तळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय?

तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी ‘संजीवन समाधी’ देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं.

महाड तालुक्यातलं ‘तळीये’ गाव उद्ध्वस्त झालं. त्यानं तुम्हीही हादरले असणार. मरण ओढवणं वेगळं, ओढवून घेणं वेगळं आणि आदळणं वेगळं! २२ जुलैच्या तांडवधारी पावसात तळीये गावावर कोसळलेल्या दरडी या ‘मरणदूत’ बनून आदळल्या. छोट्या-मोठ्या ४०-४५ घरांचं ते गाव. त्यातली ३५ घरं दरडींनी काही क्षणांत जमीनदोस्त केली आणि भूस्खलनाने आलेल्या मातीच्या लोंढ्याखाली ती घरं माणसांसकट गाडली गेली. राहिलेली घरं वाहून गेली.

ही दुर्घटना घडण्यापूर्वी जे लोक घराबाहेर पडले होते तेवढेच वाचले. शोधकार्य पथकाने गावाला गाडणाऱ्या ढिगाऱ्याखालून ३८ मृतदेह बाहेर काढले. चार दिवसांत एकही जिवंत माणूस सापडला नाही. शेवटी, ३१ बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांनी ‘ढिगारा उपसण्याची शोध-मोहीम थांबवावी आणि ३१ बेपत्तांना मृत म्हणून घोषित करावं’ अशी भावना व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी सगळे बेपत्ता हे ढिगाऱ्याखालीच गाडले गेलेत, असं गृहीत धरलं होतं.

गेली दीड वर्ष कोरोनाग्रस्त मृतदेहांची ‘प्लास्टिक बंद’ विल्हेवाट कशी लावली जाते, ते आपण पाहतोय. त्यामुळे बेपत्तांच्या नातेवाईकांना ‘मूठमाती’ची घाई लागणं, ही वर्तमानाला साजेशीच घटना आहे.

आधुनिक मशिनरी का वापरल्या नाहीत?

मात्र, भूतकाळ तसा नव्हता. मुंबई-कोकण प्रवासी वाहतूक करणारी ‘रामदास’ बोट भर समुद्रात ४० फूट उंचीच्या लाटेच्या तडाख्याने १७ जुलै १९४७ ला ८०० प्रवाशांसह बुडाली. ८०० पैकी १००-१२५ प्रवासी बचावले. तेव्हा आत्तासारखी ‘आपत्कालीन बचाव यंत्रणा’ कार्यरत नसल्याने बुडालेल्यांचे फार थोडे मृतदेह किनार्‍याला लागले.

त्यात ज्यांची ओळख पटली, त्यांचे अंत्यविधी झाले. बाकीचे बिन वारस म्हणून दहन करण्यात आले. ज्यांचे मृतदेह सापडले नाही, त्यांना ‘बेपत्ता’ म्हणून घोषित करण्यात आलं. अशा शेकडो बेपत्तांच्या पत्नींनी ‘आधी नवऱ्याचा मृतदेह बघीन आणि मगच कुंकू पुसेन, मंगळसूत्र तोडेन’ या निश्चयाने मरेस्तोवर, ४०-४५ वर्षं आपलं ‘सौभाग्य’ जपून ठेवलं.

२००३ मधे ‘वाजपेयी सरकार’च्या काळात ‘अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या जमिनीखाली मंदिराचे अवशेष सापडतात का,’ याची तपासणी करण्यासाठी पुरातत्त्व खात्याकडून आधुनिक मशिनरीचा वापर करून खोदकाम सुरू झालं होतं. तिथं बौद्धकालीन वस्तू-वास्तूंचे अवशेष सापडू लागल्यावर थांबलं, हा भाग वेगळा! पण ज्या यंत्रणांचा वापर १४ वर्षांपूर्वी निर्जीव गोष्टींच्या शोधासाठी होऊ शकतो, त्या यंत्र-यंत्रणांचा वापर ३१ जिवंत गाडले गेलेल्या जिवांच्या शोधासाठी का नाही करायचा?

हेही वाचा :  कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)

सरकारच्या जबाबदारीचं ‘सुतक’

विहिरी किंवा ‘बोअरवेल’ खोदण्याआधी, पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आता हाताच्या तळव्यात मावेल, इतक्या छोट्या ‘जपानी यंत्रा’चा वापर केला जातो. ते यंत्र १००-२०० फूट खोलवरच्या पाणी प्रवाहाची अचूक माहिती देतं. खोदकामात वाया जाणारा खर्च टाळतो.

पशुपक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गळ्यात-पायात ‘रेडिओ कॉलर’ बसवतात. त्याद्वारे ते घनदाट जंगलात, पाण्यात, आकाशात कुठे आहेत? त्यांचा प्रवास कुठून कसा झालाय? याचा तपशील आकाशात सोडलेल्या सॅटेलाईटच्या माध्यमातून निरीक्षकांना बसल्याजागी मिळतो. अशा ‘रेडिओ कॉलर’ माणसांना ठोकल्यावरच बेपत्ता ठरवलेल्यांचा ठावठिकाणा लागणार का?

