एवढी  होती माया, भूल पडली रामाला

आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत.

‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक’ अशी सीतेची प्रतिमा आजपर्यंत भारतीय जनमानसात कायम होती. ती तशीच रहावी यात परंपरावाद्यांचा एक मोठा डाव होता. कारण समाजात असे आदर्श उभे केले की मागून येणाऱ्या स्त्रियांना त्यांचा दाखला देणं सोपं जातं. स्त्रियांचा पतिव्रता म्हणून जो गौरव केला जातो, त्यामागेही हेच कारस्थान आहे. जेणेकरुन स्त्रीने आवाज उठवू नये.

मुळात स्वतःचं स्वतंत्र असित्वच मानू नये. याच न्यायाने आजवर सीतेचा आवाज दाबला गेला होता. काही वर्षांपूर्वी मामा वरेरकर यांनी लिहिलेल्या आणि मो. ग. रांगणेकरांनी रंगभूमीवर आणलेल्या ‘भूमिकन्या’ नाटकाने सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पण असे प्रयत्न, कालांतराने प्रस्थापितांकडून केले जातात.

अपवादात्मक परिस्थितीत का होईना, पण स्त्रिया पुरुषांना प्रश्न विचारू शकतात, हे कोणत्याही परिस्थितीत समाजासमोर येणं, हे समाजपुरुषाला नको असतं, त्यामुळे त्याचा इगो दुखावला जातो. याच कारणाने गौरवीकरणाच्या मखरात बसवून पुरुषी मनोवृत्तीने आताआतापर्यंत एकप्रकारे स्त्रीला बंदिस्तच करून ठेवलं होतं. हे गौरवीकरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मारच.

पण आता स्त्रिया बोलू लागल्यात. अगदी रामायण-महाभारतातल्या, पुराणातल्या स्त्रियाही! आपलं दुःख, आपल्या वेदना सांगायला त्या स्वतः अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या दैवतीकरणामागे दडलेल्या दर्दभऱ्या कथा-कहाण्यांना आता वाचा फुटलीय. आताच्या समविचारी स्त्री-पुरुषांच्या माध्यमातून त्या आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजपुरुषाला जाब विचारतायत. सीता त्यापैकीच एक!

खरंतर सीता-द्रौपदी काय, रुक्मिणी-भामा काय, किंवा अंबा-कुंती काय, या सगळ्या अभिजनांची परंपरा सांगणाऱ्या पुराणग्रंथांतल्या आणि महाकाव्यांतल्या चरित्रनायिका. साहजिकच त्यांच्या भोवती ग्रंथकर्त्यांनी स्त्री म्हणून असलेल्या मानमर्यादांचा, त्याग-नीतिमत्तेचा सुरेख कोष विणलेला, त्यामुळे त्यांची दुःख सर्वसामान्यांसमोर कधी पोचलीच नाहीत.

हेही वाचा: अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

मुळात अभिजनसंस्कृतीतल्या साहित्यनिर्मितीचा हेतूच समाजाला नीतिमत्तेचे-आदर्शवादाचे दाखले देणं हा असल्यामुळे, त्यांनी आपलं न्युनत्वही कायम झाकूनच ठेवलं. किंवा तात्त्विक मांडणी करून त्याला आदर्शांचा मुलामा तरी दिला. विशेषतः स्त्री-नायिकांच्या संदर्भात या ग्रंथकर्त्यांनी कायमच असं केलंय.

अभिजन परंपरेला समांतरपणे वाहणाऱ्या बहुजनांची संस्कृती-साहित्य असं करत नाही. ती सुख असो किंवा दुःख सगळंच मोकळेढाकळेपणाने सांगून मोकळी होते. कारण लिखित ऐवजी मौखिक परंपरेने वाहणाऱ्या बहुजनांच्या लोकसंस्कृती किंवा लोकवाङ्मयाला समाजासमोर आदर्श ठेवायचा नसतो, तर समाजातील वंचित घटकांचे दबलेले आवाज मोकळे करायचे असतात.

राम-सीतेच्या नात्याकडेही लोकपरंपरेने याच नजरेने पाहिलेलं आहे. त्यामुळे अभिजन परंपरेतल्या मर्यादापुरुषोत्तम रामाकडे लोकपरंपरेने क्वचित कधी खलपुरुष म्हणूनही पाहिलेलं आहे. कारण त्याने सीतेवर अन्याय केलाय, असं या लोकपरंपरेचं म्हणणं आहे आणि त्याचे अनेक दाखलेही लोकवाङ्मयात सापडतात.

