सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे : परिवर्तनाचा इतिहास मांडणारे साक्षीदार

‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.

भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या एखाद्या चळवळीचा इतिहास पद्धतशीरपणे आणि तटस्थपणे लिहिण्याची परंपरा तशी दुर्मिळ आहे. इतिहास लिहिताना व्यक्तिनिष्ठा न आणता वस्तुनिष्ठतेला महत्त्व अभिप्रेत असतं. इतिहासात काही काळानंतर बदल होत असला तरी आज तो सत्यपणे मांडणं अपेक्षित असतं. या विवेचनाला अनुसरून महाराष्ट्रातले एक चिकित्सक वैचारिक लेखक आपलं कार्य प्रसिद्धीविन्मुख राहून करत होते ते म्हणजे रा. ना. चव्हाण.

रा. ना. चव्हाण यांनी आयुष्यभर जी इतिहास, समाजशास्त्र आणि इतर प्रबोधनात्मक चळवळ एकहाती चालवली त्याला तोड नाही. त्यांनी वेळोवेळी अनेक विषयांवर वस्तुनिष्ठपणे भाष्य करत हा वैचारिक इतिहास परखडपणे लिहिण्याचं धाडस केलं.

जवळून पाहिली सत्यशोधक चळवळ

महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर रा. ना. चव्हाण यांनी सत्यशोधकीय चळवळ जवळून अनुभवली, वाढवली आणि त्याविषयी जनमानसात प्रबोधन केलं. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळही पाहिली. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी भाषिक राज्य निर्मितीची आंदोलनं जवळून पाहिली. अशा मोठ्या घडामोडींचे साक्षीदार रा.ना. चव्हाण होते.

एवढा मोठा वैचारिक पैस असणार्‍या व्यक्ती तत्कालीन समाजात अगदी कमी होत्या. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचं आपोआपच महत्त्व वाढतं, अधोरेखित होतं. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी वैचारिक विश्लेषण करून जनमानसात वैचारिक जागरण करण्याचं मोठं व्रत स्वीकारलं.

कोणतीही मुद्रित संस्था हाताशी नसताना त्यांनी त्यांच्या संतुलित विचारांचा केलेला प्रचार आणि प्रसार अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामधे कसदार वैचारिक लेखन केलं. त्यांच्या या लेखनाला एकत्रित करून पुन्हा समाजापुढे ठेवण्याचं श्रेष्ठ काम त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी केलं. यासाठी त्यांनी आजपर्यंत ४२ ग्रंथ प्रकाशित केले.

याच प्रबोधकीय चळवळीच्या मालेतला ४२ वा ग्रंथ ११ एप्रिल २०२१ ला महात्मा फुलेंच्या जयंतीला प्रकाशित झाला. सध्या जगभर पसरलेली कोरोनाची साथ आणि स्तब्ध झालेलं जग या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक नाही तर तीन तीन पुस्तकं प्रकाशित करण्याचं धाडस करणं खरोखरच अनोखं आहे.

हेही वाचा :  खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

अस्सल कागदपत्रांचा संग्रह

रमेश चव्हाण यांनी ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा ग्रंथ संपादित करून प्रकाशित केला. यात प्रामुख्याने महात्मा जोतीबा फुलेंच्या सत्यशोधक समाजाशी संबंधित असणारी अस्सल कागदपत्रं विषयानुसार एकत्रित करून प्रकाशित केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना भारी ठरतं. सत्यशोधक समाजाविषयी रा. ना. चव्हाण यांच्या संग्रहातली कागदपत्रं प्रकाशित करून सत्यशोधक समाजाचं प्रबोधन आणि सत्यशोधकीय तत्कालीन परिणाम याचा आरसा समोर ठेवलाय.

या आगळ्यावेगळ्या ग्रंथात सत्यशोधक समाजाचे निर्माते महात्मा जोतीबा फुलेंच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या वृत्तपत्रात आलेले श्रद्धांजलीपर लेख एकत्रित करून त्याचा एक भाग केलाय. यामुळे नेमकं त्याकाळात महात्मा फुलेंच्या समाज परिवर्तनाचा झालेला परिणाम आणि फुलेंचं श्रेष्ठपण लक्षात येतं.

हा एक भाग सोडला तर इथून पुढे रा. ना. चव्हाण यांनी जमवलेले, एकत्रित केलेले आणि त्यांनी स्वतः लिहिलेले लेख विषयानुसार एकत्रित करून क्रमवार दिलेत. हे सगळे लेख बाबा आढाव चालवत असलेल्या पुरोगामी सत्यशोधक या नियकालिकातून ‘जुनी कागदपत्रे’ या सदरात पूर्वी प्रसिद्ध झालेत.

आजच्या काळातलं महत्त्व

या सगळ्या लेखनाचं आजच्या काळात महत्त्व काय याचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतं की, सत्यशोधक समाजाचा एकत्रित इतिहास आजपर्यंत लिहिला गेलेला नाही. याही कागदपत्रातून संपूर्ण इतिहास समोर येतोच असं नाही. पण एक मात्र आहे. ज्या वेळी हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी अस्सल साधनं म्हणून या ग्रंथाचा उपयोग केल्याशिवाय एकाही अभ्यासकाला पुढे जाता येणार नाही.

