चला, आपली मुळे घट्ट करुया!

हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं.

झाडाच्या मुळावर घाव घातला आणि फांद्या, पानं, फुलांवर कितीही पाणी, पोषक द्रव्यांची फवारणी केली तरी ते झाड किती काळ जगू शकेल? सिंचन मुळांनाच करावं लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी अर्ध्या ओवीत हे सांगितलंय, ‘जैसें मुळसिंचनें सहजें। शाखापल्लव संतोषती॥’ 

चळवळींचं, विचारांचंही असंच असेल काय? आपली मुळे माहित नसतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल. मूळांना मजबूत करावं लागेल तरच झाड भक्कम उभं राहिल, जोमानं फुलू, बहरू लागेल. आपण कुणाच्यातरी खांद्यावर उभे असल्यानं आपल्याला जास्त दूरवरचं दिसतं, हे खरं. पण आपण ज्याच्या खांद्यावर उभे आहोत तो आधारच भिरकावून देऊ तर खाली पडू हाही साधा विवेक आहे.

भक्कम वैचारिक वारसा

स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, बॅ. नाथ पै या सर्वांना आपला वारसा नेमका कोणताय हे पक्कं ठाऊक होतं. या संदर्भात साने गुरुजींची ‘भारतीय संस्कृती’, ‘गीताहृदय’, ‘राष्ट्रीय हिंदू धर्म’ ही पुस्तकं तसंच लोहियांची ‘राम कृष्ण शिव’ आणि ‘हिंदू विरुद्ध हिंदू’ ही पुस्तकं पुन्हा एकदा वाचायला हवीत.

‘राम कृष्ण शिव’ या निबंधाच्या शेवटी डॉ. लोहिया म्हणतात, ‘हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे. कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा आणि कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर.’

स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, सर्वधर्मसहभाव, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, पर्यावरण संरक्षण, विवेक या सर्व विचारांना पोषक संत साहित्यातलं संचित आपली वाट पाहतंय. त्याकडे दुर्लक्ष करणं करंटेपणाचं ठरेल.

हेही वाचा: संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

साने गुरुजींचं व्याख्यान

साने गुरुजींनी पंढरपूरचं श्रीविठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणून १ मे १९४७ला आमरण उपोषण सुरू केलं. १० मे १९४७ला मंदीर सर्वांसाठी खुलं झालं. या ऐतिहासिक घटनेला यंदा ७५ वर्षं पूर्ण होतात. गुरुजींनी या उपोषणापूर्वी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला आणि आपली भूमिका मांडली. या व्याख्यानांमधून गुरुजी म्हणाले होते, ‘पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल.’

आपण ती प्रकाशाची कळ हरवून बसलोय का? आणि त्यामुळेच महाराष्ट्र अंधारात नाही ना? साने गुरुजी पुढं सांगतात, ‘संत बंडखोर होते. संस्कृतातलं ज्ञान त्यांनी मराठीत आणलं. संत करुणासागर होते. त्यांना झोपडीझोपडीत ज्ञान न्यायचं होतं, खरा धर्म न्यायचा होता, त्यांचा छळ झाला. ज्ञानदेव आणि भावंडांवर बहिष्कार घातला. कुंभाराचं मडकंही त्यांना मिळू दिलं नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत फेकले. काशीच्या पंडितांनी एकनाथी भागवतही गंगेत फेकलं.’

‘संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो. पण ते जिवंत असताना आपण त्यांचा छळच केला. पण ते डगमगले नाहीत. चंद्रभागेच्या वाळवंटात तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला. त्यांच्या पुढचं पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही ‘अवघाचि संसार सुखाचा होई’पर्यंत पुढे गेलं पाहिजे. पण आपण पुढे गेलो नाही.’

साने गुरुजींचं कार्य खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल तर पुढचं पाऊल म्हणून वारकरी सांप्रदायिक संतांचा वारसा नीट समजू शकणाऱ्यांनीच वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. वारकरी संप्रदायातही सनातनी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर झालीय. याबद्दल वारकऱ्यांनाच दोष देत बसून कसं चालेल? आपण जे क्षेत्र सोडून दिलं त्यात दुसऱ्यांनी घुसखोरी केली तर जबाबदार कोण?

बॅ. नाथ पै आणि संतविचार

हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. आम्ही मालवणच्या ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ या संस्थेच्या माध्यमातून नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या उपक्रमांत तरुणांसाठी नाथ पै यांचं छोटं इंग्रजी चरित्र प्रकाशित करतोय. नव्यानं वेबसाईट तयार करून त्यात नाथ पै आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी माहितीचं डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न करतोय.

