रानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती!

lock
आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती. न्यायमूर्ती रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे. हे गौरवोद्गार आहेत रा. ना. चव्हाण यांचे.

रा ना चव्हाण यांच्या लेखांचं संपादन करून ‘प्रबोधनपुरुष न्या. म. गो. रानडे आणि ऋषितुल्य डॉ. रा. गो. भांडारकरः एक सम्यक आकलन’ या नावाने पुणे प्रार्थना समाजाने एक पुस्तक प्रकाशित केलंय. रमेश चव्हाण यांनी या पुस्तकाचं संपादन केलंय. पुस्तकात ‘न्या. रानडे यांची सर्वांगिणता’ या शीर्षकाचा अत्यंत वाचनीय लेख आहे. रयत शिक्षण पत्रिकेच्या जानेवारी – फेब्रुवारी १९८० च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.

न्या. रानडे आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या तीव्र मतभेद होते. दोघांमधली मैत्री कायम होती. त्यांच्यातला संवादही अखेरपर्यंत राहिला. रानडेंच्या बाबतीतले असे अनेक ऐतिहासिक किस्से आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १७८ व्या जयंतीनिमित्ताने या पुस्तकातला रानडेंच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या रा. ना. चव्हाण लेखाचा हा संपादित अंश.

 

न्या. रानडे यांची गणना आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारात होते. न्या. रानड्यांची सर्वांगीणता आणि आवाका आजही चिंत्य आणि अभ्यसनीय ठरतो. रानडे मवाळ आणि नेमस्त होते म्हणून ते देशाभिमानी देशसेवक नव्हते, असे आता तरी कोणताही नि:पक्षपाती विवेकवंत म्हणणार नाही. रानड्यांची थोरवी सर्वांगीण आहे.

प्राचीन आणि आधुनिक विचारप्रवाहांचा समन्वय, धर्म आणि परिवर्तनवादी दृष्टी, अखिल भारतीय दृष्टिकोन, लोकाभिमुखता वगैरे अनेक खास पैलू रानडे यांच्या कार्याला होते. सर्वसंग्राहक, दूरदर्शी असा रानड्यांचा शांत आणि सोशिक स्वभाव होता. उत्कट आणि भव्य असा फार मोठा भाग त्यांच्या विचारात आणि कार्यात आजही आढळतो. रानडे कालबाह्य झाले नाहीत. बहुजन समूहाच्या शिक्षणार्थ रानड्यांनी प्रारंभी महत्त्वाचे प्रयत्न केले.

रानड्यांनी त्रिकालाचा अभ्यास केला होता

अव्वल इंग्रजीत रानडे न्यायाधीश होते. त्यांनी अनेक गंभीर विषय विद्वत्तापूर्वक मांडले होते. न्यायशील मन असल्यामुळे त्यांचे विचार समतोल आणि व्यापक वाटतात. रानड्यांचा पिंड आध्यात्मिक आणि प्रार्थनाशील होता. आत्मपरीक्षण हा त्यांचा स्थायीभाव होता. पारमार्थिक उन्नतीच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी इहवादी अशा अनेक लोकोपयुक्त क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली. रानड्यांचे गुणाधिक्य, कार्याधिक्य सुपरिणामाधिक्य यांचे विवेचन लाभदायक आणि मार्गदर्शक ठरणारे आहे.

भावनिक ऐक्य, तौलनिक अभ्यास आणि विशेषत: समन्वय वगैरे अनेक गुण या प्राज्ञ पुरुषोत्तमाच्या ठायी होते. ऋषीकाळ, संतांचा काळ आणि इंग्रज आल्यानंतर प्राप्त झालेली इंग्रजी विद्या (वाघिणीचे दूध) या त्रिकालाचा अभ्यास रानड्यांच्यात सामावतो.

रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी आणि निधन १६ जानेवारी १९०१ रोजी झाले. साठ वर्षे पुरी होण्याच्या आतच रानड्यांना काळाने नेले! ५९ वर्षांच्या आयुष्यात रानड्यांनी भारतात आणि महाराष्ट्रातही नवा काळ घडविण्यासाठी अपार कष्ट उपसले.

