राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.

घोड्यांचं वेड कशानं अंगात भिनलं हा प्रश्न मनात वारंवार का येतो कळत नाही. चांगलं घोडं दिसलं की माझं अंग फुरफुरायला लागतं. लहानपणापासून लागलेली ही सवय आजतागायत आहे. सवय कोणतीही असली तरी ती आपोआप जपली जाते. तसं बघितलं तर जन्मगावी इन मीन तीन घोडे. ज्यांच्याकडे जास्त जमीन आणि कोसाबाहेर त्याचं वाहन म्हणजे घोडं.

काळे-पांढरे ठिपके असलेले आणि पाठीवर ठिपक्यांची रांगोळी जन्मतःच असलेले घोडे आमच्याकडे होते. त्याच्या टापाचा आवाज आणि मनाविरुद्ध काही झालं की त्याचं गळा काढून किंकाळी मारणं. खरारा करण्याऱ्याचा हात जर वेगळा असेल तर खरारा होईपर्यंत एक-दोनदा तरी घोडा लाथा झाडणारच. तेवढ्यातल्या तेवढ्यात तो पाय रिकामा करून घ्यायचा. तो त्याच्या व्यायामाचा एक भाग होता. म्हणून आम्ही घरातली माणसं त्याला व्यायाम व्हावा म्हणून खरारा करण्याऱ्याचे हात बदलायचो. स्पर्शाने आवडत्या माणसाला ओळखणं घोड्याला चांगलं जमतं.

एक रूबाबदार प्राणी म्हणून त्याची लहानपणी पडलेली छाप आजही जशाच्या तशी डोळ्यासमोर येते. एक-दोनदा त्याच्यावर टाकलेला खोगीर आणि लगाम याची कट्टी झाल्याने पाठीवर धपकन आदळलो. मग आई आठवली. डोळे आकाशाकडे बराच वेळ तसेच होते. कोणाच्या तरी लक्षात आल्यावर पहिल्यांदा त्याने घोडा नावाच्या प्राण्याला पायबंद घातला आणि नंतर जमिनीवर आदळलेल्या स्वारीला उचलून उभा केलं. थोडावेळ मणका खुणखुणला. सुसह्यतेने त्याने श्वास सोडला. आणि मग लक्षात आलं की फार काही झालं नाही.

हेही वाचा : मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

घरगड्याने खाली पडलेला लगाम आणि खोगिर उचलून घराच्या कठड्यावर ठेवला. आणि घोड्याला त्याने जागेवर नेऊन बांधलं. या त्या दिवसाच्या घोडेपराक्रमाने माझी घोडेप्रेमाची परिक्रमा पूर्ण झाली. पण घोड्यावर बसण्याची आवड काही संपली नाही. संधी मिळेल तशी घोड्यावर तंग मारून रपेट ही केली. कदाचित त्याला माझं बसणं आवडत नसावं.  आयाळावरून हात फिरवला तरी तिरस्काराने तो बघत रहायचा. भरल्या डोळ्याने नजर टाकायचा. असे हे लकबीने रेखाटलेलं घोड्याचं चित्र आजही समोर येतं ते जिवंत होऊन. 

पाटलाचं घोडं आमच्यापेक्षा वेगळं होतं. उंचंपुरं आणि पांढरंशुभ्र. नदीवर जाऊन त्यालाही अंघोळ घातली की ते ही मैदानात येऊन बांध्याच्या कडेकडेनं पळून घ्यायचं आणि त्याचा मित्र असलेले गव्हाळ रंगाचे घोडे पिंपळाच्या झाडाखाली तहान मांडून बसायचे.

असं म्हणतात की, घोड्यांनाही घराणी असतात. त्या घराण्यानुसार मिळणारं शिक्षण आणि त्या शिक्षणावर घोडेस्वाराकडून मिळालेला तरबेजेचा दाखला त्याच्या खरेदीत उपयोगी पडायचा. नेमकं कोणतं घोडे चांगलं हे सांगणारे फार कमी असतात; पण घोड्याची आवड असणाऱ्यांना त्याचा थांगपत्ता असायचा. हा थांगपत्ता माझ्या आप्पांना होता. तो ते अनेकांना देत असतं. सवयीने ते ही हळूहळू घोडे पारखी झाले. कुठल्याही प्राण्याची पारख करण्यासाठी जेवढं असायला हवं तेवढं ज्ञान आप्पाकडे होते. शेतीच्या जोडीला प्राणी पारखणारे आप्पा त्याही व्यवसायात पारंगत झाले.

