‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. 

आपल्या देशात सर्वार्थानं क्रीडा संस्कृती रुजावी या हेतूनं सुरु करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’चा चौथा हंगाम नुकताच हरियाणात पार पडला. अपेक्षेप्रमाणे त्यात यजमान संघानं बाजी मारली आणि महाराष्ट्राला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. यात कोणी कोणता क्रमांक पटकावला यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू अशा स्पर्धांच्या माध्यमातून तयार करणं.

१७ आणि २१ वर्षांखालच्या युवाशक्तीला आपलं क्रीडाविषयक कसब दाखवण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा एक कल्पक उपक्रम म्हणता येईल. एक प्रकारे ही क्रीडा क्षेत्रातली प्रज्ञाशोध परीक्षाच आहे. नेटकं आयोजन, विविधांगी क्रीडा प्रकारांचं थेट प्रक्षेपण यामुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख क्रीडाजगतात तयार होत चाललीय.

प्रगतीचा लेखाजोखा गरजेचा

गेल्या चार वर्षांत या स्पर्धेत महाराष्ट्रानं दमदार कामगिरी करत भरघोस पदकांची कमाई केलीय. यावेळी हरियाणातल्या पंचकुला क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रानं खो-खोमधे निर्विवाद वर्चस्व गाजवलं. ठाण्याच्या संयुक्ता काळेनं तब्बल पाच सुवर्णपदकांवर आपलं नाव कोरलं. सांगलीतली चहावाल्याची कन्या काजोल हिनं वेटलिफ्टिंगमधे सोनेरी कामगिरी करून दाखवली. तिचं सर्वत्र खूप कौतुकही झालं.

आता खरा प्रश्न असाय की, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मुलं चमकण्यासाठी त्यांच्यावर आणखी पैलू कसे पाडायचे? या स्पर्धेतल्या कामगिरीनंतर पुढील वाटचालीत खेळाडूंना किती फायदा झाला, त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली का, यातले किती खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले, तिथं त्यांची कामगिरी कशी झाली या सगळ्यांचा लेखाजोखा सातत्यानं घेतला पाहिजे कारण ती खरोखरच काळाची गरज आहे.

हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही. कारण ‘खेलो इंडिया’ ही देशातली एक महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर या खेळाडूंच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जाईल, त्या प्रगतीची नोंद कशी ठेवता येईल, हे पाहायला हवं.

शिष्यवृत्तीचा योग्य विनियोग

केंद्र सरकारच्या वतीनं या स्पर्धेतल्या एक हजार खेळाडूंना सलग आठ वर्षं वार्षिक आठ लाख रुपये शिष्यवृत्तीच्या रूपानं दिले जातात. मात्र, फक्त पैसे आहेत म्हणून लगेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची रास जमा झाली असं होत नाही. हे खेळाडू या पैशांचा विनियोग कशा प्रकारे करतात याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. सरकार, पालक आणि खेळाडूंचे प्रशिक्षक अशा तीन घटकांना हे काम निग्रहानं करावं लागेल.

सरकारनं या शिष्यवृत्ती मिळवलेल्या खेळाडूंची अद्ययावत माहिती ठेवून त्यांच्या कामगिरीचा आढावा नियमितपणे घेणं गरजेचं आहे. या खेळातली कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यासाठी खेळाडूंना किती साह्यभूत ठरणारी आहे, याचीही नोंद ठेवायला हवी. ही स्पर्धा विविधांगी खेळांनी सजलीय. त्यामुळे या स्पर्धेचं स्वरूप ऑलिम्पिकसारखंच आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धांच्या तुलनेत या खेळाडूंची कामगिरी कशीय, याची पडताळणी व्हायला हवी.

आशियाई, राष्ट्रकूल आणि मग जागतिक स्पर्धांत खेळण्यासाठी आणखी किती मेहनत खेळाडूंना घ्यावी लागेल, ते कुठं कमी पडतात, त्यांची दिशा काय असली पाहिजे यावर गंभीरपणे विचार करून तशी कृती झाली पाहिजे. त्याचबरोबर, अशा स्पर्धांमधे चमकल्यानंतर जर घसघशीत पैसे मिळणार असतील, तर वय आणि उत्तेजक चाचणी या दोन्ही गोष्टींवर प्रकर्षानं लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा: विराट असा कसा तू वेगळा वेगळा

वयचोरी आणि उत्तेजकांचा धोका

अनेकवेळा काही खेळाडू खरोखरच १७ किंवा २१ वर्षांखालचे आहेत काय, असा प्रश्न पडतो. त्यांची शरीरयष्टी, चाल, क्षमता अशा गोष्टींचं निरीक्षण केलं तर काही खेळाडू जास्त वयाचे असल्याचं जाणवतं. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. स्पर्धेला मिळत असलेली प्रसिद्धी, शिष्यवृत्तीमुळे खेळाडूंना वयचोरी करून खेळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण अशीच सवय लागली तर पुढे जाऊन खेळाडूंसाठी आणि खेळासाठीही असले प्रकार मारक ठरू शकतात.  त्यासाठी जे खेळाडू खेलो इंडियात भाग घेतील, त्यांचे वयाचे दाखले तर तपासले पाहिजेतच; पण त्यांच्या वय निश्चित करणार्‍या विविध चाचण्या करून त्याचेही अहवाल मागवले गेले पाहिजेत. त्यामुळे वयचोरीला आळा घालता येईल.