हेही वाचा : आरंभशुरांनी धडा घ्यावा असं न्यायमूर्ती रानडेंच व्यक्तिमत्त्व

रानड्यांच्या घरी सगळ्या जातीची मंडळी जेवत

रानडे पुण्यास न्यायाधीश असल्यामुळे त्यांचे संबंध सर्व लोकांशी येत. शिवाय रानडे सार्वजनिक कार्यकर्ते आणि वजनदार पुढारी होते. राष्ट्रीय सभेशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. राष्ट्रीय सभेची तिच्या बालवयात रानडे वगैरे नेमस्तांनी जोपासना केली. सन १८८१ चा सुमार होता. रानड्यांच्या घरी एक भोजन समारंभ झाला. सुमारे पन्नास आमंत्रित भोजनास आले होते; त्यात डॉ. विश्राम रामजी घोले, रा. ब. नारायण भाई दांडेकर, रा. ब. गणपतराव माळकर ही पुण्यातील अब्राह्मण प्रसिद्ध पुढारी मंडळीदेखील आली होती. 

लगेच या भोजनाच्या प्रसंगाची बातमी ‘पुणे वैभवात’ नकाशासह आली. सातारा प्रकरणात भाग घेतलेल्या नातू घराण्यातील एका पुरुषाने, शंकराचार्य यांच्याकडे धाव घेतली. शंकराचार्यांनी भवति न भवति करून ‘प्रायश्चित’ द्यावं, असा या फिर्यादीचा निकाल केला. असल्या अनेक अडचणी सोसूनही रानड्यांनी सतत पुढील मार्ग काढला.

कित्येकांनी रानड्यांच्या विसंगतीचे आणि हार खाल्लेल्या प्रसंगांचे भरपूर मनसोक्त भांडवल केले, काळ पुष्कळ पालटला आहे. त्या वेळची अव्वल इंग्रजीतील एकत्र कुटुंब पद्धती, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हल्ली राहिली नाही. रानड्यांच्या नंतर अनेक वर्षे लोटून गेली. पूर्ण स्वातंत्र्य आलेले आहे. मोठी व्यक्तीदेखील काळानुरूप असते. रानडे यांचे चरित्र आणि कार्य हेच दाखविते.

फुलेंनी सार्वजनिक सभेचा विरोध का केला?

रानड्यांनी सर्व पक्ष आणि सर्व जातीधर्मातील मित्रांचा संग्रह केला होता. रानड्यांचे महाराष्ट्राबाहेर प्रत्येक प्रांतात मित्र आणि चाहते जास्त होते. किंबहुना इतर प्रांतातील पुढारी लोकच रानड्यांची योग्यता अधिक जाणत होते.

१८५७ च्या उठावाच्या वेळी रानडे पंधरा वर्षांचे होते. पुढे पुण्यास सार्वजनिक सभा इ. स. १८७० साली स्थापन झाली. या सभेशी न्यायमूर्ती रानडे, लो. टिळक, आगरकर वगैरेंचा संबंध आला. विद्येत मागासलेल्या वर्गांपैकी कै. हरी रावजी चिपळूणकर आणि गंगारामभाऊ म्हस्के वकील हे सार्वजनिक सभेचे सभासद होते.

जोतीराव फुले सार्वजनिक सभेचे आणि पुढील राष्ट्रीय सभेचेही सभासद नव्हते. त्यांनी या सभांना विरोध का केला, याची कारणे स्वत: दिली आहेत. ही कारणे आज तशीच राहिली नाहीत आणि जोतीरावांच्या काळातही स्वतंत्र विचार आणि कृती करणारे गंगारामभाऊंसारखे विचारवंत होते. उदा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या वेळी कोल्हापूरचे शाहू महाराज सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रथमपासून होते. हा काळ १८८० नंतरचा होता.

