पिपिलिका मुक्तिधाम: मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरची कादंबरी

ग्रंथाली प्रकाशनाची ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही आजची एक महत्वाची कादंबरी आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब लबडे यांनी ती लिहिलीय. ही कादंबरी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन येते. तिचं प्रायोगिक स्वरूप आणि यातले वेगवेगळे प्रयोगही फार महत्वाचे आहेत. मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पहावं लागेल.

मागच्या ६० वर्षात मराठी साहित्य विविधांगाने बदललेलं आहे. १९६० नंतर मराठी साहित्यात नक्की कोणते बदल झाले? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. १९६० ते २०००च्या दरम्यान भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अण्णा भाऊ साठे, विलास सारंग, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर, किरण नगरकर, अरुण साधू, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे, विश्वास पाटील, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे, दया पवार यांनी मराठी कादंबरी, कथा आणि कविता साहित्यात एक वेगळेपण आणलं.

मराठी दिवाळी अंकांनी , मराठी नियतकालिकांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. नंतर इंटरनेट आलं. त्यामुळे बदल झाला आणि होतोय. मराठी विविध वाङ्मय प्रकारांमधे काळाप्रमाणे बदल झाला. विशेषतः १९८० नंतर मराठीत महत्त्वपूर्ण कादंबऱ्या आल्या. मराठी साहित्यात कादंबरी वाङ्मयाचे वेगळंच स्थान आहे. कादंबरी ही कळसाची टोकदार अशी रचना दिसते पण गाभाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित असते.

१९६० नंतर लघुकथा मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेल्या. आत्ता सुद्धा फेसबूकवर लघुकथा मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात आहेत. कादंबरीचा आशय आणि अभिव्यक्तीमधे खूप सखोल प्रमाणावर बदल झालेला दिसतो. ‘नामुष्कीचे स्वगत’ रंगनाथ पठारे, ‘तणकट’ राजन गवस यांच्या कादंबऱ्या महत्त्वपूर्ण आहेत. पठारे यांची कादंबरी वेगळी आहे. मराठी कादंबरीत जे मनन-चिंतन लागतं ते नामुष्कीचं स्वगतमधे आहे.

अशा प्रकारच्या कादंबऱ्या मराठीत वेगवेगळ्या पद्धतीने येणं भाषेच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. झाडाझडती ही कादंबरी संयुक्त महाराष्ट्रातल्या पहिला येडगाव इथल्या कुकडी नदीवरच्या धरण प्रकल्पाची पार्श्वभूमी असलेली विश्वास पाटील यांची कलाकृती,  राजन गवस यांच्या ‘तणकट’मधे शेतकऱ्यांची व्यथा आली आहे. २००० नंतरची महत्त्वाची कादंबरी म्हणजे सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ आहे.

आजच्या घडीला ज्या तीन चार वर्षात कादंबर्‍या आलेल्या आहेत त्या सामाजिक दृष्टीने फारच महत्त्वपूर्ण आहेत. गणेश महादेव यांची ‘रहस्य’ ही कादंबरी गूढ नाथपंथीं आणि शैव धारणांची पार्श्वभूमी असलेल्या जीवनाचं चित्रण करते. अशा प्रकारची कादंबरी आपण विसरलो आहोत. या कादंबरीचे लेखक गणेश महादेव आहेत. मच्छिंद्रनाथ ते निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वरांचा नाथपंथ या पंथाची पार्श्वभूमी घेऊन ही कादंबरी आली आहे.

हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

सध्या सगळ्यात जास्त चर्चिली गेलेली आणि यापुढेही सतत जास्त चर्चा व्हावी अशी वारकरी पंथाची पार्श्वभूमी घेऊन आलेली महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘पिपिलिका मुक्तिधाम’. या कादंबरीचे लेखक बाळासाहेब लबडे हे आहेत. ते मराठीचे प्राध्यापक आहेत. ही कादंबरी प्रायोगिक स्वरूपाची कादंबरी आहे. तिच्यात विविध स्वरूपाचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. ते महत्वपूर्ण आहेत.

१९६४ला कोसला आली तेव्हा मराठी कादंबरीचा एक पॅटर्न होता. नायक, त्या भोवतीचं विश्व, तो ज्या व्यवस्थेशी झगडत आहे त्याचं वर्णन कोसलामधून आलं. आजच्या काळात ‘पिपिलिका मुक्तीधाम’ ही अशाच मराठी कादंबरीच्या बदलाच्या टप्प्यावरची कादंबरी आहे. ती २०१९ला ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेली आहे. ही वेगळी कादंबरी आहे.

