माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम! 

lock
राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी कडवा शिपाई होतो. घडणीच्या कोवळ्या वयात अस्मितेचं पोषण त्यानं केलं. जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील.

पॅंथरच्या जन्मावेळी ७-८ वर्ष वय असलेल्या आमच्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांतलं विद्रोहाचं प्रात्यक्षिक दिलं ते पॅंथरच्या नेत्यांनी. त्यातही राजा-नामदेवनं. आणि त्यातही पराकोटीच्या कठोर तत्त्वनिष्ठ राजा ढालेनं. सगळे प्रस्थापित संकेत उधळून लावणाऱ्या पॅंथरमधे साहेब म्हणण्याची प्रथा सुरवातीला नव्हती. त्यामुळे राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले हे त्यांच्या पहिल्या नावानेच लोकांमधे ओळखले जात होते.

बाबासाहेबांना आमच्या वडलांनी पाहिलं. त्यांना ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं म्हणून बौद्ध धम्म घेतला. म्हणून आम्हाला शिकवलं. आम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं नाही. त्यांची प्रतिमा घरात, दारात, वस्तीत सर्वत्र. ते देवासमान. आमच्या आधीच्या पिढीला बाबासाहेबांनी माणूस म्हणून उभं केल्यानंच झोपडपट्टीतल्या आमच्या सर्वहारा, वंचित जगण्याला आशय आणि गती होती.

हा आशय आणि गती मंदावण्याच्या आत दलित पॅंथरच्या डरकाळीनं आणि घेतलेल्या झेपेनं आमचं तनमन निखारा झालं. ही व्यवस्था उधळून नवे न्याय्य असं काही निर्माण करायचं हे जीवनध्येय झालं. 

राजाचा माझ्यावर विलक्षण प्रभाव

काय बदलायचं? आपण कसं व्हायचं? याचा माझ्यासमोरचा नमुना राजा ढाले होता. नामदेवचं विद्रोहीपण भावायचं. पण नंतर महत्वाची वाटलेली त्याची भाषा, कवितेतले संदर्भ, वेश्यावस्तीतलं कलंदर जगणं कमीपणाचं वाटायचं. जे नासलेलं, सडलेलं आहे, जो आमचा भूतकाळ आहे त्याची आठवण का जागवायची? ते का पुन्हा रेखाटायचं? ‘बलुतं’ सारख्या आत्मकथनांबद्दलही मला तसंच वाटायचं.

राजा त्यातला नव्हता. आपण ‘दलित’ नाही, बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला दलितपणाच्या दलदलीतून बाहेर काढलंय आणि बौद्ध ही नवी ओळख दिली. ती घेऊन पुढे जायचं, हे राजाचं म्हणणं एकदम पटायचं. म्हणूनच दलित पॅंथर सोडून राजानं ‘मास मुव्हमेंट’ काढली, त्यावेळी बरं वाटलं. दलित शब्द सुटला याचं समाधान वाटलं.

हेही वाचा: मी बंडखोर कसा झालो सांगतायत राजा ढाले

नव्या अस्मितेच्या भरणपोषणाची प्रतीकं त्यानं दिली

त्याच्या दिसण्याबरोबर त्याची भाषा, त्याचं अक्षरही अप्रतिम होतं. त्याच्या अनुकरणाचा मोह स्वाभाविक होता. भौतिक वैभवाची आस बाळगण्याची काहीही शक्यता नसलेल्या त्या काळात भाषा, अक्षर, लिखाण या बिनपैश्याच्या क्षेत्रातल्या वैभवाच्या मागे आम्ही लागलो. वर्षानुवर्षे कोरड्या जमिनीवर पहिल्या सरी पडल्यावर जसे नवे अंकुर सरसरुन उगवतात, तसं हे होतं. ‘श’ आणि ‘ष’ या दोन्हींतल्या उच्चाराचा बारकावा आपल्याला साधला पाहिजे, याची जीवतोड कोशीस आमची असायची.

नव्या अस्मितेच्या भरणपोषणाची प्रतीकं राजानं आम्हाला दिली. २२ प्रतिज्ञांचं कसोशीने पालन, दसरा नाही तर १४ ऑक्टोबर दीक्षा दिन, बौद्ध भिक्खूंच्या अवैज्ञानिक विधि-संस्कारांना नकार, पालीतली बौद्ध विधितली सूक्तं मराठीत अनुवादित करणं याला पुढे शांताराम नांदगावकर संगीत दिलं आणि त्याची कॅसेटही निघाली. तसंच नावाच्या आधी श्री ऐवजी आयुष्मान लावणं, मृत व्यक्तीच्या नावाआधी कै. ऐवजी कालकथित लावणं ही काही उदाहरणं.

हेही वाचा: एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

आमच्यासाठी तो वास्तवातला फॅंटम होता

राजाचा १५ ऑगस्ट १९७२ च्या साधनेतला राष्ट्रध्वजाचा अपमान आणि दलित स्त्रीची अब्रू यात मोठं काय, असा प्रश्न विचारणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख आणि त्या लेखातल्या भाषेनं झालेली खळबळ, वेश्या व्यवसायाच्या गरजेचं समर्थन करणाऱ्या दुर्गा भागवतांना भर सभेत ‘मग त्या व्यवसायाची सुरवात तुमच्यापासून होऊ द्या.’ असं त्याचं सुनावणं, मराठी सारस्वतांच्या साचलेपणापणावर प्रहार करुन रुढ संकेतांना धाब्यावर बसवणाऱ्या लघुनियतकालिकांच्या चळवळीतलं त्याचं नायकत्व, मराठी सारस्वतांचं पीठ असलेल्या सत्यकथेची होळी या घटनांना मी साक्षी नव्हतो.

