नरसी नामदेव गावात भेटलेले संत नामदेव

lock
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.

संत नामदेव हे तेराव्या शतकातले. आता सुरू आहे एकविसावं शतक. जवळपास आठशे वर्षं झाली. त्याकाळी नामदेव आजच्या पाकिस्तानापर्यंत पोचले. कदाचित अफगाणिस्तानापर्यंतही. दक्षिणेत अगदी रामेश्वरमपर्यंत त्यांनी तीर्थयात्रा केल्या. या प्रत्येक ठिकाणी आजही त्यांचा कमी अधिक प्रभाव दिसतो.

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तरांचल इतक्या राज्यांमधे तरी त्यांच्या काहीना काही स्मृती आढळतातच. सद्विचारांच्या सूईने देशाच्या एवढ्या मोठ्या प्रदेशाला आठशे वर्षांपूर्वी जोडणं जवळपास अशक्यप्राय गोष्टच. कारण तेव्हा ना आजच्यासारखे रस्ते होते, ना वाहनं. तरीही नामदेवांनी कठीण ते सोपं करून दाखवलं. थोडं गमतीनं म्हणायचं, तर या महान संतांच्या जन्मगावी पोचणं तेराव्या शतकात होतं तेवढंच आजही कठीण आहे.

कृष्णाची गोपिका मुसलमान?

हिंगोलीत साहित्यिक, कवी आणि हिंगोली  बाजार समितीचे सेक्रेटरी डॉ. जब्बार पटेल यांनी संत नामदेवांच्या साहित्यावर पीएचडी केलीय. उत्सुकता होतीच, नामदेव आणि जब्बार पटेल हे कॉम्बिनेशन कसं काय, असं विचारून गेलो. हा प्रश्न त्यांना नेहमीचाच असावा. ‘मुस्लिम असून संत साहित्याचा अभ्यास’ असं विचारायच्या आतच समोरून उत्तर आल, ‘संत हे कोणत्या जाती धर्माचे नसतात. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी जन्म घेतलेला असतो.’

एक सरळ चेंडू आणि मी क्लिन बोल्ड. ‘संत नामदेवांच्या गाथेकडे एक अभ्यास म्हणून वळलो. त्यातून त्यांच्या साहित्यातील अनेक गोष्टींची अनुभूती झाली. संत नामदेव आपल्या जवळच्याच नरसीचे असल्याचं कळाल्यावर अधिकच जवळीक निर्माण झाली.’ जब्बार पटेल बोलत होते. सूर्य आग ओकत होता पण जब्बारभाईंशी गप्पांमधे मनावर जणू पहिल्या पावसाचा शिडकावा होत होता.

हिंदू अंधा तुरक काणा। दो हाते ग्यानी श्याना।

हिंदू पूजे देहुरा। मुसलमान मसीद।

नामें सोई सेव्या। जह देहुरा मसीति ना ।

असं सर्व धर्मांच्या पलीकडे जाणारं तत्त्वज्ञान नामदेवांनी आठशे वर्षांपूर्वी पेरून ठेवलं. आजही त्याला कोंभ फुटताना दिसत आहेत. नामदेवांनी एका गवळणीत श्रीकृष्णाच्या पाच गवळणींचं वर्णन केलं आहे. यातली एक गोपिका मुसलमान आहे. कृष्णाची गोपिका आणि तीही मुस्लिम हे नामदेवांसारखा महान संतच करू जाणे.

हेही वाचा: साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

नामदेवांचं घर राष्ट्रीय स्मारक

जब्बारभाईंचा नामदेवांवरचा अभ्यास गाढा आहे. त्यांच्या पीएचडीचा विषय नामदेवांच्या अभंगाचा होता. त्यांचा प्रबंध हा त्या वर्षीचा युनिवर्सिटीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधही ठरला. पण त्यांचा आवडीचा विषय म्हणजे नामदेवांचं जन्मस्थान. महापुरूषाच्या पाचवीला जन्म, जन्मतिथी आणि जन्मस्थानाविषयीचे वाद पुजलेलेच. नामदेवही त्याला अपवाद नाहीत.

पूर्वी नामदेवांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या ‘नरसी’चे असल्याचं मानलं जात असे. पण बार्शीजवळची ही नरसी कोणालाच कधी सापडली नाही. अनेकजण कृष्णेकाठचा एक नामदेव पार दाखवून कऱ्हाडजवळच्या नरसिंगपूरलाच नरसी मानत. त्यात अनेक मोठे अभ्यासकही होते. खुद्द नामदेव आणि जनाबाईंच्या अभंगांचा दाखला देऊन अनेकजण  नामदेवांचा जन्म पंढरपुरात झाल्याचा दावा करत. पण जब्बारभाई नरसीच्या बाजूने जोरदार खटला चालवतात.