फक्त अस्सल कागदपत्रं म्हणून या ग्रंथाकडे पाहता येणार नाही. कारण प्रत्येक घटना-प्रसंगामागची कारणमीमांसा संपादकांनी स्पष्ट केलीय. प्रस्तावनाकार अरुण शिंदेंनी ‘महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा दस्ताऐवज’ या दीर्घ लेखात या सगळ्या कागदपत्रे आणि आजच्या काळात त्यांचं असणारं महत्त्व अभ्यासपूर्ण विशद केलंय.

हेही वाचा : रा. ना. : महाराष्ट्राच्या इतिहासाचा संगणक

स्वतंत्र मतांचे वैचारिक सुधारक

रा. ना. चव्हाण हे कोणत्या एका पक्षाचे वाहन नव्हते तर ते स्वतःच्या संतुलित वैचारिक मतांचे संप्रेरक होते. त्याकाळी मोठमोठे मतप्रवाह आणि राजकीय संघटना असताना स्वतःच्या वैचारिक प्रबोधनाचा दीप त्यांनी नेहमी तेवत ठेवला. तत्कालीन समाजजीवनावर परिणाम करणारे अनेक समाजधुरीण त्या काळात सक्रिय होते. त्यांच्या रुकरात रुकार आणि नकारात नकार मिळवणारे रा. ना. चव्हाण नव्हते. तर चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायचं धाडस त्यांच्याकडे होतं. म्हणूनच त्याचा उल्लेख नेहमी स्वतंत्र मतांचे वैचारिक सुधारक म्हणून केला जातो.

‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या काही परिषदांचे अहवाल देत तत्कालीन समाजात सत्यशोधकांनी चालवलेले प्रयत्न लक्षात येतात. हे अहवाल लेखन करताना रा. ना. चव्हाण यांनी समकालीन परिस्थितीत ही चळवळ किती कष्टाने सुरू केली होती याचं विवेचन केलंय.

महर्षी शिंदेचं योगदान

या ग्रंथाचं दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महात्मा जोतीबा फुलेंचे सत्यशोधकीय वारसदार यांची दिलेली माहिती. यात गंगारामभाऊ म्हस्के, संतुजी लाड, विश्राम घोले, नारायण लोखंडे, जावजी चौधरी, बाबूराव यादव, वा. रा. कोठारी, नारायण चव्हाण, भाऊशास्त्री लेले, मोरो वाळवेकर, केशव जोशी, वसुदेराव बिर्जे, दिनकरराव जवळकर, रामचंद्रराव धामणसकार, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, बाबूराव हैबतराव, भाऊराव पाटील, विनायक भांडारकर, हरी रावजी चिपळूणकर, गोपाळबाबा वलंगकर, महर्षी वि.रा. शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा समावेश आहे.

जवळजवळ चाळीस भागात हे जुने लेख आणि टिपणे देताना साधारणपणे महात्मा जोतीबा फुले, त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज, त्याची वाटचाल, समाजाची अधिवेशनं, महात्मा फुलेंचे मित्र, सत्यशोधक कार्यकर्ते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सत्यशोधक समाजासाठी असणारं भरीव योगदान याबद्दल विस्तृत भाष्य रा. ना. चव्हाण यांनी केलं होतं. महर्षी शिंदेंचं सत्यशोधक समाजासाठी असणारं योगदान स्पष्टपणे समजतं.

या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रा.ना. चव्हाण यांना आलेली अत्यंत दुर्मिळ पत्रं स्कॅन करून अस्सल साधनं म्हणून ग्रंथात दिलीत. या पत्रांवरून नवीन अभ्यासकांना तत्कालीन परिस्थितीत सत्यशोधक चळवळ कशाप्रकारे पुढे जात होती याची कल्पना येते. त्याचबरोबर रा. ना. चव्हाण यांचा अनेकांशी असणारा वैचारिक स्नेहबंध ही उलगडत जातो. यातली वैचारिक देवाणघेवाण किती श्रेष्ठ दर्जाची होती हे समजतं. त्याच अंगाने सत्यशोधक ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्नशील होते याचीही कल्पना येते.

हेही वाचा : नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं

समाजपरिवर्तनाची धम

या ग्रंथाकडे केवळ आधारभूत ग्रंथ किंवा साधनसामग्री म्हणून न पाहता तो एक सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवण्याचा राजमार्ग आहे. त्याचबरोबर दीडशे वर्षांचा इतिहास प्रामुख्याने यातून समोर येतो. प्रस्तावनाकार अरुण शिंदे म्हणतात त्याप्रमाणे सत्यशोधक चळवळ आणि बहुजन समाजाच्या इतिहासाभ्यासाचा एक विश्वनिय दस्तऐवज म्हणून हा ग्रंथ मोलाचा आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या उत्खननाची अनेक क्षेत्रं आणि दिशा दाखवतो. हे ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. मूलतः रा.ना. चव्हाण यांचं सगळंच लेखन हे वैचारिक अक्षरधन आहे. यात समाजपरिवर्तनाची धमक आहे. वैचारिक शिस्त लावण्याएवढं त्यांचं लेखन कसदार आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच लेखनाचा समग्र अभ्यास करणं समाजाच्या हिताचं आहे.

ग्रंथाचे नाव : सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे
लेखक : रा. ना. चव्हाण
संपादक आणि प्रकाशक : रमेश चव्हाण, रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई
प्रकाशन : ११ एप्रिल, २०२१
पृष्ठसंख्या : ३०४
मूल्य : ३५०/- रुपये

हेही वाचा : 

 बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

 महात्मा फुले अमर आहेतः प्रबोधनकार ठाकरेंचा दुर्मीळ लेख

महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…