‘आरआरआर’ला ‘बाहुबली’च्या वरचढ नेणारा ‘राजामौली’ फॅक्टर

गेल्यावर्षी आलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा पूर ओसरत नाही तोच ‘आरआरआर’ या आणखी एका तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवलंय. ‘बाहुबली’ सिरीजनंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेत आणि याही सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.

२०१५मधे ‘बाहुबली: द बिगिनिंग’ नावाचं वादळ देशभरातल्या थियेटरमधे घोंघावत होतं. त्यानंतर पुढचे काही महिने प्रभास, रम्या कृष्णन, राणा दगुबाती, सत्यराज, तमन्ना ही त्यातल्या कलाकारांची नावं तर याच्या त्याच्या तोंडी होतीच, त्याचबरोबर या सगळ्यांना एकत्र आणणारं नाव मात्र आदराने घेतलं जात होतं. ते नाव म्हणजे कोदुरी श्रीशैल श्री राजामौली म्हणजेच दिग्दर्शक एस. एस. राजामौली!

राजामौलींनी त्यांच्या दोन दशकांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत एकूण बारा सिनेमे बनवलेत. या बाराही सिनेमांनी छप्परतोड कमाई करत राजामौलींना भारतीय बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर नेऊन बसवलंय, असं म्हणायला हरकत नाही. जागतिक स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावणाऱ्या ‘बाहुबली’नंतर राजामौली ‘आरआरआर’ घेऊन आलेत.

पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर ७१० कोटींचा गल्ला जमा केलाय. यात भारताचा वाटा ५६० कोटींचा असून, त्यातली २८० कोटींची कमाई तर निव्वळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधेच झालीय. ज्युनियर नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच ज्यु. एनटीआर, राम चरण तेजा आणि राजामौली या त्रिकुटाचा हा करिष्मा बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड बनवत चाललाय.

सिनेमा हिट होण्याची कारणे

राजामौलींचे सिनेमे ‘बाहुबली’ येण्याआधीपासूनच प्रसिद्ध होते, पण ते त्यातल्या कलाकारांमुळे. प्रभासचा ‘छत्रपती-हुकुमत की जंग’, राम चरण तेजाचा ‘मगधीरा’, ज्यु. एनटीआरचा ‘सिम्हाद्री- यमराज एक फौलाद’, रवी तेजाचा ‘विक्रमार्कुडू-आयपीएस विक्रम राठोड’ ही त्यातली काही खास नावं. तसं म्हणायला २०१२ला आलेल्या नानीच्या ‘इगा-मख्खी’ने त्यांचं नाव चर्चेत आलं होतं खरं, पण ते फार काळ चर्चेत टिकलं नाही. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ने त्यांना खरी ब्रँड वॅल्यू मिळवून दिली. 

२०१७च्या ‘बाहुबली २’नंतर राजामौलींचा पुढचा सिनेमा कुठला असणार, याचा अंदाज लावत असतानाच राजामौलींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘मेगा पॉवर स्टार’ राम चरण तेजा आणि ‘यंग टायगर’ ज्यु. एनटीआरसोबत एक फोटो टाकला आणि चर्चांना उधाण आलं. मार्च २०१८मधे हे दोघेही कलाकार राजामौलींच्या नव्या सिनेमात एकत्र काम करणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर झालं आणि उत्सुकता आणि अपेक्षेचा मीटर साहजिकच उंचावला.

स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर बेतलेल्या या सिनेमाचं नाव काय असणार हा एक मोठा प्रश्न होता. चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी तात्पुरतं नाव ‘आरआरआर’ असं ठेवलं गेलं. ज्यु. एनटीआर, राम चरण तेजा आणि राजामौलींच्या आद्याक्षरांपासून हे नाव घेतलं गेलं होतं. पण ‘आरआरआर’चा हॅशटॅग इंटरनेटवर अनपेक्षितपणे वायरल झाल्यानंतर याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सिनेमाच्या प्रमोशनमधे दोन मोठ्या स्टारच्या स्टारडमसोबतच या नावानेही मोठा वाटा उचलला.

सिनेमाची गाणीही तितकीच महत्त्वाची आहेत. तेलुगू स्टार त्यांच्या नृत्यकौशल्यासाठी बरेच फेमस आहेत. कुणाचा डान्स जास्त चांगला हा इथल्या फॅनवॉरचा कळीचा मुद्दा आहे. या सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या अवघड डान्स स्टेप्स असलेल्या गाण्यात तर चक्क ज्यु. एनटीआर आणि राम चरण तेजा एकत्र थिरकताना दिसलेत. आलिया भटच्या वाढदिवसाला रिलीज झालेल्या ‘शोले’ गाण्यातूनही स्वातंत्र्ययोद्ध्यांना मानवंदना देताना प्रादेशिक अस्मितेला हात घालणारं मार्केटिंग बघायला मिळालं.

