गोविंदाची ‘सेकंड इनिंग’ सुपरहिट ठरेल?

नव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी.

गोविंदाच्या आगामी कारकिर्दीबद्दल विचार करताना महानायक अमिताभ बच्चन यांचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहतं. कधीकाळी या महानायकाच्या प्रतिमेला तडा जाईल की काय अशी चिंता बच्चन यांना सतावत होती. त्यांची एबीसीएल ही निर्मितीसंस्था सुरवातीपासूनच तोट्यात होती. ‘देख भाई देख’चा अपवाद वगळता सगळीकडे या संस्थेला नुकसान होत होतं.

१९९७ साली ‘मेजरसाब’चं चित्रीकरण चालू होतं. तिथं अभिषेक असिस्टंटचं काम करायचा. ‘मेजरसाब’च आता संस्थेला नफा मिळवून देऊ शकतो अशी एकमात्र आशा उरली होती. पण जरी नफा मिळाला तरी अमिताभ बच्चन यांची सुपरस्टार इमेज कितपत सुधारेल हा प्रश्न होताच. कारण सेकंड इनिंगसाठी कुठलाही दिग्दर्शक, निर्माता त्यांला संधी द्यायला धजावत नव्हता. या बॉलीवूडच्या शहेनशहाचं करियर किनाऱ्याला लागतंय की काय अशी चर्चा त्यांच्या तोंडावर बिनधास्तपणे होऊ लागली.

मेजरसाबने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. एबीसीएल आणि निर्मात्यांना भरमसाठ फायदा झाला. पण बिग बींची मुख्य अडचण ती नव्हती. त्यांच्या सुपरस्टार इमेजला धक्का लागला होता. अक्षय कुमार, सुनिल शेट्टी, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदासहित खानत्रयींनी इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला होता. एकापेक्षा एक सुपरहिट फिल्म येऊ लागल्या. नव्वदीतल्या तरुणाईला बच्चन आऊटडेटेड वाटू लागला. बच्चनला स्वतःचं स्टारडम टिकवणं महत्वाचं होतं.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

‘जुडवा’ जॉनरचा आधार

डेविड धवननं एकेदिवशी बच्चनची भेट घेऊन एक जुडवा चोर पोलीस भावांची कथा ऐकवली. मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘जुडवा’पेक्षा या सिनेमाचं कथानक वेगळं असल्यानं बच्चननं होकार दिला. त्या सिनेमाचं नाव बदलून नंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ठेवण्यात आलं.

‘हम’ नंतर गोविंदा पुन्हा एकदा बच्चन सोबत स्क्रिन शेअर करणार होता, ती सुद्धा दुहेरी भूमिकेत! डेविडचा जुडवा फॉर्म्युला बॉक्स ऑफिसवर दणक्यात चालला. थेटरात आपल्या एण्ट्रीला टाळ्या-शिट्ट्या वाजताना बघून बच्चन सुखावला. कदाचित अनेक महिन्यांनी त्याला शांत झोप लागली असेल. ‘मेजरसाब’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मुळं बच्चनची गाडी हळूहळू रूळावर यायला लागली.

एबीसीएल अजूनही कर्जमुक्त झाली नव्हती. रुळावर येणाऱ्या गाडीतून उतरुन दुसऱ्या गाडीने प्रवास करण्याची रिस्क बच्चन घेणार होता. सिनेमांमधे सेकंड इनिंग ची संधी उपलब्ध होईल अशी आशा असतानाही आयुष्यातला सर्वात मोठा जुगार खेळण्याचा निर्णय बच्चननं घेतला. ‘Who will be the millionaire’ ह्या विदेशी मालिकेच्या धर्तीवर भारतात सुरु होणाऱ्या सोनीच्या ‘कौन बनेगा करोडपती’अर्थात केबीसीचा सूत्रधार बनण्यासाठी बच्चनने होकार दिला.

‘बडे मियाँ’नं रचला पाया

बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आता संपलाय, बरबाद झालाय अशा चर्चांना उधान आलं. ‘केबीसी’ हा फक्त स्पर्धकांसाठीच नाही तर बच्चनसाठीही जुगारच बनला होता. सुदैवाने बच्चनने हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा जुगार जिंकला. एबीसीएल कर्जमुक्त झाली. निर्मात्यांचे फोन येऊ लागले.

