आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?

भारतात शास्त्रीय संगीतात एक वाद नेहमीच चालू असतो. निखिल बॅनर्जी श्रेष्ठ की रविशंकर श्रेष्ठ? वास्तविक दोघंही मल्हार घराण्याचे आहेत. दोघांनीही सतार जगप्रसिद्ध केली. पण रवीशंकर जगभर जसा प्रचार करत हिंडले तसे निखिल बॅनर्जी हिंडले नाहीत. रविशंकर प्रायोगिक होते तर निखिल बॅनर्जी समांतर. दोघांनीही परंपरेचं अनुकरण न करता तिला ताजगी दिली. उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे हे दोघेही शिष्य पण निखिल बॅनर्जी परंपरेकडे जास्त कललेले! दोघेही मेस्ट्रो म्हणजे दादा! तिसरे अर्थातच विलायत खान!

आर्या बॅनर्जी हिच्याशी माझी पहिली मिटिंग झाली तेव्हा मला माहीत नव्हतं की ती निखिल बॅनर्जींची मुलगी आहे. तिनं संगीतात मास्टर डिग्री मिळवली होती. म्हणून मी तिला गंमतीत छेडलं होतं. तेव्हा निखिल बॅनर्जी विरुद्ध रविशंकर असा वाद सुरु झाला.

मी तिला सांगितलं की माझे वडील निखिल बॅनर्जींचे फॅन आहेत ते तिला आवडलं. मी निखिल बॅनर्जींचं योगदान नाकारत नव्हतो. पण रविशंकर हे अधिक प्रायोगिक होते, असं माझं मत होतं. तिला ते मान्य नव्हतं. निघताना तिनं सांगितलं की, मी निखिल बॅनर्जींची मुलगी आहे. साहजिकच मग पुन्हा भेटू असं सांगून आम्ही वेगळे झालो.

हेही वाचा: गोवा मुक्ती दिन : स्वातंत्र्यवीरांची आठवण करण्याचा दिवस

तिच्या डोळ्यात आर्तता होती

दुसऱ्या मीटिंगमधे मात्र सत्यजित रे पासून गोडार्डपर्यंत सगळ्यांवर चर्चा सुरु झाली. मी ऋत्विज घटकांचा फॅन आणि तीही मिटिंग संपल्यावर तिने पिण्याची ऑफर दिली. मी दारू पीत नाही म्हणून सांगितलं. तिला तो धक्का होता.

‘सिरियसली?’ तिनं विचारलं.

मी म्हणालो, ‘हो, मी दारू, सिगरेट वैगरे काहीही भानगडी करत नाही.’

‘का?’ हा पुढचा प्रश्न आला.

मी म्हणालो, ‘मोक्ष!’

ती फक्त ‘इंटरेस्टिंग’ म्हणाली आणि निघून गेली. मग भेटी सुरु झाल्या. तिने जगातले उत्तम चित्रपट पाहिले होते. ती उत्कृष्ट कुक होती. वेगवेगळ्या डिशेस बनवण्याची शौकीन! तिचे जगाचा आस्वाद घेण्याचे स्वतःचे काही फंडे होते. पण कुठंही सौंदर्यतोल ढळायचे नाहीत.

एक प्रकारचा बंगाली अभिजातपणा तिच्या बॉडीलँग्वेजमधे वावरत राहायचा. आपण पुरेसे सुंदर नाही असा तिला कॉम्प्लेक्स असावा. पण ती तो बोलून दाखवायचा नाही. मी मात्र तिला कायमच सुंदर आणि स्मार्ट म्हणायचो. तिच्या डोळ्यात एक आर्तता असायची. आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणाऱ्या मुसाफिराची.

टाईपकास्ट व्हायचं नव्हतं

मुंबई शहरात ती एकटी होती आणि तिचे फक्त चार पाचच मित्र असावेत. माझ्या ऍरोगन्सला सुरवातीला नाकं मुरडणारी ती तो जन्मजात आहे हे लक्ष्यात येताच सरावली. गोव्याबद्दल तिला उत्सुकता होती आणि मी गोवन नाही याची तिला माझ्या कोल्हापुरी भाषेवरून खात्रीच पटली होती. तिचं मूळ नाव देवदत्ता होतं. पण ते लांब वाटल्याने तिने आर्या हे नाव घेतलं.