कोसला नंतरची कादंबरी म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल. कादंबरीचा लेखक प्राध्यापक आहे. पण त्याचं बालपणीचं जीवन आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रात गेलेलं आहे. आळंदी हे सात-आठ दशकांपासून आध्यात्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आळंदी पुण्याच्या अगदी जवळ आहे. पुण्याची भाषा ही प्रमाण भाषा मानली जाते. पुण्यातल्या लोकांची शब्द उच्चारण्याची पद्धती, बोलण्याची लकब, सवयी, वेगळ्या आहेत.

आळंदी ची भाषा आणि पुण्याची भाषा वेगळी आहे. आळंदीच्या परिसरातल्या भाषेचं दर्शन आपल्याला ‘पिपिलिका मुक्तिधाम’ या कादंबरीतून घडतं. पुण्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या आळंदी मधल्या जनजीवनाचं चित्रणही ही कादंबरी करते . आळंदी सारख्या नगरात-शहरात काय काय घडतं ते सांगते. संत ज्ञानेश्वरांपासून असलेला एक भाषिक धागा ती आपल्या सोबत घेऊन येते.

आळंदी किंवा पैठण, पंढरपूर ही जुन्या काळापासूनची असलेली धार्मिक तीर्थक्षेत्रं आहेत. ती अनेक कारणांनी प्रसिद्ध आहेत. आणि महत्त्वपूर्ण आहेत. निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वरांना न्याय मिळाला नाही त्यासाठी ते पैठणला गेले. येताना त्यांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली सच्चीदानंदानी लिहुन घेतली. संस्कृतमधल्या गीतेचं ज्ञान मराठीत मांडलं. त्यांचा हा पहिला प्रयोग होता.

पुण्याची भाषा ही सतत बदलती भाषा आहे. पुणे हे सुद्धा सतत बदलत आलेलं नगर-शहर आहे. पुण्यात अनेक गोसाव्यांच्या समाध्या आहेत. जुन्या काळापासून पुणे एक महत्त्वाचं सामाजिक-सांस्कृतिक केंद्र राहिलंय. सातारा आहे तसंच पुणे आहे. सातारा हे नाव सप्तर्षी वरून आलं. त्याचं पौराणिक महत्त्व आहे.  तसंच ऐतिहासिक महत्त्वही आहे. तांत्रिक मांत्रिक काळात त्याला महत्त्व होतं.

हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

पुण्याचं रूपही अनेक प्रकारे बदललं. त्याच्या परिसरातली भाषा बदलली. ही भाषा पिपिलिका मधून आलेली आहे. पेशवे काळात पुण्याचं रूप बदललं. तसंच इंग्रज काळातसुद्धा पुण्याचं रूप बदललं. भाषा बदलली. आळंदी, देहू आणि पुणे एकमेकांपासून फक्त २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. भाषेच्या या त्रिकोनी प्रदेशात वावरल्यानंतर लक्षात येईल की किती वैविध्यपूर्ण भाषा आणि संस्कृती एकमेकात मिसळल्या आहेत. एके काळी तुकाराम महाराजांची गाथा ब्राह्मणांनी इंद्रायणीत बुडवली. भाषेला नवीनपण देण्याचं काम देहू आणि आळंदीतल्या प्रज्ञावंतांनी केलं. देहू आणि आळंदी ही वैश्विक गावं आहेत. आणि त्याच्यावरचं शब्द चित्रणही वैश्विक आहे.

‘पिपिलिका मुक्तीधाम’ या साऱ्या परीसराची भाषा मांडत जाते. तुम्ही या संस्कृतीबाहेर गेल्याशिवाय या वैश्विकतेचं महत्त्व कळत नाही. ‘पिपिलिका मुक्तीधाम’ ही मराठी भाषेला वैश्विक दृष्ट्या समृद्ध करणारी कादंबरी ठरते. ती आळंदीच्या परंपरेतली आहे. असंच एक वैश्विक सेंटर आमच्या जुन्नर परिसरात २१ व्या शतकात निर्माण झालंय. त्याचं नाव जिएमआरटी सेंटर आहे.