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

मल्टीस्टारर सिनेमाची क्रेझ

सध्याची तेलुगूभाषिक तरुणाई अशाच एका कॉम्बोच्या प्रतीक्षेत होती. तेलुगू सिनेसृष्टीत ढीगभर सुपरस्टार आहेत, पण त्यांचं एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याचं प्रमाण फारच कमीय. या स्टारडमच्या गर्दीचं पिढीनुसार वर्गीकरण करायचं झालं तर पहिल्या पिढीत ज्यु. एनटीआरचे आजोबा ‘नटरत्न’ एनटीआर आणि नागार्जुनचे वडील ‘नटसम्राट’ एएनआर म्हणजेच अक्किनेनी नागेश्वर राव ही जोडी बरीच लोकप्रिय होती.

पुढच्या पिढीने मात्र अशा कॉम्बोमधे फारसा रस दाखवला नाही. सगळेच स्टार सोलो हिट देत चालले होते. त्यानंतर बऱ्याच उशिराने म्हणजे २०१३मधे आलेल्या ‘सितम्मा वाकित्लो सिरीमल्ले चेट्टू-सबसे बढकर हम २’मधे ‘विक्टरी’ व्यंकटेश आणि ‘प्रिन्स’ महेश बाबू एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले. तेलुगू स्टारडमच्या दुसऱ्या पिढीचा हा पहिला मल्टीस्टारर सिनेमा ठरला. आता चाहत्यांची तिसऱ्या पिढीतल्या कलाकारांनीही एकत्र यावं अशी इच्छा आणखीनच प्रबळ झाली.

त्यानंतर २०१४मधे ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुन आणि राम चरण तेजा यांचा ‘येवाडू’ आला. पण दोघेही आमनेसामने आले नव्हते. त्यानंतर २०१५मधे ‘नॅचरल स्टार’ नानी आणि ‘राऊडी स्टार’ विजय देवरकोंडा यांचा ‘येव्वडे सुब्रमण्यम-ये है जिंदगी’ आला, पण तेव्हा विजय स्टारडमपासून बराच लांब होता. २०२२मधे आलेल्या ‘बंगारराजू’मधे ‘युवा सम्राट’ नागार्जुन आणि ‘ज्यु. युवा सम्राट’ नागा चैतन्य ही अक्किनेनी घराण्याची दुसरी आणि तिसरी पिढी झळकलीय.

‘नटरत्न’ एनटीआर यांच्या शेवटच्या ‘मनम-दयाळू’ या २०१४ला आलेल्या सिनेमात तर अक्किनेनी घराण्याच्या तिन्ही पिढ्या दिसल्या होत्या. पहिल्या पिढीतले एनटीआर, दुसऱ्या पिढीतला नागार्जुन आणि नागा चैतन्य-‘मिसाईल स्टार’ अखिल ही तिसरी पिढी या सिनेमात दिसली होती. पण आता रामचरण तेजा आणि ज्यु. एनटीआरच्या अभिनयाने नटलेला ‘आरआरआर’ हा खऱ्या अर्थाने तिसऱ्या पिढीचा पहिला मल्टीस्टारर सिनेमा ठरतोय.

राजामौली फॅक्टर

‘आरआरआर’च्या यशात जितका वाटा ज्यु. एनटीआर आणि राम चरण तेजाच्या स्टारडमचा आहे, चलाख मार्केटिंग आणि प्रमोशनचा आहे, त्याहून कितीतरी पटीने मोठा वाटा एकट्या राजामौलींचा आहे. राजामौलींच्या सिनेमाची सूत्रं आधीपासूनच ठरलीयत आणि प्रत्येक सिनेमात ती इतकी फिट बसवली जातात की सिनेमा हमखास यशस्वी ठरतो. या सुत्रांनाच एकत्रितपणे ‘राजामौली फॅक्टर’ असं म्हणता येईल.

पौराणिक कथांचे संदर्भ, नायकाची ओळख करून देणारे प्रसंग, नायक आणि सहनायकातले अंतर्गत वाद, उत्कंठेच्या शिखरावर नेऊन ठेवणारे इंटर्वल, नायक-खलनायकाच्या बलस्थानांची ओळख करून देणारे इंटर्वल, कथेच्या शेवटपर्यंत वचनांमधे बांधले जाणारे नायक, नायक वापरत असलेलं वैशिष्ट्यपूर्ण हत्यार, भव्यदिव्यतेची जाणीव करून देणारे कॅमेरा अँगल्स, कथेला कलाटणी मिळवून देणारे भावनिक फ्लॅशबॅक अशी अनेक सूत्रं राजामौलींच्या सिनेमामधे चपखलपणे बसवलेली दिसतात. 