न्या. रानडे हे मराठ्यांच्या शिक्षणाचे एक आद्य प्रवर्तक होते. ही जमेची बाजू फारशी ज्ञात असलेली आढळली नाही. न. र. फाटक यांनी लिहिलेले रानडे चरित्र प्रसिद्ध आहे, द्वितीयावृत्तीदेखील निघाली आहे. या लेखात दिलेली माहिती फाटककृत रानडे चरित्रात आलेली नाही. काही वर्षांमागे प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या वार्षिक उत्सवात वाईला वयोवृद्ध श्री. फाटक आले होते. मला मिळालेली पुढील माहिती श्री. फाटक यांना उपलब्ध नव्हती, असे त्यांनी सांगितले.

पहिली मराठ्यांची संस्था स्थापन केली

डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या हीरक महोत्सव ग्रंथात आणि पुढील एका प्रतिवृत्तात रानड्यांच्या छायाचित्रासह त्यांच्या कार्याची माहिती कृतज्ञतेने दिलेली आहे. वयोवृद्ध श्री. पांडुरंग चिमणाजी पाटील (जन्म १८७७) यांच्या ‘माझ्या आठवणी’ (१९६४) या पुस्तकाच्या उपलब्धतेमुळे अधिक भर पडली. रानडे पुष्कळांना सल्ला तर देत, पण दुसर्यांचाही सल्ला घेत.

उदा. – ‘‘सन १८७५ साली दयानंद सरस्वती यांची जाहीर व्याख्याने रानडे यांनीच पुण्यास ठेवली आणि शेवटी दयानंदांची मिरवणूकही काढण्याचे योजिले. सनातनी पक्षाच्या कारवाईची खबर रानड्यांना अगोदर लागली. रानडे यांनी त्यांचे मित्र गंगारामभाऊ म्हस्के यांचा सल्ला घेतला आणि पोलीस बंदोबस्त ठेवला.’’ (श्री. पाटील पां. चि. माझ्या आठवणी – पान १०६ आणि १०७) म्हस्के यांना प्रथमपासून शिक्षणप्रसाराची सक्रीय कळकळ होती.

म्हस्के आणि रानडे यांनी अगदी पहिली मराठ्यांची संस्था स्थापिली. या संस्थेचे रानडे प्रथमचे पेट्रन झाले. गंगारामभाऊ म्हस्के हे पहिले सेक्रेटरी होते. ‘रानडे-म्हस्के’ युती मोठी शुभ आणि महत्त्वाची ठरली. रानड्यांचे मित्र म्हस्के हे नाशिक जिल्ह्यातील ओढे रंगरावाचे येथे अत्यंत गरीब मराठे कुटुंबात सन १८३१ साली जन्म पावले. पुण्यास मिशन स्कूलमधून इंग्रजी शिकले.

कॅन्टोनमेंट मॅजिस्ट्रेटचे शिरस्तेदार होते. पुढे कायद्याचा अभ्यास करून वकील झाले आणि मोठा लौकिक मिळविला. रानडे पुण्यास न्यायाधीशाच्या जागेवर असताना, म्हस्के यांचा रानड्यांशी परिचय वाढला. रानड्यांच्या बरोबर पुण्यातील विविध सार्वजनिक कार्यात यांनी भाग घेतला. कँप एज्युकेशन सोसायटी स्थापण्याच्या कामात म्हस्के यांचा पुढाकार होता. पहिल्या प्लेगच्या वेळी चीफ व्हालंटिअर होते.

हेही वाचा : आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

बहुजन सुधारल्याशिवाय ब्राम्हण काय करणार?

रानडे दि. १६ जानेवारी १९०१ रोजी वारले. याच साली गंगारामभाऊ (२९ एप्रिल रोजी) निधन पावले. या दोघांवर ‘केसरी’मधे मृत्यूलेख आले ते वाचनीय आहेत. दोघांच्या निधनामुळे बहुजन समाजाच्या शैक्षणिक चळवळीचे नुकसान झाले. म्हस्के यांचे छायाचित्र उपलब्ध आहे. म्हस्के ब्राह्मणी पगडी परिधान करीत. त्या काळात वकिलांचा असा ठरावीक पोषाख असे. म्हस्के बहुजनातील पहिले वकील.