ही यंत्रणा माणसांनी बनवलीय. ती माणसांसाठी का वापरली जात नाही? अशावेळी लोकांचं भूतभविष्य सांगणाऱ्यांची ‘दिव्यदृष्टी’ दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली काय आहे, ते सांगण्याऐवजी कुठे माती खात असते? अशा प्रश्नांचे जबाब घेण्यापेक्षा बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या ३१ जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी ‘संजीवन समाधी’ देणं सोयीचं वाटलं असावं.

अशाने तळीयेची आळंदी होणार नाही! उलट, अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे शासनाचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की सरकारच्या जबाबदारीचं ‘सुतक’ सुटतं. तसं सुटलं.

इजिप्शियन कथेची आठवण

शासकीय सुतक सोडवताना जिल्हाधिकाऱ्यांनी कर्तव्यकर्माची ‘ब्रह्मगाठ’ मारलीय. त्यांनी ३१ बेपत्तांना मृत म्हणून घोषित करून, नातेवाइकांना आवश्यक ती कागदपत्रं देण्याचं मान्य केलंय. पण त्याचवेळी  ‘नागरिकांनी विरोध केला तरी, एकूण एक बेपत्ता व्यक्ती सापडेपर्यंत शोधकार्य सुरूच राहील’ अशी भूमिका घेतलीय. ती शासकीय कर्मकांडासाठी आवश्यक आहे.

इथे एक इजिप्शियन कथा आठवली. कथा इजिप्तमधली म्हणजे प्राचीन ‘मिश्र’ देशातली आहे. तिथे मृतांना मोठ्या इतमामाने भव्य थडग्यात पुरण्याची पद्धत ज्या काळात होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. ‘मिश्र’मधला एक मोठा मातब्बर साधू मरण पावला. त्याचं प्रेत एका महाप्रचंड थडग्यात पुरण्यात आलं. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, तो साधू मेलेलाच नव्हता! लोक त्याला पुरून त्या महाप्रचंड थडग्याचा दरवाजा बंद करून निघून गेले.

काही वेळाने तो साधू मरणग्लानीतून शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून बघताच त्याला कळलं की, ‘आपण थडग्यात आहोत!’ साधूने सगळीकडे नजर फिरवली तर, सडलेले मुडदे, हाडांचे सापळे, मिट्ट काळोख, ओलसर कुबट हवा आणि घाण, याचंच साम्राज्य दिसलं.

हेही वाचा :  प्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार?

थडग्यातला जिवंत म्हातारा

साधूने जिवाच्या आकांताने धडपडत थडग्याचं दार गाठलं आणि तो ओरडून ओरडून आपण जिवंत असल्याचं बाहेरच्या जगाला कळवण्याची धडपड करू लागला. ओरडून-ओरडून थकला. रडला. अंधारात वावरताना धडपडला. स्वतःवर, जगावर चिडला. पण ‘इथून बाहेर पडणं अशक्य आहे,’ हे त्याला कळलं. ‘दुसऱ्या कुणाचा मृत्यू होईपर्यंत थडग्याचं दार उघडणार नाही. तोवर आपल्याला वाट बघायलाच हवी. थडग्यातच जगायला हवं,’ हेही त्याला कळून चुकलं.

खरं तर, हे वास्तव कळल्यावर तो मरूनच जायला हवा होता. पण जगण्याची आशा माणसाला मृतवत जीवनातही सोडत नाही. त्या साधूने ठरवलं, ‘थडग्याचं दार उघडेपर्यंत जगायलाच हवं!’ प्रेताबरोबर ठेवलेलं अन्न संपलं. मग तो इतर प्रेतांवर जगणारे किडेमकोडे खाऊ लागला. झिरपणाऱ्या घाण पाण्यावर तहान भागवू लागला. प्रेतांवरचे कपडे काढून त्याने आपल्यासाठी बिछाना-पांघरुणं बनवली. त्या सडलेल्या प्रेतांच्या सोबतीने तो जगू लागला. 

‘बाहेर कुणीतरी मरावा,’ अशी प्रार्थना करू लागला. कारण कुणीतरी मेल्याशिवाय त्या थडग्याचं दार पुन्हा उघडणार नव्हतं आणि दार उघडल्याशिवाय त्या साधूला बाहेर पडता येणार नव्हतं. वर्षामागून वर्षं गेली. तो साधू काळाचं भान विसरला होता. त्याचं शरीर थकलं-वाकलं होतं. दाढी आणि केस पायापर्यंत वाढले होते. आणि कुणीतरी बाहेर मेलं!