केवळ लोकवाङ्मयच नाही, तर सद्यकालीन वाङ्मयातही सीतेकडे तिच्या पारंपरिक सोशिक प्रतिमेच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. विशेषतः  अमिष त्रिपाठी यांची ‘सीता : वॉरियर ऑफ मिथिला’ ही इंग्रजी आणि प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांची ‘उत्तररकांड’ ही कन्नड कादंबरी, या दोन कादंबऱ्यांनी सीतेला काहीशा वेगळ्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

अमिषने सीतेला वीरांगनेच्या रूपात रंगवलंय. आपल्या मिथिला नगरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या सीतेचं क्षात्रतेजच अमिषने उजळून टाकलंय. तर भैरप्पांनीही सीतेच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलंय. ‘पर्व’ कादंबरीत त्यांनी ज्याप्रमाणे महाभारतातल्या सगळ्या पात्रांना मानवी पातळीवर रेखाटलंय, तेच त्यांनी ‘उत्तरकांड’मधे केलंय. त्यामुळे सीता थेट आजच्या काळातली व्यक्तिरेखा वाटते.

हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, हा प्रसंग एकूणच स्त्रीवादाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच सीता जशी रामापासून दूर होती, त्याप्रमाणेच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल अनेकदा केला जातो.

नेमका असाच सवाल भैरप्पांच्या उत्तरकांडमधली सीता रामाला करते. ती म्हणते- ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर होतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. कारण आजचा पुरुष असाच दुटप्पी वागत आलाय.

सीतेसंदर्भातल्या कथांना-मिथकांना आता वेगळा आयाम दिला जात आहे. पण खरंच सीता कोण होती? वाल्मीकींच्या रामायणानुसार ती जनकाची कन्या होती, रामाची पत्नी होती, लवकुशाची आई होती, दशरथाची सून होती. जोडायची तर तिची अशी कितीतरी कुणाकुणाशी जिव्हाळ्याची नाती जोडता येतील.

पण जन्मापासून ते थेट जीवनाची अखेर होईपर्यंत तिचं एकच नातं तिला कायम चिकटून राहिलं. ते होतं, मातीचं नातं. मातीचं तिच्याशी आणि तिचं मातीशी असलेलं नातं. ती मातीचीच लेक होती, म्हणून तर जिवंतपणी मातीत गेली. सन्मानाने.

या अंगाने सीतेकडे पाहिलं, तर सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा दुसरी सापडणार नाही. रामायण-महाभारत महाकाव्यं होती की इतिहास हा वादाचा मुद्दा आहे. तो बाजूला ठेवला तरी, वेगवेगळ्या कथा आणि गाण्यांसोबत सीता जेवढी भारतीय मातीत रुजली, तेवढी इतर कुणीच नाही. ते साहजिकही होतं. कारण तिच्या वाट्याला जे दुःख आलं, ते आणि तसंच भारतीय स्त्रीच्याही वाट्याला आलेलं आहे आणि अजूनही येत आहे.

हेही वाचा: ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त

त्यामुळेच अभिजन परंपरेनं ‘रामायण’ सांगितलेलं असलं, तरी लोकपरंपरेनं मात्र ‘सीतायण’च गायलेलं आहे. ‘अंकुशपुराण’, ‘चंद्रावती रामायण’ ते दक्षिणेकडच्या मोठ्या नाटककार स्नेहलता रेड्डी यांचं ‘सीता’ नाटक. सगळ्यांनी किती विविधप्रकारे सीतेचं गुणगान गायलं आहे. ते केवळ गुणगान नाहीय. सीतेची ताकद त्या ‘सीतायणां’त सामावलेली आहे. उगाच नाही लोकपरंपरा म्हणत-

‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा’

सीतेवर झालेल्या अन्यायाची चूड लोकसंस्कृतीतल्या स्त्रियांच्या मनामनात पेटलीय. त्यांना तिचं दुःख पाहवत नाही. रामाने तिचा केलेला त्याग आणि रानात तिच्या वाट्याला आलेलं दुःख, त्या आपलंच दुःख मानून व्यक्त करताना म्हणतात-

‘सीता चालली वनाला, रडू लागली मनाला
एवढी  होती माया, भूल पडली रामाला

सीताई सांगी कथा, आपल्या जलमाची परवड
लव-कुश बाळायाच्या, नव्हती न्हाणीला तरवड’

एवढंच कशाला? काही लोकभावना तर एवढ्या पुढे जातात की सीतेवर झालेल्या अन्यायाने क्षोभ पावून म्हणतात-

‘सीतेला वनवास, असे कितीदा येतील
लवू पोटाला येतील, सूड रामाचा घेतील.’

हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

लोकवाङ्मयाची पानं चाळत गेलं, तर यापेक्षाही किती तरी कठोर प्रहार लोकमानसाने रामावर केलेले दिसतात. अभिजन परंपरेने रामाचा गुणगौरव केला आणि सीतेला सोशिकतेची मूर्ती बनवून लोकांसमोर सादर केलं. पण जे अभिजन परंपरेला दिसलं नाही, ते लोकपरंपरेला दिसलं. म्हणून तर या परंपरेने सीतेचं पुन्हा जमिनीत जाणं, हा तिने केलेला विद्रोह मानला. कारण ती रामाच्या सततच्या दांभिक वागण्याला कंटाळली होती.

महत्त्वाचं म्हणजे अयोध्येला वारसदार हवा म्हणूनच रामाने सीतेचा लवकुशासह स्वीकार केला, असंही काही गीतं सांगतात. कोकणात म्हटल्या जाणाऱ्या एका लोकगीतात तर सीतेचा उद्वेग सरळसरळ अधोरेखित करण्यात आला आहे.

लवकुशाची भेट झाल्यानंतर जेव्हा राम-लक्ष्मण आणि लव-कुश, सीता सगळेजण पुन्हा अयोध्येला जायला निघतात, तेव्हा त्याचं वर्णन करताना हे लोकगीत म्हणतं-

‘रथ आला अर्ध्या रस्त्यात गं, रथ आला अर्ध्या रस्त्यात गं
सीता मग मनी बोलली गं, सीता मग मनी बोलली गं

आता कशाला जाऊ वाड्यात गं, कशाला जाऊ वाड्यात गं
बाळ दिले त्यांच्या हाती गं, बाळ दिले त्यांच्या हाती गं

सरलं अर्ध आयुक्ष गं, सरलं अर्ध आयुक्ष गं
आयुक्षाची झाली माती गं, आयुक्षाची झाली माती गं

वसार वसार तू धरतरी माते गं, वसार तू धरतरी माते गं
तिथे धरतरी वसारली, सीता धरतरीत गेली गं’

या गाण्यात सीतेने काढलेले ‘आयुक्षाची झाली माती गं’ हे उद्गार खूप जहाल आहेत. पराकोटीचा छळवाद वाट्याला आल्यानंतरच असे उद्गार काढले जातात.

हेही वाचा: मुंह मे राम, बगल में वोट

लोकपरंपरा फार पूर्वीपासून सीतेबद्दल आणि तिच्या संदर्भातल्या मिथकांबद्दल बोलत आलेली आहे. नागरपरंपरेने मात्र आतापर्यंत त्याच्याकडे कानाडोळाच केला होता. अमिष त्रिपाठी, एस. एल. भैरप्पा, देवदत्त पटनाईक यांच्या कादंबऱ्यांमुळे सीतेच्या व्यक्तिरेखेला पुन्हा उठाव मिळत आहे. यानिमित्ताने लोकपरंपरेतील ‘सीतायणा’चाही वेध घेतला गेला. डॉ. तारा भवाळकर तो पुस्तकरूपात घेत आहेत. तर सीतेची आणखी वेगळी प्रतिमा झळाळून उठेल.

मुळात मिथककथांच्या निमित्ताने का होईना, तरुण पिढी आणि एकूणच वाचक वाचनाकडे वळत असेल, तर चांगलंच आहे. पण हे वाङ्मय वाचताना ते कायमच खरं नसतं, याची जाणीव वाचकांनी ठेवायला हवी. कारण सत्य-असत्य, भास-आभासाच्या पातळीवरच्या एखाद्या घटनेला कल्पनेचा सुरेख मुलामा दिला की एखादं मिथक किंवा मिथ्यकथा सहज तयार होऊन जाते.

त्यावर काळाची पुटं चढली की मग समाजमनात त्या मिथकांना एक घट्ट आणि उबदार स्थान मिळतं. त्या स्थानाला मग सहसा कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तोपर्यंत परंपरेचं पाठबळ त्या मिथकाला प्राप्त झालेलं असतं.

सीतेचं जमिनीत सापडणं काय आणि तिने पुन्हा मातीत जाणं काय, एक मिथकच तर आहे! मात्र हे सीता आणि मातीचं मिथक थेट स्त्री आणि भूमीचं नातं अधोरेखित करणारं आहे. म्हणून आयाबाया एका ओवीत म्हणतात-

‘सीताबाई म्हणिते, मला माय की मावशी
मला न्हाई नातंगोतं, जलम नांगराच्या ताशी’

हेही वाचा: 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…