पुस्तकरूपाने आलेला एका स्थितप्रज्ञाचा लोभस जिव्हाळा

महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं ‘माणसं जिव्हाळ्याची’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं ‘लोभस’ पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.

रसाळ सर वयाच्या पंचविसाव्या वर्षी १९६० ला युनिवर्सिटीत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांची नोकरी २५ वर्षांची झाली आणि सर पन्नास वर्षांचे झाले तेव्हा म्हणजे १९८५ झाली मी त्यांचा विद्यार्थी म्हणून औरंगाबाद युनिवर्सिटीत रुजू झालो. तेव्हापासून आतापर्यंत गेली ३७ वर्षं मी त्यांना जवळून पाहतोय.

सर आता ८७ वर्षाचे झाले आहेत. ३७ वर्षांच्या सहवासात मला न कळलेले सर या पुस्तकातून उलगडू लागले म्हणून मी ही पुस्तकं अधाशासारखी वाचली. लोभस हे पुस्तक आलं तेव्हा पाच वर्षांपूर्वी वाचलंच होतं. पण या पुस्तकासोबत ते पुन्हा एकदा वाचून काढलं.

सोबतच बाळकृष्ण कवठेकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि गो. मा. पवार यांनी इतरत्र लिहिलेली सरांची व्यक्तिचित्र ही वाचली. मी तर पंधरा-वीस वर्षांपूर्वीच सरांवर लिहिलं होतं. हे सगळं एकत्र करून सरांची एक परिपूर्ण व्यक्तिरेखा माझ्या मनात उभी राहिली.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

आंतरिक उमाळ्यानं केलेलं लेखन

या दोन्ही पुस्तकात मिळून एकूण वीस लेख आहेत. त्यात गावाविषयीचे चार म्हणजेच गांधेली, बोधेगाव, औरंगाबाद आणि हैदराबाद नातेवाईकांविषयीचे म्हणजे आई आणि वडील. गुरु विषयीचे चार म्हणजे भगवंतराव देशमुख, भालचंद्र महाराज कहाळेकर, म. भी. चिटणीस आणि वा. ल. कुलकर्णी.

मित्रांविषयीचे तीन यात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर गो. मा. पवार आणि अनेक मित्रांवर मिळून एक लेख. स्नेह्याविषयीचे सहा अनंतराव भालेराव, गंगाधर गाडगीळ, बा. भ. बोरकर, नरहर कुरुंदकर, वा. रा. कांत आणि स. मा. गर्गे आणि दुसऱ्या पुस्तकातला शेवटचा स्वतःविषयीचा ‘मी’ या नावाचा एक लेख. या दोन्ही पुस्तकांच्या एकंदर मांडणीवरून आणि शेवटच्या लेखावरून असं वाटतं की अशा स्वरूपाचं लेखन सर पुन्हा करण्याची शक्यता नाही.

यातला कुठलाही लेख कोणी सांगितला म्हणून, कुठल्या नियतकालिकाची गरज म्हणून सरांनी लिहिलेला नाही. हे सगळं लेखन आंतरिक उमाळ्यानं झालेलं आहे. एका अर्थानं व्यक्तीवरचे लेख म्हणजे सरांच्या जडणघडणीतला त्यांचा वाटा कृतज्ञतेनं व्यक्त करणारे आहेत. त्यासोबतच त्या त्या व्यक्तीचं नेमकं व्यक्तीचित्रही आपल्या डोळ्यासमोर सर या लेखनातून उभं करतात. वेगवेगळ्या नात्याने या सगळ्या व्यक्ती सरांशी निकटच्या वर्तुळातल्या आहेत. या व्यक्ती चित्रणाविषयी स्वतंत्र लिहिणं आवश्यक आहे. इथं मी तो भाग टाळतो आहे. 

वतन असलेल्या गावचा लळा

सुरवातीला सरांचे जे गावाविषयीचे लेख आहेत त्यांचा आपण विचार करूयात. गांधेली हे सरांचं मूळ वतन असलेलं गाव. ते औरंगाबाद पासून सात-आठ किलोमीटरवर आहे. गावी जाताना सर वडलांसोबत तिथं नेहमी पायीच जायचे. सण-वार आणि सगळ्या सुट्ट्यातलं सरांचं बालपण इथेच गेलेलं आहे. त्यामुळे जन्मापासून औरंगाबादवासी असूनही सरांचा आपल्या मूळ वतनाच्या गावचा लळा सुटलेला नाही.

