आपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल?

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

भाषाशास्त्र या विषयाची सुरवात झाली तेव्हा युरोपमधल्या भाषांच्या इतिहासासंबंधी पुष्कळ काम झालं. त्याचबरोबर संस्कृत, पर्शियन आणि अरेबिक या भाषांवरही बरंच काम झालं. पण त्याचवेळी युरोपमधे आर्किऑलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी ही दोन्ही शास्त्रं प्रगत होत असल्याने युरोपमधल्या भाषांचा नक्की इतिहास ठरवण्यात तिथल्या भाषाशास्त्रज्ञांना यश आलं. उदाहरणार्थ, लॅटिन भाषेची निर्मिती कधी झाली, लॅटिनची चलती कधीपासून सुरू झाली, लॅटिनला अवकळा कधी आली याविषयीचे विवाद शिल्लक राहिले नाहीत. हीच स्थिती ग्रीक भाषेबाबतही दिसून येते.

भारतातल्या भाषांची स्थिती

ज्यांना आधुनिक युरोपियन भाषा म्हणून शकतो अशा फ्रेंच, जर्मन, इंग्रजी या भाषांच्या इतिहासासंबंधी निश्चिती करण्यात तिथल्या अभ्यासकांना यश मिळालं; पण आपल्याकडे म्हणजे संपूर्ण आशिया खंडामधे अरेबिक, पर्शियन, संस्कृत, संस्कृतमधून निर्माण झालेली भाषा तमिळ, तमिळमधून निर्माण झालेल्या भाषा यांच्या निश्चित उगमाविषयी जरी भाकितं मांडली गेली तरी त्याची निश्चिती करण्यासाठी आर्किऑलॉजी किंवा इंडॉलॉजी अशा भाषाअभ्यासांची वानवा असल्याने आपल्याकडे भाषांच्या उद्गमाची नक्की तारीख, वेळ ठरवण्यात यश आलं नाही.

तमिळ ही भाषा इसवी सनाच्या ५०० वर्ष आधी बोलली जात होती, याचे पुरावे असूनही त्या भाषेची नक्की सुरवात केव्हा झाली याची आजही माहिती नाही किंवा निश्चिती नाही. हीच स्थिती भारतातल्या बहुतांश भाषांविषयी दिसून येते. सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी कानडी भाषेची सुरवात इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून झाली असं मानण्यात आलं होतं; पण आज कानडीची सुरवात इसवी सनाच्या पूर्वी दोन किंवा तीन शतकं झाली होती, अशी मतं अभ्यासकांनी मांडली आहेत.

कानडीची जी स्थिती आहे तशीच ओरिया आणि बांगला या भाषांचीही आहे. कारण एकेकाळी ओरिया ही बंगालीची उपभाषा आहे असं मानण्यात आलं होतं. सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी ओरिया ही स्वतंत्र भाषा असं मत मांडलं गेलं. पण साधारणतः १० वर्षांपूर्वी भारत सरकारने ओरियाला अभिजात दर्जा दिला. याचा अर्थ, ओरिया भाषा ही सुमारे २००० वर्ष जुनी आहे असं मानलं गेलं. ओरिया, बांगला, कानडी या भाषांसारखीच स्थिती मराठीची आहे.

हेही वाचा: मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

मराठीच्या मुळाशी महाराष्ट्रीय प्राकृत

एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला मराठी भाषा साधारणतः अकराव्या-बाराव्या शतकापासून सुरू झाली होती. संत ज्ञानदेवांना मराठीचे आद्यकवी मानण्यात आलं. त्यानंतरच्या अभ्यासकांनी महानुभव पंथाचाही अभ्यास केला आणि मराठीच्या इतर बोलींच्या वेगळ्या परंपरांचा अभ्यास करून ही कालसीमा बाराव्या-तेराव्या शतकापासून मागे घेऊन जात नवव्या-दहाव्या शतकापर्यंत नेऊन ठेवली.

‘कर्पूरमंजिरी’सारखा ग्रंथ हा नवव्या आणि दहाव्या शतकात लिहिला गेला. गेले काही काळ म्हणजे सुमारे ३०-३५ वर्ष मराठीचा उगम संस्कृतपेक्षा प्राकृतमधून झाला असेल तर मराठीचा आरंभ थेट इसवी सनाच्या आरंभी झाला, असंही मत मांडण्यात आलं आणि त्यातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी पुढे आली.

गेल्या १५ ते २० वर्षांमधे मानवी जनुकशास्त्रात जे नवं तंत्रज्ञान वापरण्यात आलं, त्यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे असंही म्हणता येऊ शकेल, की संस्कृत भारतात येऊन पोचण्यापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व १४००-१५००च्या आधी मध्य भारतात आणि दक्षिण भारतात जिथं आता महाराष्ट्र राज्य आहे, तिथं बोलली जाणारी प्राकृत भाषा अस्तित्वात होतीच. महाराष्ट्रीय प्राकृत या नावाने तिला ओळखण्यात येत होतं. त्या भाषेची रूपं जरी बदलत गेली तरीही आजच्या मराठीच्या मुळाशी महाराष्ट्रीय प्राकृत आहे.