तिचा पहिला सिनेमा ‘लव सेक्स अँड धोखा’ हिट झाला आणि ती लाइमलाईटमधे आली. या चित्रपटातला तिचा अभिनय अफलातून होता. कारण तिने सादर केलेली व्यक्तिरेखा तिच्या मूळ व्यक्तिरेखेशी अजिबात जुळणारी नव्हती. तिने त्या रोलसाठी कायापालट केला होता. प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सुशील आणि एटीकेट असणारी आर्या  फिल्ममधे कसलेही एटीकेट नसलेल्या शिवराळ आणि फ्रष्टेशनमधे डुबलेल्या गायिकेच्या व्यक्तिरेखेच्या बोल्ड अवतारात होती.

यानंतर तिची करिअरची गाडी वेगाने धावेल असं सर्वांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. बॉलिवूड तिला बोल्ड अवतारात टाईपकास्ट करू पहात होतं आणि आर्याला टाईपकास्ट व्हायचं नव्हतं. याचा व्हायचा तो परिणाम झाला. ऑफर लिमिटेड झाल्या.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

बॉलिवूड यश बघतं?

एके दिवशी तिचा फोन आला म्हणाली, ‘मला शकीलाविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे.’ मला सुरवातीला बॉलिवूडची शकीला वाटली मग कळलं की तिला साऊथच्या सेक्स सायरनविषयी जाणून घ्यायचं आहे. मी मला माहीत असलेल्या शकीलाच्या गोष्टींविषयी बोललो. मग कळलं की तिला डर्टी पिक्चर ऑफर झालाय. मला हा रोल तिने करावा हे पटलं नाही. एडिटिंगमधे काही शिल्लक राहणार नाही अशी मला शक्यता वाटत होती. पण तिचा प्रश्न सडेतोड होता. एकता कपूर ही माझी मेंटॉर आहे मी तिला नाही कशी म्हणू शकते?

शिवाय विद्या बालन हे आकर्षण होतं. तिने शकीलाला योग्य तो न्याय दिला होता. पण रोल मर्यादित लांबीचा झाला. हाही सिनेमा सुपरहिट झाला.  दोन सिनेमा हिट दिल्यावरही आर्याला ऑफर येईनात हे धक्कादायक होतं. तिच्याबरोबर ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटात काम केलेली नुसरत भरुचा ही कुठल्याकुठे निघून गेली. पण आर्याच्या वाट्याला असं काही आलं नाही.

बॉलिवूड यश बघतं म्हणतात. पण आर्याच्या दोन्ही फिल्म हिट होऊनही तिला चित्रपट मिळेनात तेव्हा नेमकं काय केलं की बॉलिवूड ऑफर देईल अशा चर्चा सुरु झाल्या. यातून एक हिरोईन ओरिएंटेड फिल्मचा मुद्दा पुढे आला. दरम्यान तिने गोव्यावर आधारित एक फिल्म सावधान इंडियासाठी स्वीकारली आणि तुझ्या प्रदेशात शूटिंग करतीय म्हणून फोन केले. माझ्यासाठी हेही धक्कादायक होतं.

संबंध तुटले ते कायमचेच!

बॉलिवूडमधे तुम्ही सावधान इंडिया, क्राईम पेट्रोलमधून फिल्ममधे जाणं मानाचं आणि फिल्ममधून सावधान इंडिया, क्राईम पेट्रोलमधे येणं हे बेकारीचं लक्षण मानलं जातं. पण हे समजून घ्यायची तिची तयारीच नव्हती. दिग्दर्शक मोठा आहे म्हणून तिने हे काम केलं आणि मला स्लॉट कळवून मतही विचारलं. हेही काम तिने मनापासून केलं होतं.  मग एक बंगाली फिल्म आल्याची आणि त्यासाठी परदेशात जाणार असल्याची माहिती तिनं दिली. फिल्म हे तिचं माध्यम असल्याने मी आनंदलो.

दरम्यान मी तिच्या टॅलेंटला न्याय देईल अशी एक हिरॉईन ओरिएंटेड फिल्म लिहायला घेतली आणि पूर्ण केली. तिला ती अतिशय आवडली आणि आम्ही काही काम करायला सुरवात करणार तोच मला अपघात झाला. मग माझ्या बहिणीचा मृत्यू मग भावाचा मृत्यू अशी एक मालिका सुरू झाली. याचवेळी तिच्याही जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून ती कलकत्याला निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणाली, ‘तू कलकत्याला ये. मला इथं विश्वासार्ह माणूस हवं आहे. तुझ्याखेरीज मला कुणी दिसत नाही.’