शिवाय आजीच्या लाडानं सरांना कायम या गावी ओढून नेलं. तीन डोंगराच्या बेचक्‍यात.एका तळ्याकाठी वसलेलं २१ हजार लोकवस्तीचं हे गाव. या वयातही बारीक-सारीक तपशिलासह सरांना आठवतं. आता हे गाव अस्तित्वात नाही. औरंगाबाद शहरानं त्याला गिळून टाकलंय.

आता त्या गावाच्या जागी उद्योग, कारखाने, प्रचंड इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आता कोणी हे गाव शोधायला गेलं तर तिथं या गावाचं नामोनिशानही सापडणार नाही. पण सरांच्या लेखनात हे गाव सरांनी हुबेहूब साठवून ठेवलंय.

वेगळ्या अंगाने आलेलं गाव

औरंगाबादच्या पूर्वेला अजिंठा रस्त्यावर असलेलं बोधेगाव हे सरांचं आजोळ. लाडका भाचा म्हणून खूप लाड होत असल्यामुळे सरांचा लहानपणचा बराचसा रहिवास इथं झाला. त्यांचे सख्खे आजोबा कायम नोकरीनिमित्त फिरत राहिले आणि निवृत्तीनंतर ते देवगाव रंगारी इथं स्थायिक झाले. ही सगळी गावं आजोळ म्हणून सरांनी अनुभवली आणि त्याविषयीही लिहिलेलं आहे.

सरांचे चुलत आजोबा सरांच्या आईचा म्हणजे आपल्या पुतणीचा इतका लाड करायचे की सख्या आजोबांनी बोधेगाव सोडलं तरी सरांना आणि त्यांच्या आईला बोलावून चुलत आजोबांनी सतत पाहुणचार केला. कारण त्यांना आपल्या पोटच्या मुलीपेक्षा पुतणी जास्त लाडकी होती.

सरांचा हा आजोळवरचा लेख वाचताना मला सतत धर्मानंद कोसंबी यांचं फार पूर्वी वाचलेलं ‘मेरा मातुल ग्राम’ हे पुस्तक आठवलं. कोसंबी हे ही प्रामुख्यानं वैचारिक लेखन करणारे. आपल्या आजोळाविषयी लिहिताना नात्यागोत्या विषयी कमी आणि त्या गावाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व याविषयी कोसंबी यांनी जास्त लिहिलं आहे. रसाळ सरांनीही या लेखांमधून तेच केलं आहे. तिथं पाहिलेला तेव्हाचा गाव, लग्नविधी, रुढी-परंपरा याविषयी रसाळ सर भरभरून लिहितात.

हेही वाचा: सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

सामाजिक, सांस्कृतिक पाऊलखुणा

सरांचा जन्म जरी वैजापूरला झाला असला तरी आधी वडलांच्या आणि नंतर स्वतःच्या नोकरीनिमित्त सगळं आयुष्य औरंगाबादेत गेलेलं आहे. त्यामुळे औरंगाबादची खडानखडा माहिती त्यांना आहे. औरंगाबादवरचा त्यांचा लेख वाचताना हे सतत जाणवत राहतं. औरंगाबादला नेमका सेहरा का नाही याचं उत्तर या लेखात सापडतं.

मुगल राजवटीत उत्तर भारतातून आलेले सरदार इथंच स्थायिक झाल्यामुळे या गावाचं वळणही तसंच राहिलं. जवळच्या पैठणला मराठी संस्कृतीच्या सगळ्या खुणा सापडतात. पण औरंगाबादेत त्या सापडत नाहीत. इथं सगळी उत्तरेची छाप. सण-वार, गल्ल्या, इमारती सगळीकडं तिकडचीच नावं.