‘एबीसीएल’च्या स्थापनेपासून ते ‘केबीसी’च्या जुगारापर्यंत ढासळत जाणाऱ्या कारकिर्दीत बच्चनला सुपरस्टार म्हणून जिवंत ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण एखादी घटना घडली असेल तर ती होती ‘बडे मियाँ छोटे मियाँ’. बच्चनच्या सेकंड इनिंगचा आढावा घेताना सगळेच ‘केबीसी’ आणि ‘सूर्यवंशम’नं बच्चनला परत स्टारडम मिळवून दिलं असं नमूद करतात. पण कुणी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा साधा उल्लेखही करत नाही.

हेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

गोविंदाने दिला विश्वास

ऐंशी-नव्वदीतल्या डबलरोल फॉर्म्युलावर काम करणं कदाचित बच्चनची कारकिर्द बुडवणारंसुद्धा ठरु शकत होतं. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ अपयशी ठरली असती तरी गोविंदाला विशेष असा काही फरक पडला नसता. फरक पडला असता तो बच्चनला.

नव्वदीतले टुकार सिनेमे चवीने पाहणाऱ्या प्रेक्षकांना बच्चनची लायकी काढायला वेळ लागला नसता. डेविड धवन बच्चनसोबत फिल्म करतोय म्हटल्यावर लोकांनी डेविडलाच येड्यात काढलं. फिल्म रिलीज होईपर्यंत बच्चनला धाकधूक होती पण बच्चन आणि डेविडपेक्षा जास्त विश्वास गोविंदाला होता.

‘आप सुपरस्टार हो, वही आपकी पहचान है बडे मियाँ और वो पहचान आपसे कोई नही छिन सकता’ हे बच्चन ला ठामपणे सांगणारा गोविंदा आज स्वतःच्या सेकंड इनिंगसाठी धडपडतोय.

बच्चन सावरला, गोविंदाचं काय?

इतिहासाची पुनरावृत्ती म्हणावी की काय पण गोविंदा आता कालबाह्य झालाय याची जाणीव त्याला होतेय. लेथ मशीन चालवणारे जोशी जसं नवीन यंत्रांसोबत जुळवून घेऊ शकत नाहीत तसंच काहीसं. ‘बडे मियाँ’ ज्या लॉबीचे शिकार झाले होते तशाच लॉबीने ‘छोटे मियाँ’ला पण शिकार केलंय.

प्रत्येक ठिकाणी त्याची लायकी दाखवून तू आऊटडेटेड झालाय, तू आजच्या तरुणाईसोबत कनेक्ट नाही होऊ शकत हे वेळोवेळी सांगितलं जातंय आणि दुर्दैवाने हे खरंय. ‘पार्टनर’पर्यंत गोविंदाची डेविडसोबत चांगली मैत्री होती. त्यानंतर काही वैयक्तिक कारणांनी त्यांच्यात वाद होत गेले. २०१५ला गोविंदानं डेविडसोबतचे अंतर्गत वाद पहिल्यांदा मुलाखतीत बोलून दाखवले.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

बॉलीवूड लॉबीशी अपयशी झुंज

गोविंदा सलमानचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे तोही बॉलीवूड लॉबीचा भाग असल्याचं बोलला. मध्यंतरी ‘किल दिल’ आणि ‘हॅपी एंडिंग’मधे गोविंदा सहाय्यक भूमिकेत दिसला. पण त्यानंतर ‘आ गया हिरो’ या त्याने स्वतः निर्मीती केलेल्या सुमार सिनेमातून गोविंदानं त्याच्याविरोधात असलेल्या लॉबीचं म्हणणं अप्रत्यक्षपणे सिद्ध करुन दाखवलं.

आत्ताच्या तरुणाईशी गोविंदा कनेक्ट होऊच शकत नाही हे या सिनेमाच्या समीक्षेत अनेकांनी अधोरेखित केलं. नव्वदीतलं ‘हिरो एके हिरो’चं सूत्र आता कालबाह्य झालंय हे गोविंदाला बऱ्याच उशिरा लक्षात आलं हे त्याचं दुर्दैव. आपल्या सिनेमाला कमी थिएटर दिल्याचा आरोप त्याने लावला होता. पण त्या सिनेमाचा ट्रेलरवरूनच सिनेमाचा सुमार दर्जा दिसून येतो.