रानड्यांच्या बरोबर सार्वजनिक सभेच्या कार्यातही भाग घेत. म्हस्के-रानडे यांना सन १८८३ मधे स्थापन केलेल्या वरील डे. मराठा एज्युकेशन (पुणे) या संस्थेस प्रथम यथाशक्ती साह्य करणार्यांत लोकहितवादी, आगरकर, गोखले वगैरे रानड्यांना मानणारी अनेक प्रागतिक आणि उदार मंडळी सामील होती. रानड्यांच्या वजनाचा परिणाम होता. हा काळ समाजप्रबोधनाचा होता.

सन १८८० मधे न्यू इंग्लिश स्कूल पुण्यास निघाले. पुढील वर्षी केसरी आणि मराठा चालू झाला. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. पुढे सन १८८५ मधे इंडियन नॅशनल काँग्रेस, मुंबई येथे स्थापन झाली. राजकीय जागृतीलाही सुरवात होत होती. परंतु शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर जास्त विचारविनिमय चालू असे. म्हस्के यांच्याप्रमाणेच गरिबीतून शिकून बडोद्याच्या गादीवर आलेल्या सयाजीरावांना मराठे आणि तत्सम लोकांच्या विद्येत मागासलेपणाबद्दल सक्रीय खंत वाटे.

डेक्कनच्या मराठांच्या संस्थेची स्थापना झाली

गंगारामभाऊ म्हस्के यांना ही मोठी संधी वाटली. पुण्यातील उदारमतवादी आणि रानड्यांचे सुधारक स्नेही आपणास मदत करतील अशी त्यांना खात्री वाटली आणि न्या. रानड्यांचा त्यांनी सल्ला घेतला. रानडे म्हणाले, ‘‘आपण जरूर प्रयत्न करू या. बहुजन समाज सुधारल्याशिवाय लहानशी ब्राह्मण जात काय करू शकेल?’’ पूर्वी सन १८७३ नंतर पुणे सत्यशोधक समाजामार्फत काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स देण्याचा उपक्रम म. फुले यांनी चालू केला होता.

पण सत्यशोधक समाजाची स्थिर संस्था कधी झालीच नाही. गंगारामभाऊंनी एक पहिली सभा बोलाविली. या सभेत न्या. रानडे, सरदार कुपुस्वामी मुदलियार, खा. ब. नवरोजी फ्रामजी, खा. ब. काझी शहाबुद्दीन, प्रो. गो. कृ. गोखले, हरी नारायण आपटे, रा. ब., सि. वि. पटवर्धन वगैरे न्यायमूर्तींचे मित्र उपस्थित झाले. ८ जानेवारी १८८३ रोजी हिरा बागेतील टाऊन हॉलमधे विद्येत मागासलेल्या वर्गामधे शिक्षणप्रसार कसा करावा, यासंबंधी चर्चा झाली.

अध्यक्ष सर वुइल्यम वेडरबर्न होते. मराठे आणि तत्सम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कामी उत्तेजन मिळावे म्हणून स्कॉलरशिप देण्यासाठी ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ ही स्वतंत्र संस्था स्थापण्यात आली. रानडे यांनी आपल्या नावे दरमहा तीन रुपयांची स्कॉलरशिप ठेवली आणि नंतर रानडे यांनी त्यांचे मृत्यूपत्रात एक हजार रुपये ट्रस्टमधे ठेवले आणि या रकमेचे व्याज या संस्थेला मिळण्याची कायमची व्यवस्था केली.

प्रथम संस्था स्थापण्याच्या वेळी स्वत: तीनचार हजारांची देणगी दिली, पुढे फलटण बडोदे आणि कोल्हापूर वगैरे मराठी संस्थानिकांनी या संस्थेस सढळ हस्ते देणग्या दिल्या. पण या वृक्षाचे बी रोवण्यास रानड्यांचे महत्त्वाचे सहकार्य कारणीभूत झाले. (श्री. पां. चि. पाटील – माझ्या आठवणी : पान नं. १०६ ते ११०).