त्यामुळे सरांनी या लेखाला नावच दिलं ‘औरंगाबाद: महाराष्ट्रातली दिल्ली’ याच लेखातून सरांनी या गावात आपलं आयुष्य जे घडलं त्या विषयी आणि त्या काळातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन, सांस्कृतिक जीवनाविषयी भरपूर लिहिलेलं आहे.

जिवलग मित्रांविषयी

‘हैदराबादचे दिवस’ या लेखामधे एम. ए. मराठी करायला तिथं असतानाचा आणि नंतर काही काळ तिथं केलेल्या नोकरीचा तपशील सर देतात. १९५५ ते १९५७ चा हा काळ असावा. हैदराबादहून परत येऊन औरंगाबादेत रुजू झाल्याच्या तारखेवरून आपल्याला हा अंदाज करता येतो. सरांनी तसा काळाचा स्पष्ट उल्लेख इथं कुठेही केलेला नाही.

तेव्हाचं हैदराबाद, तिथली युनिवर्सिटी, तिथला मराठी विभाग याचं नेमकं दर्शन सरांनी या लेखात घडवलंय. तिथल्या साहित्य परिषदेविषयी व्यवस्थित लिहिलेलं आहे.आपले शिक्षक ना. गो. नांदापूरकर, भालचंद्र महाराज कहाळेकर, भगवंतराव देशमुख यांची धावती व्यक्तिचित्र आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती यातले गुणदोष दोन्ही सरांनी स्पष्टपणे मांडले आहेत.

आपल्या पुढच्या शिकवण्यावर भालचंद्र महाराजांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा प्रभाव असल्याचंही सरांनी इथं नोंदवलं आहे. चंद्रकांत भालेराव आणि प्र. द. जोशी या इथल्या आपल्या दोन जिवलग मित्रांविषयीही सरांनी मोठ्या आत्मीयतेनं या लेखात लिहिलंय.

कर्तव्यदक्ष भूमिकेतले वडील

आता दोन नाते विषयक लेखांचा विचार आपण करुया. त्यातला ‘भाऊ : आगरकरी वळणाचे वडील’ या नावाचा सरांचा वडलांवरचा लेख सोळा पानांचा आहे. यात आलेली वडलांची कहाणी म्हणजे सरांच्या कुटुंबाचीच कहाणी आहे. सरांच्या वडलांचं नाव नरहरी माणिक कुलकर्णी. वा. रा. कांत यांनी त्यांना त्यांच्या नावाच्या आद्यक्षरावरून नमा हेच नाव रूढ केलं. आणि ते तिथल्या वर्तुळात रूढंही झालं.

ते सरस्वतीभुवन या औरंगाबादच्या तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय विचारांच्या खाजगी शाळेत कमी पगारावर राष्ट्रीय भावनेमुळे शिक्षक होते. त्यांच्या नगरच्या मामांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधे इंटर पर्यंत शिकवलेलं असल्यामुळे ते आगरकरी विचारांचे सुधारणावादी होते. त्यांच्या मामांनी त्यांना जर शिकवलं नसतं तर त्यांच्या वडलांनी त्यांना शिकवलंच नसतं.

गावाकडचा कसल्याही आधाराशिवाय सरांच्या वडलांनी दहा माणसांचं बहीण-भावांचं कुटुंब ओढाताणीत सांभाळलं. कर्तव्यदक्ष शिक्षक आणि तितकाच कर्तव्यदक्ष कुटुंब प्रमुख किती ओढाताणीत जगतो तसे ते जगत होते.

पण संगीत, साहित्य, क्रीडा, नाट्य या सगळ्या कलांची त्यांना आवड होती. नभोवाणीवर श्रुतिका लिहीण्याचंही काम ते करत. त्यामुळे रसाळ सरांनाही तेव्हा अत्यंत नवलाची असलेली आकाशवाणी नित्याचीच झालेली होती. कारण लहान मुलांच्या कार्यक्रमात रसाळ सरांना नेहमी भूमिका दिल्या जात. अगदी कंठ फुटेपर्यंत त्यांनी या कार्यक्रमातून भूमिका केल्या.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

वडलांच्या हाताखाली घडलं व्यक्तिमत्त्व

तेव्हा आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी असलेले वा. रा. कांत हे रसाळ सरांच्या वडलांचे मित्र होते. कांत यांचा पहिला कवितासंग्रह ‘रुद्रवीणा’ हा रसाळ सरांच्या वडलांनीच प्रकाशित केला. इतकंच काय त्या वेळी आकाशवाणीवर झालेली न. चि. केळकर यांच्यापासून मर्ढेकरापर्यंतच्या लेखकांच्या ‘मी का लिहितो’ या लेखांचं अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज असलेलं पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलं.