मी स्वतः माझ्या अपघात  मालिकेत अडकलेलो आणि मोक्षाच्या वाटेवर उमलत चाललेलो! माझ्या कामवासनेचा अस्त मला साधलेला! या दोन्ही कारणांमुळे मी नाही म्हणालो. मला गृहीत धरल्याने माझं नाही म्हणणं हे तिला अनपेक्षित होतं. तिनं त्यानंतर माझ्याशी संबंध तोडले ते कायमचेच!

हेही वाचा: संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार

तिचा कंट्रोल का सुटला?

मी फोन केले. तिने उचलले नाहीत. मग मीही थांबलो  आणि आज चार वर्षांनी थेट बातमी आली. कलकत्याच्या तिच्या घरात तिची डेड बॉडी सापडली. दारू पिऊन लिवर खराब झालेलं आणि तब्बल दोन लिटर दारू पोटात! नशेत कार्डियाक अटॅक आला पण तिला तो कळला नाही! खरंतर तिचा जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?

ती एकांतप्रिय होती. आपण भलं आपलं आयुष्य भलं असा तिचा स्वभाव होता. मात्र एखादी व्यक्तिरेखा सादर करायची म्हटली की तिच्या अंगात भूत संचारायचं. सगळे तपशील गोळा करून त्या व्यक्तिरेखेची बॉडी लँग्वेज तयार करून ती त्यात स्वतःला ढाळायची. त्या जीवावरच तिनं डर्टी पिक्चरमधे विद्या बालनला तोडीस तोड अभिनय केला होता.  दुर्देवाने बॉलीवूडने तिच्या अभिनयप्रतिभेला न्याय दिला नाही हे शल्य बोचत राहिल्याने तिचा कंट्रोल सुटला?

मी कलकत्याला गेलो असतो तर हे टळलं असतं? तिचे वडील संगीताला अध्यात्मिक साधना समजायचे. हा वारसा तिच्याकडे का सरकला नाही? मी तिला मेडिटेशनचे काही धडे दिले होते. पण मुळातच तिचा स्वभाव नव्हता. तिच्या आत असलेल्या अस्तित्वाच्या अध्यात्मिक पोकळीनं तिला गिळलं?

तिच्या वडलांप्रमाणे तिलाही संगीत जीव की प्राण होतं. मी न ऐकलेल्या अनेक चिजा तिने मला सांगितल्या. काहींच्या सीडीज आणल्या काहींच्या बनवून दिल्या. तिचा आवाज सर्वस्वी तिचा होता आणि ती अफलातून गायची. ती उत्तम फिल्मी गायिका झाली असती.

गीता दत्त तिला आवडायची. वक्तने किया क्या हंसी सितम हे आम्हा दोघांचंही फेवरेट! तिनं ते माझ्यापुढे दोन वेळा तरी गायलं असेल. गीता दत्तची काळीज चिरत जाणारी तासीर आणि आर्तता तिच्याकडेही होती.

भिडस्तपणा तिला नडला

आपल्या भावना फार कमी वेळा ती व्यक्त करायची. वडील लहानपणी गेल्याने एक पोरकेपण तिच्या आयुष्याला व्यापून होतं. वडलांच्या नावाला आपल्यामुळे धक्का बसू नये यासाठी ती खूप काळजीपूर्वक बोलायची आणि वागायची. भिडस्तपणा हा आम्हा दोघांचाही दुर्गुण होता. त्यामुळे लोकांकडे काम मागणं व्हायचं नाही आणि बॉलिवूडमधे तुम्ही मागितल्याशिवाय कोणी काम देत नाही. तिचा भिडस्तपणा तिला नडला.

माझ्या लेखी ती एक उत्कृष्ट मैत्रीण होती. हळव्या बंगाली संवेदनशीलतेनं भरलेली आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बाळगणारी. कलेतल्या अभिजात पर्यावरणाचं भान बाळगणारी बुद्धिमती! आम्ही आमनेसामने भेटलो की सगळं विसरून पुन्हा मित्र होऊ अशी मला खात्रीच होती. ती खात्री कायमची नाहीशी झाली.  तिच्या अव्वल दर्जाच्या प्रतिभेला सॅल्यूट आणि आदरांजली!

हेही वाचा: 

वो सुबह कभी तो आयेगी!

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…