आपला आक्रोश जगापुढे मांडतायत अफगाणी महिलांच्या डॉक्युमेंटरी

पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्‍या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात.

जर मी चालण्याचे थांबवले,
तर मी दगड आहे!
जर मी पाणी आणि मुक्तीचा शोध थांबवला,
तर मी दगड आहे!
 
-‘मोशागत सादत’

ही अफगाणी कवयित्री, ‘अनव्हेल्ड व्यूज : मुस्लिम आर्टिस्टस् स्पिक आऊट’मधे भेटते. यात पुरुषवर्चस्वी धर्मांधतेचा पगडा असणार्‍या पाच देशातल्या, पाच महिलांचा कला आणि जीवनविषयक मुक्तिदायी दृष्टिकोन कळतो. वेगवेगळ्या देशातल्या, थरातल्या प्रातिनिधिक मुलींची कथा सांगणार्‍या ‘आय एम अ गर्ल’मधे अफगाणिस्तानच्या अझिजास शाळेत जाणं एक क्रांतीसारखं आव्हानच आहे आणि ती ते पेलत आहे.

‘आय एम द रिव्हॉल्युशन’मधे तीन देशातल्या परिवर्तनाच्या लढाईत जीवावर उदार होऊन लढणार्‍या तीन स्त्रिया भेटतात. तालिबान्यांकडून मोस्ट वाँटेड असूनही देशभर प्रवास करत स्त्रियांना हक्कांची जाणीव करून देणारी सेलाय गफर राजकीय कृतीतून क्रांतीची घोषणाच देत असते.

हेही वाचा: मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?

एनिमीज ऑफ हॅपिनेस

‘एनिमीज ऑफ हॅपिनेस’मधे ‘लोया-जिरगा’ या अफगाणी टोळ्यांच्या महापंचायतीत धमाकेदार धीट भूमिका घेणार्‍या मलालाई जोया या तरुणीच्या राजकीय कारकिर्दीचा एक टप्पा टिपला आहे. तालिबानोत्तर पहिल्या संसद निवडणुकीपूर्वीच्या १० दिवसांचं चित्रण येतं. अशा अस्थिर आणि निरक्षर देशात सनदशीर निवडणूक प्रक्रिया रुजवणं किती अवघड आहे, याचीही प्रचिती येते.

लोकशाही, स्त्रिया आणि आनंद या सार्‍यांचं शत्रू हे पुरुषवर्चस्वी धर्मांध आहेत, असं मलालाईचं म्हणणं आहे. ‘लोया-जिरगा’ घटनेनंतर येणार्‍या धमक्यांमुळे तिला घर सोडावं लागतं, इतरांनाही बुरखा घालू नका, असं सांगणार्‍या तिला बाहेर पडताना बुरखा घालून कमांडोंच्या संरक्षणात वावरावं लागतं. प्रचारकाळात तिला समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या थरातले लोक भेटायला आलेले दिसतात, तसंच अगदी घरगुती भांडणंही ती सोडवताना दिसते.

सर्च फॉर फ्रीडम

‘सर्च फॉर फ्रीडम’मधे चार वेगवेगळ्या थरांतल्या अफगाणी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्ष कथा साकारताना अफगाणिस्तानचा १९२० ते २००३ असा प्रदीर्घ इतिहासपटच उभा राहतो. या चौघींनाही पुढे पाकिस्तानात आश्रय घ्यावा लागतो. पहिला प्रागतिक राजा अमानुल्लाची बहीण शफीका सरोज हिने ‘सर्वांसाठी मोफत शिक्षण’, ‘बुरखा सक्ती नाही’ धोरणांशी सुसंगत राहून महत्त्वाचं काम केलंय.

सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग प्रथमच सुरू झाला. पण मूलतत्त्ववाद्यांना प्रागतिकता न रुचल्यानं सुरू झालेल्या बंडात देश पुढे यादवीग्रस्त झाला. मेरमां परवीन ही अफगाण रेडिओवरची पहिली गायिकाही भेटते, पण तिची गाणी तालिबान्यांनी नष्ट केलीयेत, त्या आठवणी आळवताना मन कातरतं.

