बुद्ध तत्वज्ञान, वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी विचार

२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.

मी हाका मारतोय तुला
हे अदृश्य
उकळते माझे अंत:करण
आणि होत आहेत आतमधे स्फोट
अरे स्वातंत्र्या, जवळ तरी ये
हे महारवाडे बघ, हे दैन्य बघ, हे दास्य बघ, हे दु:ख बघ,
पण स्वातंत्र्य अदृश्यच!
अरे ती माझी बंदूक तरी द्या
नाहीतर तुक्याची वीणा तरी द्या
गावोगावी जाईन म्हणतो
या वीणेवर क्रांतीची कीर्तने गाईन म्हणतो!

ही कविता आहे बाबुराव बागुल यांची. आंबेडकरवाद मार्क्सवादाशी जोडून नव्या तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा हा मोठा कवी. त्याला आपण नोबेल द्यायला हवं होतं. पण साहित्य अकादमीही देऊ शकलो नाही. आंबेडकरवाद म्हणजे काय, बौद्ध तत्वज्ञान नेमकं काय आहे, ते त्यांना पुरेपूर माहितीय; तरीही त्यांना क्रांतीची कीर्तनं गाण्यासाठी तुकोबाची वीणा हवीय.

बौद्ध तत्त्वज्ञान आणि वारकरी विचारधारा यांचा ऋणानुबंध समजून घ्यायचा असेल तर बाबुराव बागुल तुक्याची वीणा का मागतायत, हे समजून घ्यावं लागेल. आपला आजचा विषय ‘वारकरी तत्त्वज्ञानावरील बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव’ असा असला तरी मी इथं या दोन विचारधारांमधला अनुबंध मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथातल्या अनेक संदर्भांचा उपयोग केलाय.

हेही वाचा: मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

बुद्धाची वाट दाखवणारे तुकोबा

माझ्या पिढीचा कुणीही बुद्धाच्या वाटेने जातो, तेव्हा त्याला ही वाट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेली असते. गोयंका गुरुजींच्या विपश्यनेच्या रस्त्याने बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जाणारी वाट आहे, पण तो आपला प्रांत नाही. विचारधारेशी संबंधित मांडणी करताना प्रामुख्याने बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून हळूहळू बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जाणारी दिशा दिसते.

बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी बुद्धाची दिशा दाखवणारे महाराष्ट्रातले प्रमुख विचारवंत म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी भागवत धर्म आणि बुद्ध धम्मातल्या समन्वयाची दिशा दाखवून दिली. महर्षी शिंदे ‘प्रार्थना समाज’ आणि ‘ब्राह्मो समाज’ यांचा बुद्ध तत्वज्ञानाशी दुवा बांधून देतात.

धर्मानंद कोसंबी यांनी आधुनिक भारताला खऱ्या अर्थाने बुद्ध तत्वज्ञानाची, बुद्धांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांनीही म्हटलं की मी तुकारामांच्या सेतूवरून बुद्धाकडे गेलोय. इथं आपण आंबेडकरवादाच्या सेतूवरून बौद्ध तत्वज्ञानाकडे जातोय. म्हणून आपल्याला तुकोबाराय म्हणजे वारकरी विचारधारा आणि आंबेडकरवाद यातली साम्यस्थळं शोधावी लागतात. 

संतसाहित्याचे अभ्यासक बाबासाहेब

‘मूकनायक’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राचं ब्रीद म्हणजे टॅगलाईन ही तुकोबांचा एक अभंग होता. त्यात ‘मूकनायक’ची भूमिका बाबासाहेब मांडतात,

काय करुं आतां धरूनिया भीड।
नि:शंक हे तोंड वाजविलें॥
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण।
सार्थक लाजून नव्हे हित॥

संत तुकाराम ‘मूकनायक’चं ब्रीदवाक्य म्हणून मास्टहेडवर विराजमान असतात. तसंच `बहिष्कृत भारतचं ब्रीदवाक्य म्हणून संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरीमधील ओव्या येतात.