ज्या दुर्बीणी जगातल्या अनंत मैल दूरवरच्या अंतरात घडामोडींचा ध्वनीलहरींच्या साहाय्याने अंदाज घेतात. त्या आवाजाच्या विश्वात नवीन काय घटना घडतेय हे ऐकण्यासाठी त्याची नोंद करण्यासाठी त्या ३१ दुर्बिणी बसवलेल्या आहेत. त्याला अनेक युनिवर्सिटी, संशोधकांनी अभ्यासासाठी भेटी दिलेल्या आहेत. वैज्ञानिकांचं अभ्यासकेंद्र बनलंय. वैश्विकतेसाठीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. संत एकनाथांचा एक महत्त्वपूर्ण अभंग आहे जो वैश्विकतेवरती भाष्य करतो. मराठी संतपरंपरेच्या अभंग गाथेतून मराठीचा गोडवा वाहिलेला आहे. त्यात संत नामदेव,संत ज्ञानेश्वर संत एकनाथ, संत तुकाराम वगैरे संतांचा उल्लेख करावा लागेल. संत नामदेवांनी १३व्या शतकात सोप्या भाषेत मराठीत लिहिलंय.

काळ देहाशी आला खाऊ
आम्हीं आनंदी नाचू गाऊ
कोणे वेळे काय गाणे
हें तो भगवंता मी नेणें
टाळ मृदुन्ग  दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे
नामा म्हणे बा केशवा
जन्मोजन्मी घ्यावी सेवा

मध्ययुगीन मराठी भाषेचा अभ्यास अनेक युनिवर्सिटी करत आहेत. ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही मराठी भाषिक आणि प्रांत संस्कृती मिश्रण असलेली कलाकृती आहे.

हेही वाचा: अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

संत एकनाथ म्हणतात,

ओंमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो
मोहजाळ माझे कोण निरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया
सद्गुरुराया माझा आनंदसगर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
त्यापुढे उदास चंद्र-रवि
शशी रवि अग्नि नेणती ज्या रूपा
स्वप्रकाशरूपा नेणें वेद
एक जनार्दनीं गुरू परब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी

चंद्र सूर्य हे ओंकाराच्या नंतरचे आहेत. ग्रह आणि उपग्रह हे विश्वाच्या प्रारंभी आहेत. ओंकारानंतर चंद्रसूर्य आहेत. संत एकनाथ ओंकाराला प्रमाण मानतात, गुरुसमान मानतात. संत ज्ञानेश्वरांनी आद्य रूपं लिहिली आहेत. गणेशा पूर्वीचा त्यांचा आद्य देव आहे त्याला वंदन करतात. पहिला आवाज-ध्वनी येतो आणि नंतर प्रतिमा येते. अशी मांडणी संतांनी केलेली आहे.

भाषा आणि तिचा आवाज-ध्वनी याचं अनोखं मिश्रण ‘पिपिलिका मुक्तीधाम’मधे दिसतं. या कादंबरीत आहे ते मानवी मन आणि त्या मानवी मनाची चाललेली घालमेल. ती उत्कृष्टरित्या ही कादंबरी व्यक्त करते. ही कादंबरी आजच्या जगण्याचा भाव व्यक्त करते. जास्तीत जास्त माहिती मिळावी, ज्ञान मिळावे, संभाषण करावे, अशी वृत्ती माणसांमधे दिसून येते. तसं आजचं जग प्रतिमांचं आहे.

साहित्य हा आतला आवाज आहे. आपल्या भाषेवर ओंकाराचा परिणाम होत असतो. स्त्री आणि पुरुष असे दोन भेद असले तरीसुद्धा तुम्ही माणूस म्हणून व्यक्त होत असता हे खूप महत्त्वाचं आहे. अनुभव हे वैयक्तिक असतात. तसंच वैश्विक स्वरूपाचे सुद्धा असतात. आपल्या परंपरेत पुनरावलोकन करून आपण पुन्हा प्रत्येक जण अनुभव घेत असतो.

हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

अनुभवाचं महत्वपूर्ण चित्रण करणारी कादंबरी भटक्या विमुक्तांच्या विश्वातल्या अशोक पवार यांची ‘बिऱ्हाड’ ही आहे. हे बिऱ्हाड वाचलं तर पोतराजाचं जीवन आपल्याला समजतं. अश्वत्थामा संकल्पना की वास्तव ते वेगळेपणाने दिसतं. ब्रिटिशांनी अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या. त्यांच्या फायद्यासाठी शिकवल्या. पण नंतर आपल्या सोयीनुसार आपण त्याचा उपयोग करून घेतला आणि घेत आहोत. यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा.

