भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय.

भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन लावूनही कोरोनाचा प्रसार थांबायचं नाव घेईना. पण आतापर्यंतच्या अनुभवातून कोरोनाशी कसं लढायचं याचा एका मार्ग मात्र सापडलाय. केंद्र सरकारनंही आता या दिशेनं काम करायला सुरवात केलीय. राजस्थान सरकारनं निव्वळ भारतालाच नाही तर साऱ्या जगाला कोरोनाशी लढायचा एक जालीम इलाज दिलाय. तो इलाज म्हणजे भिलवाडा मॉडेल.

भिलवाडा मॉडेल आता देशभर लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. केंद्र सरकारनंही काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातल्या या मॉडेलचं कौतूक केलंय. केंद्रानं स्वतःहून या मॉडेलची माहिती मागवलीय. द प्रिंटच्या एका बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनासुद्धा भिलवाडा मॉडेलनं खूप प्रभावित केलंय.

हेही वाचाः कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

भिलवाड्यात कोरोना कुठून आला?

राजस्थान पत्रिका या राजस्थानातल्या आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, १९ मार्चला भिलवाड्यात ब्रिजेश बांगड मेमोरिअल हॉस्पिटल या खासगी दवाखान्यातले तीन डॉक्टर आणि नर्स यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचा रिपोर्ट आला. या डॉक्टर्सची परदेशी दौऱ्याची कुठलीही ट्रॅवल हिस्ट्री नव्हती. अशी हिस्ट्री नसण्याला कोरोनाच्या लढ्यात धोकादायक तिसरी स्टेज म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणून ओळखलं जातं.

५२ वर्षाच्या न्यूमोनियाच्या पेशंटचा १३ मार्चला मृत्यू झाला. पण त्याची कोरोना टेस्ट झाली नव्हती. उदयपूरला ९ मार्चला होळी खेळायला गेलेला बांगड हॉस्पिटलमधला डॉक्टर या पेशंटच्या संपर्कात आल्याचं शोधण्यात आलं. मग सगळ्या स्टाफला क्वारंटाईन केलं. काही दिवसांनी या सगळ्यांचे टेस्ट रिपोर्ट आले. १२ जण कोरोना पॉझिटिव आढळले.

भिलवाड्यात फेमस असलेल्या या हॉस्पिटलबद्दलची ही बातमी फुटली तशी ती वाऱ्यासारखी पसरली. या हॉस्पिटलमधे गेलेल्या लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. हॉस्पिटल सील करण्यात आलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनानं २० मार्चलाच कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन लागू करणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य बनलं. देशभरात लॉकडाऊन लागू होण्याच्या पाच दिवस आधीच राजस्थानानं हा निर्णय घेतला.

हॉस्पिटलच कोरोना वायरसच्या संक्रमणाचं केंद्र बनणं ही खूप धोक्याची परिस्थिती होती. कारण चीनमधलं वुहान आणि इटलीत हेच घडलं. आणि कोरोना वायरस कम्युनिटी स्प्रेड म्हणजे सर्वसामान्य लोकांमधे पसरायला सुरवात झाली. हे रोखण्यासाठी राजस्थान सरकारनं पावलं उचलायला सुरवात केली. भिलवाड्यात हे सारं सुरू असताना देशात कोरोनाचे ४६० पेशंट सापडले होते. तर ९ जण दगावले होते.

हेही वाचाः लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

भारताची इटली बनणार का?

हे सगळं बघून टेक्सटाईल आणि मायनिंग हब अशी ओळख असलेला भिलवाडा भारताची इटली बनतोय, अशा बातम्या येत होत्या. गेल्या महिन्यात २४ तारखेला बीबीसीनं इंग्रजीत एक स्टोरी केली होती. त्या स्टोरीच हेडिंग, ‘टेक्सटाईल हब भिलवाडा भारताची इटली बनणार का?’ असं होतं.

क्षेत्रफळानुसार देशातलं सर्वांत मोठं राज्य असलेल्या राजस्थानमधे कम्युनिटी टान्समिशनची मोठी भीती होती. भिलवाडाची कोरोनाचा देशातला पहिला हॉटस्पॉट म्हणून ओळख निश्चित करण्यात आली. कोरोना वायरस हॉटस्पॉट म्हणजे एक प्रकारे हा इलाखा कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमधेच गेला. नव्यानचं आलेल्या रोगाशी कसं लढायचं, त्याविरोधात जगाला अजून काही मार्ग सापडला नाही तिथं आपला काय निभाव लागणार, अशी परिस्थिती होती.

