बॉलिवूड सेलिब्रिटींना मालदीव सोडून तुर्कस्थान का खुणावतंय?

आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय.

सुट्ट्या म्हटलं की, बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलं मालदीवकडे वळतात. या सेलिब्रिटींनी मालदीवमधे केलेली मजा-मस्ती, सुट्ट्यांचा आनंद असं बरंच काही चर्चेत राहतं. बातम्यांचा विषय होतं. पण यावेळी मात्र हे ठिकाण मालदीव नाहीय. तर मध्यपूर्वेतला मोठा देश आणि आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेल्या तुर्कस्थान आहे.

मलायका अरोरा, मौनी रॉय, सारा अली खान, सुजैन खान या बॉलिवूडच्या सेलिब्रिटी मंडळींचे तुर्कस्थाममधे सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होतायत. त्यामुळे त्यांच्या तुर्कस्थानमधल्या फिरस्तीची आणि त्या घडवून आणणाऱ्या ठिकाणांची सगळीकडे चर्चा होतेय.

गेल्या काही वर्षांमधे पर्यटनसाठी तुर्कस्थानची चर्चा होतेय. भूमध्य समुद्रातल्या हवामानामुळे असंख्य पर्यटकांना तुर्कस्थान खुणावतंय. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे हा देश सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलाय. भारतातल्या सेलिब्रिटींनाही या पर्यटन स्थळांनी मोहिनी घातलीय.

हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?

इस्तंबूलमधली ऐतिहासिक स्थळं

तुर्कस्थानचं इस्तंबूल शहर पर्यटनाचं महत्वाचं केंद्र आहे. इस्तंबूल मोठं आणि सर्वाधिक लोकसंख्येचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरानं रोमन आणि ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे इथल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी इथं उभी केलेली शहरं, मागे सोडलेले स्थापत्यकला, वास्तुकलेचे नमुने आजही जगभरातल्या पर्यटकांना भुरळ घालतात.

सुलतान अहमद मशीद इस्तंबूलमधलं महत्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे. या मशिदीच्या बाहेरच्या भिंतींना असलेल्या निळ्या रंगामुळे ही निळी मशीद म्हणून ओळखली जाते. ऑटोमन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली सहा मिनारांची जगातली ही एकमेव मशीद आहे. या मशिदीच्या मुख्य खोलीत अनेक घुमट आहेत. आतमधे नैसर्गिक प्रकाश जावा म्हणून २००पेक्षा अधिक काचेच्या खिडक्या आहेत.

या मशिदीच्या बांधकामात स्थापत्यकलेच्या अनेक छटा दडल्यात. दर शुक्रवारी इथं इमाम भाषण देतात. ते देताना मशिदीच्या प्रत्येक कोपऱ्यातून ते भाषण स्पष्ट ऐकू जाईल अशी व्यवस्था ही मशीद उभी राहताना करण्यात आलीय. तसंच प्रार्थनास्थळ आणि सध्या म्युझियम असलेलं अय्या सोफिया, टोपकापीची वाडा ही इथली प्रमुख आकर्षणाची केंद्र आहेत.

जगातली दोन प्राचीन आश्चर्य

जगातल्या ७ प्राचीन आश्चर्यांपैकी दोन आश्चर्य तुर्कस्थानमधली आहेत. त्यातलं एक आश्चर्य म्हणजे आर्टेमिसचं मंदिर. आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य, धनुर्विद्येचा देव अपोलोची जुळी बहीण होती. इसवी सन पूर्व ५५०मधे बांधलेलं हे मंदिर आधुनिक तुर्कस्थानातल्या इफेसूस या शहरात आहे. या मंदिराचे भग्नावशेष तुर्कस्थानच्या इफेसूसमधे पहायला मिळतात.

दुसरं आश्चर्य असलेली हॅलिकार्नसस कबर ही तुर्कस्थानच्या सध्याच्या बोर्डम शहरात आहे. मकबूलची कबर म्हणून ओळखली जाणारी ही कबरी इसवी सन पूर्व ३५३मधे बांधली गेली. राजा मॉसोलस याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याची पत्नी राणी आर्टिमिझियाने ही कबर बांधली होती. संगमरवरामुळे ती लक्षवेधक ठरली. ऐतिहासिक खाणाखुणा असलेल्या या वास्तू पहायला दरवर्षी लाखो पर्यटकांची इथं रीघ लागते.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

ऐतिहासिक शाही बाजार

बाहेर कुठं फिरायला गेलं की खरेदी आलीच. तुर्कस्थानच्या इस्तंबूलमधला ग्रँड बाजार जगातल्या मोठ्या बाजारांपैकी एक आहे. या बाजारामुळे तुर्कस्थानच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची ओळख पर्यटकांना होतेय. या बाजारात जवळपास ६४ गल्ल्यांमधे ४ हजारच्या आसपास दुकानं आहेत. तिथं २५ हजार लोक काम करतात.

या बाजारात वेगवेगळ्या ठिकाणांहुन प्रवेश करण्यासाठी म्हणून २२ दरवाजे आहेत. इथं अगदी टेबल लॅम्पपासून ते कपडे, घड्याळं, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेता येतात. जगप्रसिद्ध ब्रँडच्या पर्स आणि इतर अनेक वस्तू या बाजारात हमखास मिळतात. इथल्या वेगवेगळ्या लॅम्पवरची अगदी छोटी-छोटी रंगीबेरंगी कलाकुसर लक्ष वेधून घेते.