का कोण जाणे माझं घोडेप्रेम संपलेलं नाही. अधूनमधून प्रेमाची उबळ येते आणि मी घोड्यांना बघण्यासाठी वेळ घालवतो. तो एक आनंदाचा भाग आहे. कोण कधी आनंद देईल ते सांगता येत नाही. मी म्हणतो सांगायचं ते सांगायचं तरी काय म्हणून. झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवण्याची सवय नसल्याने घोड्यांनी लाथ मारली, घोडे उधळले, मणक्यावर पाडले असली गाऱ्हाणी मित्र-मंडळीना सांगण्यात मजा यायची.

एखादं दुसरे गोचीड पाठीवर दिसलं तर चाबकाने ओढून लावताना झालेली फजिती आणि त्यामागील पुरेपूर इतिहास डोळ्यातल्या पुस्तकात पूर्णपणे लिहिला जातो. शेपटी हलवण्याच्या पद्धतीपासून डोळे मिचकवण्याच्या सवयीपर्यंत आणि डोळ्यातून वाहणाऱ्या चिकट पाण्यापर्यंत हा इतिहास आपोआप समोर येतो. 

मग वाटतं आपल्या राजेमहाराजांच्या, सैन्यदलातील घोड्याला शिक्षण देणारे, जपणारे, हळूवार प्रेम देणारे हे सुद्धा त्याचे कौशल्य शास्त्र अंगिकारलेले होते असे पूर्वज सांगतात. त्याची पाणी पिण्याची ढब, टापाचा नाद, लगाम हाती घेतल्यानंतर ओढ आणि ढील याच्यावर लक्ष ठेवून पडणाऱ्या टापा आणि त्या टापावर लक्ष ठेवून त्याचं आरोग्य चांगलं की वाईट याची दक्षता घेणारे हनमघर घराणी संस्थानिकाच्या तबेल्यात मुख्य रक्षक म्हणून असायची.

खुरावरून आणि श्वासावरून नेमकं घोड्यांचा आजार ओळखणारे हे दूत राजे-राजवाडे यांच्याकडे कायम सेवेत असायचे. त्यांचाही रुबाब घोड्यासारखाच ऐटदार ठेवण्यात संस्थानिकाचा कायम आग्रह असायचा. आणि मग ते मानकरी म्हणून दसरा महोत्सवाला अग्रभागी असायचे. ही झाली सवय लागण्याची बाजू.

हेही वाचा : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर

असंच एकदा राजस्थानातल्या पुष्कर गावी भरणाऱ्या घोड्याच्या प्रदर्शनात जाण्याची संधी मिळाली तेव्हा गावातील तीन घोड्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं स्मरण झालं. या स्मरणाच्या आधाराने काळजावर रेखाटलेली चित्रं पुष्करच्या वाहत्या वाऱ्याबरोबर उडणाऱ्या रेतीनं पुन्हा एकदा ध्यानात आलं. दोन-तीन मैलाचा अगडबंब घेर असलेल्या मैदानाकडे जाताना लागलेलं तळं म्हणजे एक प्रकारची मजाच होती. त्या मैदानावर भरलेल्या प्रदर्शनातली घोड्याची तहान भागवणारं हे तळं एकदम झकास दिसायचं.

काठावरील झाडाच्या पानांच्या प्रतिबिंबाबरोबर पाणी प्यायला आलेली घोडी त्या नितळ पाण्यात आपलं प्रतिबिंब बघायची. शेजारी-पाजारी न बघता आपल्याच प्रतिबिंबाला स्पर्धक म्हणून फुरफुरण्याचा आवाज वेगळाच राग दरबार सांगून जायचा. गाण्याच्या क्षेत्रात जशी घराणी असतात तशीच घराणी घोड्यांना जन्मजात लाभलेली असतात. उंच, ठेंगणे, अतिउंच आणि उंचच उंच अशा पद्धतीची एक रांग प्रदर्शनात बघायला मिळाली.