नामदेव हिंगोलीजवळच्या नरसीचेच असल्याचे १४ पुरावे जब्बारभाईंनी आपल्या पुस्तकांतून मांडलेत. नामदेवांचे पूर्वज सांगली जिल्ह्यातल्या शिराळे तालुक्यातल्या रिळे या गावचे. त्यामुळे नामदेवांचे आडनाव शिंपी नाही तर रिळेकर. शिंपी हे आडनाव नसून ही संस्कृती आहे. कापडाच्या व्यापाऱ्यानिमित्त नामदेवांचे मूळपुरूष यदूशेट हे सांगलीहून नरसीला आले होते. त्यानंतर त्यांच्या पाच पिढ्या नरसीला राहिल्याचे पुरावे आहेत. नामदेवांचे वडील दामाशेठ आणि त्यांची आई गोणाई यांचा विवाह नरसी येथेच झाला, याचा उल्लेख नामदेवांच्या अभंगात आहे.

नामदेवांची आई किन्ही गावची. हे गाव एलदरी धरणात गेल्यामुळे सध्या ते परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वसलं आहे. नामदेवांच्या आईने पूत्रप्राप्तीसाठी केशीराजाला नवस केला होता. केशीराज हे नरसीचं ग्रामदैवत. नामदेवांची शिष्या जनाबा ई ही जवळच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथली आहे. नामदेवांचे पूर्वापार घर आणि वस्त्र समाधीमंदिर हे नरसी या गावी आहे. नामदेवांची पुतणी धाडी हिच्या अभंगावरूनही नरसी हेच नामदेवांचे जन्मगाव आहे याला आधार मिळतो. पंजाबातील शीख बांधव नरसीलाच नामदेवांचे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून उभारत आहेत.

हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

आणि गावाला नरसी असं नाव पडलं

नामदेव आपल्या वडिलांसह लहानपणीच पंढरपुराला वारीनिमित्त गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे नामदेवांचे वंशज किंवा नातेवाईक असा कोणताही परिवार सध्या नरसी नामदेव किंवा हिंगोली परिसरात नाही. पण त्यांची जमीन आणि घर नरसी नामदेव या ठिकाणी सर्व्हे क्रमांक ६१ मधे असल्याचे पुरावे सापडतात. शीख भाविक या घराला सात मजली स्मारक म्हणून उभारणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

पूर्वी नरसी बामणी म्हणून ओळखलं जाणारं गाव आता नरसी नामदेव म्हणून ओळखतात. परभणी जिल्हा पूर्वी निजामाच्या हैदराबाद संस्थानात होता. बामणी हे परभणी जिल्ह्यातलं एक पोलिस ठाणं आणि नरसी हे तालुक्याचं ठिकाण. विदर्भाच्या सीमावर्ती भागात लष्कर नरसी ते बामणी अशी गस्त घालत असे. त्यामुळे याला नरसी बामणी असं नाव पडलं. आजही नरसी आणि बामणी ही दोन वेगळी गावं अस्तित्वात आहेत. बामणी हे गाव जिंतूर तालुक्यात गेलं आणि नरसी हे हिंगोली जिल्ह्यात. नरसिंहाचं मंदिर असल्यामुळे या गावाला नरसी असं नाव पडलं. इति जब्बारभाई

नरसी नामदेव गावात नामदेवांच्या काळापासून अठरापगड जातींचे लोक राहतात. साधारण दीड हजार लोक संख्या असलेल्या या गावाची स्थिती आजही फारशी सुधारलेली नाही. मराठवाड्याच्या गावांत दिसतात तशी जुनी पडकी घरं. टिपिकल खेडेगाव शोभावं असा या गावाचा चेहरा मोहरा. नरसी नामदेव हे नामदेवांचे जन्मठिकाण असल्याचा सुगावा १९९७ मधे शीख भाविकांना लागला. त्यानंतर या गावाचा थोडाफार विकास झालेला दिसतो.

सरकाच्या दुटप्पी धोरणाबद्दल संताप

जब्बारभाईंचा निरोप घेऊन मी हिंगोलीहून नरसीला निघालो. राष्ट्रसंत नामदेव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सतीश विडोळकर सोबत होते. त्यांनी प्रवासात ट्रस्टने केलेले उपक्रम सांगितले.  आतापर्यंत कोणत्याही देवस्थानात नाही इतक्या समित्या विडोळकरांनी केल्यात. पाणीपुरवठा, माहिती जनसंपर्क आदी, अर्थ आणि नियोजन, यात्रा उत्सव समिती. यातून नरसी नामदेवमधील अनेकांना या कामात सहभागी करून घेतलं.