पूर्वी १८७३ पासून विश्राम रामजी, हरी रावजी, फुले आणि गंगारामभाऊ व्यक्तीश: विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत होते. स्कॉलरशिप फंड नव्हता. उपक्रम वैयक्तिक होता. पुढे बंद पडला. (महात्मा फुले : समग्र वाङ्मय पान १५८). सन १८७६-७७ साली दुष्काळ पडून शेतकर्यांना वाईट दिवस आले; म्हणून वरील उपक्रम थांबलेला असावा. सत्यशोधक समाजाच्या ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्मग्रंथ यांच्या विरुद्ध चाललेल्या केवळ प्रचारामुळे बहुजन समाज पुढे येणार नाही, अशी रानडे आणि त्यांचे वरील म्हस्के वगैरे मित्रमंडळी यांची खात्री होती.

स्वत: गंगारामभाऊ जोतीबा फुले यांचे मित्र आणि साहाय्यक असूनही सत्यशोधक समाजाचे फक्त वर्गणी देणारे हितचिंतक होते. सभासद नव्हते. शिक्षणाची वाण दूर करणे, हाच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या काळात होता. राजर्षी शाहू छत्रपतींनी पुढे खूप खस्ता खाल्ल्या. रानड्यांच्या प्रारंभिक प्रयत्नासंबंधी शाहू महाराजांना आदर वाटणे साहजिक होते.

रानड्यांनी मराठा शब्दाची व्याख्या व्यापक केली

सन १८८५ चे पावसाळ्यात सयाजीराव गायकवाड यांच्या स्वारीने पुण्यास दोन महिने मुक्काम केला होता. अनेक संस्थांनी महाराजांना मानपत्रे दिली. २७ सप्टेंबर रोजी मराठे मंडळींनी मानपत्र दिले. यासाठी पुणे रेल्वे स्टेशनजवळील इगल्स नेस्ट येथे समारंभ झाला. गंगारामभाऊ म्हस्के यांचे मित्र न्या. रानडे यांना प्रास्ताविक भाषण करण्याची विनंती केली होती. रानडे यांनी मराठा शब्दाची व्याख्या व्यापक केली. 

डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती, मराठा आणि तत्सम विद्येत मागासलेल्या सर्व जाती-जमातीसाठी होती. पण रानड्यांच्या निधनानंतर पुढेही शैक्षणिक संस्था केवळ मराठा समाजापुरती संकुचित राहिली. संस्थापनेच्या वेळी डॉ. विश्राम रामजी घोले वगैरे तत्सम समाजातील पुढारी आणि कार्यकर्ते समावेशित होते. रानड्यांची व्यापक दृष्टी आणि व्याख्या पुढील पिढीला उत्तरोत्तर नापसंत झाली.

जातिभेद देशाचे उन्नतीचे आड येत नाही, असा रा. ब. रानडे यांच्या वरील सभेतील भाषणाचा रोख होता. या भाषणाच्या संबंधानी १ सप्टेंबर १८८५ च्या ज्ञानप्रकाशात मजकूर आला होता. ज्ञानप्रकाशाने जोतीराव फुलेंवर एककल्लीपणाचा आक्षेप घेतला. मानपत्राच्या सभारंभात जोतीराव हजर असावेतच आणि त्यांनी रानड्यांचे व्याख्यानदेखील ऐकले. ज्ञानप्रकाशातील टीका त्यांना खपली नाही. लगेच पुढील महिन्यात त्यांनी इशारा (१८८५) नामक निबंध लिहून प्रतिक्रिया जाहीर केली.

 ‘‘जातिभेद असला म्हणून आपल्या इष्ट हेतूस तो (जातिभेद) बिलकूल (या देशाचे उन्नतीस) आडवा येणार नाही.’’ ‘‘पूर्वीचे तीसवर्षांपेक्षा (शूद्र) शेतकर्यांची हल्ली स्थिती बरी झाली आहे.’’ (महात्मा फुले समग्र वाङ्मय पान ३०९). कंसातील शब्द फुल्यांनी घातले आहेत. जातिभेद आडवा येतो आणि शेतकर्यांची स्थिती किती भयानक आहे, याचे चित्र फुल्यांनी या निबंधात रेखाटले आहे. न्या. रानड्यांचे भाषण मला उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांची बाजू समजू शकत नाही.

