…आणि तरीही सरदारजींवरचे जोक बंद होत नाहीत

lock
आज गुरूनानकांची जयंती. गुरूनानकांनी शीख धर्म स्थापन केला. मुळात सरदारजी लढवय्ये आणि ताठ बाण्याचे. पण त्यांच्यावरच्या विनोदांनी त्यांची प्रतिमा बदलून टाकली आहे. सरदारजी आज प्रत्येक क्षेत्रात चमकतायत. तरीही हे विनोद कमी होत नाहीत. 

‘ए आज तुमचा सण आहे ना?’ गल्लीतली मुलं एकमेकांना चिडवत होती. गुरुनानक जयंतीची सुट्टी होती आणि एकमेकांना विचारणं सुरु होतं. गुरुनानक हे शीख धर्माचे जनक. म्हणजे तमाम सरदारजींचे धर्मगुरू. सरदारजी म्हटलं की हल्ली सर्वांनाच हसू फुटतं. लहान मुलांना तर सरदारजी साफ बिनडोक वाटतात. त्यांच्याशी सारखे विनोद केले जातात. एसएमएसमुळे तर सरदारजींवर नवेनवे विनोद करायचं पेवच फुटलंय. 

रजनीकांत आणि रवी जडेजा यांच्यामुळे सरदारजींना थोडा ‘आराम’ मिळालाय. पण एरवी कुठलेही विनोद सरदारजींवर बनवले जाण्याची प्रथाच पडली आहे. खरंच सरदारजी विनोद करावेत एवढे बिनडोक आहेत? मुळीच नाही. ते तडफदार असतात. त्यांचं रक्त लगेच उसळतं. त्यातून ते एखादी चुकीची किंवा वेडसर वाटावी अशी कृती करतात. आणि म्हणून त्यांना बिनडोक ठरवलं जातं.

गुरूनानकांचा विनोदी स्वभाव

गंमतीची गोष्ट म्हणजे खुद्द गुरु नानक हे महान संत विनोदी स्वभावाचे होते. ते नेहमी हसत खेळत तत्वज्ञान समजवायचे. याबाबत बऱ्याच कथा प्रचलित आहेत. एकदा हरिद्वारात गंगेत स्नान करून एक ब्राह्मण सूर्याला अर्ध्य देत होता. ते गुरूंनी पहिले आणि मग त्यांनी पूर्वेऐवजी पश्चिमेला तोंड करून पाणी उडवायला सुरवात केली. 

त्याचं हे चमत्कारिक वागणं पाहून त्यांना कुणीतरी विचारलं ‘आपण काय करता आहात?” तेव्हा नानक म्हणाले ‘मी माझ्या पंजाबमधल्या शेताला पाणी घालतोय.’ तेव्हा सगळी आजूबाजूची लोक हसायला लागली. त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘तुम्ही इथे गुरुद्वारला आणि तुमचं पाणी तुमच्या शेतात कसं पोहचणार?’ 

त्यावर नानक ताडकन म्हणाले, ‘अरे जर तुम्ही इथून जे पाणी सोडता ते त्या सूर्याला मिळतं तर मी उडवलेलं पाणी पंजाबला का नाही जाणार?’ तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं गुरूंना अंधश्रद्धा पसंत नाहीत. सांगायचा मुद्दा हा गुरु नानकही विनोदी होते. पण त्यांचे अनुयायी उलट लढवय्ये, गंभीर म्हणून जास्त प्रसिद्ध झाले.

नवज्योतसिंगचा सिद्धूईझम

आपण नावाजलेले सरदारजी बघूया. ते तडफदारच आढळतात. पण वादविवाद हा त्यांना त्यांच्या एखाद्या कृतीने चिकटलेला दिसतो. नवज्योतसिंग सिद्धू यांचं उदाहरण या दृष्टीनं बोलकं आहे. एकदा वाहतूक कोंडीत ते अडकले होते. त्यांची पुढे असलेल्या मोटारवाल्याशी हाणामारी झाली आणि तो माणूस जबर जखमी होऊन मरण पावला. पुढे कोर्ट कचेरीमधे हे प्रकरण गेलं. सिद्धु यांना पासपोर्ट मिळतानाही त्रास झाला. 