भिलवाडा हॉटस्पॉट बनत होता त्याच काळात राजस्थानमधे वेगानं राजकीय घडामोडी घडत होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार धोक्यात आलं होतं. काही आमदार कर्नाटकात जाऊन बसले होते. त्यामुळे आता जास्तीचा धोका नको म्हणून काँग्रेसनं आपल्या उरलेल्या सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना राजस्थानमधे हलवलं. या आमदारांची जबाबदारी राजस्थान काँग्रेसवर आणि पर्यायानं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आली. शेवटी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार पडलं.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

सहा कलमी भिलवाडा मॉडेल

स्वाईन फ्लूशी लढणाऱ्या राजस्थाननं कोरोनाचं गांभीर्य ओळखून तातडीनं एक गोष्ट केली. ती म्हणजे, भिलवाड्याच्या साऱ्या बॉर्डर्स सील केल्या. आणि कोरोनाला सामोरं जाण्यासाठी सहा कलमी कार्यक्रम हाती घेतला. राज्य सरकारनं मीडियाला दिलेल्या सांगितल्यानुसार,

  • जिल्ह्याला आयसोलेशनमधे टाकणं,
  • हॉटस्पॉट ओळखणं,
  • घरोघरी जाऊन सर्वे करणं,
  • पॉझिटिव पेशंटच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना काही करून शोधणं,
  • क्वारंटाईन, आयसोलेशन सुविधा वाढवणं आणि
  • ग्रामीण भागात निगराणीच्या यंत्रणा सज्ज ठेवणं.

सहा कलमी मॉडेल प्रत्यक्षात उतरवणं हे एक आव्हानास्पद काम होतं. आरोग्य खात्याचा कारभार असलेले राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंग सांगतात, ‘भिलवाडा जिल्ह्याला आम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यांपासून वेगळं काढलं. ही काही चांगुलपणा दाखवण्याची वेळ नाही, ही गोष्ट आम्हाला चांगली माहीत होती. लोकांना त्रास होईल, पण आता तो त्यांना सहन करावा लागणार आहे. आमच्यासाठी लोकांच्या आरोग्याची निगा राखणं हाच सगळ्यात महत्त्वाचा प्राधान्याचा मुद्दा आहे.’ द प्रिंटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

‘२२ मार्च ते २ एप्रिल या काळात घरोघरी जाऊन ४.४१ लाख कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. १,९३७ आरोग्य पथकांनी हे काम केलं. यात २२ लाख ३९ हजार लोकांकडून आरोग्यविषयक माहिती जमवण्यात आली. यामधे १४ हजार लोकांमधे फ्लू सारखी लक्षणं आढळली. अशा लोकांची एक यादी तयार केली. या लोकांचा आमच्या पथकांनी दिवसातून दोनदा फॉलोअप घेत काही बरंवाईट तर घडत नाही ना याची माहिती घेतली.‘

हेही वाचाः कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

सारी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर

२० फेब्रुवारी ते हॉस्पिटल सील करेपर्यंत बांगड हॉस्पिटलमधे ६,१९२ पेशंट तपासण्यात आले होते. हे सर्व पेशंट राज्यातल्या १५ जिल्ह्यांतून आले होते. तसंच ३९ पेशंट हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतले होते. हॉस्पिटलमधूनच कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ शकतं हा धोका प्रशासनानं ओळखला. ४ ते ११ मार्च या काळात बांगड हॉस्पिटलच्या ओपीडीमधे तपासणीसाठी गेलेल्या लोकांची यादीही प्रशासनानं मिळवली. या यादीतल्या कुणाला नव्यानं काही आजार झालाय का हे तपासण्यात आलं. संबंधित पेशंटची माहिती १५ जिल्ह्यांचे अधिकारी आणि चार राज्यांना देण्यात आली.

जिल्ह्याच्या साऱ्या बॉर्डर्स सील करण्यात आल्या. तसंच जिल्ह्याला लागून असलेले राज्य आणि जिल्ह्यांतून भिलवाड्यात येणंजाणं थांबवण्यात आलं. आजूबाजूच्या जिल्ह्यांशी, संपर्क साधून त्यांनाही त्यांच्याबाजूनं भिलवाड्यात कुणी येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. समन्वयासाठी भिलवाडा इथंच वॉर रूम तसंच कोरोना कंट्रोल रूम सुरू करण्यात आली. राज्य सरकारनं सारी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली.

मग सारी यंत्रणा कामाला लागली. लगोलग ६०० जणांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले. त्यात कोरोना पॉझिटिव पेशंटचा आकडा वाढून १९ झाला. यात हॉस्पिटल स्टाफमधले १५ जण आणि चार पेशंट यांचा समावेश होता. दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं कोरोना पॉझिटिव आढळलेल्या १९ जणांच्या संपर्कात आलेल्या ६,४४५ जणांना निगराणीखाली ठेवलं. सर्वेच्या काळात १४९ लोकांना हाय रिस्क कॅटेगरीमधे टाकण्यात आलं.