शिक्षण घेण्याच्या आड जातिभेद इंग्रजी नव्या राज्यात आडवा येत नाही. मागील देशी अशान्त राज्यातून हल्लीपेक्षा शेतकर्यांची स्थिती बरी नव्हती. असा न्या. रानड्यांचा पोक्त भाव असावा, असा तर्क करता येतो. या काळात फुले, लोखंडे, भालेकर आदी बहुजनसमाज जागा व्हावा म्हणून आग ओकीत होते. ‘केसरी’त यापूर्वी ‘‘ज्याचा त्याचा ब्राह्मणावर कटाक्ष’’ या शीर्षकाखाली बाजू मांडलेली आढळते (केसरी वर्ष १ अंक ११ आणि १२).

हेही वाचा : रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

रानडे आणि फुल्यांमधे धार्मिक आणि सामाजिक मतभेद होते

रानड्यांच्या वेळची सामाजिक परिस्थिती समजावी म्हणून हा भाग द्यावा लागतो. रानडे यांच्या वेळी जाणता समाज विरोधामुळे जागा झाला आणि त्याने मुंबई येथे ब्राह्मण सभेची स्थापना केली. जोतीराव यांनी निर्माण केलेल्या ब्राह्मणविरोधी चळवळीचा हा परिणाम होता. असो. रानड्यांच्या व्याख्यानातील एक-दोन वाक्ये जोतीरावांना फक्त नापसंत वाटली; बाकी मुद्दे त्यांना आवडले असेच साधार म्हणावे लागते. कारण त्यांचे खंडण करण्याची गरज त्यांना पडली नाही.

गंगारामभाऊ म्हस्के यांनी रानड्यांना नेतृत्व दिले, हे मात्र जोतीबांना आवडले नाही. गंगारामभाऊवर जोतीबांनी केलेल्या काही कविता उपलब्ध आहेत (म. फुले : समग्र वाङ्मय पा ४९४ आणि ४९५). गंगारामभाऊंची जोतीबांनी त्याच मतांच्या संदर्भात कानउघडणी केलेली आढळते. म्हस्के हे जोतीबांचे पूर्वीपासूनचे जुने साहाय्यक आणि मित्र होते. सार्वजनिक सभेत आणि राष्ट्रीय सभेत त्यांनी भाग घेतला आणि पुढारलेल्या वर्गाबरोबर सहकार्याने अनेक कार्यात वागू लागले, म्हणून म. फुल्यांचा त्यांच्यावर राग झाला!

म्हस्के आणि रानडे यांनी स्थापन केलेल्या डे. मराठा एज्युकेशनशी म. फुले यांनी कोणताच संबंध ठेवलेला आढळत नाही. फुले यानंतर अर्धांगाने पुढे आजारी झालेले होते. एका वृद्ध गृहस्थाने त्याच्या ओळखीच्या एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळावी म्हणून म. फुलेंच्या घरी नेले. फुले अंथरुणावरूनच त्यांना म्हणाले की, ‘‘मी आता लाचार आहे. तुम्ही गंगारामभाऊंकडे जा. ते काहीतरी मदत करतील.’’

एका वृद्ध गृहस्थाकडून मिळालेल्या या आठवणीवरून मला असे म्हणता येते की, रानडे-म्हस्के यांनी स्कॉलरशिप देण्यासाठी जो नवा फंड काढला, तो फुलेंना अमान्य नव्हता. रानडे आणि फुले यांच्यामधे मतभेद होते ते धार्मिक आणि सामाजिक होते. फुलेंचा पुढारलेल्या वर्गावर विश्वास नव्हता. असा विश्वास न ठेवणे, तुसडेपणा पत्करणे, हा पवित्रा गंगारामभाऊ, विश्राम रावजी, हरी रावजी, जावजी दादाजी वगैरे विद्येत मागासलेल्या सङ्काजाच्ङ्मा पुढार्यांना सर्वथैव पसंत नव्हता, असा निष्कर्ष येथे निघू शकतो. जोतीबा आणि वरील मंडळी यांच्यात असे अंतर पडले.