तेव्हाची कुठलीच वितरण व्यवस्था हाताशी नसल्यामुळे आणि मराठवाड्यातलं उदास वाङ्मयीन वातावरण यामुळे हा व्यवहार त्यांना तोट्याचा ठरला आणि त्यांनी प्रकाशन व्यवस्था गुंडाळली.

वा. रा. कांत आपल्या नव्या कविता वाचून दाखवायला रात्री घरी येत तेव्हा दिव्याच्या उजेडात त्यांच्या हातवाऱ्यांच्या आणि मान हलवन्याच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्यायांविषयी रसाळ सरांनी फार सुंदर लिहिलं आहे. एका अर्थानं त्या काळात समृद्ध, सुसंस्कृत, औरंगाबादच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वर्तुळाचं केंद्र असलेल्या वडलांच्या हाताखाली सरांचंही व्यक्तिमत्व घडत गेलं.

रसाळ सर प्राध्यापक पदावर रुजू होताना त्यांचे वडील त्यांना म्हणाले ‘हा नुसता पेशा नाही, हे व्रतही आहे. पैशाच्या आणि सत्तेच्या मागे लागलं कि या व्रताचा भंग होतो. तू कधीही पैशाच्या आणि उच्च पदाच्या मोहात पडू नकोस’ वडलांचा सल्ला सरांनी तंतोतंत पाळल्याचं आम्ही विद्यार्थी साक्षीदार आहोत.

‘आई’ स्त्रीच्या जगण्याची प्रतिनिधी

‘बाई’ हा सरांनी स्वतःच्या आईवर लिहिलेला लेख आहे. पण नेहमीच आईवर जसं भळभळतं लिहिलं जातं तसं हे लेखन नाही. तो सरांच्या लेखणीचा स्वभावच नाही. किंबहुना आपल्या आईकडे ते आई म्हणून पाहण्यापेक्षा त्या काळातल्या समाजाच्या एका स्तरातल्या स्त्रीच्या जगण्याची प्रतिनिधी म्हणून तटस्थपणे पहावं तसं सर आपल्या आईकडे पाहतात. आणि आईच्या माध्यमातून तत्कालीन स्त्रीजीवनाची वैशिष्ट्य नोंदवतात.

सरांनी या लेखात एका ठिकाणी लिहिलं आपल्या ‘घरात एका परक्या घरातून आपला वंश टिकवण्यासाठी आणि घरात राबण्यासाठी स्त्री आणण्याचा विधी म्हणजे लग्न, असा एक अर्थ लग्नासारख्या आनंददायक आणि दोन व्यक्तींचे जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या या विधीला प्राप्त झाला होता’.

लेखाचा शेवट करताना सरांनी लिहिलंय ‘बाईच्या एकूण आयुष्याचं पार्श्ववलोकन करताना मी जेव्हा पाहतो, तेव्हा मराठवाड्यात रेंगाळत राहिलेल्या मध्ययुगातून आधुनिक युगात होणाऱ्या संक्रमण काळाचा अनुभव मी तिच्या आयुष्याद्वारा घेतो’ सरांची आई म्हणजे औरंगाबाद जवळच्या बोधेगावच्या पाठकांची कन्या जी वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी गांधेलीकरांची सून म्हणून आली.

मित्रांविषयी तटस्थपणे लिहिलंय

‘आम्ही सारे मित्र’ या लेखात सरांनी आपल्या मित्रांविषयी लिहिलं आहे. चंद्रकांत भालेराव गो. मा. पवार, अरुण चव्हाण, तू. शं. कुलकर्णी, नरेंद्र चपळगावकर अशा अवघ्या सहा लोकांविषयी मित्र म्हणून सरांनी या लेखात लिहिलंय. एम. ए. करायला हैदराबादला जाईपर्यंत तर आपल्याला कुणी मित्रच नव्हता असंही सरांनी लिहून ठेवलंय.

