राजाला ठेंगा दाखवणारा व्यंगचित्रकार अजूनही जिवंत आहे

मंजुल या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराला ट्विटरने एक ईमेल पाठवला. ‘मंजुलटुन्स’ या हँडलवरून प्रकाशित होणारा मजकूर देशाचा कायदा मोडतोय, असं केंद्राने ट्विटरला सांगितलंय. आज सत्ता व्यंगचित्रकारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना धमक्या मिळतायत. तरीही व्यंगचित्रकार थांबलेले नाहीत. त्यांनी राजाला ठेंगा दाखवायचं थांबवलेलं नाही. ईर बीर फत्ते या गाण्यातला तो ‘हम’ आहे.

गोष्ट साधारण १९९५-९६ची असावी. बाली सागू नावाचा बॉलिवूड रिमिक्सचा बाप युरोप-अमेरिकेत धुमाकूळ घालत होता. त्याने भारतात येऊन अमिताभ बच्चनसोबत एक अल्बम केला, एबी बेबी. एकदम नवं असणारं फ्यूजन. आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रेझेंटेशन. राकेश ओमप्रकाश मेहरा हा पुढे बॉलिवूड गाजवणारा डायरेक्टर त्याच्यामागे होता. तेव्हा अपरिचित असलेल्या अ‍ॅनिमेशन आणि वीएफएक्समुळे तो सगळाच अल्बम तेव्हाच्या नव्या पिढीने तोंडाचा आ वासून बघितला.

त्यात एक लहान मुलांचं वाटणारं गाणं होतं, ईर बीर फते. `इक रहेन ईर’, असा मुखडा असलेल्या त्या गाण्यात ईर, बीर, फते ही लहान मुलं आणि गाणं गाणारा हम यांची गोष्टच आहे. त्यात हम म्हणजे अमिताभ बच्चन होता. गाण्यातल्या गोष्टीत ईर लाकडं कापायला जातो. मागून बीर आणि फतेही जातात. हम ते करायला जातो, तर झाडावरून पडतो. हमची तशीच फजिती बेचकी बनवताना होते. चिमणीला मारायला जाताना होते. पण हम त्यांच्या मागूनच जातो.

शेवटी `ईर कहेन चलो राजा के सलाम कर आईन.` इर सांगतो, चला राजाला सलाम करायला जाऊ. मागून बीर आणि फतेही तेच म्हणतात. म्हणून हमही तेच म्हणतो. मग ईर एकदा सलाम ठोकतो. बीर दोनदा सलाम ठोकतो. फते तीनदा सलाम ठोकतो. तेव्हा हम मात्र राजाला ठेंगा दाखवतो. गाणं संपतं.

हेही वाचा : नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

राजाने पाठवली नोटीस

आज जवळपास पंचवीस वर्षांनी मोदींचं राज्य सुरू असताना या गाण्याचा अर्थ लक्षात येऊ लागलाय. एका ईरने सलाम ठोकला की दुसरे हजारो बीर आणि फते मागोमाग सलाम ठोकायला हजर आहेत. कुण्या एका जमान्यातला अँग्री यंग मॅनही त्याला अपवाद उरलेला नाही. पण गाण्यातला ‘हम’ अजूनही संपलेला नाही. तो देशातल्या व्यंगचित्रकारांच्या रूपाने जिंदा आहे.’

हे व्यंगचित्रकार राजाला सलाम करायला तयार नाहीत. ठेंगा दाखवणं हे तर त्यांचं कामच आहे. आणि आता तर राजाला त्यांचा ठेंगा खूपच टोचायला लागलाय. आपण भलं आणि आपलं काम भलं, असं म्हणत शांतपणे तीस वर्षांहून जास्त काळ इमानेइतबारे आपलं काम करणारा मंजुल नावाचा ‘हम’ ठेंगा दाखवतोय, हे बघून राजा धुसफुसतोय. राजाने त्यांना नोटीस पाठवलीय.

मोदी सरकारकी जय!

२०१६ला टॉपटेनी नावाच्या लोकप्रिय इंग्रजी वेबसाइटने जगभरातल्या सध्याच्या सर्वोत्तम दहा व्यंगचित्रकारांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात भारतातलं एकच नाव होतं. मंजुल. ते सहाव्या नंबरवर होते. त्यांच्याविषयी वेबसाइटने म्हटलं होतं की मंजुल यांना अजूनही जग बदलायचंय आणि त्यात त्यांची कार्टून त्यांना मदत करतील, असं त्यांना वाटतं.