नाथ पै यांच्या वक्तृत्वाची आठवण म्हणून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलीय. त्याला महाराष्ट्रभरातून तरुणांचा उत्साही प्रतिसाद मिळालाय. नाथ पै यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. आपले स्नेही वासु देशपांडे यांना लंडनहून पाठवलेल्या एका पत्रात नाथ पै आपल्या मनातलं गुज प्रकट करताना म्हणतात,

‘वारकऱ्याचं श्रद्धामय, भक्तिमय जीवन हे मला विलोभनीय वाटतं. माझ्या प्रकृतीचा हा स्थायीभाव आहे, असं मला वाटतं.’

ते कॉलेजमधे असताना सातत्यानं ज्ञानेश्वरी वाचत असत आणि आपल्या मित्रांनाही ज्ञानेश्वरी वाचायला सांगत. स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगात असताना त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं दिली आहेत. हा सर्व वारसा पुढे नेण्यासाठी ‘बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ या संस्था कटिबद्ध आहेत.

हेही वाचा: 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं ‘रिंगण’

वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबीर 

आपले समविचारी सहकारी सचिन परब गेली १० वर्षं आषाढी एकादशीला `रिंगण` या वार्षिक अंकाचं प्रकाशन करतात. प्रत्येक वर्षी एका संतावर हा विशेषांक असतो. संतविचार प्रभावीपणे आजच्या तरुणाईच्या भाषेत मांडणे, हे या अंकाचं वैशिष्ट्य असल्यानं तरुण वाचकही मोठ्या प्रमाणात हा अंक वाचतात. संतविचार तरुणांपर्यंत नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही ते राबवत असतात.

आता पुढचं पाऊल म्हणून सेवांगण आणि रिंगण यांनी मिळून ३० एप्रिल ते ३ मे २०२२ या कालावधीत मालवण इथं एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केलाय. वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आणि त्यानिमित्तानं वारकरी कीर्तन महोत्सव असा हा उपक्रम आहे. वारकरी कीर्तनाची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

नामदेवरायांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’ या उक्तीनं कीर्तनातून समाज प्रबोधन कसं साधलं जातं हे स्पष्ट केलंय. तर एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यांनी कीर्तनकारांनी कोणत्या मर्यादा पाळायला हव्यात हेही स्पष्ट केलंय. वारकरी कीर्तन ही एक सामूहिक सेवा आहे.

शिबीराचं स्वरूप

संतांच्या निवडलेल्या अभंगाचं निरुपण करताना अभंगाच्या कडव्यांतली आंतर सुसंगती स्पष्ट करावी लागते. यासाठी आवश्यक तिथं संतसाहित्यातल्या अवतरणांबरोबर चपखल दृष्टांत, किस्से, कथा हेही सांगितलं जातं. सर्वसाधारणपणे देवाचं रूप, संत, नाम, भक्ती, उपदेश, मागणे, काला अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या अभंगातून एक अभंग कीर्तन चिंतनासाठी निवडतात. कीर्तनात गायच्या संगीत चालींनाही महत्व आहे. या सगळ्याची ओळख या शिबीरात नक्की होईल.

शिबिरात व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि चर्चेतून समजून घेण्यासाठी काही विषय ठरवलेले आहेत. वारकरी संतपरंपरेचा महान वारसा, वारकरी तत्वज्ञान आणि संप्रदायाचं स्वरूप, वारकरी कीर्तनाची पद्धत आणि तंत्र, वारकरी संगीत आणि अभंगांच्या चाली, भजन, काकडा, हरिपाठ आणि दिंडी, वारकरी प्रवचन विषय मांडणी असे हे विषय आहेत. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण यांना तर हे शिबिर उपयुक्त ठरू शकतंच. पण संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं.

यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही कारण ही आमच्यासाठी सेवा आहे. ‘वार्षिक रिंगण’ आणि ‘संत अभ्यास मंडळ’ एकत्रितपणे कीर्तन-प्रवचन प्रशिक्षणासाठी एक ऑनलाइन अभ्यासवर्ग सुरू करतंय. त्याची सुरवात या शिबिरातून होईल. हे शिबिर पूर्णपणे ऑफलाईन असेल. त्याचा कोणताही भाग ऑनलाइन प्रशिक्षणासाठी लाईव असणार नाही. पण सहभागासाठी पूर्वनोंदणी अत्यावश्यक आहे.

