यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात कुणी बाजी मारलीय?

सिनेक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावर्षीच्या सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ‘ड्युन’ ठरला असला तरी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार ‘कोडा’च्या पदरात पडलाय. सर्वाधिक नामांकन मिळवूनही ‘द पॉवर ऑफ द डॉग’ला एकच पुरस्कार मिळालाय, जो बराच खास आहे.

लॉस एंजिलीसच्या डॉल्बी थियेटरमधे नुकताच ९४वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यात शान हेडरच्या ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर डुनी विल्नवच्या ‘ड्युन’ने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलीय.

मूकबधिरांचं जगणं मांडणारा ‘कोडा’

चाईल्ड ऑफ डीफ अडल्टस किंवा ‘कोडा’ म्हणजे प्रौढ मूकबधिरांचं मूल. सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचा पुरस्कार मिळवणाऱ्या या सिनेमात दिग्दर्शिका शान हेडर यांनी मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या रॉसी कुटुंबाची कथा दाखवलीय. रुबी रॉसी वगळता तिचे आईवडील फ्रँक आणि जॉकी तसंच भाऊ लियो मूकबधीर आहेत. रुबीच या कुटुंबाचा आवाज आहे. रुबीला शाळेत तिच्या घरच्यांच्या या व्यंगावरून वारंवार हिणवलं जात असतं.

रुबीच्या शाळेतले संगीतशिक्षक मिस्टर वी तिच्या आवाजावर प्रभावित होऊन तिला बर्क्ली कॉलेज ऑफ म्युझिकला प्रवेश घेण्याचा सल्ला देतात. इकडे स्थानिक प्रशासनाच्या जाचक अटींना कंटाळून रॉसी कुटुंब स्वतःची मासेमारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतं. पण त्यासाठी त्यांना रुबीची मदत हवी असते. यामुळे घरगुती व्यवसाय आणि गायन प्रशिक्षण अशा अनुक्रमे गरज आणि स्वप्नाच्या दोन्ही आघाड्या सांभाळताना रुबीची तारांबळ उडते. यात रुबी कुटुंबाला महत्त्व देते की तिच्या स्वप्नांना याचं उत्तर आपल्याला ‘कोडा’ देतो.

‘कोडा’मधे रुबीच्या घरच्यांची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही कर्णबधिरच आहेत. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत ‘कोडा’ बराच उजवा ठरलाय. यात साईन लँग्वेजचा वापर अतिशय प्रभावीपणे केला गेलाय. शारीरिक व्यंग असणाऱ्या लोकांचं नेहमीचं निरस, उदासवाणं चित्रण टाळून त्यांचं नॉर्मल जगणं दाखवल्याने बहुतांश प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलंय. सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारासाठी ‘कोडा’चं नाव घोषित झाल्यावर संपूर्ण सभागृहाने उभं राहून साईन लँग्वेजद्वारे यातल्या कलाकारांना मानवंदना दिली.

‘कोडा’ हा असा पहिलाच ऑस्करविजेता सिनेमा आहे, ज्यात मध्यवर्ती पात्रांची भूमिका खऱ्याखुऱ्या मूकबधिर कलाकारांनी केलीय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊन ऑस्कर मिळवण्याचा पहिला मानही ‘कोडा’नेच मिळवलाय. त्याचबरोबर रुबीच्या वडिलांची भूमिका साकारणारे आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे ट्रॉय कॉत्सर हे ऑस्कर मिळवणारे पहिले पुरुष मुकबधिर कलाकार ठरलेत.

साय-फाय ‘ड्युन’चा जलवा

डुनी विल्नवच्या ‘ड्युन’ने तांत्रिक विभागात दिमाखदार कामगिरी करत तब्बल सहा ऑस्कर पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. या सिनेमात राजकीय सत्तासंघर्ष मांडला गेलाय. ऐतिहासिक कालखंडात घडणाऱ्या राजकीयपटाला साय-फाय जॉनरची फोडणी दिल्याने हा सिनेमा अधिक मनोरंजक ठरलाय. आपल्या भव्यदिव्य मांडणीमुळे हा सिनेमा सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलाय.