मोशीना या युद्धविधवेच्या व्यथांना तर अंतच नाही. कशीबशी कत्तलीतून बचावलेली ती छावणीत आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. सोहिलाने तर अगदी तालिबान काळातही ‘रावा’ या अफगाण स्त्रियांच्या क्रांतिकारी संघटनेसाठी भूमिगत राहून मुलींसाठी शिक्षण देण्याचं काम जारी ठेवलंय.

आपल्याच देशात, आपल्याच लोकांकडून पारतंत्र्यात राहावं लागण्याचं दुःख ती अगदी टोकदारपणे व्यक्त करते. तिचाही बुरख्याला विरोधच; पण केवळ बुरखाकेंद्री पाश्चात्त्य प्रचाराचाही ती खरपूस समाचार घेते. भूक, गरिबी या अस्तित्वाच्या संकटांसाठी नव-वसाहतिक धोरणांकडेही कटाक्ष टाकते.

हेही वाचा: ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

अफगाणिस्तान अनव्हेल्ड

‘अफगाणिस्तान अनव्हेल्ड’ मधे कधीही काबूलबाहेर पडू न शकलेल्या आणि आयना वुमेन फिल्मिंग ग्रुपमधे प्रशिक्षण घेतलेल्या स्त्री पत्रकारांच्या कॅमेरा – नजरेतून बेचिराख प्रदेश आणि उद्ध्वस्त मनांचं दर्शन घडवलं आहे. तालिबानोत्तर काळात काबूल शहराने स्त्रियांच्या बाबतीत काही प्रागतिक पावलं स्वीकारली तरी या आजूबाजूच्या टोळ्यांच्या प्रभावक्षेत्रांमधे स्त्रियांची परिस्थिती जैसे थे असल्याचं लक्षात येतं.

कॅमेरा हातात आल्यामुळे, जगण्यात आणि दृष्टिकोनात पडत चाललेल्या सकारात्मक बदलांचंही दर्शन घडतं. जिथं स्त्रियांना रस्त्यांवर फिरण्याचीही मोकळीक नव्हती, तिथे रस्त्यावरच्या गर्दीत बुरखा न घेणारी एक महिला पुरुषांना बुरख्याविषयीचे प्रश्न विचारते, तेव्हा तंतरलेल्या पोपटी उत्तरांचा ती ठामपणे प्रतिवादही करते.

प्लेईंग विथ फायर

‘प्लेईंग विथ फायर – वुमेन अ‍ॅक्टर्स ऑफ अफगाणिस्तान’ या विषयसूचक शीर्षकातूनच आशयाची जळजळीत धार स्पष्ट होते. अनेता पॅपाथॅनासियो या ग्रीसच्या रंगकर्मीला काबूल युनिवर्सिटीत कार्यशाळा घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं, तेव्हा तिच्या निरीक्षणांतून आणि मुलाखतींमधून माहितीपट साकारतो.

तालिबान्यांची राजवट कोसळली तरी बुरसटलेल्या धर्मांध पुरुषवर्चस्वी मानसिकतेचं काय करायचं? महिला अभिनय करण्यासाठी सरसावल्या की त्यांना घरातून, समाजातून विरोध सुरू होतो. एखादाच बाप आपल्या मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याचंही दिसतं. वेश्या म्हणून अपमान, धमक्या, फतवे, मारहाण, हल्ले आणि प्रसंगी खूनसुद्धा! पण हा जीवघेणा प्रतिरोध सहन करूनसुद्धा अभिनेत्री होण्यासाठी सरसावलेल्या जिगरबाज महिलांची ही कथा आहे. अर्थात काही जणींना यासाठी मायदेश सोडून परदेशाचा आसरा घ्यावा लागतो.