तसंच मंदिर परिसरात एक सभागृहही उभारलंय. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संस्थानाने स्वतःच्या पैशातून शेडही उभारलं. गर्दीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेत. संस्थानाला तिर्थ क्षेत्राचं स्वरूप यावं, म्हणून काही प्रमाणात जागाही त्यांनी विकत घेतली. त्याला संरक्षक भिंती घातल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानाच्यामार्फत अखंड वीणा पहारा समाधी मंदिरात सुरू आहे. या परिसरातील ७० गावांनी हा वीणा पहारा वाटून घेतला. प्रत्येक जण आपला नंबर आल्यावर या ठिकाणी येतो आणि खडा पहारा देतो. मात्र, यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून झालेल्या बेपर्वाईचाही पाढा वाचला. ‘मराठवाडा ही संतांची भूमी. परंतु, सरकारचं दुर्लक्ष होत. संत नामदेवांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला असता, तर त्यांच्या जन्मगावाच्या विकासासाठी सरकारनेच पुढाकार घेतला असता.’

विडोळकरांच्या बोलण्यात चीड जाणवत होती. ‘नरसीला शासनाने ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय. पण अजूनही विकास कामं झालेली नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातल्या संतांची समाधीस्थळं आणि मराठवाड्यातील समाधीस्थळं यांच्यात जमीन आसमानचा फरक दिसतो. शासनाने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलंय.’ त्यांच्या बोलण्यात सरकाच्या दुटप्पी धोरणाबद्दल संताप होता.

हेही वाचा: संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

दोन वस्त्रसमाधी मंदिरं

नरसी नामदेव गावात प्रवेश करण्यापूर्वीच विकासाच्या दुष्काळाची चाहूल लागते. बोअरिंग आणि विहिरीच्या पाण्यावर गावाची गुजराण होते. पण गावात समाधीस्थळापर्यंत जायचा रस्ता आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती येणार होते. त्यामुळे हा रस्ता तयार झाला. झैलसिंग आले नाहीत पण त्यांच्यानिमित्ताने गावात रस्ता आला. जो अजूनही आहे. गावाच्या नाक्यावर काही टपऱ्या आहेत. गावात साधं पोलिस ठाणंही नाही.

त्या ऐतिहासिक रस्त्याने आम्ही समाधीपर्य़ंत पोहचलो. गावापासून उत्तरेला एक किलोमीटर अंतरावर नामदेवांचे समाधीमंदिर आहे. नामदेवांची नरसीतील समाधी ही संजीवन समाधी नाही तर वस्त्रसमाधी आहे. नामदेवांचे वस्त्र घेऊन ही समाधी बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. नदीकाठी गर्द झाडीच्या परिसरात नामदेवांची एक सोडून दोन वस्त्रसमाधी मंदिरं आढळतात. दोन समाधीमंदिरं कशी याचीही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे.

पूर्वी नामदेव महाराजांचे एकच वस्त्रसमाधी मंदिर होते. ते येथील गुरवाच्या ताब्यात होतं. कालांतराने गावात गुरवाची दोन घरं झाली. मराठवाड्यात समाधीवर शंकराची पिंड ठेवण्याची पद्धत आहे. समाधीमंदिराच्या परिसरात अशा अनेक समाधी आहेत. त्यातल्याच एका पिंडीवर दुसऱ्या गुरवानं नामदेव महाराजांचा मुखवटा तयार करून बसवला आणि नित्यनियमाने पूजा करू लागला. त्यामुळे आता या परिसरात नामदेवांची दोन समाधीमंदिरं दिसतात. दुसऱ्या समाधी मंदिराचा मुखवटा हा एका शंकराच्या पिंडीवर असल्याचं कुणीही पाहू शकतं.  

मुख्य समाधीमंदिरातील काळ्या पाषाणात घडविलेली संत नामदेवांची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. विठू-रुखमाईच्या पार्श्वभूमीवर असलेली नामदेवांची मूर्ती भक्ताशी संवाद साधते की काय असं वाटतं. मूर्तीची सजावट अत्यंत साध्या पद्धतीनं पण आकर्षक केलेली असते. मराठवाड्यातील ग्रामीण ढंगात बांधलेला फेटा आणि कपडे यामुळे नामदेव प्रत्यक्षात या ठिकाणी असल्याचा भास होतो. या काळात गर्दी नसल्याने मनसोक्त दर्शन घेता येते. गर्दी पापमोक्षदा एकादशीला असते.

कयाधू नदीत अस्थी विरघळतात

आषाढी वारीत पांडुरंगाच्या दर्शनानंतर पापमोक्षदा एकादशीला वारकरी नरसी येथील नामदेवांचे दर्शन घेऊनच आपल्या घरी जातात. सुमारे एक ते दोन लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात, असं मंदिराच्या माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष गिरीश वरूडकर यांनी सांगितलं. नांदेडला जे शीख भाविक येतात, ते या ठिकाणी दर्शनाला येतात. मराठी भाविकांपेक्षा शीख भाविक नामदेवांना अधिक मानतात. या ठिकाणी दानपेटीत डॉलर आणि पौंडही मिळतात, असं काही गावकऱ्यांनी सांगितलं.