थडग्याचा दरवाजा उघडला. हा प्रेतवत जगलेला जराजर्जर साधू इतर प्रेतांजवळचं सोनं नाणं जमवून बांधलेले गाठोडे कसेबसे खेचत, ‘अहो, मी जिवंत आहे,’ असं ओरडत त्या उघड्या दरवाजाकडे धावला. थडग्यातला जिवंत मुडदा बाहेर पडला. ही गोष्ट भयंकर आहे. पुरातन काळातली असली तरी हेही एक वास्तव आहे.

रिती रिती जिती माणसं

उद्ध्वस्त तळीयेच्या प्रत्येक टीवी, पेपरात शोधकार्यात जिवंत माणसांऐवजी निर्जीव वस्तू आणि सापडलेले मृतदेहच दिसत होते. त्याच्या पार्श्वभूमीवर ‘ही मुलं-माणसं कशामुळे मेली?’ या प्रश्नाची चर्चा ‘मीडिया-सोशल मीडिया’तून जोरात झाली. त्या चर्चेतून राजकारण्यांचा स्वार्थ, समाजसेवींचा ‘पेड’ परमार्थ, निसर्गाचा ऱ्हास आणि निसर्ग रक्षकांचे दुर्घटनेबद्दलचे अदमास; यांचा काला तयार झालाय. तो ऐकून-पाहून-पचवून गेलेले जीव परत येणार नाहीत; तसंच अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही, अशी आशाही ठेवता येत नाही.

आशा-अपेक्षांची माती कशी होते, ते तळीये दुर्घटनेने तीव्रतेने दाखवून दिलंय. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! त्याने अवघ्या महाराष्ट्राचं जगणं आठवडाभर अंधारून गेलं. अशीच अवस्था शोधकार्यात दिवस-रात्र झटणाऱ्यांची झाली असणार! 

पण जे या दुर्घटनेतून बचावले आणि ज्यांनी आपले नातेवाईक-मित्र गमावले त्यांची मृतदेहाबरोबरची केविलवाणी दृश्यं पाहताना अधिक कासावीस व्हायला होत होतं. त्यांच्या डोळ्यात जानच नव्हती. दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापाशी बळच उरलं नव्हतं. रिती रिती दिसत होती, ही जिती माणसं!

हेही वाचा :  पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

काला चर्चेचा, अंधार उपायांचा

जगण्यातला आनंद नासवून टाकणारं, हे मृत्यूचं थैमान वारंवार का उठत असतं? कधी बॉम्बस्फोटात छिन्न-विच्छिन्न झालेली शरीरं. कधी रेल्वे अपघातांत झोपेतच मृत झालेले देह. कधी महापुरात वाहून जाणारे, तर कधी भूकंपात गाडले गेलेले मृतदेह. कधी शहरातली इमारत ५०-६० जणांचा जीव घेत जमीनदोस्त होते. तर कधी आग विझवणारे स्वतःच आगीत भस्मसात होतात.

सीमेवरच्या चकमकीत ‘शहीद’ झालेल्यांच्या शवपेट्या पाहताना तुमच्याही डोक्यात संतापाच्या चिता भडकत असणार! असे एकामागोमाग आघात करून नियती पुनःपुन्हा काय सांगते? कुणाला सांगते? या काळजी वाढवणाऱ्या प्रश्नांनी काळजाचंसुद्धा पाणी पाणी होतं! 

पाणी कुणाची धुलाई करतं?

यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला. चांगला पडला. मग रुसला. आणि २२ जुलैपासून आठवडाभर कसलासा राग काढल्यासारखा त्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला  झोडपून काढलं. ज्यांच्या डोक्यावर सुरक्षित, हक्काचं छप्पर आणि रोजच्या दोन घासांची शाश्वती आहे, त्यांनी हा खतरनाक पाऊसही ‘एन्जॉय’ केला असणार! या दोन गोष्टींनी खूप हिंमत मिळते. पण असा हा हैदोस घालणारा पाऊस अनेकांना नुसताच भिजवत नाही, तर तो त्यांच्या तोंडचा घासही पळवतो.

अंगावर पावसाच्या सरी सपासप कोसळताहेत आणि दाताखाली ओठ आवळून, छातीवर हातांची घट्ट घडी दाबून, थरथर कापणाऱ्या अंगात ऊब आणण्यासाठी मुलं धडपडताहेत हे बघितलं की, कुणाचं मन कासावीस होणार नाही? हे बघायला मुद्दाम कुठे जावं लागत नाही. थोडा वेळा स्वत:च्या सुख-सोयी विसरा. तुमच्या अवतीभोवतीचं दारिद्र्य, असहाय्यता यांनी पोखरलेली माणसं वेढल्यासारखी दिसायला लागतील.