पुढं आपल्या मित्रांचा पार्ट्या करणारा एक ग्रुप होता तोही आम्ही विसर्जित केला, हे सांगताना सर म्हणतात ‘आपण प्राध्यापक आहोत आणि आपल्या  विषयाच्या अध्यापनात अधिकाधिक वेळ व्यतीत करणं ही आपली जबाबदारी आहे असं कदाचित आम्हाला वाटलं असावं’ आता या मित्रांपैकी नरेंद्र चपळगावकर वगळता कोणीही जिवंत नाहीत.

युनिवर्सिटीच्या आपल्या संपूर्ण कालखंडात गो. मा. पवार वगळता इतर कुणाचाही त्यांनी मित्र म्हणून उल्लेख केलेला नाही. जास्त मित्र करणं म्हणजे वेळ वाया घालवणं असंही सरांना वाटत असावं. खरं तर आपण भलं आणि आपलं काम भलं असा सरांचा नेहमीचा स्वभाव या लेखावरून आणखी स्पष्ट होत जातो.

याही लेखाचा शेवट तसा भावनिक झालेला आहे. सर लिहितात ‘एकामागोमाग हे सर्व गेले आता नाना आणि मी असे दोघेच राहिलो आहोत. मी एखादं चांगलं पुस्तक वाचलं तर त्यावर कुणाशी बोलावं? नानानं जर एखादा वैचारिक लेख लिहिला तर त्याची कठोर चिकित्सा करणारा असा इथं कोण? आता हे आम्ही दोघेच एकमेकासंबंधी करतो’ या लेखातही मित्राविषयी लिहिताना, त्यांच्या स्वभावातले बारकावे सांगतानाच सर त्यांच्या गुणदोषांची ही निर्मम चिकित्सा करतात. अगदी मित्राविषयी लिहितानाही सरांचा रोख स्थितप्रज्ञासारखाच आहे.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

असा आहे नावाचा किस्सा

दुसऱ्या पुस्तकातला सर्वात शेवटचा लेख हा ‘मी’ या नावाचा आहे. आयुष्यभर स्वतः विषयी बोलायचं टाळणाऱ्या सरांनी इथंही स्वतः विषयी बोलताना संकोचच केला आहे. आपण काय केलं याचा दिंडोरा पिटण्याऐवजी सरांनी आपलं काय चुकलं, आपल्यात काय उणीवा आहेत तेच जास्त सांगितलं आहे.

सरांच्या आजोळच्या लोकांनी ठेवलेलं प्रभाकर हे सरांचं मूळ नाव. सरांपेक्षा वीस वर्ष मोठ्या असलेल्या मामाला सगळे लोक बापू म्हणायचे ते सरांना इतकं आवडलं की लहानपणी सरांना कुणी त्यांचं नाव विचारलं तर ते स्वतःचं नाव बापू असं सांगायचे. पण शाळेत घालताना वडलांनी अचानक सुधीर असं नाव नोंदवलं.

वडलांनी असं अचानक आपलं नाव का बदललं असावं याचा पुढे मोठेपणी विचार करताना सरांच्या लक्षात आलं की हे नाव ना. सी. फडके यांच्या ‘अटकेपार’ या कादंबरीच्या नायकाचं आहे. ही कादंबरी तेव्हा नुकतीच आलेली होती आणि फडके हे सरांच्या वडलांचे आवडते कादंबरीकार होते. पण सरांना आवडणारं बापू हेच नाव त्यांच्या अर्धवर्तुळात अजूनही लोकप्रिय आहे.

वडलांचे प्राधान्यक्रम

वडलांची शिस्त, दरारा आणि घरातली आर्थिक चणचण यामुळे आपल्यात कसे न्यूनगंड निर्माण झाले हेही सरांनी मोकळेपणानं सांगितलेलं आहे. नीट दिसत नसतानाही तीन वर्ष चष्मा घ्यायचं लांबलं आणि अभ्यासात कसे मागे पडत गेलो हे सांगताना माझा चष्मा, कपडे, वाहना या वस्तू वडलांच्या प्राधान्यक्रमात नव्हत्या असं सर सांगतात.