मंदिराच्या परिसरात शंकर महाराज सातारकर यांचं नव्याने बांधलेलं मंदिर आहे. शंकर महाराज यांनीच नामदेवांच्या समाधीमंदिराचा जीर्णोद्धार केला. शंकर महाराजांचे साधारण तीस वर्षे या ठिकाणी वास्तव्य होतं. सुरूवातीला त्यांनी जवळच असलेल्या कयाधू नदीवर घाट बांधला. १९८० मधे सध्या असलेल्या समाधी मंदिराच्या केवळ भिंती बांधलेल्या होत्या. शंकर महाराजांनी दर एकादशीला इथे येणाऱ्या भाविकांकडून एक-एक रुपया गोळा केला. त्याची पावती देऊन हे मंदिर उभे केलं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचीही समाधी आणि त्यावर मंदिरही बांधण्यात आले आहे.

समाधी मंदिर कयाधू नदीच्या काठी आहे. ‘आपली काया धूते अशी ती’ कयाधू नदी‘. अस्थी विसर्जनासाठी अनेक जण विदर्भ मराठवाड्यातून या ठिकाणी येतात. समाधी मंदिरासमोरील नदीच्या ठराविक भागात मृत व्यक्तींच्या अस्थी पाण्यात विसर्जित केल्या तर त्या विरघळतात. अजूनही याचे सायंटिफीक कारण समजू शकलेलं नाही. मेलेल्यांच्या हाडाचं ठीक आहे. पण जिवंत माणसांची हाडंही नदीच्या पाण्यात जास्तवेळ राहिलं की ठिसूळ होतात. गावकरी तसे आपले अनुभव सांगतात.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

एक मराठी नामदेव आणि दुसरे पंजाबी

समाधीमंदिराचं दर्शन घेतल्यावर आता नामदेवांचे मूळ घर पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे विडोळकरांना ते घर दाखविण्याचे विनंती केली. या ठिकाणी नामदेव कोणाचे या वादाची ठिणगी पहिल्यांदा दिसली. मंदिर आणि मंदिराचा परिसर हा नामदेव महाराज ट्रस्टच्या अख्यारित येतो. पण नामदेवांचं घर हे सध्या पंजाबमधून आलेल्या शीख भाविकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे विडोळकर या ठिकाणी जाण्यास उत्सुक नव्हते. ‘घर पाहण्यासाठी शिखांकडून चावी घ्यावी लागते, मला ते पटत नाही, म्हणून मी अजिबात त्या ठिकाणी जात नाही, विडोळकरांनी आपली बाजू मांडली.

घर पाहिल्याशिवाय नरसीला येण्याचा उद्देशच सफल होणार नव्हता. आग्रह केल्यानंतर विडोळकरांनी गाडी वळवली. एका चिंचोळ्या रस्त्यातून वाट काढत आम्ही एका घरासमोर थांबलो. सिमेंट काँक्रिटने पहिले दोन मजले बांधलेले घर पाहून मला प्रथम विश्वास बसला नाही. भल्या मोठ्या लोखंडी गेटमधून आत प्रवेश केला. प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला एक मोठी विहीर होती. ही विहीर बांधण्यासाठी ब्रिटनमधील जसवीर कौर भट्ट यांनी २००३मधे ७९ हजार ८०० रुपये देणगी दिल्याची दगडी पाटी होती.

दुमजली भव्य वास्तूत प्रवेश केल्यावर एक ७० बाय ३५ फुटांचे जुने दगडी बांधकाम असलेली एक छोटी वास्तू पाहायला मिळाली. हे ते नामदेवांचे मूळ घर. घराच्या मध्यभागी एक छोटा दरवाजा आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी उजवीकडून एक छोटा दरवाजा आहे. कोणताही माणूस खाली बसूनच या ठिकाणी प्रवेश करू शकतो. याची देखभाल शीख भाविक करतात. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने आपल्याला डोके झाकून आत प्रवेश करावा लागतो.

डोकं न झाकता या ठिकाणी प्रवेश करायला बंदी आहे. या ठिकाणी पोहचल्यावर नामदेवांचं दुसरंच रूप पाहायला मिळतं. आपले नेहमीचे पुणेरी पगडी, बाराबंदी, धोतर आणि वीणेतले नामदेव इथे नाहीत. इथे त्यांच्या डोक्यावर शिखांचं पागोटं, वाढलेली दाढी मिशी, हातात वीणेऐवजी एकतारा. मी हे नामदेव  पहिल्यांदाच पाहत होते. नसरीमधे नामदेवांच्या दोन समाधी आहेत. तसेच दोन नामदेवही. एक मराठी नामदेव आणि दुसरे पंजाबी.

