एका वाचक मित्राचं सतीश काळसेकर यांना पत्र

ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.

प्रिय सतीश काका,

खरं तर हे सगळं थेट तुम्हाला भेटून सांगायचं होतं. तुम्ही बोलावलं होतं पेणला तुमच्या घरी. तुला आवडलेली पुस्तकं घेऊन ये. इथं तुला बरेच पुस्तकं भेटतील असं म्हणाला होतात. पण तुम्ही गेलात. नाईलाज झाला. वाचणाऱ्याची रोजनिशी सलग वाचून काढलं. असं वाटलं तुम्हीच खांद्यावर हात टाकून तुमचा अनुभव सांगत आहात.

असं वाटलं आपली मैत्री आहे फार पूर्वीपासूनची. इतक्या सुंदरतेने रोजनिशी तुम्ही सर्वांसाठी खुली केलीत. तुम्हाला मॅसेज पाठवला. ‘रोजनिशी वाचली, तुमच्याशी बोलता येईल का?’ रिप्लायची वाट बघत बसलो तर थेट तुम्हीच फोन केलात. ‘काळसेकर बोलतोय. कसे आहात?’ मी दडपणात आलो. थेट तुम्हीच फोन केलाय म्हटल्यावर दुसरं काय व्हायचं? ततपप झालं माझं.

मग तुम्ही आपुलकीने बोललात, तुम्ही सोडून तू संबोधू लागलात. मला मोकळं वाटू लागलं. आपण खरंच मित्र झालो. पहिल्याच टेलिफोनीक संभाषणात. एक सल मनात आहे जी तुम्हालासुद्धा मी कित्येकदा बोलून दाखवली. तुमचं पुस्तक मी फार उशिरा वाचलं.आपली भेट फार उशीरा झाली. ती खूप आधीच व्हायला हवी होती. आता ही सल पाश्चातापात बदलणार.

हेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं?

तुम्ही गेलात हे ऐकुन भरून आलं. वरचेवर फोन करून घरात सगळ्यांची चौकशी केलीत तुम्ही. आईच्या आजारपणाबद्दल मुद्दाम विचारत होतात तुम्ही. मी एक छोटासा वाचक तुमचा, तुम्ही मला फोन करायचं काहीच कारण नाही. पण तुम्ही केलात. नेहेमी केलात. आई ऍडमिट असताना वारंवार केलात. माझ्यावर निर्व्याज प्रेम केलत. कोण कुठचा मी? इतकं निर्व्याज प्रेम करायला किती मोठ्ठं मन हवं? तुमच्याचसारखं.

पुस्तकं ही आपल्या दोघांच्या आवडीची गोष्ट. मी पुस्तक खरेदी केली की तुम्हाला फोन लावणार आणि तुम्ही म्हणणार ‘अरे पुस्तकं विकत घेणं जरा आटोपशीर ठेवायला हवं. पुस्तकं ठेवता यावी म्हणून मला पेणला मोठ्ठं घर घ्यायला लागलं.’ मी ठरवलं सुद्धा. अमरावती जिल्हा नगर वाचनालय जॉईन केलं. पण पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा भरगच्च पुस्तक खरेदी. पुन्हा तुम्हाला फोन. मग मात्र तुम्ही मनापासून हसलात एवढंच.

बहुतेक लिळा पुस्तकांच्या या पुस्तकातच मी वाचलं होतं की bibliophile म्हणजे पुस्तकप्रेमी आणि bibliomane म्हणजे पुस्तकवेडा. मी नेहमी पुस्तक खरेदीबाबत bibliomane ठरलो. तुमच्यासारखाच. तुम्हीच रोजनिशीत म्हटलय की तुमचं पुस्तकं संग्रहित करणं हे व्यसन पातळीवर जाऊन पोचलं होतं म्हणून.

एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. खरंतर त्यासाठी तुमचे उपकार मानायचे राहून गेलेत आता. इंग्रजी पुस्तकं वाचाण्यासंबंधी माझ्या डोक्यात जो गुंता होता तो किती सहज सोडवला होतात तुम्ही. तुम्ही म्हणालात मला शालेय ते कॉलेज जीवनात इंग्रजीत नेहमी पास होण्यापूरतंच म्हणजे ३५ वगैरे मार्क्स मिळाले. तेसुद्धा इतर विषयात माझे उत्तम गुण पाहून केवळ इंग्रजीमधे हा नापास होता कामा नये म्हणून दिलेले असावेत बहुदा. कारण मला तेवढ्याचीही अपेक्षा नसायची.

पण त्याने फारसा फरक पडत नाही. तू एक काम कर तू सारामागोच Blindness वाच. मी वाचलं. काहीच अडचण आली नाही. फक्त सुरवात करण्यावरच गाडी अडली होती. मग मी इंग्रजी साहित्य वाचत सुटलो. इंग्रजी साहित्याचं केवढं मोठ्ठं विश्व तुमच्यामुळे मला खुलं झालं. हे उपकारच आहेत की. आता जेव्हा जेव्हा एखादं नवीन इंग्रजी पुस्तक हाती घेतो तेव्हा पहिल्या एक दोन पानांवर तुमची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

तुम्ही तुमच्या एका भाषणात म्हणाला आहात की, ‘कवी म्हणून मी किती लहान किंवा मोठा आहे हा माझ्यासाठी फार कमी महत्त्वाचा मुद्दा आहे, खरा महत्त्वाचा मुद्दा मी माणूस म्हणून किती चांगला वागू शकतो हा आहे. चांगली कविता लिहिणं हा माझ्या दृष्टीनं चांगला माणूस असल्याचं लक्षण असेलच असं नाही. मला मात्र असं वाटतं की चांगला कवी नसलो तरी चांगला माणूस असण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते ते मी माझ्या आयुष्यभर करतोय.’

तुम्ही माझ्याशी इतक्या आपुलकीनं का वागलात या प्रश्नाचं उत्तर या पेक्षा वेगळं आणखी काय असू शकतं? मला वाटतं माणूस म्हणून आपण जन्माला येतो, मात्र मधल्या प्रवासात आपलं माणूसपण हळूहळू गळून पडतं. एका हिरव्या गार झाडाचं पानगळीत जसं फक्त एक भकास रूक्ष खोड बनून रहातं तसेच आपण उरतो शेवटाला कोरडे. तुम्ही मात्र तुमचं माणूसपण जपलत सदैव. फळा फुलांनी बहरलेल्या सदाहरीत वृक्षासारखं. 
 
‘जिकडे जातो तिकडे मला माझी भावंडे दिसतात’

कवी केशवसुतांची ही ओळ तुम्हाला तुमची वाटली. तशी ती आम्हाला सुद्धा वाटू लागली तर ती तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल.

तुमचा मित्र,
अन्वय

हेही वाचा: 

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

फ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…