सिद्धू हे एक वेगळंच रसायन आहे. एकदा इंग्लंड दौऱ्यात आपल्याला योग्य वागणूक मिळत नाही असं वाटल्यावरून त्यांनी सरळ बॅग भरली होती आणि दौरा अर्धवट सोडून तो भारतात निघून आला होता. आधी खूप कमी बोलणारा सिद्धू नंतर टीवीवरचा सर्वात लोकप्रिय आणि सूत्रसंचालक मानला गेला. 

त्याच्या बडबडीला सिद्धूईझम असंही कौतुकानं बोललं जातं. इतकंच नाही तर तो खासदारही बनला होता. संसदेतही तो गप्प बसायचा नाही तर आपले मुद्दे हिरीरीने मांडायचा. आपल्या व्यक्तिमत्वात त्याने आमुलाग्र बदल करून दाखवलाय यात शंका नाही.

हेही वाचा : अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

मिल्खा सिंगचे विनोद किती खरे?

क्रिकेटबद्दलच बोलायचं तर बिशन बेदीही आणखी एक नावाजलेला दुसरा क्रिकेटपटू. बेदी आधी पतौडीच्या हाताखाली खेळत असताना शांत होते. त्याच्या फिरकीला जगानं सलाम केला आणि मग ते निर्भीड लढवय्या बनले. जेव्हा ते भारताचे कर्णधार झाले तेव्हा त्यांनी आक्रमकपणे नेतृत्व करायला घेतलं. 

बेदी पुढे भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले आणि त्याचे खेळाडूंशी खटके उडणं रोजचचं झालं. त्यांना बेशिस्त खपायची नाही. संघाची कामगिरी खराब व्हायला लागल्यावर ते सरळ पत्रकारांना म्हणाले होते, ‘या संघाला पॅसिफीक महासागरात बुडवायला पाहिजे.’ बेदीच्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं कधीच नसतं. बेदीकडून नेहमीच रोखठोक मतं ऐकायला मिळतात. बेदी आताही आयपीएल बंद करा असं ठामपणे सांगतात. आयपीएलमुळे क्रिकेटचं नुकसान झाल्याचं मत ते निर्भीडपणे मांडतात.
 
कृपालसिंग आणि मिल्खा सिंग हे दोघे बंधू फार पूर्वी भारतीय संघाकडून खेळले. त्यांच्याही आधी लालसिंग हे शीख क्रिकेटपटू झाले. ते क्षेत्ररक्षणात अव्वल होता. मिल्खासिंग याच्यावरून विनोद तयार झाला होता. त्यांना एकदा सहज आरामात पहुडलेला पाहून एका इंग्लिश पत्रकारानं प्रश्न केला, ‘आर यु रिलॅक्सींग?’ त्यावर मिल्खा सिंग म्हणाले, ‘नो आय अम मिल्खा सिंग’ हा विनोद किती खरा किती खोटा ते सांगणं कठीण आहे.

माळ्यांचा सत्कार करणारा शीख खेळाडू

संधू हा विलक्षण क्रिकेटपटू होता. ते चेंडू चांगला स्विंग करायचे. त्यांनीच १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका अप्रतिम इनस्विंगवर ग्रिनीजची दांडी गुल करून भारताच्या एका अशक्यप्राय वाटणाऱ्या विजयाचा पाया घातला होता. संधू आचरेकर सरांचे शिष्य होते. अंगाने धट्टेकट्टे. सरांचा त्यांच्यावर खूप विश्वास. ते कमी बोलणारे आणि गंभीर प्रवृत्तीचे होते. म्हणून बऱ्याचदा सरांना जेव्हा मुलांचा सराव घेतेवेळी बाहेर कामानिमित्त जावं लागायचं तेव्हा ते सगळी सूत्रे संधू यांच्याकडे द्यायचे.