हेही वाचाः कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

वेळीच गांभीर्य ओळखणं फायद्याचं ठरलं

राजस्थान सरकारनं हॉटस्पॉट ओळखून चटकन शहराच्या साऱ्या बॉर्डर सील केल्या. भिलवाडा शहरातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. असं करणारं भिलवाडा हे देशातलं पहिलं शहर आहे. सरकारनंही कोरोनाविरोधातल्या या लढाईचं गांभीर्य ओळखून राज्यभरातून १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना भिलवाड्याला पाठवलं.

घरोघरी जाऊन सर्वे केला. कुणाला कोरोनाची लक्षणं तर नाही ना याची माहिती घेतली. अशी माहिती जमा करण्याचं कामही देशात पहिल्यांदाच इथून सुरू झालं. यातून शेकडो लोकांमधे काही लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं. मग सरकारनं कठोरपणे, सक्तीनं लॉकडाऊन अमलात आणला.

नवजीवन इंडियाच्या बातमीनुसार, जिल्हा प्रशासनानं १० दिवसांतच जवळपास १८ लाख लोकांची माहिती गोळा केली. सर्दीपडसं असलेल्या सगळ्यांनाच घरातून काढून क्वारंटाईन करण्यात आलं. क्वारंटाईन केलेल्या ६४४५ लोकांवर मोबाईल एपच्या मदतीनं निगराणी ठेवली जातेय. कुणी घराबाहेर तर पडत नाही ना हे कंट्रोल रूमधून कायम बघितलं जातं. क्वारंटाईनसाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडत असल्याचं बघून भिलवाड्यातली सर्वच्या सर्व फाईवस्टार, थ्री स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट आणि खासगी दवाखान्यांचं अधिग्रहण करण्यात आलं.

जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणा अशा तिहेरी पातळीवर ही लढाई सुरू ठेवण्यात आली. लोकांमधे जनजागृती पसरवण्याचं कामही सुरू ठेवलं. शहर आणि जिल्ह्यात निर्जंतुकीकरणाची मोहीमही राबवण्यात आली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आजचं भिलवाडा मॉडेल आहे.

राजस्थान सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलपर्यंत २७०८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. यात २७ नमुने पॉझिटिव आढळले. यापैकी १३ लोक बरे होऊन घरी परतलेत. दोन जणांचा मृत्यू झालाय. आता फक्त तीन जण पॉझिटिव राहिलेत. उर्वरित सात जणांचा रिपोर्ट निगेटिव आल्यावर त्यांनाही घरी सोडलं जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आठवडाभरात इथं नव्यानं एकही कोरोना पॉझिटिव पेशंट सापडला नाही. आणि यातूनच भिलवाडा मॉडेल जन्म झाला.

कोरोनाच्या साखळीवर आता शेवटचा घाव

सर्वेचा एक टप्पा पार झाला. असं असलं तरी कोरोनाची साखळी तुटेपर्यंत सतत सर्वे केले जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. या काळात रँडम पद्धतीनं धडधाकट व्यक्तींचे नमुनेही तपासले जाणार आहेत. राजस्थान पत्रिका वृत्तपत्रात ७ मार्चला आलेल्या बातमीनुसार, सध्या ९५० लोक क्वारंटाईनमधे आहेत. ७६२० लोकांना आयसोलेशनमधे ठेवण्यात आलंय.

जिल्हाधिकारी भट्ट यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘३ ते १३ एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांसह सगळीचं दुकानं पूर्णतः बंद राहतील. पुढचे दहा दिवस खूप महत्त्वाचे आहेत. मीडिया आणि एनजीओच्या लोकांनाही फिरायला बंदी घालण्यात घालण्यात आलीय. सगळीकडे बॅरिकेडिंग केलं जाईल. पोलिस तैनात केले जाईल. आणि गरज पडली तर सैन्यदलालाही बोलवलं जाईल.’

ग्रामीण तोंडवळा असलेल्या भिलवाड्यात लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे खूप हाल होताहेत. आता सरकारनंही घरोघरी जेवणाचे पॅकेट पोचवण्याची मोहीम राबवायला सुरवात केलीय. गाव, तालुका आणि जिल्हा अशा तिहेरी पातळीवरून ही मोहीम राबवली जातेय.

राजस्थाननं हे केलं नसतं तर आज हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात अशी चार राज्यं आणि १५ जिल्हे यांना आज कोरोनाशी लढत बसावं लागलं असतं. आणि राजस्थान हे भारताचं इटली बनलं असत. मीडियात तसं भाकितही करण्यात आलं होतं. पण राजस्थान सरकारनं वेळीच पावलं उचलल्यानं हे सारं टळलं. त्यासाठी आपण आरोग्य कर्मचारी, लोकांना घरोघरी जेवण पुरवणारे कार्यकर्ते, राज्य सरकार अशा सगळ्यांना खूप थँक्स म्हणायला हवं.

हेही वाचाः 

पॅथॉलॉजीविषयी: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…