बॉक्सिंगमधे होणाऱ्या अन्यायावर मात करणारा निखतचा गोल्डन पंच!

निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.

भारताच्या क्रीडा इतिहासात १९ मे २०२२ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्याचं कारण निखत झरीनची सुवर्णमय कामगिरी. तुर्कस्तानच्या इस्तंबूल नगरीत तिनं या दिवशी बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद स्वतःच्या नावावर केलं आणि इतिहास रचला. जिगरबाज, वादळी आणि काहीशी वादग्रस्त या तीनच शब्दांत निखतचं वर्णन करता येईल. ५२ किलो वर्गात तिनं थायलंडच्या जितपोंग जुटामेन्सला अस्मान दाखवताच संपूर्ण देशात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

या यशाची खासियत अशी की, निखतनं अंतिम फेरीत जुटामेन्सला ५-० अशा सणसणीत फरकानं धूळ चारली. तेलंगणाच्या या उमद्या कन्येनं सगळ्या भारताला खूश करून टाकलं. महिला विश्वविजेतेपदाचा गौरव प्राप्त केलेली निखत ही भारताची पाचवी बॉक्सर आहे. या आधी मेरी कोमनं तब्बल अर्धा डझन वेळा हा बहुमान पटकावलाय. त्याशिवाय सरिता देवी, लेखा के. सी. आणि जेनी आर. एल. या इतर महिला बॉक्सरनीही विश्वविजेतेपद मिळवलंय.

चौदाव्या वर्षी बनली ‘युवा विश्वविजेती’

१४ जून १९९६ला तेलंगणातल्या निजामाबादमधे निखतचा जन्म झाला. या राज्याला बॉक्सिंगची फारशी पार्श्वभूमी नाही. निखतचे वडील मोहम्मद जमील फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचे. निखतला एकूण चार बहिणी. त्यातल्या दोघी डॉक्टर, तर सर्वात धाकटी बॅडमिंटनमधे आपलं नशीब आजमावतेय. निखत ही चार बहिणींपैकी चौथी.

मोहम्मद जमील यांना सातत्यानं असं वाटत होतं की, आपल्या एकातरी मुलीनं क्रीडा क्षेत्रात नावलौकिक संपादन करावा. त्यासाठी त्यांनी निखतची निवड केली. पण निखतनं सर्वसाधारपणे महिला ज्या खेळाकडे फारशा वळत नाहीत अशा ‘बॉक्सिंग’ची निवड आपल्या कारकिर्दीसाठी करताच, घरातल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या. वडील मोहम्मद यांनी कसलेही आढेवेढे न घेता आपल्या कन्येच्या या निर्णयाला लगेच पाठिंबा दिला.

खरं तर, त्यांना असं वाटत होतं की, निखतनं धावपटू म्हणून नाव मिळवावं. तिनं बॉक्सिंगची निवड केल्याचं समजताच, निखतची आई परवीन सुलताना यांनी तर सुरवातीला घरच डोक्यावर घेतलं! त्यांची अडचण वेगळीच होती. ‘अगं, तू जर बॉक्सर बनलीस तर तुला पत्नी म्हणून कोणीही स्वीकारणार नाही.’ असं त्यांनी आपल्या लेकीला बजावलं.

पण व्यर्थ! निखतला किशोरवयातच बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद खुणावू लागलं होतं. आता तिला पाठिंबा द्यायला तिचे काका शमसुद्दीन हेही सज्ज झालं. कारण, त्यांची दोन्ही मुलं एतेशामुद्दीन आणि इतिशामुद्दीन बॉक्सिंगचं रिंगण गाजवू लागली होतं. त्यामुळे काका हेच निखतचं प्रेरणास्थान बनले. त्यांनी निखतला सर्वतोपरी साहाय्य केलं आणि वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी निखत ‘जागतिक युवा बॉक्सिंग विजेती’ ठरली.

हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

निर्भेळ यशाची त्रिसूत्री

त्यानंतर तिची ठोसेबाजीची मालिका सुरूच राहिली. यशाच्या पायर्‍या ती चढत गेली. हा वेग अफलातून होता. तसं पाहिलं, तर तिला उशिरानेच विश्वविजेतेपद मिळालं. याचं मुख्य कारण म्हणजे २०१७ला तिच्या खांद्याला झालेली दुखापत. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता तिची कारकीर्द संपणार की काय, असं वाटू लागलं होतं.

पण निखत पुन्हा पूर्ण ताकदीनिशी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली आणि पाहता पाहता तिनं जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातलीसुद्धा! ‘निखतचं हे यश देशातल्या सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल!’ अशी भावना तिचे वडील मोहम्मद जमील यांनी व्यक्त केली. ते खरंच आहे.

निखत ही मुस्लिम असल्यामुळे ती हाफ पँट घालून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर सुरवातीच्या काळात नातेवाईक आणि निजामाबादमधल्या मोहल्ल्यांतून जमील कुटुंबाला टोमणे सहन करावे लागले होते. त्यांनी निग्रहानं त्याकडे दुर्लक्ष केलं. निखतमधे असलेल्या अपार क्षमतेची जाणीव कुटुंबातल्या सर्वच सदस्यांना झाली होती. त्यामुळे त्यांनी निखतला सातत्यानं प्रोत्साहन दिलं. परिणामी, निखतलाही हुरूप आला. ती एकेक पायरी सर करत गेली.

अपार परिश्रम, तीव्र इच्छाशक्ती आणि कणखर मनोबल या त्रिसूत्रीच्या बळावर निखतनं हे निर्भेळ यश खेचून आणलं. निखतच्या यशात तिचे प्रशिक्षक आणि गुरू द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्ही. राव यांचा मोठा वाटा आहे. निखतमधले सुप्त गुण त्यांनी वेळीच ताडले आणि या कच्च्या हिर्‍यावर असे पैलू पाडले की, नंतरच्या काळात या हिर्‍याच्या तेजानं सगळ्या जगाचे डोळे दिपले!

सडेतोड भूमिका आणि वादळी खेळी

ही गोष्ट आहे टोकियो ऑलिम्पिकच्या चाचणी स्पर्धेची. त्यावेळी मेरी कोमनं निखत झरीनचा ९-१ अशा फरकानं लीलया पाडाव केला. पण नंतर अचानकपणे विश्व बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरीचा समावेश ५१ किलो गटात करण्यात आला. त्यावेळी कोणताही चाचणीचा निकष लावला गेला नाही. याला निखतनं तीव्र आक्षेप घेतला.

केवळ आधीच्या यशामुळे मेरीला झुकतं माप देण्यात आल्याचा आरोप निखतनं केला. एवढंच नाही, तर तिनं तेव्हाचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना आपली बाजू मांडणारं सविस्तर पत्रही लिहिलं होतं. निखतच्या या लेटरबाँबनं एकच खळबळ उडवून दिली. अनेक दिवस माध्यमात या वादाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. शेवटी, कुणालाही उजवं-डावं केलं जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिजिजू यांना द्यावा लागला.

दुसरीकडे, मेरी कोमही हट्टाला पेटली. कोण ही निखत? असा उर्मट सवाल मेरीनं माध्यमांसमोर केला तेव्हा निखत मनातून दुखावली गेली. हे शाब्दिक युद्ध एवढं टिपेला पोचलं की, जेव्हा निखत आणि मेरी यांची लढत झाली तेव्हा मेरीनं निखतशी हस्तांदोलन करण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. त्याबद्दल मेरीवर तेव्हा टीका झाली होती. हा जबरदस्त अपमान निखतच्या मनात घर करून राहिला होता. आता ती जिद्दीला पेटली. रोज तासंतास सराव करू लागली.