त्यांचा धाक मुलांना असायचा. ते स्वतः सराव करायचेच आणि मुलांनाही मोकळीक द्यायचे नाहीत. ते एकटे असे क्रिकेटपटू होते जे दरवर्षी मैदानांची निगराणी करणाऱ्या माळ्यांचा सत्कार करायचे.

हॉकीतही शिखांचं वर्चस्व

हॉकी म्हणजे सरदारजी असं भारतात एके काळी समीकरण होतं. पंजाब आणि हरयाणाला हॉकीनं झपाटलं होतं. ध्यानचंद, बलवीरसिंग आणि पालसिंग, सुरजितसिंग, सुरिंदर लोधी या सरदार हॉकीपटूंनी एक अनोखी परंपरा जपली होती. त्यांची देशासाठी खेळण्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती. पाकिस्तान हा तेव्हा भारताचा परंपरागत प्रतिस्पर्धी असायचा आणि हे सरदार जीव तोडून हॉकी खेळायचे. 

१९८२ च्या आशियाई स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत पाकिस्तानने धुव्वा उडवला होता. गोली वीररंजन नेगी हा हास्याचा विषय ठरला होता. याच घटनेवर चक डे इंडिया हा चित्रपट निर्मिला गेला. तेव्हा सरदारजींना मेल्याहून मेल्यासारखं वाटलं होतं. सरदारजींचे हॉकीप्रेम अफलातून. 

जेव्हा पंजाबी खेळाडूंचा भरणा हॉकी संघात होता तेव्हा हे खेळाडू इतके देशप्रेमाने भरलेले दिसायचे की त्यांना विशेष सोयी, सवलती, मानधन मिळत नव्हतं तरी त्याचं वाईट वाटायचं नाही. आशियामधे किंवा अगदी युरोपातही स्पर्धेसाठी गेले तर हॉटेलमधे रहाणं, जेवण परवडत नसल्यानं हे खेळाडू सरळ जवळपास असलेला गुरुद्वारा गाठायचे. खुशाल तिथं रहायचे. एक तर तिथं अस्सल घरचं जेवण मिळायचं आणि वातावरणही घरच्यासारखं लाभायचं. कुठं स्पर्धा जिंकली की गुरुद्वारामधे जाऊन गुरूंचे आभार मानायला ते चुकायचे नाहीत. 

हॉकीचं समालोचनही शिखानेच करावं असं वाटायला जसदेव सिंग यांनी लावले होते. उंच पुरे, दणकट जसदेव समालोचन करायला लागले की संपूर्णपणे खेळत रंगून जायचे. चेंडूचा जसा प्रवास व्हायचा त्या वेगाने ते समालोचन करायचे. ते गोल झाल्यावर इतक्या उत्स्फुर्तपणे ओरडायचे की वाटावं ‘परमानंद’ म्हणतात तो हाच असावा.

हेही वाचा :  …म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे!

रेकॉर्ड मोडण्याऱ्याला पाच लाखांचं बक्षीस

शीख फक्त क्रिकेट, हॉकी खेळण्यात माहिर असं म्हणता यायचं नाही. ते प्रत्येक खेळात दिसतात. मिल्खा सिंग हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपटही निघाला आहे. मिल्खाचे ऑलिम्पिक पदक काही सेकंदाने हुकले. तरीसुद्धा त्याने केलेला पराक्रम छोटा नव्हता. नंतरही त्यांची विक्रमी वेळ वर्षानुवर्षे भारतीयांसाठी विक्रमीच राहिली होती. स्वतः मिल्खाने बक्षीस जाहीर केले, ‘माझा विक्रम मोडेल त्याला मी लाख रुपये देईन.’ असं काही शीखच बोलू करू शकतात. त्यांची तडफ यातूनच दिसते.

