आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?

‘मेरा निकाह हुआ और मेरी बहन के फेरे.’ झूमवरच्या सत्रात एक कार्यकर्ती बोलत होती. हे एवढंच ऐकणाऱ्याला वाटू शकतं, बोलणारी मुसलमान आहे आणि तिच्या मुसलमान बहिणीने हिंदूशी लग्न केलं. कारण तिने फेरे घेतले. पण तसं नाही. या दोघी हिंदू आहेत आणि मुसलमानही. एकाचवेळी दोन्ही धर्माच्या. आश्चर्य वाटावं असं आहे आहे ना? हो. मीही हे सगळं ऐकताना आश्चर्यचकीत झालो होतो. आणि पुढे अधिक ऐकल्यावर चिंतित!

राजस्थानातल्या चीता मेहरात समुदायाच्या कार्यकर्त्यांसोबत माझं एक सत्र कोरो संस्थेनं आयोजित केलं होतं. झूमवर चाललेल्या या ऑनलाईन सत्रात कार्यकर्ते बोलत होते. आपल्या समाजाची वैशिष्ट्य सांगत होते. त्यांच्यासमोरचे आताचे पेच मांडत होते. हे ऐकून नंतर मला संविधानातल्या मूल्यांची ओळख करुन द्यायची होती. त्यांच्या आताच्या पेचावर काही मार्ग सुचवायचे होते.

मी बोलायचं ते नंतर बोललो. मार्ग काही असे झूमवरच्या एका सत्रातून पुढे येत नाहीत. ते त्यांच्यासोबत राहून शोधायचे असतात. अशा सत्रात काही ढोबळ दिशा सुचवता येतात. तशा सुचवल्याही. पण त्यातून काही तोडगा निघणं तूर्त महाकठीण वाटतं.

हेही वाचा: आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

धर्म हिंदू मुसलमान

चीता मेहरात हे समुदायाचं नाव ऐकून हा लेख वाचणाऱ्यातल्या काही जाणकारांना यांचं वैशिष्ट्य नक्की आठवलं असेल. माझ्यासारख्या अगदी अनभिज्ञ किंवा धूसर कल्पना असणाऱ्यांना आश्चर्य वाटलं नसणार. पण वाचकांमधे माझ्यासारखे अनभिज्ञ अधिक असणार. त्यादृष्टीने ही माहिती देत आहे. वास्तविक ही माहितीही खूप परिपूर्ण नाही. या सत्रात कळली ती. आणि नंतर ऑनलाईन शोधली ती. या समूहाच्या वस्त्यांत काही मी फिरलो नाही. त्यांच्या लढ्यांत भाग घेतलेला नाही. लोकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो नाही.

प्रत्यक्ष बोलणाऱ्यांचे यूट्यूबवरचे वीडियो पाहिलेत. अधिक सखोल माहिती आपण नंतर घ्याल. मीही मिळवेन. सध्या त्यातल्या पेचाकडे लक्ष वेधलं तरी पुरे. तो पेच गंभीर आहे. भारतीय संविधानातल्या धर्म, श्रद्धा, उपासना स्वातंत्र्याशी निगडित आहे. भारताच्या भारतीयत्वाशी जोडलाय. राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेला सुमारे दहा लाखांची संख्या असलेला हा चीता मेहरात काठात समुदाय. चीता, मेहरात, काठात अशा अंतर्गत तीन ओळखी, भाग असलेला एकाच वैशिष्ट्यांचा हा समुदाय. हिंदू आणि मुसलमान दोन्ही.

तुमचा धर्म कोणता या प्रश्नाला आतापर्यंत तरी त्यांचं उत्तर आहे : हिंदू-मुसलमान. पुढचं माहीत नाही. आणखी काही काळाने दोन स्वतंत्र उत्तरंही मिळू लागतील. त्याची सुरवात झालीच आहे. आजचं त्यांचं- बहुसंख्यांचं मुख्य स्वरुपवैशिष्ट्य हिंदू-मुसलमान हेच आहे. एकाच कुटुंबात दोन्ही उपासना होतात. दोन्ही धर्मांचे सण साजरे केले जातात. आपल्या आवडीनुसार दोन्ही पेहराव केले जातात.