युनिवर्सिटीतल्या धार्मिक विभागप्रमुखाला छेडलं की ‘स्त्रियांच्या शरीराचं दर्शनच नाही, तर त्यांचा आवाजही पुरुषांना कामोत्तेजक ठरतो, म्हणून स्त्रियांवरच बंधनं’, अशा युक्तिवादाची कीव करावीशी वाटते. प्रशिक्षणादरम्यान स्त्री-पुरुष कलाकारांचा अगदी निसटसा स्पर्शही होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

टीवीवरच्या अभिनेत्रीचे मोकळे केस पाहून संसदेतून आलेल्या फोनवर, त्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया – ‘मूलभूत प्रश्न सोडून हे प्रतिनिधी संसदेत बसून अभिनेत्रीची केसं मोकळी सोडलीत का, हेच पाहात बसतात का?’ अभिनयामुळे या महिलांच्यात येणार्‍या धैर्याचंही दर्शन घडतं.

हेही वाचा: आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

अ थाऊजंड गर्ल्स लाइक मी

‘अ थाऊजंड गर्ल्स लाइक मी’मधे सतत १३ वर्ष वडलांकडूनच लैंगिक शोषणाच्या बळी पडलेल्या तरुणीचा न्यायासाठीचा संघर्ष टिपला आहे. असहाय आई, भावंडंही तिला वाचवू शकत नाहीत. अनेक मौलवीही मदत करण्याचं नाकारतात. पोलिस आणि न्यायव्यवस्थाही न्याय द्यायला तयार नाहीत. तिला वडलांकडूनच दोन मुलं झाली आहेत.

शेवटी टीवी शोचा आसरा घ्यावा लागतो, तेव्हा कुठे तिच्या बापाला अटक होऊन खटला सुरू होतो. तिच्या या धैर्याचं काहीजण कौतुक करतात; पण बहुतेकांच्या मते तीच दोषी आहे. तिच्या चुलत्यांकडून तर धमक्या सुरू आहेत.

भाऊ मदत करतायेत, पण तिने टीवीमधून या प्रकरणाला सार्वजनिक केलं म्हणून त्यांचाही रोष आहेच. त्याचवेळी काही स्त्रियांचा तिला फोनही येतोय आणि त्यांचीही अवस्था तिच्यासारखीच आहे. याची तिला होणारी जाणीव म्हणजे हे अस्वस्थकारी शीर्षक.

सोनिता

‘सोनिता’ ही शीर्षकी अफगाणी तरुणी इराणमधे कागदपत्रांशिवाय निर्वासित म्हणून राहताना रॅपर होऊ पाहतेय. पण तिच्या कुटुंबीयांसाठी ती पैसे मिळवून देणारी लग्न बाजारातली एक वस्तू मात्र आहे. अफगाणी प्रथेप्रमाणे तिच्या भावाला बायको विकत घ्यायची आहे, आणि त्यासाठी बहिणीला लग्नासाठी विकणं क्रमप्राप्त आहे.

रूढ परंपराच असल्याने त्यात कुणालाच, अगदी आईलासुद्धा काहीही गैर वाटत नाही. इथं दिग्दर्शिका निव्वळ निरीक्षक न राहता घटनाक्रमात हस्तक्षेप करते. हा लग्न व्यवहार लांबवण्यासाठी आर्थिक मदत करते, लग्नाच्या बाजाराविरोधातील तिचा रॅप वीडियो  शूट करत स्पर्धेला पाठवते. बक्षीस तर मिळतंच; शिवाय अमेरिकेतून शिष्यवृत्तीचं आमंत्रण येतं. पण त्यासाठी तिला कागदपत्रे आणण्यासाठी मायदेशी जाण्याचा धोका पत्करावाही लागतो.

अमेरिकेत पोचल्यावर आईशी फोनवर बोलताना ती आनंदाने म्हणते – ‘इथं तालिबानी नाहीयेत!’ व्हॉइसेस ऑफ अफगाण वुमेन हा ‘वुमेन मेक मुवी’चा ऑनलाईन महोत्सव १२ सप्टेंबरपर्यंत पाहता येणार आहे.

हेही वाचा: 

बदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…