पण ज्या वातावरणात मी वाढत होतो, तिथं पुढची बरीच वर्षे त्याचे निनाद उमटत होते. राजाचा आमच्या वस्तीत सतत वावर असायचा. त्याच्या अवतीभवती गराडा करुन मोठ्यांबरोबर आम्ही मुलंही असायचो. त्यावेळीही या सगळ्या चर्चा कानावर पडत. आमच्यासाठी तो वास्तवातला फॅंटम होता.

हेही वाचा: शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

त्याच्यामुळे वर्गीय भाषा बोलणाऱ्यांपासून सावध राहता आलं

गवई बंधूंचे डोळे काढण्याच्या जातीय अत्याचाराच्या घटनेने आमच्या वस्त्या पेटून उठल्या. निदर्शने, सभांनी ढवळून निघाल्या. माझ्या गल्लीसमोरही पुढे कधीतरी सभा झाली. त्याला राजा ढाले अन्य नेत्यांसह मंचावर डोळे काढलेले गवई बंधूही होते. या व्यवस्थेला चूड लावण्यासाठी अजून काय साक्षात्कार आम्हाला हवा होता! अशा सभा वस्तीत झाल्यावर खूप उशीर झाला की हे नेते तिथेच थांबायचे. जायला काही साधन नसायचं. मुख्य म्हणजे पैसे नसायचे. वस्तीतच त्यांची जेवणं व्हायची. रात्रभर गप्पा चालायच्या. पहाटे पहिल्या लोकलने ते निघायचे. ते आमचे, आमच्यातले नेते होते. 

नामदेव ढसाळ कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आहे. त्याने काढलेला जाहिरनामा हा पॅंथरचा जाहिरनामा नसून त्यातून ‘नामा’ जाहीर झाला आहे, हे राजाचं विधान मीही अनेकांना ऐकवत असायचो. त्यावेळी पॅंथरची फूट या भूमिकेवर मला योग्य वाटत होती. बुद्धाची रक्तविहिन क्रांती आणि मार्क्सची रक्तरंजित क्रांती यात श्रेष्ठ काय? अर्थात बुद्धाची रक्तविहिन क्रांती! मग जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या का असेनात कम्युनिस्टांशी संबंधित असतील, ज्यांच्या कविता-कथेत वा बोलण्यात वर्गीय भाषा येत असेल अशांपासून कमालीची सावधानता मी बाळगायचो. असे लोक अस्तनीतले निखारे असतात, हा माझा समज होता. नामदेवच्या या डावेपणामुळे त्याच्यापासून आणि त्याच्या कवितांपासूनही मी बराच काळ दूर राहिलो.

हेही वाचा: चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला

आमच्या या फॅंटमच्या मोहजालात मी जवळपास १५ वर्ष होतो. कधीही नमस्ते म्हणायचं नाही. जयभीमच म्हणायचं. मग ते कोणीही असोत. वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना, ते कोणत्या का समाजाचे असेनात, जयभीमच घालायचा, हे माझं ठरलं होतं. शाळेत माझ्याकडे संस्थेची अधिकृत पत्रं लिहायचीही जबाबदारी यायची.

त्यातही नावाच्या आधी आयुष्यमान आणि जयभीम असायचं. संस्थेची प्रमुख मंडळी समाजवादी होती, म्हणून बहुधा त्यांनी हे खपवून घेतलेलं दिसतं. मला कोणी असं करण्यापासून रोखलं नाही. काही बोललेही नाही. त्यांच्या सहनशीलतेची तेव्हा मला कल्पना येणं शक्य नव्हतं. पुरोगामी म्हणवणारे जोवर बौद्ध होत नाहीत, तोवर ते दांभिकच अशी माझी धारणा होती.

राजानं स्वतः संघटित करण्याची जराही तमा न बाळगलेल्या ढालेपंथाचा मी असा कडवा शिपाई होतो. एकप्रकारे तो माझ्यातल्या असहिष्णुतेचाही नायक होता. पुढे मी बदललो. अतिरेकी पंथ सोडला. नामदेव, डावे यांच्याविषयीच्या भूमिका बदलल्या. कर्मठ, शुद्धिवादी बौद्ध राहिलो नाही. राजा ढालेंच्या विचारविश्वाशी संबंध राहिला नाही. तरीही राजा ढाले माझ्यासाठी कायम संदर्भ राहिला. पुढेही राहील. घडणीच्या कोवळ्या वयात जे अस्मितेचं पोषण त्यानं केलं आणि जी अस्मिता पुढच्या तमाम आयुष्यासाठी, अगदी त्याच्या विचाराच्या विरोधात जाण्यासाठीही उपयुक्त ठरली त्यासाठी, या माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला, कालकथित राजा ढालेंना अखेरचा जयभीम!

हेही वाचा: 

कवीच्या जाण्याने काय गेलं, काय उरलं?

आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू

वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…