दोन प्रवाह एकत्र

मशिद आणि देऊळ दोन्ही त्यांच्या गावात आहेत. कुटुंबातल्या सदस्यांची नावंही मिश्र आहेत. वडिल जवाहरसिंग तर मुलगा सलालुद्दिन. एक बहीण सलमा, तर दुसरी विद्या. सुरवातीला ज्या कार्यकर्तीबद्दल सांगितलंय, ती कार्यकर्ती आणि तिची बहीण याच प्रकारची. दोघींची लग्नं दोन वेगवेगळ्या धार्मिक पद्धतीने झालेली. या पद्धती कोण ठरवतं? ज्यांचं लग्न होणार आहे ती मंडळी. त्या दोघांची इच्छा. लग्न ज्या पद्धतीने झालं, त्याच पद्धतीने पुढचे सर्व रीतीरिवाज होतील असं नाही. ही मंडळी पूजाही घालतील.

मुलांची नावं दोन्ही धर्मातली ठेवतील. या मुलांना त्यांचं स्वातंत्र्य असेल. त्यांनी कोणत्या रिती पाळायच्या याचं. दिवाळी आणि ईद दोन्ही आपलेच समजून हे लोक साजरे करतात. ‘न हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा’ हा प्रश्न आतापर्यंत तरी त्यांच्यापर्यंत येत नव्हता. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना ‘इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा’ ही भूमिका घेण्याची गरज भासत नव्हती. ही गंगा-जमनी तहजीब जरुर. पण ती संगमाजवळची नाही; जिथे दोन प्रवाह एकत्र होताना दिसतात.

संगमाच्या पुढे दोघांचा एकच प्रवाह झाल्यानंतरची ही अवस्था आहे. एकाच शरीरात दोन्ही भाग गुंतून गेलेले. उभयलिंगी अर्धनारी नटेश्वरासारखे एकच उभयधर्मी अस्तित्व. तब्बल सातशे वर्ष ते आहे.

समाजाचं खास वैशिष्ट्य

सातशे वर्षांचा इतिहास ही मंडळी सांगतात. या इतिहासाचे सुस्पष्ट पुरावे काही मला लक्षात आले नाहीत. परंपरेनं सांगितला गेलेला तो इतिहास आहे. हे लोक स्वतःला पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजपूत, क्षत्रिय राजाचे वंशज मानतात. याच राजाच्या वारसदारांच्या नावांवरुन कोणी चीता, तर कोणी मेहरात तर कोणी काठात आहे. याचा एक उपयोग लग्न ठरवताना होतो. चीता लोक चीता समूहात लग्न करत नाहीत. ते मेहरात किंवा काठात समुहात सोयरीक करतात. एकप्रकारची ती आता गोत्रे आहेत.

एकाच गोत्रात लग्न करायला बंदी आहे. पण हिंदू राजाचे हे वंशज मुसलमानपण कसे झाले? त्याची कथा सांगतात. मुघल बादशहाच्या आक्रमणानंतर त्याच्या तीन अटी आम्ही स्वीकारल्या. दफन, खतना आणि हलालचं मांस खाणं. या तीन अटी आमच्यातला प्रत्येकजण पाळतोच. नाव हिंदू असलं, लग्न हिंदू पद्धतीने झालं तरी त्याला खतना करुन घ्यावा लागतो. मेल्यावर त्याचं दफन होतं. जिवंत असताना तो हलालचंच मांस खातो.

एका झटक्यात नाही तर जनावराची मान अर्धवट कापून सगळं रक्त निघून गेल्यावर मांस शुद्ध होतं अशी त्यांची समजूत आहे. त्याला हलाल म्हणतात. या तीन अटी पाळणं हे त्यांच्या समाजाचं खास वैशिष्ट्य असल्याचं ही माणसं अभिमानाने सांगतात.

आक्रमकाने लादलेल्या अटी आजही का पाळायच्या? तर आम्ही शब्दाला पक्के आहोत. पण हाच मुद्दा आता काही ‘बाहेरची’ मंडळी उपस्थित करतायत. तिकडे नंतर येऊ. ही मंडळी तीन तलाक मानत नाहीत. गायीला माता समजतात. स्त्री-पुरुष एकत्र नमाज पढतात.

हेही वाचा: गोवा मुक्ती दिन : स्वातंत्र्यवीरांची आठवण करण्याचा दिवस

वेगवेगळे रंग बघण्याची क्षमता नष्ट होतेय

हे सगळं सातशे वर्ष ठीक चाललं होतं. त्यांचं ‘हिंदू-मुसलमानत्व’ अभंग होतं. पण आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर प्रश्न उभे करायला सुरवात केली. हॉस्पिटलमधे केसपेपर काढताना, ट्रेनचं रिजर्वेशन करताना ‘रामचंद्र हुमायून’ असं नाव सांगितलं की लोक चमत्कारिकपणे बघू लागतात. ओळखपत्र दाखवलं की पोलीस संशय घेऊ लागतात. ‘असली नाम बोल’ असं दटावलं जातं.