‘पिपिलिका मुक्तिधाम’ मधली असणारी धुतरी ही व्यक्तिरेखा स्वतंत्र आणि वेगळी तत्त्वज्ञानाची भाषा बोलते. डॉक्टर गणेश देवी यांनी विविध बोलीभाषांची मांडणी केलेली आहे. ती महत्त्वपूर्ण आहे. भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संस्कृती आहे. ‘पिपिलिका मुक्तिधाम’ मधूनही आपल्याला आपली संस्कृती भारतीय पातळीवरची समजते.

विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’ सारखी कादंबरी वाचल्यानंतर १९७० नंतरची ग्रामीण विस्थापणाची संस्कृती समजते. महाराष्ट्रात पाऊस कमी पडतो म्हणून धरणं आली. धरणं बांधल्यानंतर वेगळे प्रश्न आले. पाणीवाटपाचे प्रश्न आले. मतदारसंघांमधे पाण्यावरून भांडणं होऊ लागली. हे साहित्यात येणं महत्त्वाचं आहे.

आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे दलित, ग्रामीण, आणि आदिवासी साहित्याने रेखाटलं. या साहित्यामधून महाराष्ट्राची वैश्विकता आली. तसंच वैज्ञानिक साहित्यामधून सुद्धा महाराष्ट्राची वैश्विकता आली. त्यात महत्वपूर्ण असं लेखन केलं गेलं.  साहित्याला आवाज आणि प्रतिमा असते. ‘पिपिलिका मुक्तीधाम’ने असा आपला स्वतःचा आवाज आणि प्रतिमा तयार केलेली आहे. अध्यात्मानुसार प्रतिमा महत्त्वाची आहे. आवाजही महत्त्वाचा आहे. बाळ जर जन्मल्यानंतर रडले नाही तर सगळे नातेवाईक किती काळजी करतात. आवाज इतका महत्त्वाचा असतो.

भाषेचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नव्या नव्या कलाकृतींमधून भाषा आपल्याला नव्याने भेटत असते. या दृष्टीने पिपिलिकाचा भाषिक आवाज महत्त्वाचा आहे. कथनाचे अनेक प्रयोग तिच्यात आहेत. आई- मुलगा, गुरु -शिष्य असा संवाद सतत होत असतोच. आपण आपल्या मनाशी सुद्धा बोलत असतो. या कादंबरीमधे आपल्याला अनेक पातळ्यांवर जो संवाद आहे तो संवाद दिसून येतो. माणसाच्या जन्मानंतर त्याचा मेंदू कार्यरत होत असतो. आणि तो भाषिक पातळीवरती वावरायला लागतो.

हेही वाचा: ‘वारीच्या वाटेवर’ ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

अध्यात्म मानणं किंवा न मानणं ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. विश्वाच्या निर्मितीचा काळ, पृथ्वीच्या निर्मितीचा काळ, आणि लेखकाचा अनुबंध हा त्याच्या अनुभव सापेक्ष आहे. काळानुसार अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या. नदीकाठच्या अनेक संस्कृती लुप्त झाल्या. वाळवंटात स्थलांतरित झाल्या. विज्ञान तंत्रज्ञानात बदल झाला. जगण्यातही बदल झाला. मराठी कादंबरीत बदल झाला. तिच्यात नवीन नवीन भाषिक प्रयोग आले. यात ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही महत्त्वाचं आहे. नवीन नवीन शब्दांनी मराठी समृद्ध झाली. ही नवी भाषा या कादंबरीत आलेली आहे.

‘पिपिलिका मुक्तिधाम’ प्रमाणेच प्रतिक पुरी यांच्या ‘मोघ पुरुष’ कादंबरीतही वेगळेपण आहे. ‘मोघ पुरुष’ अनेक धर्म संस्थापक आणि तत्त्ववेत्ते यांच्यावर तसंच देव संकल्पनेवर भाष्य करत जाते. त्यातल्या तत्त्वज्ञानावर भाष्य करत जाते. जीवन जगण्याच्या पद्धतीवर शैलीवार भाष्य करते. ही कादंबरी वाचल्यानंतर गौतम बुद्धाचं संभाषण कसं असेल? ख्रिस्ताचं संभाषण कसं असेल? हे चित्र आपल्या समोर दिसायला लागतं. विश्वातल्या देव आणि माणूस यांचा शोध घेणं आणि मांडणं महत्त्वाचं आहे. ‘मोघ पुरुष’ ही या दृष्टीने महत्त्वाचे कादंबरी आहे.