सर्वोत्कृष्ट संगीत, एडिटिंग, प्रोडक्शन डिझाईन, सिनेमेटोग्राफी, साऊंड आणि वीएफएक्स अशा सहा पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या ‘ड्युन’ला यावर्षी एकूण १० ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकित केलं गेलं होतं. प्रथितयश संगीतकार हांस झिमर यांनी ‘ड्युन’ला पार्श्वसंगीत दिलं असून, १९९४च्या ‘द लायन किंग’नंतर त्यांचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे.

हेही वाचा: 

जेन कॅम्पियन ठरल्या चॅम्पियन

जेन कॅम्पियन दिग्दर्शित ‘द पॉवर ऑफ द डॉग’ हा यावर्षीचा सर्वाधिक ऑस्कर नामांकन मिळवणारा सिनेमा ठरला. तब्बल बारा नामांकने मिळालेला हा सिनेमा फक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्याच पुरस्काराचाच मानकरी ठरला. सायकोलॉजिकल ड्रामा असलेला हा सिनेमा राग, दुःख, प्रेम, इर्ष्येसारख्या मानवी भावभावनांवर आणि लैंगिकतेच्या वेगळेपणावर भाष्य करतो. बहुतांश सिनेसमीक्षकांच्या मते, २०२१च्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत ‘द पॉवर ऑफ द डॉग’चं स्थान बरंच वर आहे.

हा सिनेमा दिग्दर्शिका जेन कॅम्पियन यांच्या शिरपेचातला एक मानाचा तुरा आहे. सर्वोत्कृष्ट पटकथेचा ऑस्कर मिळवणाऱ्या १९९३च्या ‘द पियानो’नंतर कॅम्पियन यांचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार ठरलाय. ‘द पॉवर ऑफ द डॉग’मुळे एकापेक्षा जास्त ऑस्कर नामांकन मिळवणारी पहिली दिग्दर्शिका बनण्याचा मान कॅम्पियन यांना मिळालाय. एकाच सिनेमासाठी सर्वाधिक ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्याच दिग्दर्शिका आहेत.

वेगवेगळ्या सिनेमांनी मारली बाजी

मिशेल शोवाल्टर दिग्दर्शित ‘द आईज ऑफ टॅमी फे’ला सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषेचा ऑस्कर मिळालाय. त्याचबरोबर, यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या जेसिका चास्टेनला सर्वोत्कृष्ट नायिकेचा म्हणून गौरवण्यात आलंय. ऑस्कर सोहळ्यात आपल्या पत्नीवर विनोद करणाऱ्या ख्रिस रॉकला मारल्यामुळे चर्चेत आलेल्या विल स्मिथला ‘किंग रिचर्ड’साठी सर्वोत्कृष्ट नायकाचा ऑस्कर मिळालाय.

‘रायटिंग विथ फायर’ ही ऑस्कर नामांकन मिळवलेली पहिली भारतीय डॉक्युमेंटरी ऑस्कर मिळवण्यात अपयशी ठरली. तिच्याऐवजी ‘समर ऑफ सोल’ला सर्वोत्कृष्ट ऑस्कर डॉक्युमेंटरीचा ऑस्कर मिळालाय. रुसुके हामागुची यांच्या ‘ड्राईव माय कार’या जपानी सिनेमाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या ऑस्करवर आपलं नाव कोरलंय.

आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत १५०हून अधिक सिनेमांमधे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सॅम्युएल जॅक्सन यांना ऑनररी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आपल्या विनोदी सिनेमे आणि नाटकांनी कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका, दिग्दर्शिका इलेन मे यांनाही ऑनररी ऑस्कर पुरस्कार देण्यात आलाय.

हेही वाचा: 

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…