याला प्रामुख्यानं प्रशिक्षक आणि पालकही बर्‍याचअंशी जबाबदार असतात. आपला पाल्य किंवा शिष्य जास्त वयाचा आहे, हे माहीत असतानाही त्याला भाग घेऊ दिला जातो. तो खेळाडू स्पर्धेत जिंकतही असला तरी ते त्याचं यश काळवंडलेलं असतं. मग पुढे हे खेळाडू मुख्य प्रवाहात येतात तेव्हा त्यांचं बिंग फुटतं. मग त्यांची पीछेहाट होऊ लागते.

म्हणूनच वयचोरीवर लक्ष ठेवणे हे सरकारचं काम असेल तेवढंच पालक आणि प्रशिक्षकांचंही. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भात कमालीची जागरूकता आल्यामुळे, त्याची तपासणी वेळोवेळी केली जातेय. साहजिकच या प्रकारांना वेगानं आळा बसत चाललाय.

उत्तेजकांबद्दल जागरूकता गरजेची

दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे उत्तेजकांचं सेवन. आजकाल याविषयी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होऊ लागलंय. अनेक खेळाडूंना त्यासाठी शिक्षाही झाल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्याही स्थितीत उत्तेजकांचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असे खेळाडू सापडल्यास त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, हा संदेश सर्वदूर गेला पाहिजे.

उत्तेजक चाचणीबरोबरच स्पर्धेच्या ठिकाणीही उत्तेजकांचे दुष्परिणाम, त्याविषयीचे कायदे-नियम, कारवाई याविषयीची मूलभूत माहितीही खेळाडू, पालक, प्रशिक्षकांपर्यंत पोचवणं सहज शक्य आहे. 

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

सहभागी राज्यांची कामगिरी

‘खेलो इंडिया’ स्पर्धेतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्र आणि हरियाणा यांचाच वरचष्मा दिसलाय. कर्नाटक आणि दिल्ली यांचाही कामगिरी चांगली झालीय. इतर राज्ये त्या तुलनेत खूपच मागे आहेत. 

ही राज्ये या स्पर्धेत पूर्ण ताकदीनं सहभागी होतात का, कोणत्या खेळांत त्यांचा सहभाग असतो, कोणत्या खेळांत सगळी राज्ये भाग घेतात, त्यांची या क्रीडा प्रकारातली कामगिरी काय, या सगळ्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे.

त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी कोणत्या क्रीडा प्रकारांवर आपण विशेष मेहनत घेऊ शकतो, हे ठरवणं सहज शक्य होईल. गुवाहाटीत २०२०ला झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेमुळे ईशान्येकडच्या राज्यांत क्रीडा संस्कृती बाळसं धरू लागल्याचं दिसून येतं.

स्पर्धा प्रेरणादायी ठरावी

सध्या १७ आणि २१ हे वयोगट ‘खेलो इंडिया’साठी निश्चित करण्यात आलेत. ‘कॅच देम यंग’ या उक्तीनुसार यामधे नजीकच्या काळात १४ वर्षांखालचा वयोगट आणता येईल का, या दिशेनं विचार व्हायला हवा. त्यातून क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल का, याचा विचार नक्कीच करता येईल.

शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन दरवर्षी केलं जात असलं तरी या स्पर्धांचा दर्जा फारसा उच्च नसतो. त्या स्पर्धांतल्या अव्वल आठ खेळाडूंना ‘खेलो इंडिया’त स्थान मिळतं. त्यापेक्षा विविध ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा आणि शालेय क्रीडा स्पर्धांतल्या खेळाडूंचा एकत्रित विचार केला, तर खेलो इंडिया स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावता येईल.

या स्पर्धेची वाटचाल चांगल्या प्रकारे होऊ लागलीय. जसे आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू गवसले तसंच ‘खेलो इंडिया’बद्दल म्हणता येईल. सुदैवानं भारत सरकारनं या स्पर्धेसाठी ९७४ कोटी रुपयांची भक्कम तरतूद केलीय. त्यामुळे भविष्यातला ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे.

एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो आणि मग त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांची झुंबड उडते. हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. ‘खेलो इंडिया’सारखी स्पर्धा त्याद़ृष्टीनं प्रेरणादायी ठरावी.

हेही वाचा: 

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…