हेही वाचा: बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

कार्यक्रम पत्रिका

वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आणि वारकरी कीर्तन महोत्सव
३० एप्रिल ते ३ मे २०२२ 

३० एप्रिल शनिवार
सकाळी ९ ते ११ 
नोंदणी, नाश्ता
११ ते १२
उद्घाटनः आयोजनामागील भूमिका
१२ ते १ 
व्याख्यानः सचिन परब, संपादक, वार्षिक रिंगण  
विषयः वारकरी विचारांचा परिचय

दुपारी १ ते ३         
जेवण आणि विश्रांती 
३ ते ५         
चर्चाः आजच्या काळातील कीर्तनाची गरज
संध्याकाळी ५.३० ते ७     
मालवण शहरातून दिंडी
रात्री ८ ते ९             
जेवण 
९ : ३०            
कीर्तनः हभप देवदत्त महाराज परुळेकर, वेंगुर्ला 
विषयः ज्ञानदेवे रचिला पाया ।

१ मे रविवार
सकाळी ८ ते ९         
नाश्ता
९ ते ११             
व्याख्यानः हभप ज्ञानेश्वर महाराज घेरडीकर, पंढरपूर 
विषयः वारकरी संप्रदायातील देवाची संकल्पना

११ ते १
वारकरी संगीताची प्रात्यक्षिकांसह ओळख 
दुपारी १ ते ३ 
जेवण आणि विश्रांती
३ ते ५             
चर्चाः कीर्तनाची मांडणी
संध्याकाळी ५ ते ७         
हरिपाठः हभप दत्तात्रय महाराज दोन्हे, मुळशी खोरे, पुणे
रात्री ८ ते ९     
जेवण 
९ : ३०             
कीर्तनः हभप अभय महाराज जगताप, सासवड – पुणे
विषय : नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार॥

२ मे सोमवार
सकाळी ६ ते १०         
सिंधुदुर्ग किल्ल्याची सफर
१० ते ११            
विश्रांती
११ ते १
वारकरी संगीताची प्रात्यक्षिकांसह ओळख 
दुपारी १ ते ३         
जेवण आणि विश्रांती
३ ते ५             
व्याख्यानः हभप स्वामीराज महाराज भिसे, आळंदी 
विषयः वारकरी संप्रदायातील नामस्मरणाचं महत्त्व

संध्याकाळी ५ ते ६.३०    
चर्चाः पालखी सोहळ्याचं वारकरी संप्रदायातील महत्त्व
मांडणीः अमृता मोरे – देहूकर

६.३० ते ७.३०            
समुद्रकिनारी फिरणं
रात्री ८ ते ९             
जेवण 
९ :३०
कीर्तनः हभप ज्ञानेश्वर महाराज घेरडीकर, पंढरपूर
विषय : जनार्दनी एकनाथ । खांब दिला भागवत॥

३ मे मंगळवार
सकाळी ७ ते ८.३०         
काकड्याचं भजन
९ ते ११             
व्याख्यानः हभप अभय महाराज जगताप, सासवड – पुणे
विषयः वारकरी संप्रदायातील प्रार्थनेचं स्वरूप

११ ते १             
वारकरी संगीताची प्रात्यक्षिकांसह ओळख
दुपारी १ ते ३         
जेवण आणि विश्रांती
३ ते ५             
चर्चाः वारकरी प्रवचनाची मांडणी
५ ते ७             
समारोपाआधीः सहभागी शिबिरार्थींची मनोगतं
रात्री ८ ते ९ 
जेवण
९ :३०             
कीर्तनः हभप स्वामीराज महाराज भिसे, आळंदी 
विषय : तुका झालासे कळस।

कृपया नोंद घ्यावीः

शिबिराचे वर्ग, चर्चा आणि प्रात्यक्षिकं बॅ. नाथ पै सेवांगण, चिवला बीच, धुरीवाडा, मालवण इथं होतील. तर कीर्तन महोत्सव मालवण शहरातलं श्री दत्त मंदिर, भरडनाका इथं होईल. हे वेळापत्रक शिबिराचं स्वरूप कळावं यासाठी आहे. त्यातल्या वेळा आणि विषय यात बदल होऊ शकतील.

शिबिरातल्या निवास आणि जेवणाच्या सोयीसाठी कोणतंही शुल्क नाही, कारण ही सेवा आहे. शिबिरार्थींनी फक्त येण्याजाण्याच्या स्वतःच्या प्रवासाचा खर्च करायचाय. मालवणला येण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर इथून एसटी आणि खासगी बसगाड्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. जवळचं रेल्वे स्टेशन कुडाळ हे आहे.

महिला शिबिरार्थींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. २९ एप्रिल आणि ४ मे रोजी कुणी राहणार असल्यास त्याचीही राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करता येईल.

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क:
देवदत्त परुळेकर –
९४२२०५५२२१
अभय जगताप – ९०९६३००५५२
स्वामीराज भिसे – ९६५७०७३३३३
ज्ञानेश्वर बंडगर – ८४५९२१२०२५
सचिन परब – ९९८७०३६८०५

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…