मिल्खासारखं जगभर कौतुक आणखी कुणा शीख ऍथलेटचं झालं असेल तर ते फौझा सिंगचं. ३६ वर्षांचे होईस्तोवर एक धावपटू म्हणून त्यांनी कारकीर्द केली. मग निवृत्ती पत्करली. नंतर नातवाबरोबर रोज चालण्याचा, धावण्याचा व्यायाम करताना त्यांना ८९ व्या वर्षी मॅरेथॉन मधे भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सहा वर्षे त्यांनी अनेक मॅरेथॉन मधे भाग घेतला. वयाच्या शंभरी गाठल्यावरही त्यांचा उत्साह कायम होता. 

एकदा एका शीख युवकाची मुस्लिम समजून हत्या झाली होती. त्यामुळे शीखांमधे संतापाची लाट उसळली होती. आमच्याकडे संशयाने बघू नका, हे दर्शवण्यासाठी या मॅरेथॉनमधे धावण्याचं फौजाने ठरवलं. ते धावत असताना लादेन, लादेन असे त्यांना चिडवलंही गेलं. पण ते विचलित झाले नाहीत. या स्पर्धेने त्यांना सर्वाधिक आनंद दिला. 

शिखांसाठी कुठलाही खेळ वर्ज्य राहिलेला नाही. मनजित दुआ हा टेबल टेनिसपटूसुद्धा चांगला लोकप्रिय होता. पण सरदारजींवर विनोद करताना ‘सरदारजी बुद्धिबळ खेळतो’ हा विनोद मात्र केला जातो. सरदारजींना डोकं नसतं या गैरसमजुतीमधून असे विनोद फैलावलेत.

शीख अधिकाऱ्यामुळे पाकिस्तान आला शरण

सरदारजींनी रणांगणावर गाजवलेले पराक्रम तर फार मोठे आहेत. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला भारताने चोप दिला तो काही हुशार आणि शूर सरदारजींमुळे. आजही भारतीय लष्करात सरदारजींचा टक्का मोठा आहे. सुमारे चाळीस टक्के शीख आहेत. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्या हिमतीने ते निभावून आहेत.

१९७१ मधे जगजीत सिंग अरोरा हे पश्चिम आघाडीचे सूत्रधार होते. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानात घुसून तिरंगा फडकवण्याचा पराक्रम भारतीय सैन्याने केला होता. कच्छच्या रणात रणगाडे घालून पाकिस्तानने मोठी खेळी केली होती. रणरणत्या उन्हात तेव्हा चान्द्पुरी या शीख अधिकाऱ्याने हवाई दलाची मदत मागवली आणि पाकिस्तानचा डाव उलटवला. पाकिस्तानचे जनरल नियाझी भारतीय लष्कराला शरण आले होते. 

भारताचा धगधगता इतिहास शिखांनीच धगधगता ठेवलाय. महान क्रांतिकारक भगतसिंग हा सरदारजीच होता. त्याच्या हौतात्म्याने अनेकांना क्रांती करण्याची प्रेरणा दिली आणि जालियनवाला बाग प्रकरणाने तर प्रत्येक भारतीय पेटून उठला. हा इतिहास आणि लष्करातले सरदारजींचे योगदान यामुळे सरदारजी म्हणजे लढवय्या हे समीकरणच बनले आहे.

‘बारा बजे’ म्हणणं शिखांचा अपमान

सरदारजीचा त्याही मागचा इतिहास असीम शौर्याने भरलेला आहे. त्यांचे झालेले गुरु हे सगळे तेजस्वी होते. गुरु गोविंद सिंग यांनी तर मोगलांना सुद्धा धूप घातला नव्हता. त्यांनी पाहणी करावी आणि त्यांच्यासाठी आपला प्रण पणाला लावणारे सैनिक पुढे यावेत ही नित्याची बाब बनली होती. 
त्या काळी जी युद्धे किंवा लढाया व्हायच्या तेव्हा सरदारजी साधारण रात्री बाराचे सुमारास हल्ला करायला निघायचे. ही वेळ शत्रूला गाफील ठेऊन त्याचा बिमोड करायला योग्य असल्याचा अनुभव या सरदारजींना आला होता. 