उन्हात घोड सावल्यांचा शांतपणे चाललेला खेळ आणखीन आपल्यालाच रंग आवृतीत घेऊन जायचा. घोड्याचा सुंदर, आकर्षक, रुबाबदार, खानदानी चेहरा बघितल्यानंतर आपल्यालाच मुखशुद्धीचा भास व्हायचा.

घोड्याला वेळच्या वेळी पळवून आणावं लागतं. खाण्याची वेळही तशीच. घंगाळभर पाण्यातील वाटीच्या आकाराच्या भांड्याने त्याच्या अंगावर सपासप पाणी मारून त्याला अभंग स्नान घालणं हे तेवढंच गरजेचं असतं. त्यालाही ओलं होणं आवडतं.

वेगवेगळ्या रंगाच्या तंबूत त्यांची ही मांदियाळी बघण्यात भलतंच अप्रूप असतं. तो एक प्रकारचा रंग बाजार असतो. विविध रंगाच्या कापडाने आच्छादलेले कपडे जणु काही आकाशातल्या हलत्या ढगाचं रूप सदृश्यपणे आपल्या मनात उतरतं. घोड्यासाठीचं हे तात्पुरतं घर कसंही नसते. असतं ते देखणं, रंगीबेरंगी, वेड्यावाकड्या कपड्यानं मंडीत केलेलं.

खिंड लढवणारे लढवय्येच फक्त आपल्या आवडत्या घोड्याचे लाड करतात असे नाही. प्रेम कोणावरही करावं अशी एक कविता शिरवाडकरांची आहे. त्यातील प्रेम करू इच्छिणाऱ्याला दिलेला सल्ला अनेकदा तळ्याकाठी पाय सोडून बसल्यानंतर माझ्यापर्यंत आला. तळ्याला अंतराअंतरानं असलेल्या पायऱ्या. घोडे आणि घोडेस्वार यांच्या इतकेच जलवंतीवर प्रेम करणारे होते. ओलत्या पायऱ्या पाण्यातील तुडूंबपण भोगून कोरड्या झाल्यानंतर मला त्यांचं खरं रूप दिसलं. ते ही तितकंच मोहक वाटलं. आजूबाजूला, कोनाकोपऱ्यात शेवाळाचा तवंग घोडे प्रदर्शनातील अनेक गोष्टींना साक्षीदार म्हणून वावरताना दिसला.

काठदार, शुभ्र चांदणी धोतराच्या घोळात अडकलेले पाय झपाझप पडताना त्यांना जयपुरी चपलेची किंवा बुटांची लयदार साथ मनावर आनंद रेषा उमटून जातात. जलवंतीच्या रंगरुपात काहीवेळ मन हरवून जातं ते पानाच्या काठावर उभा राहून पाण्यात पाहणाऱ्या घोड्यांच्या छबीदार आकृतीमुळे.

हेही वाचा : कविता व्यक्तीला संवेदनशील बनवते

आकृत्याच आकृत्या आणि झाड सावल्यांच्या बदलत्या रुपात त्यांच्याकडं बघितलं की पुन्हा लहानपण देगा देवा असंच म्हणावं वाटतं. कारण घोड वय झाल्यानंतर त्या प्राण्याशी लहान वयातील केलेले वर्तन करता येत नाही. याचं शल्य मनात गाठ बनवून लटकलेलं असायचं. लटका राग आला तरी तो या वयात काढता येत नाही असं अनेकजण सांगतात. ती दोऱ्यातदोऱ्याची राजस्थानी राजबंडी आणि त्या बंडीला साजेसे डोक्यावर असलेले सुंदर असे मुंडासे त्याचा थाट तर काही बघायलाच नको.