या मोठ्या राजकीय व्यंगचित्रकाराने ४ जूनला दुपारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी ट्विटरने पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट जोडला होता. त्यात ट्विटरने कळवलं होतं, `भारत सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनी आम्हाला सांगितलंय की ‘मंजुलटुन्स’ या हँडलवरून प्रकाशित होणारा मजकूर देशाचा कायदा मोडतोय. पण आमच्या धोरणानुसार आम्ही हे फक्त तुमच्या कानावर घातलंय. तुमच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीय.`

या स्क्रीनशॉटसोबत मंजुल यांनी लिहिलं होतं, `जय हो मोदीजी के सरकार की!’ त्यापुढची त्यांची दोन ट्वीटही याच संदर्भात होती. त्यात त्यांनी हिंदीत लिहिलं होतं, `बरं झालं मोदी सरकारने ट्विटरला हे लिहिलं नाही की हे ट्विटर हँडल बंद करा कारण हा व्यंगचित्रकार अधार्मिक आहे, नास्तिक आहे, मोदीजींना देव मानत नाही.’ पुढच्या ट्वीटमधे त्यांनी लिहिलंय, `कोणत्या ट्वीटविषयी आक्षेप आहे ते सरकारने सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पुन्हा तसंच काम करता आलं असतं. ते लोकांच्याही सोयीचं झालं असतं.’ 

हेही वाचा : महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

दडपशाहीविरुद्ध उठवलेला आवाज

मंजुल यांच्यावरच्या नोटिशीमुळे देशभरातले महत्त्वाचे व्यंगचित्रकार लगेच ट्विटरवरच चित्र काढते झाले. त्यांनी या विषयावर कार्टून काढून निषेध व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा वाढली. मुख्य प्रवाहातल्या वर्तमानपत्रांनी त्याची फक्त दखल घेतली. पण इंटरनेटवरच्या बहुतेक समांतर वेबसाईटनी त्याविरुद्ध आवाज उठवला.

मंजुल यांनी आजवर देशातल्या आघाडीच्या अनेक वर्तमानपत्रांत काम केलंय. आज ते कोणत्याही एका वर्तमानपत्राला बांधील नसले तरी त्यांची व्यंगचित्रं देशातल्या अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध होतात. त्यांनी सरकारच्या दडपशाहीविरुद्ध उठवलेला आवाज अनेकांसाठी प्रेरणा बनलाय. पण ते त्यांनी चर्चेत राहण्यासाठी केलंच नव्हतं. 

ते सांगतात, `मला माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. मी प्रामाणिकपणे कायदे पाळणारा माणूस आहे. रस्ता क्रॉस करतानाही शक्यतो झेब्रा क्रॉसिंगवरूनच करतो. गाडी चालवताना सिग्नल तोडत नाही. एखादी गाडी चुकीच्या लेनमधून चालत असेल, तर मला राग येतो. लहानपणी मी एका पोलिसाला लाच घेताना बघितलं. ते बघून मला राग आला आणि आपण काही करू शकत नाही म्हणून खूप नाराजही झालो. त्या निराशेला सकारात्मक वळण मिळावं म्हणून मी चित्र काढू लागलो. त्यामुळे मा‍झ्या व्यंगचित्रांवर कायदे तोडण्याचा आरोप मी कसा सहन करू शकतो, तुम्हीच सांगा.’ याच प्रामाणिकपणाच्या पुण्याईमुळे मंजुल यांना मिळणारा पाठिंबा वाढतोय. 

वह सबसे डरता है

दुसरीकडे नोटिशीनंतर अवघ्या चारच दिवसांनी थोरल्या अंबानींच्या मालकीच्या न्यूज एटीन नेटवर्क या मीडिया हाऊसने मंजुल यांच्यासोबत असलेलं काँट्रॅक्ट अचानक रद्द केलं. न्यूज एटीनच्या वेबसाईटवर गेली सहा वर्षं सातत्याने येणारी मंजुल यांची कार्टून बंद झाली. पाठोपाठ आल्ट न्यूज या वायरल बातम्यांची शहानिशा करणार्‍या प्रसिद्ध वेबसाईटचे एक संस्थापक सदस्य मोहम्मद झुबेर यांनी ट्विटरवरच सांगितलं की त्यांनाही ट्विटरने मंजुल यांच्यासारख्याच नोटिसा दोनदा पाठवल्यात. 

तितक्यातच प्रसिद्ध कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनाही ट्विटरची तशीच नोटीस आली. त्यातही केंद्र सरकारने एका व्यंगचित्रावरच आक्षेप घेतला होता. प्रशांत भूषण यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं. याआधीही एकदा भूषण यांनी शेअर केलेलं आचार्य यांचं न्यायव्यवस्थेवरचं व्यंगचित्र गाजलं होतं. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना एक रुपया दंड लावला होता. तरीही ते झुकलेले नाहीत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून या सगळ्याची नोंद घेतली. ती अशी, `सच से, सवालों से, कार्टून से, वह सबसे डरता है.’ राहुल गांधी यांच्या ट्वीटमधला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, हे वेगळं सांगायला नकोच. खरोखरच केंद्र सरकार या प्रकरणात घाबरत आणि चाचपडत वागतंय, असंच चित्र आहे. 

