसत नाही. माध्यमिक शाळेचे शिक्षक साहित्यविषयक उपक्रम आपल्या शाळांमधे अपवादात्मक राबवताना दिसतात तर प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचीही अशीच परिस्थिती.

मराठीचे प्राध्यापकच भाषेविषयी उदासीन

वाचन संस्कृतीसाठी महाविद्यालयात वाङ्मय मंडळांची स्थापनाही होत नाही. याचं कारण म्हणजे खुद्द मराठी विषयाच्या प्राध्यापकांची भाषेबद्दलची आणि त्या भाषेतील साहित्याबद्दलची उदासीनता. ज्या महाविद्यालयात साहित्याचा विषय घेऊन मुलं पदवीधर होण्याची स्वप्न पाहतात. 

त्याच महाविद्यालयात साहित्यविषयक विशेष गांभीर्यपूर्वक फारसं कार्यक्रम होत नाहीत आणि झाले तर अगदीच हौसेच्या पातळीवर अशातून त्या महाविद्यालयातील किमान भाषेचे विद्यार्थी भविष्यात चांगल्या साहित्य वाचनाकडं किंवा एकूणच वाचनाकडं कसं वळतील, असा प्रश्न सहज उपस्थित होतो. प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्याबद्दल अपवाद वगळता फार काही वाचन संस्कृतीबद्दल बोलायलाच नको.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठीचे उपक्रम

आपल्याकडे वाचन संस्कृती उपक्रम शाळाशाळांनी राबविणे म्हणजे शासनाच्या आदेशाचे पालन करणं एवढ्याच आज्ञाधारक पद्धतीनं शिक्षक कार्यक्रम राबवताना दिसतात परंतु महाराष्ट्रातील अपवादात्मक काही अशा शाळा पाहण्यात आल्याआहेत की, शासनाच्या आदेशापलीकडे जाऊन विद्यार्थी वाचनाकडे वळावा म्हणून स्वतंत्रपणे उपक्रम राबवत आहेत. या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक पातळ्यांवर असे वाचनसंस्कृतीचे उपक्रम राबवून विद्यार्थी वाचनाकडे कसा वळेल याचा इथे विचार करता येईल. 

आता सगळ्या प्राथमिक शाळांमधे ‘किशोर’सारखं मासिक सुरू करण्यात आलं आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. काही ग्रामीण भागातील शाळांनी आपल्या शाळेच्या आवारात वाचन कट्टा निर्माण केलाय. तिथं दिवसातून एक तास वाचनासाठी मुलांना दिला जातो. मुलं वाचन झाल्यावर आपण वाचन केलेल्या ग्रंथावर चर्चा करतात. एवढेच नाही तर वाचलेल्या ग्रंथावर शाळेमधे दर आठवड्याला वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते.

हेही वाचाः वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

दुसऱ्या बाजूला शिक्षक नवनवीन आलेले ग्रंथ स्वतः वाचून त्याच्या संदर्भातली माहिती मुलांना नियमित देतात आणि त्याबद्दलची मुलांची मते जाणून घेतात. आणि आपण वाचलेलं पुस्तक मुलांना हवं असेल तर त्यांना ते वाचायलाही देतात. वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी असे उपक्रम शाळा, महाविद्यालयांमधे राबवणे सहज शक्य आहे. वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी ग्रंथालय हा महत्त्वाचा घटक मानला जातो. 

ग्रंथालयांचा होतोय ऱ्हास

आज अशी परिस्थिती निर्माण झालीय की वाचन संस्कृतीचा अडथळा ग्रंथालयेच ठरण्याची जास्त शक्यता दिसतेय. अनुदान लाटण्यासाठी ग्रंथालयांची गावोगाव निर्मिती करण्यात येत आहे का? अशी परिस्थिती सार्वत्रिक दिसतेय. ज्या ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयात नवनवीन उत्तमोत्तम पुस्तकं ठेवावीत त्या जागी किलोने विक्रीस उपलब्ध असणारी पुस्तकं ठेवली जात आहेत. अर्थात महाराष्ट्रातील सर्वच ग्रंथालयांबदल हे विधान करता येत नाही. 

चांगलं काम करणारी ग्रंथालयं वाचन संस्कृती पुढे घेऊन जाणारा आजचा चेहरा आहे असंही म्हणता येत नाही. ग्रंथालयात चांगली पुस्तक येण्यासाठी ग्रंथपाल अभ्यासू पाहिजे. त्याला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे किंवा ग्रंथालय व्यवस्थापन कमिटीही अभिजात साहित्याची आवड असणारी हवी. 

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

मात्र अलीकडल्या काळात राजकीय व्यक्तींदनी ग्रंथालयं ताब्यात घेतलेली दिसतात. यामागे ग्रंथालयांची भरभराट व्हावी असा त्यांचा अजिबात हेतू नाही, आपल्या शहरातील अनेक संस्था आपल्या ताब्यात असाव्यात एवढाच एक हेतू त्यांचा असतो. पुस्तक त्यांनी वाचणं ही खूप दूरची गोष्ट, पण अगदी चार पुस्तकांची नावे सांगा असं जरी विचारलं तरी त्यांना काही सांगता येणार नाही. अशा व्यक्तींच्या अधिकारात ग्रंथालये असतील तर वाचनसंस्कृतीला ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून कसं काय बळ मिळेल? असा प्रश्न उपस्थित होतोच.

आता गरज सकारात्मक राजकारणाची

दुसऱ्या  बाजूला अनेक ग्रंथालयांवर असणारे पदाधिकारी हे त्या त्या शहरातील स्थानिक पातळीवर लुडबुड करणारे असतात. त्यामुळे चांगली ग्रंथनिवड तर सोडूनच द्या परंतु वर्षभराचं साहित्यिक उपक्रम ग्रंथालयामार्फत राबवलं जात ते म्हणजे एक हौशीचाच मामला असतो. आधी राजकीय मंडळींच्या ताब्यातून ग्रंथालयांची सुटका करून घेण्याची गरज आहे. 

त्याचबरोबर स्थानिक पातळीवरचे सामाजिक, सांस्कृतिक पुढारी समजणारे वर्षानुवर्ष आपल्या शहरातील, गावातील ग्रंथालयांच्या कमिटीवर ठाण मांडून बसले आहेत त्यांना दूर करायला हवे. या कमिटीवर त्या त्या शहरातील जगण्याची समज असणारे, साहित्य हा समाजाचा जगण्याचाच भाग असतो याची जाणीव असणारे चांगले वाचक किंवा त्या शहरातील अभिजात साहित्याचा आग्रह धरणारे तशी भूमिका घेऊन वावरणारे साहित्यिक यांना स्थान द्यायला हवं. 

शासकीय नियमानुसार काही ठराविक उपक्रम ग्रंथालयांना राबवावेच लागतात. मग कोटा पूर्ण करण्याच्या उद्देशानं कोणताही उपक्रम साहित्य रसिकांविना आयोजित होणं बंद होईल. मेंदूनं एक रेषीय विचार करू नये म्हणून ही ज्ञानमंदिरं आपल्या ताब्यात घेण्यासाठी एक सकारात्मक राजकारण खेळण्याची कधी नव्हे एवढी आज गरज निर्माण झालीय.

हेही वाचा: 

डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम

परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…