नामदेवांचं घर आणि परिसर म्हणजे मिनी पंजाबच

नामदेवांच्या घराची देखभाल आता शीख भाविक करतात. पंजाबमधील विशेषतः शिंपी समाजातील एक व्यक्ती दीड-दोन महिना सेवा देण्यासाठी या ठिकाणी येतो. दिवसभर येणाऱ्या भाविकांना प्रसाद देणं, परिसराची देखभाल करणं हे यांचं काम. पंजाबमें छिपा समाजही नहीं, हर एक सिख भगत नामदेवजीको मानता है. उन्होंने जो काम किया है, वह हमारे लिये भगवानसे भी बढकर है’ असं देखभाल करणारे म्हणत.

छिपा हे शिंपीचंच पंजाबी रूप. नामदेवांनीही हिंदी पदांत आपल्याला छिपा म्हटलं आहे. आजूबाजूला नजर टाकली की आपण पंजाबमधे आहोत की काय असा भास होतो. भिंतीवरील फोटो, बैठक व्यवस्था सगळंच शीख संस्कृतीतलं. त्यात भर म्हणून प्रीतमसिंग यांची पंजाबी लहेजातील हिंदी बोली.

सध्या शीख भाविकांच्या ताब्यात असलेल्या जागेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगण्यात येतात. नरसीची माहिती कळल्यावर १९९५ मधे कुलदीपसिंग, त्यांची बहीण दिलीप कौर आणि आणखी एका सदस्याने या ठिकाणाला भेट दिली. ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, जागेचा मूळ मालक जागा विकण्यास तयारच नव्हता. त्यावेळी याठिकाणी समीर नावाचा एक मुलगा आला. त्याने या तिघांना नामदेवांचा प्रसाद म्हणून एक मोसंबी दिली. तिघांनी मोसंबीचा प्रसाद खाल्ला आणि समीरचा निरोप घेऊन ते पुन्हा पंजाबला गेले. 

दोन महिन्यांनी ट्रस्टची स्थापना केल्यावर ते पुन्हा नरसीत आले. त्यावेळी त्यांनी समीरची चौकशी केली. ते शाळेत गेले. त्यांनी शिक्षकांना विचारलं. समीर नावाचा दहावीत शिकणारा मुलगा आहे का?  त्यावर शिक्षकांनी सांगितलं की आमच्या शाळेत समीर नावाचा मुलगाच शिकायला नाही. तिघांना आश्चर्य वाटलं. नामदेवांनीच समीर म्हणून या तिघांना दर्शन दिल्याची मान्यता शीख भाविकांमधे आहे. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण या कथेमुळे पंजाबी भाविकांत नरसीविषयी भक्तिभाव जागवण्यात मदत झाली हे नक्की.

शिखांना ही जागा ताब्यात घेणं सोपं नव्हतंच. वर्षानुवर्षं अडगळीत पडलेल्या या वास्तूसाठी जागेचा मालक अव्वाच्या सव्वा किंमतीची मागणी करीत होता. शिखांना गावात कुणी उभं करत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सुरूवातीला मराठी माणसांच्या नावे जमीन खरेदी केली. मग ही जमीन त्या मराठी माणसांनी संतशिरोमणी भगत नामदेवजी गुरूद्वारा ट्रस्टला दान केली. आता ही जमीन कोणाच्याही मालकीची नसून तिला केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या वास्तूभोवती वर्गणीतून एक सातमजली मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे.

नामदेवांचे वडिलोपार्जित घर पाहिल्यावर गावतलं केशवराजाचं मंदिर पाहायचं होतं. नामदेवांच्या अभंगात केशीराज अनेकदा भेटतात. केशीराज आणि विठ्ठल अनेकदा समानार्थानेच येतात. त्यामुळे बालपणी नामदेवांनी विठ्ठलाला दूध पाजल्याची आख्यायिका केशीराजांच्यासंबंधीही आहेच. नामदेवांकडून दूध पिणाऱ्या केशवराजाचं मंदिर नामदेवांच्या घराच्या मागच्या गल्लीत आहे. जमिनीच्या खाली एका भुयारात हे देऊळ आहे. तेथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. मंदिराची पडझड झाली आहे. मंदिराचा कळस पूर्णपणे ढासळला आहे. या ठिकाणी मंदिर आहे, हे कोणी सांगितल्यावरच आपल्या लक्षात येतं.

मंदिराच्या समोर एक पुरातन कुंड आहे. या कुंडात पाणी असायचं. आता यात फक्त कचरा आणि घाणच आहे. नरसीमधे सध्या शिंपी समाजाची एकदोनच घरं आहेत. तीही नामदेवांच्या वंशातली नाहीत. नामदेवांचा परिवार वारीनिमित्त पंढरपूराला गेला आणि तेथेच स्थायिक झाला. त्यांनी पुन्हा कधीही हिंगोलीकडे मोर्चा वळविला नाही.

हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

नामदेवांच्या जीवनावर बनवलेली सीडी

विडोळकरांनी मला हिंगोलीला सोडलं. तिथे बालाजी पाठक नावाच्या पत्रकाराशी ओळख झाली. पुढील पडाव औढा नागनाथ असल्याचं त्यांना सांगितले. त्यांनी आपल्या बाईकने औंढाला सोडण्याची तयारी दर्शविली. पेट्रोल भरण्यासाठी गाडी पेट्रोलपंपाकडे वळवली. योगायोग म्हणतात तो याला. पंपाचे मालक बांगर यांनी पाठकांना नमस्कार केला. पाठकांना माझी ओळख करून दिली. नामदेवांची माहिती घेण्यासाठी मुंबईहून आल्याचं सांगितलं. बांगर म्हणाले, मोतीराम इंगोले आणि पंकज अग्रवाल यांना भेटायलाच हवं. त्यांनी नामदेवांवर सीडी काढली आहे. औंढा नागनाथला जाणारे आम्ही पुन्हा हिंगोलीला परतलो.

हिंगोलीच्या मध्यमवर्गीय लोकवस्तीत मोतीराम इंगोले यांचं घर. आमचं फोनवर आधी बोलणं झाल्यामुळे पंकज अग्रवालही आले होते. चार वर्षांपूर्वी नांदेड येथील गुरुतागद्दीला ३०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इंगोले आणि अग्रवाल यांनी संत नामदेवांच्या जीवनावर माहितीपट असणारी सीडी काढली होती. डॉक्युमेंट्री बनवायचं तांत्रिक प्रशिक्षण नव्हतं. तरीही या दोन्ही अवलियांनी सीडी काढण्याचं धाडस केलं. यासाठी ते पंजाब, राजस्थान आणि नामदेवांचा प्रभाव असलेल्या ठिकाणी जाऊन आले. मला त्यांनी सीडी दिली.

विडोळकर यांच्याबरोबर नरसीला गेल्यावर माझा ग्रह थोडा मराठी नामदेव विरुद्ध पंजाबी नामदेव असा झाला होता. पण इंगोले आणि अग्रवाल सांगत होते ती बाजू वेगळीच होती. ‘नामदेवांना महाराष्ट्रापेक्षा अधिक पंजाबमधील लोक मानतात. शीख भाविकांनी घुमान येथे नामदेवांची सोन्याची मूर्ती तयार केलीय. तसंच घुमानच्या प्रत्येक गाडीवर आणि दुकानावर धन धन बाबा नामदेव असं लिहिलेलं असतं.

घुमानमधील प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानात जाण्यापूर्वी १० रुपयांच्या दोन नोटा एक दानपेटीत टाकतो आणि दुसरी नामदेवांचा आशीर्वाद म्हणून दुकानाच्या गल्ल्यामधे ठेवतो. इंगोले आणि अग्रवाल हे सांगताना अत्यंत भारावले होते. गुरूद्वाराला भेट दिल्याशिवाय तुमची नरसीची भेट अपूर्ण असल्याचं इंगोले म्हणाले. उशीर झाला होता. म्हणून हिंगोलीत एक दिवस मुक्काम वाढवला.

तर सोन्याचं मंदिर बनवलं असतं

आता रात्र मोकळी होती. नामदेवांविषयी बोलण्यासाठी आम्ही सुनील केदारींना भेटलो. हे सरकारी अधिकारी. पण त्यांचे विचार व्यापक. ‘नामदेव हे राष्ट्रसंत आहेत. त्यांना एखाद्या जातीपुरतं सीमित करून ठेवलं तर इतर त्याकडे लक्ष देत नाहीत. नामदेव आमच्या समाजाचे असं म्हटल्यावर इतर समाज आपला संत शोधतो. आणि नामदेवांच्या कार्याकडे दुर्लक्ष करतो.

नामदेव सर्वांचे असं म्हटल्यावर या ठिकाणी सर्वजण हिरीरीने भाग घेतील. नरसीला मोठ्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होईल. त्याने हिंगोली आणि नरसीचा विकास होईल‘, केदारी पोटतिडकीने सांगत होते. ‘गावात एका मारवाड्याने हनुमानाचं मंदिर उभारलंय, पण तिकडे कुणी कुत्रपण फिरकत नाही. पण येथील दर्ग्यावर मुस्लमानांपेक्षा हिंदू अधिक जातात. कारण दर्गा हा कोणाच्या मालकीचा नाही. त्यामुळे लोकांची तिथे रोजच गर्दी असते.‘

दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा बाळाजी पाठक आले. त्यांच्या बाईकवर बसून नरसीतील गुरूद्वारा गाठला. नरसीपासून दोन किलोमीटरवर असलेला हा गुरुद्वारा खरं तर नरसीहून हिंगोलीला जातानाच दिसला होता. पण विडोळकरांचं गुरुद्वारावाल्यांशी पटत नसल्यानं त्यांनी गाडी थांबवली नव्हती. सुमारे २५ एकरच्या परिसरात असलेला हा गुरूद्वारा डोळ्यात मावत नव्हता. १९९६ पासून या गुरूद्वाराचे बांधकाम सुरू आहे. समाधीमंदिराचा परिसर आणि गुरूद्वारा यातील व्यवस्थापन आणि शिस्त यात जमीनअस्मानाचा फरक होता.