कादंबऱ्या अनेक असतात पण त्यातल्या दखलपात्र मोजक्याच असतात. बरेच कादंबरीकार व्यावसायिक दृष्टिकोनातून कादंबरी लिहितात. अर्थकारण लक्षात ठेवून कादंबरी लिहिली जाते. तेव्हा लेखक पटकथा लिहितो असं वाटतं. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर सिनेमा झालेले आहेत. ‘पिपिलिका मुक्तिधाम’ तत्त्वज्ञानाच्या अनेक प्रदेशांमधे आपल्याला घेऊन जाते.

पिपिलिका म्हणजे मुंगी. ही मुंगी परकायाप्रवेश करत राहते .ती अनेक रूपं धारण करते. त्यामुळे कादंबरीला वैविध्यता प्राप्त झाली आहे. ती कार्लमार्क्सच्या केसात जाऊन बसते. अंधाऱ्यातल्या सगळ्यांमधे प्रकटतात. ती विश्वाकडे वेगळ्या नजरेने पाहते. म्हणून ती समर्थ वैश्विक चित्रण करते. ती जागतिक साम्यवादावर भाष्य करते. भारतात कम्युनिझमचे असे दोन प्रकार आहेत. एक चायनीज आणि दुसरा रशियन. ते सगळं यात आलंय. त्यांचे स्त्रोत्र यात आले आहेत. अभ्यासपूर्ण चित्रण यात आलं आहे. लोकशाही आणि लोकशाहीतील मुजोर झालेली भांडवलशाही यात आली आहे. यापूर्वी सरंजामशाही होती. आता भांडवलशाही आली. त्याचा उद्रेक या कादंबरीत आलेला आहे.

एक कंपनी तुम्हाला औषध पुरवते. इंटरनेट द्वारा गिर्‍हाईक मिळवते. डॉक्टर आणि पेशंट मिळून औषधवाल्या कंपन्यांचं एक जाळं तयार होतं. अशा शोषण प्रधान व्यवस्थेचं चित्रण ‘पिपिलिका मुक्तिधाम’ करते. आजच्या नवीन समाजाचं चित्रण ही कादंबरी करते. कोसला कादंबरीच्या वेळी जसं झालं होतं तसंच आज ‘पिपिलिका मुक्तिधाम’च्या वेळी झालंय.

हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

‘बाटलीतला राक्षस सारखं आंगडं टोपडं घेऊन फिरायचा भन्याभन्या… भन्याभन्या.. त्याच्या स्वप्नातली राजकुमारी स्वप्नातच राहिली. जेव्हा तो बाटलीतून बाहेर आला. ब्रम्हचारी राक्षसाची भरपूर वाहवा झाली. त्याने राजकुमारी नेली नाही. पण प्रजेची बुद्धी मात्र गुहेत कोंडून ठेवली. बुद्धी कोंडण्याची कला भारीच म्हणायची. ही त्याला माध्यमांमुळेच अवगत झाली याचं सगळ्यांना अपरूप वाटलं.’ पान.२८२

समकालीन जीवनाला ही कादंबरी अचुक भिडते. आजच्या कथेत समकाळाचं चित्रण करणारा एक समर्थ कथासंग्रह म्हणजे ‘ब्रँड फॅक्टरी’ हा आहे. त्याचे लेखक मनोहर सोनवणे हे २१ व्या शतकातल्या सामाजिक, सांस्कृतिक झालेले बदल अधोरेखित करत आहेत. ‘कोसला’च्या वेळी मराठी कादंबरीत जसं परिवर्तनात्मक चित्रण आलेलं होतं तशाच प्रकारचं परिवर्तनात्मक समाजाचं चित्रण हे ‘पिपिलिका मुक्तिधाम’ या कादंबरीतून, ‘ब्रँड फॅक्टरी’  कथा संग्रहातून आलेलं आहे. ही कादंबरी अतिशय वेगळी आहे. कादंबरीची भाषा आपल्याला प्रभावित करणारी आहे.

उदा. पान क्र. १३३ वरचा आशय पाहता येतो.

