सीईओ: टेक कंपन्यांमधे भारतीय वंशाच्या लोकांचा डंका

‘ट्विटर’सारख्या विश्वविख्यात कंपनीच्या ‘सीईओ’ पदावर झालेली पराग अग्रवाल यांची निवड भारतीयांसाठी अभिमानास्पदच आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्यासारखे अनेक भारतीय सध्या बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ पद भूषवत अशा कंपन्यांना प्रगतीपथावर नेतायत. बड्या कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय व्यक्ती असणं इतकंच पुरेसं नाही तर जागतिक स्तरावर डंका वाजवणार्‍या कंपन्याही भारतीयच असणं ही काळाची गरज आहे.

जागतिक पातळीवरच्या टेक कंपन्यांमधे सध्या भारतीय वंशाच्या लोकांचा डंका जोरात वाजत आहे. अनेक बड्या कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीय लोक विराजमान होत आहेत. ट्विटरच्या ‘सीईओ’पदी झालेली पराग अग्रवाल यांची नवी नेमणूक ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झालेल्या या गौरवशाली परंपरेचा नवा अध्याय आहे. सत्या नाडेला, सुंदर पिचाई, शांतनु नारायण यासारख्या अनेक उच्चपदस्थ भारतीयांच्या पंक्तीत आता पराग यांचीही वर्णी लागली आहे.

भारताच्या खाणीतले हिरे

जागतिक पातळीवर भारतीय आयटी तज्ज्ञांचा गेल्या अनेक वर्षांपासून बोलबाला आहे. देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दैदीप्यमान प्रगतीमुळेच तो निर्माण झालेला आहे. भारतातल्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ क्षेत्रामधे प्रामुख्याने दोन घटक आहेत, आयटी सर्विसेस आणि ‘बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग’ अर्थात बीपीओ.

भारतात आयटी उद्योगाचा देशाच्या जीडीपीत ८ टक्क्यांचा वाटा आहे. सध्या देशात आयटी-बीपीएम क्षेत्रात सुमारे ४.५ दशलक्ष कर्मचारी काम करतायत. तुलनेने देशातल्या आयटी कर्मचार्‍यांना योग्य वेतन मिळत नाही, असं मानलं जातं. यामुळेच कदाचित अनेक आयटी तज्ज्ञ परदेशात जात असावेत, असं म्हटलं तरी चालेल.

परदेशात त्यांना जास्त पगार आणि मोठ्या संधीही मिळतात. तिथं ते आपलं कर्तृत्व गाजवून बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’ बनण्याइतकी प्रगतीही करून दाखवू शकतात. भारताच्या खाणीतून बाहेर पडलेले हे हिरे इतर देशांच्या मुकुटाची शोभा वाढवत आहेत, हे नक्कीच हुरहुर लावणारं आहे.

हेही वाचा: फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

भारतीय टॅलेंटचा फायदा

अमेरिकेत भारतीय आणि चिनी आयटी तज्ज्ञांना आजही मोठीच मागणी आहे. या आयटी कंपन्यांमधे मोठा भरणा हा भारतीयांचाच आहे. स्ट्राईप कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ पॅट्रिक कोलेजन यांनी आपल्या ट्विटमधे बड्या टेक कंपन्यांमधल्या उच्चपदस्थ भारतीयांची जंत्रीच देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे.

त्यांचीच रीघ ओढत ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ सारख्या कंपन्यांचे प्रमुख असलेल्या एलन मस्क यांनीही म्हटलंय की, अमेरिकेला भारतीय टॅलेंटचा मोठाच फायदा झाला आहे. मात्र भारतीय टॅलेंटचा असा फायदा खुद्द भारतालाच का होऊ नये, हा सर्व भारतीयांना पडणारा प्रश्न आहे.

यशाची बीजं इतिहासात

देशात बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, दिल्ली-एनसीआर ही मोठी ‘आयटी हब’ आहेत. बंगळूरमधे तर दहा लाख कर्मचारी प्रत्यक्षपणे, तर ३० लाख कर्मचारी अप्रत्यक्षपणे या उद्योगाशी निगडित आहेत. बंगळूरला ‘भारतातल्या स्टार्टअपची राजधानी’ असंही म्हटलं जातं. २०२०मधे हे शहर ४४ टक्के युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांचं घर ठरलं होतं.

हैदराबादला तर ‘सायबराबाद’ किंवा ‘हायटेक सिटी’ असंही म्हटलं जातं. अशी शहरं या क्षेत्राबद्दल जगभरात आपला दबदबा राखून आहेत. अर्थातच, भारताच्या कॉम्प्युटर किंवा आयटी क्षेत्रातल्या यशाची बीजं शोधायची झाली तर आपण अगदी पंडित नेहरूंच्या काळापर्यंत मागे जाऊ शकतो.

देशातली पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’च्या काळातल्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ऑटोमेटिक कॅल्क्युलेटर’ हा एक प्रकारे देशातला पहिलाच कॉम्प्युटर. भारताच्या आयटी सर्विसेस इंडस्ट्रीचा जन्मही टाटांच्याच ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विस’ या मुंबईत १९६७ला स्थापन झालेल्या कंपनीपासून झाला. सध्याही हीच देशातली अव्वल क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.

मुंबईतच १९७३ला सध्याच्या आयटी पार्कची पूर्वसुरी असलेल्या ‘एसईईपीझेड’ सीप्झ या पहिल्या सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट झोनची स्थापना झाली. १९८० च्या दशकात देशातली ८० टक्के सॉफ्टवेअर निर्यात इथूनच होत होती. सध्याच्या काळात भारत हाच आयटीचा जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार आहे. मात्र भारतीय टॅलेंटही देशाबाहेर ‘निर्यात’ होऊन त्याचा  फायदा भारताला होण्याऐवजी इतर देशांना होईल, असं घडू नये हे पाहिलं पाहिजे.

