प्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं

गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले.  पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.

मस्त हिंडा-फिरायचं असेल तर एखादं शांत समुद्राचं ठिकाण आपल्यासाठी भारी चॉइस असतो. मस्त हवा, समुद्राच्या लाटा, स्वतःमधे हरवून जाणं किती मस्त ना? इथल्या विरंगुळ्याचे क्षण किती काय देऊन जातात. त्यामुळेच अशी हवेशीर ठिकाणं आपण निवडतो. पण भविष्यात अशी ठिकाणं राहिलीच नाहीत तर?

जग बदलतंय. आपलं स्वार्थी असणं त्याहून बदलत चाललंय. सगळ्याच गोष्टींचा हव्यास आपल्याला राक्षसी बनवत चाललाय. त्यातूनच निसर्गाला ओरबाडणं सुरू झालंय. त्यातून समुद्र, नद्यांचं रूप आपण बदलवतोय. वाढत्या प्रदूषणामुळे अशा ठिकाणी फेरफटका मारताना आपल्या नाकाला रुमाल बांधावा लागला की समजवावं आपलं काहीतरी चुकतंय.

समुद्र, नद्यांचं वाढतं प्रदूषण काळजीचा विषय आहे. त्यावर अनेक उपाययोजनाही होतायत. अनेक संशोधनं, अभ्यास होतात. वेगवेगळे प्रयोग केले जातात. असाच नदीच्या प्रदूषणाला मात देणारा एक प्रयोग केलाय तो ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यानं. या प्रयोगानं तिथल्या एका प्रदूषित नदीचं पूर्ण रूप बदलून गेलंय.

दशकभरापासून लुखा नदीची चर्चा

मेघालय राज्य ईशान्येकडच्या डोंगराळ भागात वसलंय. भारतातला सगळ्यात जास्त पाऊस याच भागात पडतो. अवघ्या ३० लाखांची वस्ती असलेलं मेघालय निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधतेनं नटलंय. या निसर्ग सौंदर्याला नख लावण्याचं काम इथंही अधूनमधून होत राहतंय.

मेघालयच्या पूर्वेकडे जैंतिया नावाचा एक जिल्हा आहे. या भागामधे मोठ्या प्रमाणात खाणींचं बेकायदेशीर उत्खनन होतं. या उत्खननासाठी हा जिल्हा कायम चर्चेत राहिलाय. त्याचा परिणाम इथल्या लुखा नदीवर झाला. ती कायम प्रदूषित होत राहिली. इथले स्थानिक या नदीला ‘माशांचं जलाशय’ असं म्हणतात. २००७ पासून मोठ्या प्रमाणात खाणींचं उत्खनन झाल्यामुळे लुखा नदीचं पूर्ण रूप बदललं.

नदीच्या वारंवार होत असलेल्या प्रदूषणामुळे मागच्या एक दशकाहून अधिक काळ ही नदी चर्चेत राहिली. खाणीतले विषारी पदार्थ नदीत मिसळल्यामुळे या नदीचं प्रदूषण वाढत होतं. त्यामुळे इथल्या माशांच्या दुर्मिळ प्रजातीही नष्ट होत होत्या. पाण्याचा रंगही बदलायला लागला.

हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?

प्रदूषणामुळे रोजगार, पर्यटन धोक्यात

जैंतिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा, चुनखडीच्या खाणी, सिमेंटचे कारखाने आहेत. लुखा नदीचं प्रदूषण वाढायचं हेच महत्त्वाचं कारण होतं. याचा परिणाम लुखा नदीच्या इतर उपनद्यांवरही झाला. इथल्या काही नद्या या बांगलादेशच्या सुरमा वॅलीला जाऊन मिळतात. त्यामुळे त्याचंही प्रदूषण वाढू लागलं.

पर्यटन हे इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं महत्वाचं साधन आहे. या नदीच्या जवळच अनेक पर्यटन केंद्र आहेत. तिथं पर्यटकांचं येणं कमी झालं. माश्याच्या प्रजाती नष्ट झाल्यामुळे इथल्या मच्छिमारी व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. इथले ६० टक्के लोक उदरनिर्वाहासाठी याच नदीवर अवलंबून असल्याचं स्थानिक युवा नेते के. सुचियांग यांनी डीडब्ल्यू न्यूजला सांगितलंय.

इथलं पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार धोक्यात आल्यामुळे अनेक पर्यावरण आणि सामाजिक संघटना एकत्रित आल्या. त्यांनी सरकारवर दबाव टाकला. स्थानिक लोकांची त्याला साथ मिळाली. आणि एक दशकापासून प्रदूषित होत राहिलेल्या या लुखा नदीसाठी मेघायल सरकारने एका प्रोजेक्टची घोषणा केली.