ते बारा वाजता गल्ला करायचे म्हणून त्यांना ‘बारा बजे’ असं चिडवलं जातं. हा खरं तर त्या वेळच्या पराक्रमी शिखांचा अपमान आहे. बारा बजे म्हटल्यावर सरदारजी का चिडतात? याचे खरे कारण हे आहे. सगळ्या गोष्टी विनोदाने घेण्याच्या मानसिकतेने भारतीयांचे खरे तर आज हसू होतंय.

हेही वाचा : तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

क्रांतिकारी आणि अतिरेकी यांच्यात फरक

सरदारजी असे मनस्वी असल्यानेच जेव्हा त्यांच्या सन्मानाला ठेच पोहचली तेव्हा ते खलिस्तान करायचे वेड घेऊन राहिले होते. खालीस्तानचे वेड राजकारणातून पसरवलं गेलं. पण त्याची किंमत पंजाबला मोजावी लागली. जेव्हा भारतातून अलग होऊन खलिस्तान जन्माला घालण्याची प्रतिज्ञा भिंद्रनवाले याने केली तेव्हा त्याला काही राजकारण्यांची फूस होती.

शीख अतिरेक्यांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ‘ब्लू स्टार ऑपरेशन’ करायला पंतप्रधान इंदिराजींनी हिरवा कंदील दाखवला आणि मंदिराच्या परिसरात मुक्कामाला असलेल्या असंख्य अतिरेक्यांशी भारतीय लष्कराला मुकाबला करावा लागला. हि ऑपरेशनची जखम लगेच भरून येण्यासारखी नव्हतीच. सरदारजी दुखावले गेले होते. पंजाब अशांत राहिला होता. तो मात्र नंतर हळूहळू शांत झाला. ब्लू स्टार ऑपरेशननंतर पंजाबचे मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला मंदिरात भाविकांची पादत्राणे साफ करायलाही बसले. सरदारजींचा राग शांत होणे कठीण. तो असा मलमपट्टीने शांत केला गेला.

आजही अधनंमधनं त्यावेळच्या आठवणी अनेक सरदार तरुणांना हिंसा करण्यात उद्युक्त करतात. जे अतिरेकी म्हणून मानले गेले त्यांची छायाचित्रे कवटाळून त्यांना क्रांतिकारक म्हणण्याची, त्यांचा सन्मान करायची चाल कुणी खेळत असतो. स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतर अतिरेकी आणि क्रांतिकारक यांची व्याख्या पंजाबने जेवढी स्पष्ट केली तेवढी इतर कुणी नसेल. देशसाठी जो लढतो, तो क्रांतिकारक पण तो प्रतिस्पर्ध्यांसाठी दहशतवादी, अतिरेकी असतो हे पंजाबनं पाहिलं. मार्ग चुकला की क्रांतिकारकाचा अतिरेकी होतो हे भिन्द्रन्वालेने घालून दिलेले उदाहरण आहे.

मनमोहनसिंग म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान

पंजाबमधे अकाली दलाची स्थापना धर्मकरणातून झाली. आज पंजाबमधे राजकारण बहुतांशी धर्मावर बेतलेले आहे. पण पंजाबने सर्वात भाग्याचा क्षण कुठला पहिला असेल तर तो एक सरदारजी देशाचा पंतप्रधान झाला तो क्षण. डॉ. मनमोहन सिंग हे पंजाबने दिलेले पहिले पंतप्रधान होते. 