फुले वरिष्ट वर्गावर रुष्ट असत

मतभेद झाले, तरी रानडे फुलेंची योग्यता आणि कार्य जाणत होतेच. उदाहरण – पुण्यास २४ मे १८८५ साली मराठी लेखकांची दुसरी परिषद झाली. रानडे यांनी फुलेंना उपस्थित राहण्यासाठी अगोदर पत्र लिहिले. फुले यांनी उत्तर दिले पण हजर राहिले नाहीत, ‘‘आम्हा शूद्रादी अति शूद्रांस काय काय विपत्ती आणि त्रास सोसावे लागले आणि हल्ली सोसावे लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळविणार्या ग्रंथकारास आणि मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणार्यास कोठून कळणार?’

डॉ. आंबेडकरांच्याप्रमाणे फुले वरिष्ट वर्गावर सतत रुष्ट असत. त्यांचे नेहमीचे सूत्र एकसूरी होते. प्रतापसिंह महाराज शेवटचे छत्रपती यांचे चि. शहाजी महाराज यांनी दोन-तीन ग्रंथ लिहिलेले उपलब्ध आहेत. रानडे त्यांना पूर्ण जाणीत होते. यांनाही ग्रंथकार परिषदेस हजर राहण्याचे रानड्यांनी कळविले होते. परिषदेत नंतर या छत्रपतींचे पत्र वाचण्यात आले. तत्पूर्वी जोतीरावांचे पत्र प्रथम वाचण्यात आले. रानडे पूर्वग्रहदूषित नसत.

बहुजन समाजातील वरील ग्रंथकारांना त्यांनी न चुकता आमंत्रणे केली. रानड्यांची सामाजिकता आणि सर्वसंग्राहकतेचा वरील पुरावा होय. रानड्यांना अस्पृश्यता आणि जातीभेद मान्य नव्हता. रानडे प्रार्थना समाजाचे पुढारी होते. जोतीबांची रानड्यांशी ओळख आणि मैत्री होती. राजकीय दृष्ट्या आणि समाज सुधारणुकीच्या दृष्टीने जोतीबा फुले आणि रानडे यांचा पक्ष आणि तत्त्वे एकच होती.

रानडे आणि फुल्यांचा विशेष स्नेह होता

‘रानडे आणि फुले’ यांचे वैयक्तिक आणि खाजगी संबंध कसे छान होते हे श्री. तारकुंडे यांनी अनुभवान्ती नमूद केले आहे. 

रा. जोतीबा हयात होते, तेव्हा न्या. रानडे हे त्यांच्याकडे वारंवार भेटीस जात असत आणि न्या. रानडे आपल्या घरी आले म्हणजे रा. जोतीबा त्यांचा योग्य आदर सत्कार करीत असत. इतकेच नव्हे तर न्या. रानडे यांचा आणि जोतीबांचा अखेरपर्यंत चांगला स्नेह होता (मराठे यांच्या चळवळीचा पूर्वेतिहास, पान १२८). जातीवाचक संघटनांची पद्धत जोतीरावांना मान्य नसे. तथापि ‘रानडे आणि फुले’ यांच्यामधील सहकार्याची उदाहरणे देता येतात.

१८७५ साली दयानंदांची पुण्यात मिरवणूक निघाली, त्या वेळी फुलेंचे अनुयायी (सत्यशोधक समाजाचे कर्ते सभासद) दयानंदांच्या मिरवणुकी हत्तीच्या मागे चालले होते. निबंधमालेतील टीकेत पुरावा मिळतो. १८८५ साली सत्यशोधक समाजाच्या निशाणाची पुण्यात मिरवणूक निघाली. विसर्जनानंतर जोतीबा वगैरे वक्त्यांत न्या. रानडे यांनीही भाषण केले. रानडे आणि लोकहितवादींनी जोतीरावांच्या चळवळीला विरोध न करता साहाय्यच केले.

दयानंदांच्या मिरवणुकीच्या वेळी रानड्यांना विरोध झाला तसा सत्यशोधक झेंड्याच्या मिरवणुकीच्या वेळी झाला नाही. काळदेखील बदलत चालला. रानड्यांची योग्यता जाणणारे अनेक मोठमोठे पुरुष पुढे झाले. सयाजीराव शाहू वगैरे विद्येत मागासलेल्या जनतेत शिक्षणाचा प्रसार करणारे अनेक कर्मवीर झाले. रानड्यांनी पाया घातला.

हेही वाचा :

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…