मन१

काळी उवाच:
ती पिसाळली की कुत्रं बडवायला लागतं. कुत्र उवाच म्हणून तिची बडबड सुरू होते.
‘श्र्वानाय नम:बडविंगम् बडविंगम् बहु बडविंगम्.जिथंम् भागंम् तिथंम् बडविंगम् .दगडंम् स्पर्शंम् भिरकावंगम् भागंमंगमन् रस्तोरस्ती् भागंमंगम् अथ् जिवस्य् लक्षणम्’

मन २:

तांबडी उवाच:
ती पिसाळली की वारूळाच्या मातीचे सागरगोटे करून चल्लस खेळायची दर डावाला आकाशाकडे पाहून पाढे म्हणायची.
बे एके बे वाटेत होते काटे
मी सोडून सगळेच चाटे
बे दुने आठ
आपलेच सराटे आपलेच बोराटे
बे पंचे बारा
चारा गारा आणि माझाच मला वारा
बे धाय चाळीस
थुकते माझ्या लाळीस

मन ३:

लाली उवाच:
ती पिसाळली की खोरं घेऊन घाणीवरचा कचरा उपसायची.
गाणं म्हणत म्हणत.
माझ्याच गंधवाल्याची ओवी गातेच बाई
चवल्या पावल्या हरवल्या माझ्याच ग बाई
गाऊ अंगाई गाऊ अंगाई
विसावून किती बाटल्या बुटल्या फुटल्या
दिवसा दिवाण्या पागल सार्याच लुटल्या
गाऊ अंगाई गाऊ अंगाई
ढिगार्यात भंगार सजले
वासावासाने संसार उठले
गाऊ अंगाई गाऊ अंगाई

हेही वाचा: प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

मन ४:

मीच उवाचं;
मी पिसाळले की काही खरे नाही.आहे रे नाही रे हा संघर्ष सुरू व्हायचा .मी शब्दांचे दगड फेकून मारायचे गंधवाल्यावर.
गारगोटीचा एकच वार…शब्दासाठी भलती धार…हाब…हाब…हाब…आंबा पिकतो रस गळतो…गंधवाला कसं कंसं सोनं लुटतो…तेलंगीचे एकच पान गंधवाल्याचे करूया काय…पैसा पाणी गडप..पैसा पाणी गडप…च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ अध्यात्माचं पाणी पिऊ…
आम्हा चौघींची मन एकत्र आली की
आम्ही उवाचं:
माझ्या डोक्यात पंडित जगन्नाथ अवतरतात हाच गंधवाल्याचा उतारा.
वशीकरण… वशीकरण…..
मोहिनी मोहिनी कहा चली!
बाहर खुदाई काम कन चली!
फलानी फलाने को देखै जरै मरै!
मेरे को देख के पायन पडै!
छु मंत्र काया आदेश गुरू की शक्ती!
मेरी भक्ति फूरो मंत्र ईश्वरो वाचा!

या चार मुंग्या आपल्या मनातली सल व्यक्त करत राहतात. तिचं कथन प्रभावित करणारं आहे. समाजाचे प्रश्न भाषेच्या अभ्यासकांनी मांडले पाहिजेत. कंपनीत ट्रेनी तयार केले जातात. ते पोपटच असतात असं वाटायला लागतं. औद्योगीकरण हे पोपट तयार करण्याचा कारखाना आहे.  प्रत्येक कंपनीची आपली एक पद्धती असते. ‘पिपिलिका’ मधून हा भाव व्यक्त झाला आहे.

संस्कृतीचं प्रतिबिंब साहित्यातून यायला हवं. नवीन नवीन लेखकांनी लिहायला हवं. आम्ही ‘रिंगण’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून संतांच्या नवीन नवीन भाषेबद्दल लिहिलेलं आहे. त्यांच्या वेगळेपणाबद्दल लिहिलेलं आहे. माझ्यासारख्याला तुकाराम समजायला खूप वेळ लागला. विठ्ठला विषयीची अनेक चित्रं मी काढलेली आहेत.

मराठी विषयी सगळेजण काम करत आहेत पण त्यांची सगळी दखल मराठी साहित्यात आलेली आहे असं नाही. काही साहित्यातून ही दखल आली आहे. ‘पिपिलिका’ ही महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. तिच्या प्रस्तावनेमधे डॉ शंकर विभूते यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीचा उल्लेख केलेला आहे. कंबोडियन माकडांवरचं चित्रण सत्तांतरमधे आलेलं आहे. ती कादंबरी आधी डॉक्यूमेंटरी फिल्म होती. तिच्यावरून ती कादंबरी निर्माण झाली. सत्तांतर आणि पिपिलिका मुक्तिधाम यांचा काडीमात्र संबंध नाही.

हेही वाचा: 

वारीबद्दल सांगतायंत नरेंद्र दाभोळकर 

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू

जगातल्या पहिल्या संत कान्होपात्रा स्मारकाची संघर्षकथा

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…