सरांच्या वडलांवर थोरला भाऊ म्हणून सर्व भाऊ बहिणींची जबाबदारी होती. आणि कुटूंब प्रमुख म्हणून सरांचे वडील ती भूमिका नीट पार पाडत होते. अशावेळी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं तर चालेल पण नातेवाईकांकडे दुर्लक्ष होऊ नये ही त्यांची भूमिका असायची. त्याविषयी सरांनाही अभिमानच वाटत होता. म्हणून वडलांविषयी हे सगळे लिहिताना त्यांचा सूर तक्रारीचा नाही.

या लेखातला पुढचा उतारा वाचताना तर मला गलबलूनच आलं. ‘कॉलेजला जाईपर्यंत माझ्या पायात साधी चप्पल ही नसायची. मी लहानपणापासून अनवाणी पायानेच सगळीकडे वावरायचो. त्यामुळे माझ्या पायाचे तळवे खूपच टणक झाले होते. गांधेली या माझ्या गावी सगळीकडे काटेच पण मी मात्र त्यांची पर्वा करायचो नाही. बिनधास्त चालायचो. बाभळीचा काटा बोचला तरी तो पायात घुसत नसे. निदान एवढं तरी आपलं खासपण आहे याचाच मला अभिमान वाटे’

हा उतारा वाचला आणि सर मला आणखी जवळचे वाटायला लागले. कारण मीही १९७२ च्या दुष्काळात अशाच परिस्थितीत गुरं राखलेली आहेत. त्यावर आधारित ‘नेनंता गुराखी’ या माझ्या कवितेतल्या या ओळी जणू काही रसाळ सरांचंच वर्णन करणार्‍या आहेत असं मला आता वाटू लागलं आहे.

बाई नेनंता गुराखी
काट्या कुपाटीत जाय
काटे कुटे मुडपीती
त्याचे निबरले पाय

नाटक आवडीचा वाङ्मयप्रकार

सरांचं कॉलेजचं शिक्षण औरंगाबादलाच मिलिंद महाविद्यालयात झालं. प्राचार्य म. भि. चिटणीस, म. ना. वानखेडे आणि मे. पु. रेगे या आपल्या शिक्षकांविषयी सरांनी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केली आहे. एकदा चिटणीस सरांनी वर्गात आवाहन केलं की सर्वांनी आपापले अनुभव लिहा, त्यांचा आपण एक अंक काढूयात.

त्या अनुभवांचा अस्मिता हा अंक निघाला आणि दलित साहित्याची तीच सुरवात ठरली. गंमत म्हणजे याच अंकात सरांची कथाही प्रकाशित झाली. पुढं आणखी काही कथा प्रतिष्ठान वगैरे मधून प्रकाशित झाल्या. चार पाच कथा लिहिल्या नंतर ही आपली प्रकृती नाही असं समजून सरांनी कथा लिहिणं थांबवलं.

याच लेखात आणखी एक महत्त्वाची गोष्ट कळते. आज रसाळ सर कवितेतले सर्वश्रेष्ठ जाणकार समजले जातात. पण मुळात कविता हा त्यांचा आवडता वाङ्मयप्रकार नव्हताच मुळी. त्यांना नाटक हा वाङ्मयप्रकार आवडायचा. कारण त्यांचे वडील नाटक बसवायचे. ते त्यांनी घरातल्या तालमीसह पाहिलं होतं.