दहा हजार स्क्वेअर फूटांचा लहान गुरूद्वारा आहे. आता सुमारे एक एकराच्या परिसरात एक नवीन गुरूद्वारा बांधण्याचं काम सुरूय. ‘गुरुद्वाराका काम कभी भी खतम नही होंदा. सेवेकरी पैसा भेजते है, वैसा गुरूद्वारा का काम शुरू रहता है. हमें ना पंजाब सरकार मदद करती हैं. ना महाराष्ट्र सरकार. यह भगत नामदेवजी का महिमा है की यहां पर हम ये गुरूद्वारा बना सके’, गुरूद्वारा कमिटीचे अकाऊंटंट संताप व्यक्त करत होते.

’हमे यहां गॅस का सिलेंडर कमर्शियल रेट से मिलता है. हम यहां क्या कमर्शियल काम करते है?  सरकारसे एक पैसेकी मदत नही और ऐसे तंग किया जाता है. भगत नामदेवजी को जाके नौसौ साल हो गये, यहां उनके वास्ते कुछ नही किया. भगतजी हमारे पंजाब में पैदा होते तो हम पुरा मंदिर सोनेका बना देते, अकौंटंटसाहिब खूपच चिडून बोलत होते. त्यांचं काही चुकतही नव्हतं. गेल्या १५ वर्षात शीख भाविकांनी भरभरून दान केल्यामुळे या पंचवीस एकर जमिनीचे रुपडंच पालटलं आहे. येत्या काही वर्षात मोठ्या गुरूद्वाराचे काम पूर्ण झाल्यावर जुन्या गुरूद्वारात लंगर सुरू करण्यात येईल. त्यानंतर मागील जमीन ताब्यात घेऊन तिथे गार्डन, भक्तनिवास बनविण्यात येईल, असं गुरूद्वाराचे माहिती अधिकारी सांगत होते.

हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

राजस्थानमधले नामदेव वारकरी वेशातलेच

गुरूद्वाराच्या परिसरात फिरताना एक सत्तरेक वर्षांची व्यक्ती कुतुहलाने आमच्याकडे पाहत होती. गुरुद्वारावाले आम्हाला सांगत होते, ते लक्ष देऊन ऐकत होती. आम्ही निघत होतो. तेवढ्यात त्यांनी आम्हाला बोलावलं. दानाराम छिपा. हे रिटायर्ट सिनिअर टीचर. ते राजस्थानचे होते हे त्यांच्या वागण्या, बोलण्या आणि दिसण्यातून कळतच होतं. भारत-पाकिस्तान सीमेवरील श्रीगंगानगरचे हे रहिवासी.

राजस्थानातील शिंपी समाजातील नामदेवांचे भक्त. त्यांनी राजस्थानाच्या ओबीसी समाजासाठी आरक्षणाची लढाई लढली होती. नामदेव आणि समाजासाठी आता पुढील आयुष्य वेचायचं असं त्यांनी ठरवलं होतं. नामदेवांच्या प्रेमापोटी त्यांनी तीन ते चार वेळा पंढरपूरला भेट दिली. ते पहिल्यांदाच नरसीला आले होते.

दोन दिवस मराठी नामदेव आणि पंजाबी नामदेव भेटत होतेच. आता राजस्थानी नामदेव कसे आहेत हे समजून घेण्याची उत्सुकता होती. दानारामजींचं उत्तर सविस्तर होतं. महाराष्ट्रात नामदेव वारकरी वेशातील तर पंजाबात पगडी आणि दाढी असलेले. १९८०मधे यासंदर्भात खरंखोटं ठरवण्यासाठी छबिल कमिटी स्थापन झाली होती. गुरू गोविंद सिंगांनी शीखांची खालसा फौज तयार केली ती सोळा सतव्याच्या शतकात. धर्मासाठी बलिदान करण्यासाठी तयार असलेल्या पंच प्यारे यांना शीख धर्मात मानाचं स्थान आहे. त्यातील एक सरदार मोकमसिंग शिंपी समाजाचे होते.