राजस्थानी फेट्याचा रुबाब काही वेगळाच असतो. तिथे आपल्याला दिसतं ती जपलेली संस्कृती. अगदी वर्षानुवर्ष इतिहासकालीन वंशावलीच्या आधाराने त्यांची पण कुंडली मस्त जमून आलेली असते. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका परंतु घोड्यालाही शिस्त नावाचा प्रकार माहीत असतो. माणसं जर बेशिस्त वागत असतील तर तालेवार प्राणी अधूनमधून त्यांना धडे देताना दिसतो. नेमके धडे कोण कोणाला देतो याचं एकलव्य शिक्षण पुष्करच्या मेळ्यात आपण घेत असतो. पण ते शिक्षण कायम ठेवावं म्हणून जतन केलं नाही तर घोड्याचं उधळणं आणि आपल्यापासून दूर जाणं हे पण अनेकांनी बघितलेलं असतं. 

राजस्थानमधील घोडे बघण्यासाठी जगाच्या पाठीवरून जयपुरात येणाऱ्या लोंढ्यांचा आवाका लक्षात घेतला तर पुष्करचा घोडा मेळावा कायम लक्षात राहतो. मग एका घोडेपारख्याने त्याच काठावर बसून एका रुबाबदार घोड्याची मांडलेली कुंडली बघूनच पाच लाखाचा सौदा पक्का होतो. खुराची ठेवण, खुराभोवतीचं वर्तूळ, घोट्यापर्यंतचा भाग, खुराचं वेगळेपण, त्याच्या श्वासाचा आवाज, त्यांचं जांभई देणं, उठणं-बसणं, बसण्याची लकब  आणि उठण्याची लकब याचं मांडलेलं कुंडली शास्त्र हे राजे राजवाडे यांच्या परंपरेतून अधिक गडद झालेलं दिसतं.

घोडा आपल्या घरात प्रिय व्हावा असं वाटत असतानाच घोड्यावर बसून एक-दोन मैलाची रपेट केल्याशिवाय त्याच्या सौदयावर शिक्का बसत नाही. घोड्याची खरेदी कोवळ्या किरणात करायची की सूर्य तेजाळ झाल्यावर याचं गणित प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. गणित आणि भाकीत याचा मेळ घालीत घालीत मूळ मालकाला पैसे दिल्यानंतर मग आवडीने आणलेला रंगीत खोगीर टाकूनच सौदा पूर्ण होतो.

त्यात एखादी सौदामिनी सुद्धा असते. सौदामिनी म्हणजे वीज. मग विजेचा कडकडाट करणारी एखादी घोडी घोड्यापेक्षा वेगळाच बाज अभ्यासासाठी पुढे मांडते. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास हा करावाच लागतो. रंग-रूपावर जाऊन घोडे व्यवहार करणारी मानस पुष्करमधे आढळत नाहीत.

या मेळ्यात तीन रंग बघायला मिळतात. एक सकाळचा, एक दुपारचा आणि तिसरा आकाशात उभारून आलेल्या चंद्रप्रकाशातील पौर्णिमेप्रकाशाचा. रांगांमधे बांधलेल्या घोड्यांच्या सावल्या वाळू मैदानावर पडल्यानंतर दिसणारं चित्र एम.एफ. हुसेन या महान चित्रकाराने काढलेल्या एखाद्या दुसऱ्या चित्राची आठवण करून देत राहते. कुठल्याही घोड्याचा रंग कुठलाही असो, पौर्णिमेच्या चांदण्यात तो काळ्या दगड्यावरची रेघच दिसतो. कारण तो काळ्या-पांढऱ्या रंगाचा खेळ असतो. त्याचा मेळ घालता घालता वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

मनात चाललेला घोड्यावरील प्रेमाची सर्कस पुन्हा एकदा कुठल्यातरी वर्तुळबाह्य विचारात मन गुंतवून ठेवते. ‘ठेविले अनंते तैशीचे राहावे’ याचा प्रत्यय देणारी एक नाट्यछटा अमूर्त शैलीत सादर केल्याचा भास नक्कीच होतो. जीवन कोणाचंही असो ते भासा-आभासाने भरलेलं असतं. अचानक येणाऱ्या वाऱ्यामुळे उडणारी रेती डोळ्यात गेली तरीही डोळ्यातून वाहणाऱ्या चिकट पाण्याच्या माध्यमातून ती कशी बाहेर येते याचं आपोआपीकरण माणसाच्या वाट्याला नाहीतर प्राण्याच्या वाट्याला आलेलं असतं. याचं समीकरण अजून बोलक्या मानवाला सांगता आलेलं नाही.