सरकारचा पायलट प्रोजेक्ट

पीएच हे एक प्रदूषणाची पातळी मोजायचं मोजमाप आहे. लुखा नदीच्या पाण्याची पीएच पातळी ही ७ पेक्षा कमी होती. त्यामुळे नदीतल्या छोट्या जीवांसाठी ते फार धोक्याचं होतं. पीएच पातळी दिवसेंदिवस खाली जात प्रदूषण अधिकच वाढत होतं. त्यामुळे २०१२ला मेघालयच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंबंधीचा एक रिपोर्ट सरकारला दिला होता. पण त्यावर पुढे काही होऊ शकलं नाही.

लोकांचा दबाव, रोजगाराचा प्रश्न यामुळे सरकारने लुखा नदीसाठी २०१९ला ‘डिटॉक्सिंग पायलट प्रोजेक्ट’ या नावाने एका योजनेची घोषणा केली. पाण्यातले वायरस मारून टाकण्यासाठी म्हणून फायटोरेमीडिएश तंत्रज्ञान वापरतात. या तंत्रज्ञानात शैवाळसारख्या वनस्पतीचा वापर माती, हवा, घातक, दूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो.  इथंही याच फायटोरेमीडिएश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

हा प्रोजेक्ट राबवण्यात मेघालयचे वन आणि पर्यावरण मंत्री जेम्स संगमा यांनी भूमिकाही तितकीच महत्वाची होती. यासाठी त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांचीही मदत घेतली. खाणींवर प्रतिबंध आणले. या प्रोजेक्टचा परिणाम असा झाला की त्यामुळे तिथली धोकादायक पीएच पातळीत घटली. नदीला पूर्वीचं रूप मिळालं. इतर प्रदूषित नद्यांमधेही त्यांना हा प्रोजेक्ट राबवायचा आहे.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

नद्यांमधून विषारी वायू समुद्रात

विज्ञान विषयक मॅगझीन असलेल्या नेचर कम्युनिकेशनमधे एक संशोधन प्रकाशित करण्यात आलंय. ‘नैसर्गिक आणि मानवी हस्तपेक्षांमुळे जगभरातल्या नद्यांचं प्रदूषण वाढतंय. एका मर्यादेपलीकडे पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट अशा रासायनिक पदार्थांचं नद्यांमधे मिसळणं हे प्रदूषणाचं एक कारण ठरत असल्याचं’ नेचर कम्युनिकेशनचं म्हणणं आहे.

प्रत्येक वर्षी ६४० कोटी टन इतके घातक द्रव्य पदार्थ नद्यांच्या मार्गाने थेट समुद्रात पोचतायत. अशा पदार्थांपासून नद्या कशा वाचतील याकडे लक्ष द्यायला हवं. कारण नद्यांच्या प्रदूषणामुळे केवळ नद्यांची परिसंस्थाच धोक्यात येत नाही तर त्याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन आयुष्यावरही होतोय. पारा सारखा विषारी पदार्थ आपल्या मज्जासंस्थेला हानी पोचवतो. मानसिक आजारांचं कारण ठरणाऱ्या या पाराचं समुद्रातलं प्रमाण वाढण्याकडे अमेरिकेच्या ‘येल स्कूल ऑफ एनवायरमेंट’नं लक्ष वेधलंय.

तर जगभरातल्या समुद्रांमधे नद्यांतून आलेल्या रासायनिक पदार्थांचा वाटा हा ६८ टक्के इतका आहे. यात ८१ टक्के क्लोराईड, सोडियम ८६ टक्के आणि सल्फेटचं प्रमाण १४२ टक्के आहे. अमेरिका, चीन आणि इंग्लंडमधल्या संशोधकांच्या रिसर्चमधून ही गोष्ट पुढे आलीय. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

प्रदूषणामुळे भारतातल्या नद्यांची घुसमट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘नमामी गंगे’ ही गंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना होती. पण त्याचा फार काही परिणाम झाला नसल्याचं दिसतंय. घरातलं आणि उद्योगधंद्यांमधलं सांडपाणी थेट या नदीत मिसळलं जातंय. गंगा नदीचं प्रदूषण वाढत असल्याचं जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू यांनी स्वतःच लोकसभेत सांगितलंय.

तर केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी याच महिन्यात ९ डिसेंबरला लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना यमुना नदीमधे अमोनियाचं प्रमाण वाढत असल्याचं म्हटलंय. या अमोनियामुळे झालेल्या पाणी प्रदूषणाचा सगळ्यात जास्त फटका यमुनेतून पाणी पुरवठा होणाऱ्या दिल्लीकरांना बसतोय. दूषित पाण्यामुळे दिल्लीकरांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय.

भारताच्या दक्षिणेची गंगा म्हणून ओळख असलेल्या कावेरी नदीची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. या नदीतल्या जस्त, शिसं, निकेल अशा विषारी वायूंचं वाढतं प्रमाण आणि नदीत टाकलेली औषधं, कीटकनाशकं, प्लास्टिक यामुळे या नदीचं रूप पूर्णपणे बदलतंय. आयआयटी मद्रासनं केलेल्या संशोधनातून ही गोष्ट पुढे आलीय.

हेही वाचा: 

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…