हेही वाचा: कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!

डिजिटल इंडियाचे आर्किटेक्ट

भारतातल्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ आणि टेलिकॉम क्रांतीसाठी अर्थातच राजीव गांधी यांना मोठं श्रेय दिलं जातं. त्यांना ‘डिजिटल इंडिया’चे आर्किटेक्टही म्हटलं जातं. राजीव गांधी हे देशातले सगळ्यात तरुण पंतप्रधान होते. १९८४ ते १९८९ या पाच वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २१ व्या शतकातल्या भारताच्या तंत्रज्ञानात्मक पायाभरणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

देशातल्या संगणक क्रांतीविषयी त्यांना सल्लागार सॅम पित्रोदा यांनी मोलाची मदत केली. देशातल्या जनतेनेही नवं तंत्रज्ञान, संगणक यांचं शिक्षण घेण्यापासून ते दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यापर्यंत उत्साह दाखवला आणि जगभरात भारताची प्रतिमा ‘आयटी’ क्षेत्रातला दबदबा निर्माण करणारा देश अशी झाली. यात भारताने चीनलाही टक्कर दिली हे विशेष.

उच्च पदांवर भारतीय

‘आयटी’ क्षेत्रातल्या भारतीय तरुणांसाठी अमेरिका आणि युरोपियन देशांमधे नवी दालनं खुली झाली. या तरुणांना तिथे मोठ्या पगाराच्या नोकर्‍या आणि अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या. ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांचा वार्षिक पगार ५,१०० कोटी रुपये आहे तर ‘गुगल’ची एक कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार ३३०० कोटी रुपये आहे.

‘अडोबी’चे शांतनु नारायण यांचा वार्षिक पगार ४५०० कोटी रुपये आहे. आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मेहरोत्रा, पालो ऑल्टोचे निकेश अरोडा, वीएमवेअरचे रंगराजन रघुराम, अरिस्टा नेटवर्कच्या जयश्री उल्लाल, नेटअ‍ॅपचे जॉर्ज कुरियन हे भारतीयही उच्च पदांवर काम करत आहेत.

मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुकसारख्या अनेक बड्या कंपन्यांमधल्या इतर महत्त्वाच्या पदांवर सध्या भारतीय वंशाचे लोक काम करत असून त्यांनाही वार्षिक पगार अतिशय चांगला मिळतो. परदेशात अनेक भारतीय आपल्या कामातून नावलौकिक मिळवत आहेत, ही गोष्ट भारतीयांसाठी नक्कीच भूषणावह आहे. मात्र भारतातही अशा ग्लोबल टेक कंपन्या अधिकाधिक निर्माण होऊन देशातल्या तरुणांकडून त्यांचा विस्तार होणं अपेक्षित आहे.

हेही वाचा: आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष

पर्यायी स्वदेशी प्लॅटफॉर्म्स

देशात सध्या टाटा कन्सल्टन्सीनंतर इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो लिमिटेड, रेडिंग्टन इंडिया, टेक महिंद्रा, लार्सेन अँड टौब्रो इन्फोटेक यांसारख्या अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. देशाच्या गौरवात या कंपन्याही आपलं योगदान देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमांमुळे देशातल्या तरुणांना उद्योजक बनून देशाच्या प्रगतीला आपलं योगदान देण्याची नवी प्रेरणाही मिळालेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून देशात अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे स्टार्टअप सुरू करत आहेत. सोशल मीडियाच्या क्षेत्रातही जगातल्या बड्या कंपन्यांना तोडीस तोड अशा कंपन्या भारतातही बनत आहेत, हे एक सुचिन्हच आहे.

चीननं असं धोरण सुरुवातीपासूनच राबवलेलं आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या कंपन्यांना चीनने स्वतःच्या देशात कधीही भाव दिला नाही. चीनचं ‘वीबो’ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ ट्विटरचाच नाही तर फेसबुक आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सज्जड पर्याय आहे.

भारतातही ट्विटरला पर्याय ठरलेलं ‘कू’ हे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म झपाट्याने लोकप्रियता मिळवत आहे. इन्स्टाग्रामला ‘एमएक्स टकाटक’, व्हॉट्सअ‍ॅपला ‘टेलिग्राम’, ‘टिकटॉक’ला ‘चिंगारी’ अ‍ॅपसारखे अनेक पर्यायी आणि स्वदेशी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत.

ट्विटरचे नवनियुक्त ‘सीईओ’

‘आयआयटी बॉम्बे’मधून इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेले ट्विटरचे नवनियुक्त ‘सीईओ’ पराग अग्रवाल हे २०११ला ट्विटरमधे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाले. २०१७ला ते ट्विटरचे ‘चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर’ बनले. आता जॅक डॉर्सी यांच्यानंतर त्यांनी ट्विटरची ‘चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर’पदाची धुरा स्वीकारलेली आहे.

त्यांची ही प्रगती जागतिक स्तरावर भारतीय तरुणांनी सिद्ध केलेली क्षमताच दर्शवणारी आहे. अशी क्षमता असणारे अनेक तरुण आपल्या देशातही अनेक असतील. त्यांनी या क्षमतेचा वापर इथं राहून देशाचा गुणगौरव वाढवण्यासाठी करावा, अशीही आपण अपेक्षा करू शकतो.

हेही वाचा: 

फेसबुक झालंय ‘बुक्ड’!

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…