आता कोदंड घेऊनि हातीं। आरूढ पा इये रथीं।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।।
जगी कीर्ति रूढवीं। स्वधर्माचा मानु वाढवी।
इया भारा पासोनि सोडवी। मेदिने हे।।
आतां पार्था नि:शंकु होई। या संग्रामा चित्त देई।
एथ हे वांचूनि कांही। बोलो नये।।

बाबुराव बागुल संत तुकारामांची वीणा मागतात त्याचप्रमाणे नामदेव ढसाळ नि:शंकपणे सांगतात की मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी संत तुकाराम आहेत. याचंही मूळ बाबासाहेबांच्या विचारात दिसतं. बाबासाहेब म्हणतात, तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी वगळता मराठीतलं सगळं साहित्य समुद्रामधे बुडवलं तरी चालेल.

बाबासाहेब म्हणतात की माझ्याइतका मराठी संतकवींचा अभ्यास केलेली फार थोडी माणसं आहेत. म्हणजे त्यांनी मराठी संतांचा अभ्यास केलाय, तेवढा त्यांच्या काळातल्या फार कमी जणांनी केला होता. बाबासाहेबांच्या प्रत्येक वाक्याला मोल आहे. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या मागे एक साधना आहे आणि म्हणून जेव्हा बाबासाहेब स्वतःच्या संतकवींच्या अभ्यासाविषयी विधान करतात, तेव्हा त्याचं मोल मोठं असतं.

हेही वाचा: बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

चोख्याचा भीमा

बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा एका कबीरपंथी कुटुंबामधे झाला. त्यांनी लहानपणापासून कबीराचे दोहे घरामधे ऐकलेत. वारकरी परंपरा आणि कबीराच्या तत्वज्ञानाची मूस एकच आहे. महाराष्ट्रातले असूनही वारकरी परंपरेतल्या कीर्तनात किंवा मांडणीत रामदास स्वामींचे श्लोक उद्धृत केले जात नाहीत. मात्र महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या वाराणसीतले कबीर वारकरी परंपरेचे भाग होतात. कबीरांचा उल्लेख वारकरी संतांनी वारंवार केलाय.

तुकाराम महाराजांनी आपले चार पूर्वसुरी सांगितलेत. पहिले संत नामदेव, दुसरे संत ज्ञानेश्वर, तिसरे संत कबीर आणि चौथे संत एकनाथ आहेत. या पंक्तीत तुकाराम महाराजांचा उल्लेख करून वारकऱ्यांचं संतपंचक तयार होतं. वारकरी परंपरा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. त्यामधे नामयाचा तुका, ज्ञानाचा एका म्हणजेच एकनाथ आणि कबीराचा शेखा म्हणजेच शेख महंमद ही महत्वपूर्ण परंपरा मानली जाते.

पुण्यात झालेल्या युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बोलताना मी म्हटलं होतं की या मांडणीत ‘चोख्याचा भीमा’ अशी जोड दिली जात नाही, तोपर्यंत ही परंपरा पूर्ण होणार नाही. चोख्याचा भीमा वारकरी संप्रदायाचा भाग नसला, तरी तो वारकरी परंपरेचा भाग आहे, असं मला वाटतं.

वारकरी परंपरेतले कबीर

कबीरांची परंपरा ही वारकरीच आहे किंवा तेच थोड्या अधिक पटण्यासारख्या शब्दांत मांडायचं तर, वारकरी संप्रदाय संत कबीरांना आपलं मानतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कबीर आणि त्यांचा मुलगा कमालांची समाधी कबीरमठ हा पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरावर आहे. या दोघांनी पंढरपूरात येऊन समाधी घेतली, अशी महाराष्ट्रातल्या कबीरपंथीयांची श्रद्धा आहे. तसंच कबीर महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनासाठी नाही, तर संत जनाबाईंच्या भेटीसाठी आले होते अशी आख्यायिका आहे.

आपल्या शिष्यपुत्राला कमालाला भक्ती काय असते, एखाद्या चळवळीचं नेतृत्व कसं करायचं असतं, हे दाखवण्यासाठी कबीर महाराष्ट्रात आल्याची शक्यता आहे. कबीर जनाबाईंना भेटले हे आता आपल्यासमोर असलेल्या माहितीनुसार कालसुसंगत नाही. पण कबीर जिवंत असताना संत जनाबाईंचा प्रभाव टिकलेला होताच. तो प्रभाव पाहण्यासाठी कबीर नक्कीच आलेले असतील, असा तर्क करू शकतो.