केंद्र सरकारने याविषयी खुलासा केला असता किंवा मतभेद व्यक्त केले असते, तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं. सरकार टीका सकारात्मकपणे घेत असल्याचं कळलं असतं. पण त्यांनी मंजुल यांची व्यंगचित्रं थेट कायद्याचा भंग करणारी आहेत, असा निर्वाळाच दिल्याचं या नोटिशीत नमूद आहे.

हेही वाचा : इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

भाजप विरुद्ध ट्विटर

ट्विटरच्या मेलमधे केंद्र सरकारच्या नेमक्या कोणत्या खात्याने किंवा एजन्सीने आक्षेप घेतले आहेत, ते लिहिलेलं नाही. नेमक्या कोणत्या ट्वीटवर आक्षेप घेतलेत तेही कळत नाही. त्याची माहिती मिळवण्यासाठी मंजुल लवकरच कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. यातून काही कळण्याची शक्यता कमीच आहे. 

पण मंजुल यांची कोणतीही व्यंगचित्रं कोणताही कायदा मोडणारी नाहीत, असंही कायदेतज्ञ ठामपणे सांगतायत. त्यामुळे केंद्र सरकार ट्विटरच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्षी टिपत असल्याची शक्यता जास्त आहे. या नोटिशीमुळे काय प्रतिक्रिया येतात, कोर्ट त्यावर कशाप्रकारे व्यक्त होतं आणि विशेषत: ट्विटर या प्रसंगात कसं वागतं, याची चाचपणी केली जात असावी.

कारण ट्विटर आणि केंद्र सरकारचं भांडण गेले अनेक महिने सुरू आहे. सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर नियंत्रण ठेवणारे नियम आणल्यावर फेसबुकने उशिरा का असेना पण सरकारसमोर सपशेल लोटांगण घातलं. पण ट्विटर अद्याप झुकायला तयार नाही. त्यात त्यांनी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचं एक ट्वीट वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं ठरवल्यानंतर तर हा वाद विकोपाला गेला. 

त्यात ट्विटरच्या मालकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा नावाच्या संस्थेला काही कोटींची मदत करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण हा वाद थांबलेला दिसत नाहीच. विशेषत: उपराष्ट्रपती आणि संघाच्या काही पदाधिकार्‍यांच्या अकाऊंटवरची अधिकृतपणाची ग्वाही देणारी निळी खूण हटवल्यानंतर भाजपभक्तांचे ट्विटरवचे हल्ले वाढलेत.

ते माध्यमांवरच्या चर्चांमधे ट्विटरला उघडपणे डाव्या विचारांचं म्हणून हिणवू लागलेत. ट्विटरच्या नैतिक आणि कायदेशीर विषयांवरच्या प्रमुख जिशा डायमंड या मूळ भारतीय असल्यामुळे या क्षेत्रातले जगभरातले अभ्यासक या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
पण खुद्द भारतीय जनता पक्षाने याच ट्विटरच्या सोपानावरून सत्तेचा स्वर्ग गाठला होता, हे विसरता येत नाही.

सोशल मीडियाच्या ट्रेण्डमधला बदल

खुद्द मोदी अनेक वर्षं ट्विटरवर पडीक आहेत. सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते ट्विटरवर नोंदवत राहतात. प्रचारसभांतल्या लाइव भाषणांपासून पाकिस्तानला इशारे देण्यापर्यंत ते ट्विटरवर बागडत असतात. त्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांना बोटाला पकडून पकडून ट्विटरवर आणलं. सगळ्या सरकारी यंत्रणांना ट्विटरवर यायला भाग पाडलं. 

लोकांच्या अडचणींत आपण कसे धावून जातो आणि आपण किती सहजपणे लोकांसाठी उपलब्ध आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनीच ट्विटरचा सर्वाधिक वापर केला. गाजावाजा करत आपली बाजू सतत लोकांच्या डोक्यात भरण्यासाठी आणि त्याचबरोबर विरोधकांची विश्वासार्हता संपवण्यासाठी भाजपने ट्विटर मोठ्या ताकदीने वापरलं.

मात्र काही वर्षं सोशल मीडियावरच्या ट्रेण्डमधे बदल होऊ लागलाय. सीएए-एनआरसी विरोधातल्या आंदोलनात सरकारच्या विरोधातली बाजूही तितक्याच ताकदीने आली. नंतर दिल्ली दंगलीत भाजपच्या कांगाव्याचा प्रभाव पडला नाही. पुढे महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारला अनैतिक ठरवण्याचा प्रयत्न फसला. शेतकरी आंदोलनात तर त्यांना रणनीती पूर्णपणे बदलावी लागली. त्यावर शेवटचा घाव कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने घातला.