‘आरआरआर’मधेही रामायण-महाभारताचा संदर्भ वापरला गेलाय. राम चरण तेजाचं शेवटी स्वातंत्र्ययोद्धे अल्लुरी सीताराम राजू यांच्या रुपात दिसणं प्रभू श्रीरामांची आठवण करून देतं. स्वातंत्र्ययोद्धे कुमारम भीम यांची भूमिका साकारणारा ज्यु. एनटीआर बुलेट उचलून फिरवताना महाभारतातला गदाधारी भीम वाटतो. राम चरण तेजा आणि सीतेच्या भूमिकेतल्या आलियाची भेट घालून देताना ज्यु. एनटीआर हनुमानाचं प्रतिकात्मक रूप दर्शवतो.

या सिनेमात राम चरण तेजा अग्नितत्त्वाचं तर ज्यु. एनटीआर जलतत्त्वाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. या दोन्ही भिन्न व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणण्याचं अशक्यप्राय काम ‘आरआरआर’ने केलंय. दोघेही वेगवेगळ्या वचनांनी बांधले गेले असले तरी त्यांचा हेतू शेवटी एकच असल्याचा दिसून येतो. राम चरण तेजाचं एकट्याने गर्दीला सामोरं जाणं असो किंवा यंग टायगरची खऱ्याखुऱ्या टायगरसोबत होणारी चकमक, दोघा हिरोंच्या एंट्रीचे हे प्रसंग पुरेपूर टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करतात.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

बॉक्स ऑफिसवर वर्चस्व

आपल्या प्रत्येक सिनेमाच्या मदतीने बॉक्स ऑफिसच्या यादीतले वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडण्याचा ध्यासच राजामौलींनी घेतला असावा. २५ मार्च २०२२ला रिलीज झालेला ‘आरआरआर’ही त्यांच्या याच ध्यासपूर्तीचा एक भाग आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या दिवसापासूनच ‘आरआरआर’ने बॉक्स ऑफिसवर पक्की बैठक जमवलीय.

पहिल्याच दिवशी ग्लोबल बॉक्स ऑफिसवर तब्बल २२३ कोटींचा गल्ला जमवून ‘आरआरआर’ने ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवलाय. याआधी हे स्थान राजामौलींच्याच ‘बाहुबली २’कडे होतं. ओपनिंग विकेंडला तर ‘आरआरआर’ने ‘द बॅटमॅन’ आणि ‘द लॉस्ट सिटी’सारख्या बिग बजेट सिनेमाला मागे टाकत आंतरराष्ट्रीय थियेटरमधेही आपलंच वर्चस्व निर्माण केलं.

‘आरआरआर’च्या हिंदी वर्जननेही चांगली कमाई केलीय. लॉकडाऊननंतर यशस्वी ठरलेल्या हिंदी सिनेमांच्या यादीत तो आत्ता दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता हा सिनेमा दमदार पावलं टाकत १००० कोटींकडे वाटचाल करतोय. भारतात हा आकडा फक्त ‘दंगल’ आणि ‘बाहुबली २’लाच गाठता आलाय. जर ‘आरआरआर’ने हा आकडा गाठला, तर चीनमधे रिलीज न होऊनही १००० कोटींचा व्यवसाय करणारा हा पहिला सिनेमा ठरू शकतो.

नॉन-बाहुबलीचा शिक्का

‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर इतर सिनेमांचं व्यावसायिक यश नोंदवण्यासाठी ‘नॉन-बाहुबली’ ही नवी संकल्पना तेलुगू सिनेसृष्टीत रूढ झाली. आता कोणत्याही नव्या तेलुगू सिनेमाने बॉक्स ऑफिस वरचा एखादा रेकॉर्ड मोडला तर माध्यमांतून ‘अमुक रेकॉर्ड मोडणारा नॉन-बाहुबली सिनेमा’ असा उल्लेख त्या सिनेमाचा केला जातो.

स्वतः राजामौलींनाही हा नॉन-बाहुबलीचा शिक्का आवडला नव्हता. खरं तर, हा उल्लेख त्या रेकॉर्डब्रेकिंग सिनेमाची मूळ ओळखच संपवतोय पण गेल्या सात वर्षांत बऱ्याच मोठ्या सिनेमांना याच तुलनेला सामोरं जावं लागलंय. गेल्या वर्षी आलेला बहुचर्चित ‘पुष्पा’ही या तुलनेतून सुटला नव्हता.

‘आरआरआर’ मात्र आता हा उल्लेख मोडीत काढतोय. ‘आरआरआर’ने केलेली कमाई बघता, नॉन-बाहुबलीचे शिक्के मारणारे हात आता थंडावलेत. त्याऐवजी आणखी एक सुपरहिट तेलुगू सिनेमा म्हणून या सिनेमाची नोंद घेतली जातेय. अगदी हेच चित्र राजामौली आणि इतर निर्माते, दिग्दर्शकांना अपेक्षित आहे.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…