इस्तंबूलमधे होणारी स्पर्धा जवळ येऊ लागली तेव्हाच तिला विश्वविजेतेपद खुणावू लागलं. झालंही तसंच. पहिल्या फेरीपासून निखतनं एवढा धडाकेबाज खेळ केला की, तिच्या जबरदस्त ठोशांपुढे कुठल्याच प्रतिस्पर्ध्याचा निभाव लागला नाही. अंतिम फेरी जवळ आली तसं निखतच्या ठोशांत जणू बारा हत्तींचं बळ आलं. आपल्या थाई प्रतिस्पर्धी बॉक्सरला तिनं मानच वर करू दिली नाही. पंचांनी तिला विजयी घोषित केलं तेव्हाच निखत नावाचं वादळ शांत झालं.

हेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

सोनेरी, सुगंधी स्वप्नपूर्ती

मोठ्या रुबाबात ती मेरी कोमच्या पंगतीत जाऊन बसली. सुवर्णपदक मिळवून झाल्यानंतर आता निखतला तिच्या आवडीच्या बिर्याणीवर ताव मारायचाय. कारण, खेळाडूंसाठी असलेल्या विशेष आहारामुळे गेल्या तीन वर्षांपासून बिर्याणीचं दूर-दर्शन घेऊनच तिला समाधान मानावं लागलंय.

खरं तर, निखतला आयपीएस व्हायचं होतं. बी. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर हा विषय तिच्या डोक्यात रुंजी घालू लागला. मात्र, नंतर ती बॉक्सिंगचं रिंगण गाजवू लागली आणि पोलिस अधिकारी व्हायचा विचार तिला सोडून द्यावा लागला.

एक दिवस आपल्या नावाचीही ट्विटरवर जगभर चर्चा व्हावी, असं स्वप्न तिनं पाहिलं होतं. विश्वविजेती झाल्यानंतर तिचं हे स्वप्न वास्तवात अवतरलं आणि ती कमालीची सुखावली.

‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.

संघर्षाचं झालं सोनं

तसं पाहिलं, तर निखतनं २०११मधेच युवा विश्वविजेतेपद मिळवलं होतं. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी तिला तब्बल पाच वर्षं वाट पाहावी लागली. मग २०१६ला फ्लायवेट प्रवर्गात मनीषाला पराभूत करून निखत पहिल्यांदा वरिष्ठ विभागातली चॅम्पियन बनली. यातली योगायोगाची गोष्ट अशी की, याच प्रवर्गात मेरी कोमचा समावेश होता. त्यामुळे निखतची उपेक्षा होत गेली.

दरम्यानच्या काळात वरिष्ठ राष्ट्रीय विभागात निखत सातत्यानं बहारदार कामगिरी करत राहिली. बेलग्रेडमधेही तिनं पदकाला गवसणी घातली. २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी जेव्हा निखतला डावललं गेलं तेव्हा तर ती पार मोडून पडायला आली होती. अशा वेळी वडिलांनी निखतला धीर देत वैफल्याच्या छायेतून बाहेर काढलं. त्यामुळे निखतचा आत्मविश्वास दुणावला. ती नव्या उमेदीनं रिंगणात उतरली आणि पदके मिळवू लागली.

आता जेव्हा ‘विश्वविजेतेपद’ मिळालं तेव्हा ‘मेरी कोमशी असलेला माझा वाद संपलाय,’ अशी घोषणाच निखतनं ट्विटरवर करून टाकली. ‘जुने जाऊ दे मरणालागुनि’ या उक्तीनुसार झालं गेलं विसरून, मेरीसोबतचा आपला जुना फोटो निखतनं शेअर केला. त्याखालच्या ओळी मोठ्या अर्थपूर्ण होत्या.

निखत म्हणते, ‘मेरीसारख्या महान खेळाडूचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय माझं यश परिपूर्ण होऊ शकत नाही. धन्यवाद मेरी, तुझ्याच प्रेरणेमुळे मी हे यश मिळवू शकले.’ त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा निखतच्या कौतुकाचं ट्विट केलं तेव्हा तर निखतचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या रात्री मी माझं सुवर्णपदक उशीजवळ ठेवूनच झोपले होले, अशी आठवण निखत सांगते.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा ‘षटकार’

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…