शाळेत पूर्वी धर्माच्या रकान्यात धर्म ‘हिंदू-मुसलमान’ असा लिहिला जायचा. आता तिथंही प्रश्न येऊ लागलेत. या प्रश्नांनी, संशयी नजरांनी या लोकांच्या मनात आपल्यातच काही न्यून आहे का, असा सवाल उभा रहायला सुरवात झाली.

ही दुभंग व्यक्तिमत्वाची लक्षणं वाढू लागलीत. तोच त्यांच्यापुढे आताचा पेच आहे. वास्तविक हा त्यांचा रोग नाही. लोकातले वेगवेगळे रंग बघण्याची क्षमता नष्ट होणं हा बाहेरच्यांना झालेला रोग आहे. ठरीव रंगच बघण्याची ही त्यांची मर्यादा आहे. विविध रंगछटा अनुभवण्याचं त्यांचं सामर्थ्य गळून पडतंय, ही समस्या आहे.

पण बहुसंख्यांचा आजार आजार नसतो. तो मापदंड असतो. तेच प्रमाण असतं. अल्पसंख्यांचं मोजमाप त्यातूनच होतं. या बहुसंख्यांच्या आजाराला सांस्कृतिक-धार्मिक मुलतत्त्ववादी आणि त्यांचा वापर करणारे राजकारणी यांनी अधिक गंभीर केलं.

सच्ची माणसंही दिसतात

यूट्युबवरच्या एका वीडियोत चीता समूहातला एक कार्यकर्ता सांगतो- ‘याची सुरवात मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराने झाली. १९८१ ला तिथल्या दीडशे दलितांनी जातीय अत्याचारामुळे सामूहिक धर्मांतर केलं. ते मुसलमान झाले. आणि आमच्याकडे विश्व हिंदू परिषदेचं लक्ष वळलं. पृथ्वीराज चौहानाचे वंशज असताना तुम्ही मुसलमान कसे? नक्कीच तुम्हाला जबरदस्तीने मुसलमान केलं असणार? आतापासून तुम्ही फक्त हिंदू म्हणूनच राहायचं.’

‘मुसलमान म्हणून असलेली सगळी चिन्ह, रितिरिवाज, पोषाख, मशिदीत जाणं बंद व्हायला हवं. असे धर्मादेश येऊ लागले. दुसरीकडून तबलिगी मंडळींनी येणं सुरु केलं. सच्चा मुसलमान म्हणून सर्व हिंदू रूढींना तुम्ही सोडलं पाहिजे असे त्यांचे फतवे निघू लागले. बाबरी मशिद-रामजन्मभूमी प्रकरण आणि आता भाजप केंद्रात आल्यावर ही प्रकरणं तीव्र होऊ लागलीत.’

असे छोटे छोटे अनेक वीडियो यूट्यूबवर पाहायला मिळतात. केवळ फेटे असलेले चीता मेहरात लोक समोर आहेत आणि त्यांच्यासमोर कोणी हिंदुत्ववादी नेता त्यांच्या चौहान रक्ताला ललकारतोय. तुम्ही असली हिंदू व्हायला हवं वगैरे. दुसरीकडे मुस्लिम मौलवींच्या मेळाव्यात केवळ मुस्लिम समजला जाणारा पेहराव आणि दाढी असलेले चीता मेहरात काठात लोक दिसतात.

या प्रभावाखाली येऊन मी मुसलमान, माझी बायको मुसलमान, माझी मुलं मुसलमान, त्यांची नावं मुसलमान, आम्ही फक्त मशिदीतच जातो, केवळ मुसलमानांचे सणच साजरे करतो असं कडवेपणाने बोलणारा चीता समूहातला माणूस दिसतो. तर याच्या बरोबर उलट आम्ही चौहान की औलाद, सच्चे हिंदू सांगणारी माणसंही त्यांच्यातच दिसतात.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

परंपरा, द्विधर्मी ओळख जपण्याचा प्रयत्न

मी सत्र घेत असलेल्या लोकांचा तीव्रतेने सवाल होता– अशी कोणतीतरी एक बाजू घ्यायला सांगणाऱ्यांचं काय करायचं? आम्ही दोन्ही असलेले एक आहोत. या आमच्या ओळखीवर, अस्तित्वावर घाला आलाय. आपल्या मुलाबाळांचं भविष्य नीट व्हायचं, तर कोणतीतरी एक बाजू पकडणं, हिंदू किंवा मुसलमान यांपैकी एक होणं यात शहाणपण आहे, हा व्यवहारी विचार करणारे लोक आमच्यात वाढू लागलेत. त्याचं काय करायचं?’