‘लँग्वेज एरिया’ सिद्धांत

हे विधान करत असताना अतिउत्साहाने याचं गरजेपेक्षा अधिक सुलभीकरण केलं तर त्यातून गैरअर्थ निघू शकतो. माझ्या विधानाचा अर्थ इतकाच आहे, की येत्या तीन-चार दशकांत भाषांच्या अभ्यासकांनी भारतातल्या भाषांचा ऐतिहासिक संगतवार कालक्रम ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा नव्या भाषिक सिद्धांताची गरज आहे.

अठराव्या शतकाच्या शेवटी कोलकात्यात स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीमधे सर विल्यम जोन्स यांनी भारतीय भाषांविषयीचा एक सिद्धांत मांडला होता. त्या सिद्धांताच्या आधारे भाषांची कुटुंबं कल्पण्यात आली होती. अशा कुटुंबात एका भाषेतून दुसरी भाषा निर्माण होत असल्याने आणि आसपासच्या कितीतरी भाषा एका भाषा परिवारात असणं हे स्वाभाविक असल्याचं मानलं गेलं.

त्या सिद्धांताच्या आधारे मराठी ही इंडो-आर्यन भाषांपैकी एक म्हणजेच संस्कृतमधून निर्माण झालेल्या अनेक भाषांपैकी एक असं मानण्यात आलं होतं. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इमेनो या अभ्यासकाने भारतीय भाषांचा अभ्यास भाषा परिवार या संकल्पनेने पूर्णपणे करता येत नसल्याचं स्वीकारलं  आणि त्याने ‘लँग्वेज एरिया’ या सिद्धांताने भारतीय भाषांचा अभ्यास करणं अधिक योग्य ठरेल, असं मत मांडलं. या सिद्धांताच्या आधारे, भारतीय भाषांची बर्‍यापैकी निर्मिती किंवा त्यांचा जन्म हा एतद्देशीय आहे, हे मानण्याला जागा निर्माण झाली.

हेही वाचा: गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

मराठीची पाळंमुळं अनेक भाषांमधे

त्याही सिद्धांताच्या पुढे जाऊन ह्यूमन जेनेटिकच्या आधारे नवीन भाषाविषयक सिद्धांत मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दिशेने काही अभ्यासकांनी प्रयत्नही सुरू केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय भाषा – ज्यात मराठीचाही समावेश होतो त्या – भारतीय उपखंडामधे ४५ हजार वर्षांपूर्वी येऊन स्थिर झालेल्या उत्क्रांतीच्या शास्त्रात ज्याला मॉडर्न ह्यूमन किंवा होमोसेपियन म्हटलं जातं, त्या छोट्या-छोट्या तांड्यांतून वेगवेगळ्या भाषांची निर्मिती होऊन त्याच्या मिश्रणामुळे मोठ्या भाषा निर्माण होत राहिल्या, असा विचार करता येईल.

एकेकाळी एका भाषेतून अनेक भाषा निर्माण झाल्या, असा सिद्धांत होता; तसा आता अनेक भाषांच्या मिश्रणातून काही भाषा निर्माण झाल्या असं म्हणता येईल. यादृष्टीने मराठीकडे पाहिलं तर मराठीची पाळंमुळं कानडीमधे, तेलगु, गुजराती, ओरिया आणि संस्कृतमधे आहेत असं दिसून येईल. शिवाय गेल्या किमान ४००-५०० वर्षांमधे मराठीच्या आसपास असणार्‍या छोट्या-छोट्या आदिवासी समूहांच्या भाषांपासूनही महत्त्वाची शब्दसंपदा मिळवलेली आहे. त्यात गोंदी आणि भिल्लांच्या भाषेचा समावेश प्रामुख्याने होते.

इंग्रजी, पोर्तुगीज आणि फ्रेंच या भाषांपासूनही मराठीने शब्दसंपदा घेतलेली आहे. अरेबिक आणि पर्शियन या भाषांनीही मराठीला पुष्कळ समृद्ध केलेलं आहे. एकंदरीत, मराठी भाषेची जडणघडण ही फार प्राचीन काळच्या प्राकृतमधून, वर उल्लेख केलेल्या भाषांच्या देवाणघेवाणीतून होत आलेली आहे आणि म्हणून मराठी भाषेच्या जडणघडणीचे अनेक टप्पे करावे लागतात. यात केवळ प्राकृत स्वरूप, प्राकृत आणि संस्कृत यांच्या संयोगातून निर्माण झालेले स्वरूप, तशाच प्रकारच्या अन्य सहयोगी भाषांबरोबर झालेल्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेले विस्तृत स्वरूप आणि त्यानंतरच्या काळात भारताबाहेरच्या अनेक भाषांमधून शब्दसंपदा घेतल्यामुळे सधन होत गेलेली मराठी अशा रूपात मराठी भाषेच्या उत्क्रांतीची कल्पना करणं योग्य ठरेल.