डोक्यावर छप्पर असणारी, खिडकीत उभं राहून गरमागरम चहाचा घोट घेत बाहेरच्या भिजल्या जगावर नजर टाकणारी भाग्यवान माणसं बघून रस्त्यावरच्या भिजून गारठलेल्या आणि भेदरून थरथरणाऱ्या मुला-माणसांत जीवन जगण्याइतपत धग कशी निर्माण होत असेल? 

हा पाऊस गोरगरिबांना, खेड्या- पाड्यांतल्या गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना आहे त्यापेक्षा आणखी हीन-दीन करून टाकतो! यावेळी पावसाने काय करायचं बाकी ठेवलंय? सालाबादप्रमाणे मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं. वाहनं आणि माणसं सर्वांना कवेत घेऊ बघणारं हे पाणी कुणाची धुलाई करतं? जनतेची की सत्ताधीशांची?

हेही वाचा : एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

थडग्याच्या देशात, मुडद्यांची वसाहत

पाण्यालाही जीवन म्हणतात. तेव्हा आपण जगतो ते ‘जीवन’ आहे, हे दाखवण्यासाठी जीवनाचं ‘पाणी पाणी’ करण्याचं काम माणूसच करतो! आणि वर निसर्गाचा प्रकोप, नियतीचा धडा, परमेशाची लीला; असा आक्रोश करत अकलेचा चिखल कालवतो! तळीये दुर्घटनेनंतर एक कविता ‘वायरल’ झालीय. तळीये गावाची पाठराखण करणारा डोंगर खचल्याने गावावर ‘मरणदूत’ दरडी आदळल्या. डोंगराच्या या बदललेल्या ओळखीबद्दल जाब विचारणारी ही कविता आहे.

ती अशी –

विचारलं जातं डोंगराला
बाबा तू असा का कोपलास?
का लेकरांचा बळी घेतलास
विश्वासाने गळा का घोटलास?
आरोपांचे हे प्रश्न ऐकून
कातर शब्दांत डोंगर म्हणाला
अघटित होते सारे मजला
नाही मारलं मी कोणाला
जर्जर केलेत ना तुम्हीच मला
सुरुंग पेरुनी पोखरलंत मला
तुटला आधार काठीचा
ओरबाडून नेलेत वनराईला
घायाळ माझ्या शरीराला
नाही जमले सावरायला
डोळ्यादेखत लेकरं गेली
जो तो लागलाय कोसायला
ऐकून त्याचे कष्टी बोल
धडा आता शिकू चांगला
झाडे जगवा झाडे वाढवा
तारुण्य लाभू दे डोंगरला

हे असं काही वाचलं की, आपण सारे स्वतःच महाप्रचंड थडगे बांधून त्यात वावरतोय,असं वाटतं. भोवती सारे मुडदे. फक्त आपल्यापुरते बघणारे. आपल्या शरीराला, जगण्याला सर्वस्व मानणारे. त्यांना दुसऱ्याचं अस्तित्वही जाणवत नाही. स्वार्थासाठी माणसाच्या जीवाशी खेळणाऱ्या शरीरांना मुडदे म्हणायचं, नाहीतर काय म्हणायचं? या मुडद्यांकडे बघवत नाही. आपण त्यांच्यामधे आहोत, हे साहवत नाही. जे ३१ लोक मृत म्हणून घोषित केलं गेलं, ते थडग्यातल्या साधूसारखे जिवंत गाडलेले असतील का?

असं का व्हावं?

जरा आजूबाजूला बघा. तुम्हालाही सगळीकडे मुडद्यांच्या अंगावरचे कपडे ओढणारे; मुडद्यांवर वावरणारे किडे खाऊन जगणारे; दुनियेच्या थडग्यात कोंडलेले मुडदे बघायला मिळतील. दुसऱ्याच्या मरणासाठी प्रार्थना करणारे दिसतील. हे जग जिचा दरवाजा उघडू शकत नाही, अशा मुडद्यांची वसाहत बनलीय, थडगं झालीय, असं तुम्हाला जाणवेल.

‘असं का व्हावं?’ हा हैराण करणारा प्रश्न आहे. तो तुम्हाला कधी पडतो का? वाईट वाटून घेऊ नका. पुष्कळांना असा प्रश्न पडतच नाही. कशाचाही विचार न करता जगत राहणं साधणारे खूप भाग्यवंत आपल्या देशात आहेत. त्यांना कसलेच प्रश्न पडत नाहीत. 

ते आताचं दुःख हलकं होण्यासाठी, नव्या दुःखाची वाट पाहात राहतात आणि दुसऱ्याने लादलेल्या दु:खातच संपतात. संपल्याशिवाय माणसांचंच काय  शेकडो माणसं सांभाळलेल्या तळीयेसारख्या गावाचंही अस्तित्व जगाला समजत नाही!

हेही वाचा : 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…