हेही वाचा : मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

व्यंगचित्रात मोदीच का?

पहिल्याच मोठ्या परीक्षेत मोदी अपयशी ठरत होते. सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर त्याचे वाभाडे काढले जात होते. त्यात व्यंगचित्रकार आघाडीवर होते. मंजुल त्या व्यंगचित्रकारांचं प्रतिनिधित्व करतातच. पण ट्विटरवरच्या बदलत्या लोकमताचंही प्रतिनिधित्व करतात. साध्या माणसाच्या मतांचं प्रतिनिधित्व करतात. ते मोदींच्या प्रतिमेसाठी जास्त घातक ठरतंय.

मंजुल यांनी त्यांच्या तीस वर्षांच्या कारकि‍र्दीत राजीव गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत नऊ पंतप्रधानांवर व्यंगचित्रं काढलीत. त्यांनी कधीच कुणाला सोडलं नाही. फक्त मोदींनाच त्यांची व्यंगचित्रं खटकलीत. ते कधी डाव्यांच्या किंवा भाजपविरोधकांच्या कंपूत नव्हते. मोदीच काय कुणाच्याही विरोधात डूख धरून सूडबुद्धीने वागण्याचा त्यांच्या व्यंगचित्रांचा स्वभावच नाहीय.

अगदी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी पीएम केअर्स फंडमधे देणगीही दिली होती. तरीही त्यांच्या ट्विटरवरच्या व्यंगचित्रांत मात्र मोदीच सगळ्यात जास्त दिसतात. त्याचं कारण देशातल्या लोकशाहीचं खरं रूप दाखवून देणारं आहे.

मंजुल सांगतात, `आज सत्तेवर मोदी आहेत. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाहीत. त्यामुळे व्यंगचित्र मोदींवरच बनणार. एक परीक्षा कॅन्सल करण्यापासून विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करण्यापर्यंत सरकारच्या सगळ्याच गोष्टी मोदी करतात. रस्त्यावरून चालणार्‍या कोणत्याही सर्वसामान्य माणसाला विचारलं की मोदींच्या सरकारमधल्या पाच मंत्र्यांची नावं सांगा, तर सांगता येणार नाहीत. त्यामुळे बातमीत मोदीच असतात आणि व्यंगचित्रं चर्चेतल्या बातम्यांवर बनतात. त्यामुळे त्यात मोदी असणारच. मुख्य प्रवाहातल्या अनेक वर्तमानपत्रांमधे व्यंगचित्रांत त्यांचा चेहरा दाखवण्यावर अघोषित बंदी आहे. त्यामुळे आम्ही सगळेच व्यंगचित्रकार मोदींवरची व्यंगचित्रं सोशल मीडियावर अपलोड करत असतो.’

नेहमीचं काम झालं धाडसाचं

मंजुल सांगतात, सरकार कोणाचंही असतं, त्यांना टीका आवडत नाही. पण आताची दहशतीची परिस्थिती कधीच नव्हती. ज्येष्ठ व्यंगचित्रकार अजित नैनन ‘द प्रिंट’ला सांगतात की परिस्थिती अवघड आहे. आणखी एक ज्येष्ठ व्यंगचित्रकार राजेंद्र धोडपकर यांनीही सत्य या यूट्यूब चॅनलवरच्या चर्चेत सांगितलंय की व्यंगचित्र काढायला भीती वाटावी, अशी वेळ आलीय. सकाळ समूहाचे व्यंगचित्रकार आलोक निरंतर ‘द क्विंट’ला सांगतात, आम्ही काँग्रेसच्या काळात जे काम करत होतो तेच नेहमीचं काम आता धाडसाचं ठरतंय.

आज सत्ता व्यंगचित्रकारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना धमक्या मिळत आहेत. आर्थिक गळचेपी करण्याचा प्रयत्न होतोय. सोशल मीडियावर ट्रोलिंग होतंय. तरीही व्यंगचित्रकार थांबलेले नाहीत. त्यांनी राजाला ठेंगा दाखवायचं थांबवलेलं नाही.

जिथे व्यंगचित्रकार गप्प केला जातो, तिथली लोकशाहीच नाही तर माणुसकीही धोक्यात येते. म्हणून व्यंगचित्रकाराची रेषा थांबायला नको. मंजुल यांना मिळालेल्या नोटिशीमुळे त्यावरचं दहशतीचं सावट समोर आलंय. त्यावर उपाय एकच आहे. वाचकांना, साध्या साध्या माणसाला त्या रेषांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं लागणार आहे.

हेही वाचा : 

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?

 

आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…