मराठीची वाढ संख्यात्मक नको

एखाद्या भव्य वृक्षाच्या बुंध्याला ज्याप्रमाणे सालांचे अनेक पदर किंवा स्तर असतात, त्याप्रमाणे मराठी भाषेचं व्यक्तित्व अनेक पदरी आहे आणि या प्रत्येक पदराचा ऐतिहासिक धागा हा वेगवेगळ्या काळाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे मराठीला केवळ अभिजात दर्जा देऊन मराठीचं संपूर्ण वर्णन होणार नाही. मराठीला एतद्देशीय भाषा, प्राकृतआधारित निर्माण झालेली भाषा अशा रितीने वर्णन केलं तर मराठीचा इतिहास केवळ अभिजात असण्यापेक्षाही कितीतरी भव्य असू शकेल. कारण अभिजात भाषेचा अर्थ, ‘सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा’ असा आहे. मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे.

इतकी विशाल परंपरा लाभलेल्या मराठी भाषेची आजची स्थिती काय आहे, याचा धांडोळा घ्यायचा झाला तर संविधानाच्या आठव्या परिशिष्टात ज्यांचा समावेश झालेला आहे अशा इतर भाषांच्या तुलनेतून तो योग्य प्रकारे समजून घेता येईल. २०११ च्या जनगणनेमधे संख्येच्या प्रमाणात मराठी बोलणार्‍यांचं स्थान २००१च्या जनगणनेतल्या स्थानापेक्षा एका क्रमाने उंचावलं होतं. मराठी चौथ्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर आली होती.

याच जनगणनेमधे हिंदी भाषिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. हिंदीच्या तुलनेने मराठी धिम्या वेगाने वाढत आहे, असं दिसतं. याउलट ओरिया, आसामी, गुजराती यांच्या तुलनेनं मराठीची वाढ अधिक झपाट्याने होत असल्याचं दिसून आलं. या दोन्ही तुलना करता केवळ संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहणं योग्य ठरणार नाही. त्यापेक्षा आपली मराठी ही ज्ञानाची भाषा बनली आहे की नाही, याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.

हेही वाचा: मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ

किती व्यक्ती मराठी बोलतात यापेक्षा व्यक्ती किती मराठी बोलू शकते, या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यादृष्टीने पाहिलं तर आज मराठीत सिनेमा, नाटक, संगीत, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम घडत असले तरी मराठीत विज्ञान, गणित आणि मराठीतून अन्य देशांबरोबरचे संबंध जोडण्याची स्थिती आलेली नाही.

मराठीला अत्यंत जोमाने माहिती-तंत्रज्ञानाकडे वळावं लागेल. अनेक प्रकारची मराठी संकेतस्थळं निर्माण करावी लागतील. अनेक अ‍ॅप्स विकसित करावे लागतील. या माध्यमांवर मराठी लिहिण्याची, ऐकण्याची, बोलण्याची व्यवस्था सुधारत राहावं लागेल. मराठीतली सर्च इंजिन बनवावी लागतील. हे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि तंत्रज्ञान यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करायला हवं.

आजही मराठी संस्कृतीसाठी पूर्णपणे वाहून घेतलेलं विद्यापीठ नाही. मराठी माध्यमभाषा म्हणून काही विद्यापीठांत वापरली जाते. मराठी लोकसंस्कृतीचा अभ्यास करणारे काही विभाग विद्यापीठांमधे आहेत; पण संपूर्ण मराठीच्या विकासाच्या अंगाने एक विद्यापीठ उभारणं हे अत्यंत गरजेचं आहे.

तरच मराठी ज्ञानभाषा होईल

इंग्रजांनी ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून इंग्रजीचा प्रसार वेगवेगळ्या देशांत केला, त्याप्रमाणे मराठी कौन्सिल निर्माण करून इतर भागात असणारे मराठी भाषिक आणि इतर देशांमधे असणारे मराठी भाषिक यांना भाषिक पाठबळ मिळेल याची व्यवस्था करणं आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे हिंदी प्रसार सभा दक्षिण भारतात हिंदीचा प्रसार करते, त्याप्रमाणे मराठी प्रसार सभाही महाराष्ट्राच्या जवळच्या इतर राज्यांमधे काम करत असणे गरजेचे आहे. यादृष्टीने सरकारने विचार करणं मराठीला पोषक ठरेल.

केवळ पारितोषिकं देऊन आणि साहित्य संमेलनांना निधी देऊन मराठीचा विकास होईल, अशा भोळसट विश्वासावर आपण थांबलो तर आपली मराठी ही भाषा म्हणून जिवंत राहील; पण ज्ञानभाषा म्हणून तिचा अपेक्षित विकास होऊ शकणार नाही.

हेही वाचा: 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

‘नमस्ते वहाला’: भारतीय तरुण आणि कृष्णवर्णीय तरुणीची प्रेमकथा

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…