अमृतानुभवाच्या प्रसन्न तत्त्वज्ञानाशी गळाभेट घडवणारा दिठी

दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.

दि. बा. मोकाशी हे एक प्रतिभावंत साहित्यिक होते. मराठी कथेला नवीन स्वरूप देणार्‍या आणि तिच्या आशय, विषय, घाट, मांडणीत बदल घडवून आणून मराठी कथेची वाट मोठी आणि मोकळी करणार्‍या पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर आणि अरविंद गोखले यांच्या कथालेखनाच्या झपाट्यातही त्यांची कथा स्वतंत्रपणे उभी राहिली.

तिनं तिचं असं एक मोठं अवकाश तयार केलं. याच अवकाशात आनंद ओवरी, देव चालले, पालखी, अठरा लक्ष पावलं, वात्सायन आणि ‘आता अमोद सुनासि आले’ यांसारख्या कथा यांची नक्षत्रं आपल्या स्वयंभू तेजानं तळपत राहिली.

अलीकडेच ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर ‘दिठी’ हा सिनेमा आला. त्यानिमित्तानं त्या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीच; पण मागच्या पिढीतल्या अनेकांच्या सुखद आठवणी चाळवल्या गेल्या.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

विचारात अडकलेला रामजी

केंबळ नावाचं गाव, तिथं सहा दिवस सतत धुवाँधार पडणारा पाऊस, त्या पावसानं ओले गच्च केलेले दिवस, नदीला आलेला पूर, त्या पुरानं रामजी लोहाराचा ओढून नेलेला तरुण मुलगा आणि त्याच्या या अशा जाण्यानं बधिर झालेला रामजी लोहार.

ज्या विठ्ठलाचा आपण आयुष्यभर ध्यास घेतला, त्यानंच आपल्या बाळाला असं कसं नेलं, अशा विचाराच्या आवर्तनात रामजी अडकला आहे. त्याचं अबोल दुःख कुणाला बघवत नाहीय. रामजी मात्र काळजाला पीळ पाडणार्‍या वेदनेमधे पार रुतून गेला आहे. त्याचे मित्र रोजच्याप्रमाणं अमृतानुभव वाचायला सुरवात करतात.

जगाचं मूळ सांगणारी ओवी

कथेमधे त्यांची वाचनाची सुरवात होते, ती ‘आतां अज्ञानाचेनि मारें। ज्ञान अभेदें वावरे। नीद साधूनि जागरें। नांदिजे जेवि॥’ या ओवीने. ही ओवी म्हणजे अमृतानुभवातली ‘ज्ञानअभेदकथन’ या चौथ्या प्रकरणातली पहिली ओवी आहे.

आत्मस्वरूपाबाबतच्या अज्ञानामुळं आपल्याला सगळीकडं एकच आत्मतत्त्व भरून राहिलेलं आहे याची जाणीव होत नाही, असा त्याचा थोडक्यात अर्थ. रामजीचं अनावर दुःख आणि त्याच्या मित्रांनी वाचायला केलेली ही सुरवात.

दृश्य जगातून गेलेला मुलगा आणि आत्मतत्त्वाबद्दल काही सांगू पाहणारी ओवी. डोळ्यापुढं दिसणारा मुलगा अदृश्य झालेला आणि दृश्य-अदृश्य अशा अवघ्या जगाच्या मुळाशी काय आहे ते स्पष्ट करणारी ओवी वाचली जात आहे.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

जगात यायला धडपडणारं वासरू

तिचा अर्थ वाचणार्‍याला समजतो आहे का? जे ती ओवी ऐकत आहेत, त्यांना कळतो आहे का? माहीत नाही. थिजलेल्या चित्तवृत्ती घेऊन गोठलेल्या मनानं तिथं बसलेल्या रामजीच्या कानावरूनही ती ओवी जाते आहे. पण रामजीच्या मनापर्यंत ती पोचत आहे का? नाहीच पोचत. याचं कारण मुलगा गेल्याच्या वेदनेनं रामजीच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला आहे.

त्याचं मन, बुद्धी, संवेदना बधिर झाल्या आहेत. अशा वेळी त्याच्या कानावर शिवा नेमाणेच्या बायकोचा रडका स्वर कानावर पडतो, ‘माझी गाय अडली आहे, रामजी दादा धाव रे!’ रामजीच्या कानावर पडणारा तो स्वर मात्र त्याच्या मेंदूपर्यंत जातो. तिथं काहीतरी घुसळण होते. काहीतरी त्याला जाणवतं. तो उठतो. आपली औषधं असलेली सरावाची पेटी उचलून तो शिवा नेमाणेकडं जातो. त्या अडलेल्या गायीला तो सोडवतो.

त्या अडलेल्या गायीचं बाळंतपण करणं ही मोठीच परीक्षा असते. तिचं वासरू या जगात यायला धडपडत आहे. त्याला या जगात यायचं आहे. पण काहीतरी अदृश्य शक्ती जणू त्याला या जगात येण्यापासून रोखू बघत आहे. रामजीच्या मनाच्या गाभ्यापर्यंत या वासराची ती धडपड जाते.