महाराष्ट्राला अनेक पालखी सोहळ्यांची परंपरा आहे. आषाढीला वेगवेगळ्या संतांसारखीच कबीरांची पालखी वाराणसीहून येत असल्याचं वारीचं पहिलं डॉक्युमेंटेशन करणारे न्या. महादेव गोविंद रानडे यांनी आपल्या धर्मपर व्याख्यांनांमधे नोंदवून ठेवलंय. संत नामदेव आणि विठ्ठल यांचा उल्लेख असलेली कबीरांची पदंही आहेत.

तात्पर्य हे की बाबासाहेबांना जे आपले पूर्वसुरी वाटतात, ते कबीर थेट वारकरी संप्रदायाशी संबधित आहेत. दुसरे महात्मा फुले. त्यांच्या अखंडांवर तुकोबांचा स्पष्ट प्रभाव आहे. शिवाय त्यांच्यासोबत असलेले सगळेच्या सगळे बिनीचे सत्यशोधक हे परंपरागत वारकरी कुटुंबातून आलेले आहेत.

हेही वाचा: संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

वारकरी संप्रदायाचा प्रभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं ‘अनटचेबल्स’ हे पुस्तक इतर दोन संतांच्या बरोबर संत चोखामेळा यांना अर्पण केलं होतं. बाबासाहेबांच्याबरोबर आंदोलनात उतरलेल्या महत्वाच्या लोकांमधे गोपाळबाबा वलंगकर, मडकेबुवा, शिवबा दरेकर आहेत. ही मंडळी वारकरी संप्रदायाशी संबंधित होती.

शिवबा दरेकर हे आजऱ्यामधले एक प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार होते. त्यांचा उल्लेख आपल्याला ‘बहिष्कृत भारत’ मधे सापडतो. हा सर्व प्रभाव आपण समजून घेणं आवश्यक आहे. पूर्वाश्रमीचा महार समाज स्वतःला चोखामेळा समाज म्हणून म्हणवून घेत होता. इतका त्याच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता.

म्हणून महाडचा सत्याग्रह झाला तेव्हा लोक दिंड्या घेऊन आणि विठ्ठलनामाचा गजर करत त्या सत्याग्रहात सहभागी झाले होते, अशा प्रकारच्या नोंदी गेल ऑम्वेट आणि धनंजय कीर यांनी केलेल्या आहेत. महाडच्या सत्याग्रहात रायगड जिल्ह्यातल्या वीर मुक्कामी कीर्तनकार गणपतबुवा जाधव यांचं कीर्तन झालं होतं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण झालं, असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात.

बाबासाहेबांचा रास्त सवाल

डॉ. आंबेडकर यांना स्पष्टपणे मान्य आहे की वारकरी परंपरा ही चातुर्वर्ण्याच्या विरोधातलं बंड आहे. बुद्धापासून वारकरी संप्रदायापर्यंत अहिंसा मांडणाऱ्यांची बुद्ध, वारकरी आणि गांधी अशा परंपरेची एक मांडणी बाबासाहेबांच्या काळात होत होती. ही परंपरा टाळकुटी आणि नेभळट असल्याची हेटाळणी तेव्हाच्या महाराष्ट्राच्या वैचारिक वर्गात होत होती.

हेटाळणी करणारे आपली परंपरा वैदिक, रामदासी आणि टिळक असल्याचं मांडत होते. अशा वेळेस बाबासाहेब आपल्या वर्तमानपत्रांमधे बुद्ध ते वारकरी ही बाजू घेऊन लिहीत होते. धर्मांतराच्या घोषणेनंतर बाबासाहेब मात्र वारकरी संप्रदायावर टीका करताना आपल्याला दिसतात, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ती प्रामुख्याने तत्कालीन संप्रदायाच्या परिस्थितीवर आहे.

बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की ‘भक्त बनल्यावर तुम्हाला माणूस म्हणून किंमत होते; पण माणूस म्हणून माणसाची काही स्वयंसिद्ध किंमत आहे की नाही?’ माणसाचं ते महत्व अधोरेखित करण्यासाठी संतांनी विद्रोह का केला नाही, हा बाबासाहेब आंबेडकरांचा रास्त सवाल आहे.

बाबासाहेबांचं धर्मांतर ही सामाजिक आणि धार्मिक क्रांती होती. तसंच ते एक राजकीय स्टेटमेंटही होतं. बाबासाहेब हे राजकीय नेते होते. आपला समाज त्यांना पूर्णपणे चळवळीत ओढून घ्यायचा होता, या पार्श्वभूमीवरही ती टीका बघता येईल.

हेही वाचा: संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

वारकरी परंपरेशी ऋणानुबंध

बाबासाहेबांचे नागपूरातले सहकारी किसन फागुजी बनसोडे हे धर्मांतर न करता हिंदू धर्मात राहून चोखांबांसारखं बंड करावं, या मतावर ठाम राहिले. यासाठी त्यांनी ‘चोखोबा’ नावाचं वर्तमानपत्र, आश्रम काढला. त्याच काळात महार समाजातल्या लोकांना देहूरोडला चोखोबांचं मंदिर उभारायचं होतं. आयोजकांनी त्यासाठी बाबासाहेबांना उद्घाटनाला बोलावलं.

बाबासाहेबांनी त्याला नकार दिला आणि बुद्धविहार बांधण्याच्या अटीवर येईन असं सांगितलं. तेव्हा आधुनिक काळातलं भारतातलं पहिलं बुद्धविहार देहूरोडला उभं राहिलं. हा बाबासाहेब आणि वारकरी परंपरेमधील ऋणानुबंध आहे. बाबासाहेबांचा चोखोबांना विरोध होता का? तर होता. बाबासाहेबांचा चोखोबांशी ऋणानुबंध होता का? तर होता. हे बारकावे आपण समजून घ्यायला हवेत.

बाबासाहेब आंबेडकर यांनी वारकरी परंपरेवर केलेली टीका आपण पकडून बसतोय. त्याचबरोबर बाबासाहेब आणि तुकोबा – चोखोबा हा ऋणानुबंध आपण समजून घेणं गरजेचं आहे. धर्मांतराच्या आदल्या दिवशी बाबासाहेब अभंग गुणगुणत असल्याची एक नोंद आहे. याचा अर्थ बुद्ध तत्वज्ञान आणि वारकरी तत्वज्ञान यातला अंतस्थ: प्रवाह बाबासाहेबांना मान्य आहे, असं मला वाटतं.

बुद्ध आणि विठ्ठल

या संदर्भात दुसरी गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे बाबासाहेबांनी पंढरपूरचा विठ्ठल ही बुद्धमूर्ती आहे, पंढरपूर हे बौद्ध तीर्थक्षेत्र आहे, हे सिद्ध करणारं पुस्तक लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला होता. दुर्दैवाने बाबासाहेबांना हे पुस्तक लिहिता आलं नाही. बाबासाहेबांनी ही मांडणी केली असती तर आज एक वेगळं वैचारिक चित्र दिसलं असतं. आता आषाढीला वारकरी गोळा होतात, तसंच महाराष्ट्रभरातले बौद्धही तिथं आले असते. त्यांचेही मठ असते.

सुरवातीला थोडा संघर्ष झाला असता, पण नंतर सगळे एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र येत राहिले असते, असं उगाच मला वाटतं. विठ्ठल हा बुद्ध आहे ही बाबासाहेबांच्या आधी संतांनी मांडणी केलीय. जवळजवळ सगळे संत विठ्ठलाला बुद्ध म्हणतात. बुद्ध अवतार म्हणजेच विठ्ठल आहे अशी मांडणी संत करतात. एका भारुडवजा गोंधळामधे संत एकनाथ म्हणतात की,

बौद्ध अवतार घेऊन
विटेसम चरण ठेऊन
पुंडलिक दिवटा पाहून
त्याचे द्वारी गोंधळ मांडिला
दार उघड बया दार उघड
बौद्धाई बया दार उघड

जनाबाई म्हणतात, ‘आता बुद्ध झाला माझा सखा.’ संत बहिणाबाई म्हणतात, ‘कलियुगी बौद्धरुप धरी हरी, तुकोबा शरीरी प्रवेशला.’ तुकोबांच्या समकालीन शिष्या असणाऱ्या बहिणाबाईंनी बौद्ध तत्त्वचिंतक अश्वघोषाचा ‘वज्रसुची’ हा ग्रंथ अभंगरुपात अनुवादित केलाय. नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्यावर असलेल्या बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभावाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. झालेले अभ्यास ते प्रकाशात येणं गरजेचं आहे.