त्यांची स्वच्छ प्रतिमा, मोजकं, जुजबी आणि अभ्यासपूर्ण बोलणारे सिंग हे सरळमार्गी. कुठल्या वादात ते कधी अडकले नाहीत. त्यांनी स्वतःचा प्रचार कधी केला नव्हता. एवढंच काय त्यांची निवडही राज्यसभेमार्फत व्हायची. यामुळे निवडणूक लढवण्यासाठी लागणारे छक्केपंजेही त्यांना ठाऊक नव्हते.

पंजाबचं पीक आणि गीत खासच!

पंजाब हा सुपीक प्रदेश मानला जातो. नद्या आणि धरणांमुळे तो सुजलाम सुफलाम आहे. म्हणूनच इथला शेतकरी सधन आहे. देशच्या एकूण गव्हाच्या उत्पन्नातला मोठा वाटा पंजाबचा असतो. देशाच्या संरक्षणाची आणि अन्नाची मोठ्या प्रमाणात जबाबदारी ही पंजाबने, तिथल्या सरदारजींनी उचलली आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.

ट्रॅक्टर चालवण्याचा पायंडा तिथल्याच शेतकऱ्यांनी घातला. त्यांनी आधुनिक शेतीला नाही म्हटले नाही. त्याचबरोबर बैसाखीसारखा सण देशात साजरा करण्यात उत्साहही दाखवला. आज बैसाखी देशभर साजरा होतो. धान्य घरी आल्यावर शेतकऱ्याला होणारा आनंद बैसाखीद्वारा तो साजरा करतो.

पंजाबमधली लोकगीतांची परंपरा अनोखी आहे. त्यांचा भांगडा हा नृत्यप्रकार तर आज देशविदेशात धूम माजवून आहे. भांगडा हा जल्लोष पैदा करणारा नृत्यप्रकार आहे. अगदी भगतसिंगसारखा क्रांतिकारकसुद्धा गीतसंगीताबद्दल आवड ठेऊन होता. रंग दे बसंती चोला हे त्याचे आवडतं गाणं. याशिवाय सिम्रनजीत मान, सुखवीर, मिक्का हे टिपिकल ‘सरदारजी’च्या रुपात कधी दिसत नसले तरी ते खरे सरदारजीच आहेत. चित्रपटसृष्टीत सरदारजी होते आणि आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात

पंजाबी पदार्थांमुळेच हॉटेल्स चालतात

धर्मेंद्रने आपल्या पिळदार शरीरयष्टीने ‘ही मॅन’ हिरोची इमेज हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा आणली. सरदारजी फॅशन डिझायनिंगमधेही आहेत. बलिया या फॅशन डिझायनरचं नाव तहलीयानी, मल्होत्रा ह्यांच्या बरोबरीने घेतलं जातं.

सरदारजींची आणखी एक पहेचान म्हणजे त्यांचे खाणे. मक्के की रोटी आणि सरसोंका साग हे त्यांचं खाणं सर्वश्रुत आहे. भरपूर आणि सकस खाण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. हरेभरे खेत त्यांच्या भुकेला शमवतात. गहू, मका ही पीकं तिथे भरपूर निघतात. तिथली हवा, वातावरण भरपूर जेवायला, खायला अनुकूल असल्याने वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्याचा चस्का तिथल्या गृहिणींना असतो. 

पंजाबी पदार्थ आज देशविदेशात लोकप्रिय आहेत. पंजाबी डिशेश आज सगळ्या हॉटेलमध्ये उपलब्ध असतात. भाज्यांचे अनंत प्रकार आज खायला मिळतात. हॉटेल आणि धाबा आज चालतात ते पंजाबी खाद्य प्रकारांमुळेच. दाक्षिणात्य प्रकारांचा कंटाळा आल्यावर पंजाबी लाटेने चांगला बदल आणला.