तो एकप्रकारे सम्यक् सौंदर्यशास्त्राचा नमुना असतो. एखाद्या विशिष्ट गटाचे सौंदर्यशास्त्र त्यात नसते. निसर्ग जेव्हा सौंदर्यशास्त्र बहाल करतो तेव्हा ते सर्वांचंच असतं. परंतु सकल जनाला बहाल केलेलं सौंदर्यशास्त्र जेव्हा एक विशिष्ट समुदाय त्याला स्वतःच्या मालकीचं करून जातो तेव्हा या घोड्यांच्या मेळाव्याचे अनेक पदर लक्षात येतात.

सजणं आणि साज याची आवड कुणाला नसते. मुक्या प्राण्यांनाही सजवलं तर आवडतंच ना! ते सजणं घोड्याचं असलं तरी त्यातील बोलकेपण हे चढवलेल्या साजाचे आनंदध्वनी हळूहळू तलावापर्यंत जात जात पाण्यात उतरतात. तरंग उमटतात आणि घोड्याच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य सांगतात.

हेही वाचा : ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

माणूस अशा मेळाव्याला जाताना सजूनच जात असतो. स्वतः केलेली सजावट त्याच्यासाठी प्रेरणादायक असली तरी ती ‘काटा रुते कुणाला, मज फुल का रुतावे’ या प्रश्नांकीत वर्तुळात गरगर फिरवीत राहते. गरगर फिरणं आणि गरागरा फिरवणं या दोन्ही गोष्टींची सवय घोड्याला असतेच की.

पंढरपूरला जाताना वाटेत रिंगण नावाचा खेळ खेळला जातो तो चपखल घोड्याच्या मदतीने. रथाची घोडी, युद्धाची घोडी आणि कसरतीतील घोडी, सैन्यदलातील घोडी या घोड्यांची लीला बघता बघता समोर येणाऱ्या अनेक घटनात्मक इतिहासाची साथ देत राहतात. आणि रिंगण खेळात भक्तिभाव उधळणारी घोड्यांची स्वारी ही काहीशी वेगळ्या जातकुळीतील असली तरीही याच वंशपरंपरेतली असते हे सांगायला नको.

पुष्करच्या घोडे मेळाव्यात तेथील वाळवंटी रेतीच्या दर्शनानेही मन भावूक होतं आणि घोड्याबरोबरच माणसाचीही जगण्याची रित दिसून येते. कधी दालबाटी जेवणातून, कधी नुपूर नर्तनातून, कधी डोहाळाच्या नादमय साथीने निघालेल्या लोक गीतांच्या आवर्तातून. पदन्यास कोणाचाही असला तरी त्यातील लयबद्धता व्यापक स्वरूपात ध्यानी आल्यानंतर मन उडून जातं ते चित्तोडच्या राजाच्या घोड्यावर. 

‘बावरे मना’ची ही प्रतिमा जेव्हा खुळेपणात रस घेते तेव्हा तिचा आणखी वेगळा असतो म्हणून कधीही नकारात्मकतेच्या आहारी जाऊन अशा आनंदाला मोकळेपणाने अंगभर फिरू द्यायचं असतं. लहानपणीच्या घोड्याला आपण शिंगरू म्हणतो आणि उंचीप्रमाणे शेपटी जेव्हा पसरत जाते तेव्हा ते घोडे होते. घोडे होण्याचा आणि घोड्यावर बसण्याचा, त्याला उधळू देण्याचा, खाली पडण्याचा स्वतंत्र अधिकार असतो. त्या अधिकाराचा लगाम कधीही, कुणीही हातात घेता कामा नये.

हेही वाचा : 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…