हेही वाचा: सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

बुद्ध आणि वारकरी तत्त्वज्ञान

विचारधारा आणि चळवळ ही उर्जेसारखी असते, ती संपत नसते. एका चळवळीतून दुसऱ्या चळवळीत रुपांतरीत होत असते. हे वारकरी तत्त्वज्ञानाच्या संदर्भात आपण समजून घ्यायला हवं. वारकरी संप्रदायाचा जातिभेद विरोध, समता, बंधुतेला प्राधान्य, बोलीभाषेचा पुरस्कार, नीतीमत्ता असणाऱ्या आचरणाला धर्म मानणं, स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन, अंधश्रद्धेला विरोध ही वैशिष्ट्यं होती. हे सगळं काही आकाशातून येत नाही. या वैशिष्ट्यांचं मूळ बुद्ध तत्त्वज्ञानात आहे.

वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ संप्रदायात आहे. नाथ संप्रदाय सिद्ध परंपरेतून आला आणि सिद्धांचं मूळ बुद्ध तत्त्वज्ञानात आहे. कॉ. शरद पाटील यांच्यासह अनेकांनी ही मांडणी केलीय. बुद्ध तत्त्वज्ञान वेद नाकारतं. तसं वारकरी तत्त्वज्ञान थेट नाकारत नाही. सर्वसमावेशकता हे वारकऱ्यांचं वेगळेपण आहे. उलट ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसिच ठावा’ असं म्हणत वारकरी वेदांचा नवा अर्थ मांडतात. बुद्ध तत्त्वज्ञानातलं महत्वाचं सार वारकरी तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून मांडतं.

बुद्ध तत्त्वज्ञान मांडण्याचं गीता हे सर्वमान्य साधन आहे, असा तर्क वारकरी परंपरेने काढला असावा, असं मला वाटतं. बुद्धांचा विचार मानणाऱ्या लोकांनी पूर्वग्रह न ठेवता गीता वाचणं आवश्यक आहे. त्यात बुद्ध तत्त्वज्ञानाशी सांधा जोडणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा शक्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी व्यासांची गीता सांगितली नाही तर कृष्णाची गीता सांगितली, असं वारकरी मानतात. त्याचा अर्थ त्यांनी गीतेचा अधिक व्यापक अर्थ सांगितला.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब

ज्या काळात बाबासाहेब आंबेडकर बौद्ध तत्त्वज्ञान नव्या रुपात मांडत होते, त्याच काळात संत गाडगेबाबा वारकरी तत्त्वज्ञान मांडत होते. आपण गाडगेबाबांना एनजीओसारखे समाजसुधारक मानून चालतो. पण संतांना अभिप्रेत असणारं वारकरी तत्त्वज्ञान मांडणारा महान तत्वचिंतक म्हणजे गाडगेबाबा.

गाडगेबाबांचं लिखित साहित्य उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा विचार फारसा पुढे येत नाही. त्यांनी वांद्र्याच्या पोलीस स्टेशनसमोर केलेले शेवटचं कीर्तन फक्त रेकॉर्डेड आहे. ते युट्यूबवर ऐकताही येतं. गाडगेबाबा त्या कीर्तनात सांगतात की देव कुठे आहे हे बघायचं असेल तर आमचा गांधीबाबा बघा, बाबासाहेब आंबेडकर बघा. ते ऐकल्यावर बुद्ध तत्वज्ञान आणि वारकरी तत्वज्ञान यातला ऋणानुबंध वेगळा सांगायची गरज उरत नाही.

हेही वाचा: 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…