‘तुम्ही तटून उभे राहा. आपली भूमिका, परंपरा सोडू नका. कितीही दबाव येऊ दे.’ असा थेट उपदेश काही मी केला नाही. सभोवतालचं राजकीय, सांस्कृतिक वास्तव भान ठेवून बघतो त्याला हे सोपं उत्तर देऊन जमणारं नव्हतं. आपण आपली परंपरा, द्विधर्मी ओळख जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करायला हवा, एवढं मात्र बोललो. मुख्य सांगितलं ते आपल्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेतल्या विचारबहुलतेविषयी, वैविध्याविषयी. उदाहरणार्थ सम्राट अशोक, त्याचे वडील बिंदुसार आणि आजोबा चंद्रगुप्त हे अनुक्रमे बौद्ध, वैदिक आणि जैन होते. एकाच घरात विविध धर्माची माणसं असू शकत होती.

समुदायाची परंपरा भारतीयच

आपल्या आवडीच्या धर्मांची उपासना करण्याचं स्वातंत्र्य एका कुटुंबात असतानाही त्यांना होतं. महात्मा फुलेंच्या कल्पनेतल्या आदर्श कुटुंबाची रचना सांगितली. त्या रचनेत आई, वडील, बहीण, भाऊ प्रत्येकजण त्यांना पटलेला धर्म स्वीकारू शकतात. विविध धर्माचे लोक एकाच कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदू शकतात. सम्राट अशोकाच्या प्राचीन काळात आणि आधुनिक काळातल्या महात्मा फुलेंच्या विचारभूमिकेत भारतात जर अशी वेगवेगळे धर्म पाळण्याची मुभा असेल तर तुम्ही चीता, मेहरात, काठात मंडळी तीच परंपरा पाळत आहात.

तुमची परंपरा ही भारतीय परंपरा आहे. संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा चोख अंमल करणारा तुमचा समुदाय आहे. याचा न्यूनगंड नाही, तर सार्थ अभिमान वाटला पाहिजे. पुढे धर्म आणि आधुनिकता याची थोडी अधिक चर्चा आम्ही केली. धर्माचं एक अंग आध्यात्मिक विचार हे, तर दुसरे अंग आचार व्यवहाराचं. आजच्यासारखे घटना, कायदे नव्हते त्यावेळी धर्म ती जबाबदारी निभावयाचा हे बरोबर आहे. पण आता त्याची गरज आहे का? धर्माने अध्यात्म, उपासना एवढ्यापुरते सीमित राहून लग्नासारख्या बाबी विशेष विवाह कायद्यावर सोपवल्या तर काय हरकत आहे?

चीता मेहरात समाजचं विभाजन अटळ

या कायद्याखाली होणारी लग्न ही दोन भारतीयांची असतात. तिथं धर्माचा संबंध नसतो. आपापला धर्म पाळायची परवानगी लग्न करणाऱ्या दोघांनाही राहते. दोघे भिन्न धर्माचे असले तर लग्नासाठी म्हणून धर्मांतर करण्याची कोणा एकाला गरज नाही. केवळ वेगवेगळ्या धर्माचे असतानाच नाही, तर एका धर्माचे असतानाही लग्न विशेष विवाह कायद्याखाली करण्याची वहिवाट प्रयत्नपूर्वक आपण सुरु करायला हवी. काही नवं कळल्याचं, आश्वासक वाटल्याचे अभिप्राय ऐकणाऱ्यांनी दिले. करोनाकाळ संपला की प्रत्यक्ष भेटू, अधिक बोलू ठरलं.

हे वेबसत्र संपलं. पण माझी अस्वस्थता अधिक वाढली. या खंडप्राय देशात खंडीने असलेल्या परंपरांचं हे अजब मिश्रण आणि तेच त्याच्या टिकण्याचं, प्रवाही राहण्याचं गमक आहे, ही जाणीव एकीकडे मन समृद्ध करत होती. तर दुसरीकडे हे सगळे एका साच्यात कोंबू पाहणाऱ्या, त्यासाठी पराकोटीच्या हिंसेला उतरणाऱ्या मूलतत्त्ववादी पिशाच्च्यांचे पलिते डोळ्यांसमोर नाचत होते. माझा अंदाज निराशाजनक वाटेल. पण ‘हिंदु-मुसलमान’ असलेल्या चीता मेहरात काठात समुदायाचे पुढच्या एक-दोन दशकांतच मुख्यतः हिंदू आणि उर्वरित मुसलमान असं विभाजन अटळ आहे. हा अंदाज चुकावा अशी मनोमन इच्छा आहे.

हेही वाचा: 

आपण इतके हिंसक का होतोय?

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार

अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…