वासराची साद रामजीच्या आत्म्यापर्यंत

फुसांडत वाहणार्‍या पाण्यात ओढला जात असताना आपला मुलगाही असाच ओरडला असेल. पाण्याचा कराल विळखा त्याच्या भोवती पडत असताना तोही असाच धडपडला असेल. नाका-तोंडात पाणी जात असताना पाण्याबाहेर येण्यासाठी त्यानं निकरानं प्रयत्न केले असतील. हे वासरूही त्याच्या आईच्या गर्भाशयातून बाहेर येण्यासाठी धडपडत आहे. निकरानं प्रयत्न करत आहे. आतमधे फिरत आहे. पण कुठंतरी काहीतरी चुकतंय.

आता रामजीच्या मनाच्या गाभार्‍यापर्यंत त्या वासराची ही धडपड पोचली आहे. मुलाचा गेलेला जीव आणि या जगात येण्यासाठी धडपडणारा गायीच्या वासराचा जीव. गेलेला काय आणि येऊ पाहणारा काय, जीव एकच. आत्मा एकच. माणसाचा असेल किंवा प्राण्याचा असेल. जीव तो जीवच. तोच आता धडपडतो आहे. झगडतो आहे. त्याची ही तडफड गायीला जाणवतेय.

आपल्या वासराला या जगाचा प्रकाश दिसावा, म्हणून ती तिच्या परीनं प्रयत्न करत आहे. ती दमली आहे. तिला धाप लागली आहे. ती धाप आहे की अदृष्टाला घातलेली साद आहे? असेलही कदाचित; पण एक नक्की की ती साद रामजीच्या आत्म्यापर्यंत पोचली आहे. आता तो सजग झाला आहे. त्याच्या शरीरात एक आगळं चैतन्य आलं आहे. त्याच्या बोटांना जणू आता डोळे फुटले आहेत.

त्या वासराच्या फिरण्याची दिशा त्याला आता उमजली आहे. ती दिशा पकडून तो प्रयत्न करतो आहे. आणि रामजीनं त्या गायीची सुटका केली आहे. तिच्या वासराच्या रूपानं एक जीव या जगात आला आहे. रामजी त्याच्या अंगावरचं आवरण दूर करतो. त्याला त्याच्या आईकडं वळवतो. त्याची आई त्याला प्रेमानं चाटू लागली आहे. आणि दमलेला, थकलेला रामजी आपली औषधाची पेटी आवरून आता यापुढं काय करायचं हे सांगून परत निघाला आहे.

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

जगणं व्यापून टाकणाऱ्या तत्त्वाविषयी

आता रामजीच्या अंगातलं चैतन्य गेलं आहे. त्याच्या चित्तवृत्ती पुन्हा गोठू लागल्या आहेत. मन थिजू लागलं आहे. चालता चालता तो ओसरीवर आला. संतूनं पोथी उघडली. तो वाचू लागला, ‘आता अमोद सुनासि जाले। श्रुतीस श्रवण रिघाले। आरिसे उठिले। लोचनेसी॥ अपुलेनि समीरपणें। वेल्हावती विंजणे। कीं माथेची चापेपणे। बहकताती॥’ याचा अर्थ म्हणजे रामजीच्या हातून आता जोे अद्भुत, अवर्णनीय, शब्दाच्या चिमटीत न मावणारा आनंद शिवा नेमाणेच्या घरात भरून राहिला, तोच आहे.

ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक विंदा करंदीकरांनी अमृतानुभवाचं अर्वाचीनीकरण केलं आहे. आजच्या भाषेत ते धन त्यांनी मांडलं आहे. या ओव्याचं त्यांनी केलेलं रूप असं. आता सुगंध नाक झाले; शब्दालाच कान फुटले; डोळ्यांमधेच उमटले आरसेही. स्वतःच्याच वार्‍यावरती पंखे स्वतःच हेलावती; चाफे हाऊन दरवळती मस्तकेच.

या चराचरात रूप, आकार आणि चलनवलन वेगवेगळं असलं, तरी त्यामागं एकच एक तत्त्व आहे. ते तत्त्व हेच चिरंतन सत्य आहे. अवघं भवताल त्याच तत्त्वाचे विविध आविष्कार आहेत. त्यांच्यात भेदाभेद करण्याचं कारण नाही. ते केले जातात, याचं कारण सार्‍याला व्यापून असणार्‍या तत्त्वाविषयी असणारं अज्ञान.

मनुष्य नावाचा प्राणी हासुद्धा एका विराट, अविरत स्पंदनशील असणार्‍या चैतन्यमय आणि नवनिर्मितीक्षम तत्त्वाचा एक भाग आहे. मात्र मानव स्वतःला त्यापासून ‘वेगळं’ समजतो. ही अलगपणाची भावना संपण्यासाठी आवश्यक असणारी संवेदनशीलता, तरलता संतांच्या लेखनाच्या वाचनातून येऊ शकते.