साहित्यात शीख महिलाही अग्रेसर

आणखी काही क्षेत्रांचा विचार केला तर साहित्य क्षेत्र आपल्याला विसरून चालणार नाही. सरदारजी किंवा शीख ह्यांच्या धर्माचे प्रतीकच मुळी एक पुस्तक आहे. त्यांचा ग्रंथसाहेब गुरु नानक ह्यांनी लिहिलेला ग्रंथ. ह्याचीच ते पूजा करतात. गुरुद्वारामध्ये ग्रंथाचीच स्थापना केलेली असते. ह्या ग्रंथाला धूप दाखवण्यापासून वारा घालण्यापर्यंत सगळे सोपस्कार केले जातात. शबर कीर्तन इथे सतत चाललेले असते.

‘शबर’चे सरदारजी उपासक आहेत. साहित्य कृतीवर आधारित त्यांचा धर्म आहे. त्यांच्यातले काही साहित्यिक चांगले लोकप्रिय झाले. गाजले. अगदी पंजाबीच नव्हे तर इंग्रजीतही कसदार लिखाण करून राहिले. खुशवंत सिंह हे नाव त्या दृष्टीने घ्यावे लागेल. खुशवंत सिंह ह्यांनी शिखांचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी चालेल. पक्के धर्मनिरपेक्षवादी असल्याने त्यांना धार्मिक दंगली झाल्यावर संताप यायचा. त्यांनी १९७४ मध्ये पद्मश्री मिळवला होता. 

महिलांमधली साहित्यिका अमृता प्रीतम. यांना कुणी विसरणे अशक्य आहे. फाळणीनंतर भारतात येत असताना हिंसाचार बघितलेल्या अमृता प्रीतम यांनी कविता लिहिली ती आजही जगभर विविध भाषांमध्ये अनुवादित होते. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिलीत. त्यात काव्यसंग्रह अधिक आहेत.

भांबावलेपणासाठी सरदारजींना माफ केलं जात नाही

सरदारजी मनस्वी असतात. देहाने आणि मनाने. त्यांना दणकट, बळकट रहायला आवडतं. एक घाव दोन तुकडे हा त्यांचा बाणा असतो. ते प्रेम आणि दुष्मनी दोन्ही मनापासून करतात. ध्येयासाठी इर्श्येला पेटतात. लढण्याची वृत्ती त्यांच्यात जन्मतःच असते. पण ते नुसतेच झगडणारे, भांडणारे, लढणारे नाहीत. ते तेवढेच कल्पक, खिलाडू, प्रामाणिकही असतात. रसिक असतात. काहीशी निरागसता त्यांच्यात असते.

एकदा बोरीवली स्टेशनच्या ४ नंबर प्लॅटफॉर्मवर गाड्यांच्या डब्याचे क्रमांक दाखवणाऱ्या पाट्या वर लटकवलेल्या आहेत. एकदा एक उंचापुरा पण वयोवृद्ध सरदारजी त्या पाट्या बघून आपला बारा क्रमांकाचा डबा कुठे येईल हे शोधत होता. त्याने डावीकडे पाहिलं. त्याला तेरा क्रमांकाच्या डब्याची पाटी दिसली. आणि उजवीकडे अकरा क्रमांकाची. तो थोडा बावचळला. त्याने न बाजुला उभ्या असलेल्या एकाला विचारलं, ‘बारवा डब्बा कहा आयेगा?’ तो इसम म्हणाला, ‘आप खडे है इधरही’. 

‘लेकीन बोर्ड कहा है?’ त्या सरदारजीने न रहावून विचारलं. बाराव्या क्रमांकाचा बोर्ड बरोबर हा सरदारजी उभा होता त्याच्या डोक्यावर लटकलेला होता. त्यामुळे त्याला तो दिसला नव्हता. अशा ह्या धांदलीवरून आजूबाजूचे हळूच हसले. ‘सरदारजी तो सरदारजीही रहेगा.’ असंही काहीजण म्हणाले. खरं तर असा भांबावलेपणा कुणाकडूनही घडतो. पण सरदारजींना त्याबद्दल कुणी माफ करत नाही. त्यांच्यावर आम्ही लगेच विनोद करतो.

हेही वाचा : 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…