नाटकाचा त्यांच्या मनावरचा प्रभाव अधिक होता. पण पुढे युनिवर्सिटीत संशोधन करताना म. भि. चिटणीस यांनी सरांना सुचवलं की कवितेतल्या प्रतिमेवर मराठीत कामच झालेलं नाही, तू त्यावरच संशोधन कर. सरांनी ते मानलं आणि आज सर त्यातले सर्वश्रेष्ठ जाणकार ठरले.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

स्वतः सांगितलेले स्वभावातले बारकावे

मी सरांचा तीन वर्ष विद्यार्थी असल्यामुळे आणि पुढेही कायम संपर्क ठेवून असल्यामुळे सरांच्या स्वभावातले बारकावे माहीत आहेत. माझं निरीक्षण सरांच्या या लेखात सरांनी स्वतःच मान्य केल्याचं दिसलं. स्वतःविषयी सर लिहितात ‘अभ्यास विषय सोडून मी विद्यार्थ्यांशी बोलत नसे. मी कधीही विद्यार्थ्यांची वैयक्तिक चौकशी केली नाही. मी आणि विद्यार्थी यांच्यात फक्त ज्ञानसलग्नच नातं मी कायम ठेवलं. त्यामुळे माझे कोणत्याही विद्यार्थ्यांशी भावनिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत.’

‘माझ्या या स्वभावामुळे माझ्या खोलीत यायला विद्यार्थी घाबरत. तरीही एखाद-दुसरा विद्यार्थी माझ्या या स्वभावाकडे दुर्लक्ष करून माझ्या खोलीत येऊन माझ्याशी अघळपघळ गप्पा मारायचा. अशा विद्यार्थ्यांशी हळूहळू माझे प्रेमाचे संबंध कायम होत. आणि नंतर ते टिकूनही राहात. पण असे विद्यार्थी संख्येने कमीच.’

सुदैवानं अशा कमी विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो. युनिवर्सिटीतल्या सर्वच प्राध्यापकांशी माझे खूप जवळकीचे संबंध होते. फक्त पानतावणे सरांशी त्या काळात तसं होऊ शकलं नाही. पण विद्यार्थी दशा संपल्यावर तेही मी साध्य केलं.

तटस्थ संस्कृती निरीक्षक

सर आत्मचरित्र लिहिण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे आता हेच सरांचं आत्मचरित्र समजायला हरकत नाही. एरवीच्या वागण्यात, बोलण्यात आणि लेखनात कटाक्षानं टाळलेला बराचसा स्वतःविषयीचा तपशील सरांनी इथं मात्र येऊ दिला आहे.

त्यांना त्यांचा काळ मांडायचा आहे. तो मांडताना समकाळाचा एक भाग म्हणून त्यांचं चरित्र थोड्याफार प्रमाणात येतं. हे सगळं लेखन करत असताना भावनिक ओलाव्यापेक्षा तटस्थ संस्कृती निरीक्षक त्यांनी जागा ठेवलाय.

आजोबांच्या जगण्याची वैशिष्ट्य सांगताना त्यांचे दोषही सर प्रकर्षाने सांगतात. त्यांचे आजोबा त्यांना एका पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर मांडायचे असतात. जुन्या माणसांच्या जगण्याच्या धारणा काय होत्या ते सांगायचं असतं.

लेखन ललित आणि समाजशास्त्रीय

हे करताना वस्तुस्थितीचं दर्शन व्हावं म्हणून सर आपल्या प्रिय माणसाच्या स्वभावाचे चुकीचे पीळ उकलायलाही संकोच करत नाहीत. काही लेखांचा शेवट चटका लावणारा भावनिक झालाय. तर्कशुद्ध विचार आणि भावनिक ओलावा यांचा मेळ अशा ठिकाणी घालताना सर दिसतात.

हे सगळं लेखन म्हटलं तर ललित आहे आणि म्हटलं तर ते समाजशास्त्रीयही आहे. या लेखनाची कुणाच्या लेखनाशी तुलनाच करायची झाली तर ती इरावती कर्वे यांच्या ललित लेखनाशी करता येईल. पण इरावती कर्वे या जाणून-बुजून समाजशास्त्रज्ञ होत्या.

‘फणसा अंगी काटे,आत अमृताचे साठे’ असं एक संतवचन आहे. सरांना दुरून जाणणाऱ्याला काटेच दिसतात. ही दोन्ही पुस्तके वाचताना आपल्याला सरांमधले अमृताचे साठेही अनुभवता येतात. आम्ही तर ते नेहमीच अनुभवलेले आहेत.

हेही वाचा: 

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

राजस्थानातल्या पुष्करच्या वाळूत उमटलेल्या घोड्यांच्या टापांची गोष्ट

 जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…