मोकाशींच्या कथेत प्रसन्नतेचं चांदणं

रामजी किंवा संतू हे वर्षानुवर्षं ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव वाचत आहेत. तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ काय, असं त्यांना विचारलं, तर तो कदाचित त्यांना शब्दांमधे सांगता येणार नाही. मात्र सततच्या वाचनातून त्यांच्या मनाची आणि बुद्धीची मशागत झालेली आहे. त्यांच्या धारणा पालटल्या आहेत. त्यांची मनं तरल झाली आहेत. संवेदना तीव्र झाल्या आहेत.

शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी त्यांच्या मनात उमटतं आहे. मनात उमटतं ते कृतीतून कसं दिसतं, ते वाचकाला रामजीकडून समजतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात.

ही कथा लिहिणारे मोकाशी कसे होते? आपली अशी आगळी कथासृष्टी तयार करणार्‍या प्रतिभावंत वसुंधरा पटवर्धन लिहितात, ‘मोकाशी म्हणजे थंडीतल्या उगवत्या सकाळसारखा प्रसन्न, हसरा माणूस.’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या या प्रसन्नतेचं चांदणं त्यांच्या या कथेत पडलं आहे.

हेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

हे कथाशिल्प कसं साकारलं?

मौजच्या अंकात १९५९ ला प्रसिद्ध झालेली ही कथा मोकाशी यांनी कशी लिहिली? त्यांना ही कल्पना कशी स्फुरली? असं नेमकं काय घडलं की मोकाशी यांच्या लेखणीनं हे विलक्षण कथाशिल्प साकारलं?. अरविंद गोखले या ज्येष्ठ प्रतिभावंत कथाकारानं त्याचा वेध घेतला आणि १९६४ ला ‘फुलेचि झाली भ्रमर’ ही अप्रतिम कथा लिहिली.

गोखले लिहितात, ‘जन्म-मृत्यूच्या पाठशिवणीच्या खेळातला केवढा कारुण्याचा प्रसंग. आता आमोद सुनासि आले. श्रुतीशी श्रवण निघाले. आरसे उठले लोचनेशी. जणू मृत्यूचा जन्म झाला. रामजी लोहाराचा वाहून गेलेला पोरगाच पिळदार स्नायू फिरवीत नेमाण्याच्या गायीची महाकळ काढीत होता. जसं काही शिवाचं होणारं वासरूच पुरात वाहत जात होतं.’

‘सगळं एकमेकांत मिसळत होतं. रहाटगाडगं फिरत होतं. कथेचे अलग धागे एकमेकांत गुफून गेले होते. तंत्र-मंत्र एकजीव झाले होते. स्वतः लेखकच एक लेख बनले होते. पुराच्या खळबळत्या पाण्यातून शिवा नेमाण्याच्या बायकोची हाक रामजीला ऐकू आली. आयुष्यभर ज्ञानेश्वरी ऐकूनसुद्धा तो पुत्रशोकानं दिङ्मूढ झाला होता; पण त्या आरोळीनं मात्र तो हलला. जन्म देताना एक माता टाहो फोडीत होती.’

‘कुणी तरी मेलं होतं अन् कुणीतरी जन्मायला घातलं होतं. तोच जीव कदाचित जगात येत होता. गाय हंबरली की मुलगा ओरडला? रामजी उठला. ज्ञानेश्वरी सोडून दुःख विसरून गोठ्याशी आला. आपली ओसरलेली शक्ती पणास लावून गायीची महाकळेतून सोडवणूक करू लागला. मोकाशी झपाट्यानं लिहीत होते. त्यांची बोटं झपाटली होती. जणू ती रामजीचीच बोटं होती! सगळं मन लेखनात एकवटलं होतं. प्रतिमा पेनमध्ये एकजीव झाली होती. ज्ञानेश्वरांनी म्हटलं असतं, आता बोटं डोळे झाले आहेत. मेंदू झाले आहेत.’

प्रतिभावंताच्या प्रकटपणाचं कौतुक

अरविंद गोखले यांनी आपल्या या कथेला नाव दिलं आहे, ‘फुलेचि झाली भ्रमर.’ अमृतानुभवातल्या नवव्या प्रकरणातल्या चौथ्या ओवीची ही पहिली ओळ आहे. फुलेंचि जालीं भ्रमर। तरुणीच जाले नर। जालें आपुले शेजार। निद्राळुचि॥ ही कथा म्हणजे एका प्रतिभावंतानं दुसर्‍या प्रतिभावंताला जाहीरपणं केलेला नमस्कार आहे. प्रकटपणानं केलेला गुणगौरव आहे.

आपल्या बरोबरीनं कथा लिहिणार्‍याला दिलेली ही दाद आहे. आजच्या कमालीच्या आत्मकेंद्रित आणि स्वार्थलिप्त जगात तर ते अद्भुतच आहे. अविश्वसनीय वाटावं, इतकं! परस्परांबद्दल आदर, प्रेम आणि कौतुक हे गुण त्या पिढीबरोबरच काळाच्या उदरात गडप झाले असावेत.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…