या बाजाराला दरदिवशी तीन लाखच्या आसपास लोक भेट देतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे हा बाजार आर्थिक घडामोडींचं केंद्र बनलाय. या बाजाराने आजपर्यंत अनेक हल्लेही पचवलेत. १६व्या शतकात इथं आलेल्या भूकंपामुळे हा बाजार पूर्णपणे उध्वस्त झाला होता. पण त्यातून उभं राहतं टर्किश लोकांनी ग्रँड बाजार पुन्हा उभा केला.

शहरांच्या दिलखेचक अदा

अनेक शहरांनी तुर्कस्थानच्या वैभवात भर घातलीय. कप्पडोसिया हे असंच एक महत्वाचं शहर आहे. हे शहर तुर्कस्थानच्या अगदी मधोमध वसलंय. कप्पडोसिया अनेक भागात अंडरग्राउंड जागा आहेत. इथून सूर्यास्त बघणं एक वेगळीच मजा असते. शिवाय सकाळच्या हवेत फुग्यांची राईड करत इथला थरार आणि निसर्गाच्या दिलखेचक अदा अनुभवणं यातही वेगळाच आनंद असतो.

इथलं प्राचीन शहरांपैकी एक असलेलं इफेसूस शहर येशू ख्रिस्ताच्या आईचं उत्तर आयुष्यातलं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. हे तुर्कस्थानमधलं महत्वाचं सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र आहे. इथं ऐतिहासिक बंदरही आहे. यालाच लागून असलेल्या मार्दिन शहरात अनेक प्राचीन घरं पहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक या शहराला आवर्जून भेट देतात. मार्दिनचाच एक भाग असलेलं न्यू मार्दिन शहर इथल्या इमारतींच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींसाठी ओळखलं जातं.

तुर्कस्थानचं बोर्डम हे शहर राहणं-जेवणासाठीची मोठमोठी हॉटेलं, क्लब यासाठी प्रसिद्ध आहे. निवांतपणा घालवण्यासाठी पर्यटकांसाठी हे हक्काचं ठिकाण आहे. विशेषतः बोर्डममधला पारंपरिक टर्किश ब्रेकफास्ट खवय्यांमधे चर्चेचा विषय असतो. त्याचा तिथल्याच पारंपरिक पद्धतीने आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये इथं हजेरी लावतात.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

ट्रेकिंगचा आनंद देणारी ठिकाणं

तुर्कस्थानमधे बाबाडग नावाचं एक प्राचीन शहर आहे. या शहरात असलेली ‘बटरफ्लाय वॅली’ पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इथं फुलपाखरांच्या ८० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामुळेच याला ‘बटरफ्लाय वॅली’ म्हटलं जातं. या वॅलीतली वेगवेगळ्या प्रकारची झाडं, निसर्गाच्या अदा मोहात पाडतात. त्यामुळे लोक इथं ट्रेकिंगलाही प्राधान्य देतात.

ज्यांना निसर्गाची वेगवेगळी रूपं पहायची आहेत; त्याचा याची देही, याची डोळा आनंद घ्यायचाय अशांसाठी ‘लायकियन वे’ नावाचं ठिकाण सगळ्यात बेस्ट समजलं जातं. हा तुर्कस्थानमधला पायी प्रवासासाठी सगळ्यात लांब पल्ल्याचा रस्ता आहे. अनेक ट्रेकर्सना हे ठिकाण खुणावत असतं.

पर्यटनासाठी तुर्कस्थानची पावलं

तुर्कस्थाननं पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक काही पावलं उचलली आहेत. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक हे रशियातून येतात. जगभरातून ही संख्या वाढावी यासाठी इथलं सरकार सातत्याने काही प्रयत्न करतंय. त्यात तुर्कस्थानचे संस्कृती आणि पर्यटन खात्याचे मंत्री मेहमत नुरी एरोसी यांनी जाणीवपूर्वक काही उपाययोजना आखल्यात. त्याचाच भाग म्हणून तुर्कस्थानमधल्या पर्यटन स्थळांची माहिती जगभरातल्या देशांना व्हावी म्हणून १४० देशांमधे प्रचार मोहीम राबवली गेलीय.

१३० हुन अधिक कंपन्यांचा समावेश असलेल्या युरोपातली आघाडीची प्रवासी संस्था ‘डीईआर टुरिस्टीक ग्रुप’ची एप्रिल २०२२मधे एक बैठक झाली होती. या बैठकीत एरोसी यांनी २०२२मधे तुर्कस्थानात ४२ मिलियन पर्यटक येतील आणि त्यातून ३५ बिलियन डॉलरचं उत्पन्न मिळेल असं लक्ष्य ठेवलंय. त्यासाठी सरकार वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करतंय.

कोरोना काळातही तुर्कस्थानमधल्या पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यासाठी मागची दोन वर्ष सरकारने २२ देशांमधे तुर्की पर्यटन संवर्धन आणि विकास या नावाने वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन केलं होतं. त्यातून देशातल्या पर्यटन स्थळांची माहिती जगभर पोचवली गेली. यावर्षी १४० देशांमधे इथल्या पर्यटनाच्या जाहिराती देण्यात आल्या. २०२८पर्यंत देशाला १२० मिलियन लोक भेट देतील आणि त्यातून १०० बिलियन डॉलरचं उत्पन्न आपण देशाला मिळवून देऊ असा विश्वास एरोसी यांनी एका इंटरव्यूमधे व्यक्त केलाय.

हेही वाचा: 

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…