गुरू गोविंद सिंगापासून घरातली एक व्यक्ती शीख बनू लागला. त्यानी पाच ककार बाळगण्याचा नियम होता. त्यात केस वाढवणं होतंच. त्यापूर्वी त्यांना पगडी, दाढी नव्हती. त्यामुळे तेराव्या शतकातल्या नामदेवांनी केस वाढवून पगडी घातील असेल असं वाटत नाही. पण देश तसा वेश याप्रमाणे शीख आपल्याप्रमाणेच नामदेवांना पाहतात. पण मुळात महाराष्ट्रीय वेशभूषा असलेल्या नामदेवांनाच आम्ही मानतो. आम्हा राजस्थानींसाठी ते वारकरी वेशातच कायम राहिले. असे दानाराम सांगत होते.

नामदेव शिंपी पण तेलुगू नामदेव शिंपी

आता पुन्हा परभणीकडे जाणं भाग होतं. परभणीत शिंपी समाजातील काही मंडळी भेटली. शहरात शिंपी समाजाची साधारण १५० घरं आहेत. यांची आडनावे बहुतांशी वैदर्भीय धाटणीची आहेत. विदर्भासारखं इथेही करच्या ऐवजी वार लावतात. उदा. गटलेवार, पेंडलवार, रापतवार, संगेवार. नरसीला जाण्यासाठी परभणीहून जाणंच सोयीचं आहे. त्यामुळे बहुसंख्य तीर्थयात्री परभणीला येतातत. त्यामुळे परभणीतही नामदेव महाराजांचे मोठे मंदिर बांधण्याचा मनोदय असल्याचं या मंडळींनी सांगितलं. या माध्यमातून पर्यटनालाही वाव मिळेल आणि समाजातील एक दोन जणांना रोजगार मिळेल, असं त्यांनी बोलून दाखविलं.

परभणीहून पुन्हा देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. शेजारी जनाबाईंच्या गावचे म्हणजे गंगाखेडचे डॉ. सिद्धेश्वर होते. त्यांच्याशी बोलणं सुरू होतं. नरसी आणि नामदेवांचा उल्लेख झाला आणि समोरच्या बर्थवर बसलेल्या व्यक्तीचे डोळे चमकले. त्यांचं नाव होतं श्रीनिवास संगा. तेही आमच्या गप्पांत सामील झाले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मीही नामदेव शिंपी पण तेलुगू नामदेव शिंपी.

त्यांच्या तीन चार पिढ्या मुंबईत असल्यामुळे ते मराठी उत्तम बोलत होते. ते सांगत होते, आम्ही सारे शिंपीच. पण भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे त्या त्या भाषेनुसार नावं बदलली. पूर्वी आंध्र प्रदेशात शिंपी समाजाला छिप्पा म्हणून ओळखलं जायचं. आता मेरू म्हणून ओळखलं जातं. काही लोक स्वतःची जात मेरा म्हणूनही लिहितात. तर काही मेरलू पण म्हणतात. शिंपी समाजातील व्यक्तींनी आंध्रप्रदेशात आडनावपुढे वार लावले आहे. पण त्यांनी मुंबईत  किंवा महाराष्ट्रात आल्यावर आपलं नाव कर करून घेतलं आहे.

शिंपी हा शब्द शिंपल्यांवरून आला. आमचे महाराज नामदेव यांचा जन्म शिंपल्यातून झाल्याचं आमच्या पूर्वजांनी सांगितलंय. हे खरं की खोटं आहे कोण जाणे. पण त्यामुळेच शिंपल्यावरून शिंपी झालं असावं असं म्हटलं जातं. आपल्या गुरूमहाराजांचा जन्म शिंपल्यातून झाल्याने आम्ही शिंपले खात नाही. मुंबईत कामाठीपुरा येथे आमच्या समाजाचं मोठं मंदिर आहे. अखिल भारतीय शिंपी मेरू समाज अशी आमची मुंबईत ओळख आहे. लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात मेरू समाजाची दुकानं आहेत, असं संगा सांगत होते.

दादर आलं. आणि संगा उतरले. मी त्यांना खिडकीतून निरोप देत होतो. दोन दिवसांत भेटलेले नामदेव डोळ्यासमोरून पुढे जात होते. संगांचे तेलुगू नामदेव. दानाराम छिपांचे राजस्थानी नामदेव. गुरुद्वाऱ्यातले पंजाबी नामदेव. विडोळकरांचे मराठी नामदेव. नामदेव एकच, पण मला दोन दिवस वेगवेगळी रूपं घेऊन भेटत होते. त्यांच्या जन्मगावीच त्यांनी मला विश्वरूपदर्शन दिलं. एका वैश्विक संताचं विश्वरूपदर्शन. मी आजच्या ग्लोबल खेड्याचा रहिवासीही आठशे वर्षांपूर्वीच्या या ग्लोबल संतासमोर नम्र होतो.

हेही वाचा: 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…