‘हिरो’ असण्याचा शाप

त्यानंतर ‘फ्राय डे’ आणि ‘रंगिला राजा’मधून गोविंदाला सेकंड इनिंगची संधी मिळणं कठीण होतं. गोविंदाला कालबाह्य केलं गेलं की तो स्वतःच्या हिरोईजमच्या प्रेमातून बाहेर न आल्यानं कालबाह्य झालाय हे महत्त्वाचं नाही. पण तो आता कालबाह्य झालाय हे ठळकपणे दिसून येतं.

मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. हे कशामुळे झालं? त्याला अपेक्षित असलेले चांगले सिनेमे आणि चांगल्या भूमिका कुणी देत नाहीय.

इंडस्ट्रीने त्याला गृहीत धरलंय. नव्वदीचा ‘हिरो नंबर वन’ ही ओळख रुजलेली असल्याने त्याला एक अभिनेता म्हणून कुणी किंमत द्यायला तयार नाहीय. सिनेमाचं कथानक असेल किंवा भूमिका असेल ती निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडं उरलेलं नाही.

हेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

साचा मोडायला हवा

गोविंदा फार आधीपासूनच सांगत आलाय की माझे सिनेमे हे कुटुंबवत्सल असतात आणि मी तसेच सिनेमे करणार. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा सिनेमा पाहता आला पाहिजे. फॅमिली एंटरटेनर सिनेमे करत आलेल्या गोविंदाला गुन्हेगारी आणि अश्लीलतेने बरबटलेले सिनेमे आणि वेबसिरीज नको वाटतात. मागच्या पाच वर्षात त्याने अशा अनेक सिनेमांना आणि वेबसिरीजला नकार कळवलाय.

गोविंदाला जशी चांगली भूमिका असणारे सिनेमे करायचेत ते कुणी निर्माते, दिग्दर्शक बनवायला तयार नाहीत. कारण जागतिक सिनेमा पाहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांची अभिरुची दरवर्षी बदलत आहे. त्या प्रेक्षकवर्गाला जे अपेक्षित आहे तेच निर्माता, दिग्दर्शकांना दाखवावं लागेल. तरुण प्रेक्षकवर्गाची अभिरुची समजून न घेता जर भोजपुरी पद्धतीचे टुकार सिनेमे प्रेक्षकांवर थोपवले तर त्याचा परिणाम काय असेल हे वेगळं सांगायला नको.

जसं ‘बडे मियाँ’ला ‘आयडेंटीटी क्रायसिस’चा सामना करावा लागला तशीच वेळ आता छोटे मियाँवर पण आलेली आहे. ‘बडे मियाँ’ची सेकंड इनिंग तर जोमात सुरुय पण ‘छोटे मियाँ’ अजूनही गटांगळ्या खात आहेत. कुणीतरी म्हणलंय, ‘हर कोई अमिताभ बच्चन जैसी सेकंड इनिंग नही खेल सकता।’

मध्यमवर्गीयांचा ‘गोंद्या’

नांदेडला आमच्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत वीसीआरवर ‘राजाबाबू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हिरो नंबर वन’, ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’, ‘आँखीयोंसे गोली मारे’, ‘दुल्हे राजा’, ‘साजन चले ससुराल’, ‘शोला और शबनम’ असे अनेक सिनेमे बऱ्याच वेळा बघितलेत.

एकेकाळी थिएटरमधे पब्लिकला नाचायला लावणाऱ्या सुपरस्टार गोविंदाचा आता लेथ जोशी होताना पाहवत नाही. तू लवकरात लवकर कुठल्यातरी छान-छान गोड-गोड कुटुंबवत्सल वेबसिरीजमधून सेकंड इनिंग गाजवायला तयार हो बाबा.

ऐंशी-नव्वदीच्या दशकातले जुने फॉर्म्युले सोड आणि नवीन प्रेक्षकवर्गाला तुझ्याकडून काय अपेक्षित आहे ते शोध. तश्या भूमिका तसे सिनेमे, वेबसिरीज निवड. तू मध्यमवर्गीय माणसांचा सुपरस्टार आहेस गोंद्या. तू कालबाह्य झालेला नाहीस हे तुला स्वतःलाच सिद्ध करावं लागणार आहे.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…