मानव गुरू चंद्रशेखर यांना स्वत:चा मृत्यू का समजला नाही?

वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा ‘सरल वास्तू’ हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. ‘मानव गुरू’ म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. ‘मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ’ हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.

नुकताच विख्यात वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा ‘सरल वास्तू’ हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. ‘मानव गुरू’ म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्यांचं मोठं प्रस्थ होतं. अनेक आमदार-खासदार, उद्योगपती त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे घराची मोडतोड, तोडफोड करत होते.

दिव्यज्ञानी व्यक्तीची हत्या व्हावी?

अवघ्या महाराष्ट्रात त्यांचा भक्त वर्ग मोठा होता. अनेक मोठ-मोठे सुशिक्षित लोक त्यांच्या भक्त यादीत होते. ‘मानवी कल्याणासाठी मानव गुरू परिवाराची यात्रा’ या नावाने त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हायचे. लोकांच्या जीवनातलं दु:ख, संकट, अनिष्ठ ते आपल्या दिव्य ज्ञानाने दुर करत होते म्हणे. प्रेमातले अपयश, करियरमधले अपयश वगैरे वगैरे अनेक गोष्टींवर त्यांच्याकडे तोडगे होते.

त्यांच्याकडे आपल्या व्यथा-वेदना घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला ते मार्गदर्शन करत. त्यातून बाहेर पडण्याचे हमखास उपाय सुचवत. त्यांच्या संपर्कात जाणं म्हणजे विश्वशक्तीच्या संपर्कात जाण्यासारखे होते. त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे माणसाला हवं ते मिळवता येत असल्याचं त्यांचे भक्तगण सांगत होते. तसा दावाही करत असत.

‘मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ’ हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. जो माणूस स्वत: विश्व शक्तीच्या संपर्कात होता, जो माणूस स्वत: दिव्यज्ञानी होता, त्या माणसाला स्वत:चा मृत्यू का समजला नाही? त्यांची अशी हत्या होईल असा वास्तूदोष त्यांच्या राहत्या घरात होता की नाही? हे त्यांच्या लक्षात का आलं नाही? चंद्रशेखर गुरूजींना स्वत:च्या मृत्यूचं ज्ञान का झालं नाही? त्यांना प्राप्त असणाऱ्या दिव्य शक्तीने त्यांना याची माहिती का दिली नाही?

‘बाबा तू तिथे जाऊ नकोस, तुला चाकूने भोकसून मारलं जाईल!’ असं विश्वशक्तीने त्यांना का नाही सांगितलं? अखिल मानव जातीच्या कल्याणाची भाषा करणाऱ्या मानव गुरूची अशी निघृण हत्या का  व्हावी? त्यांना हत्यारांनी का मारावं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं

मानव गुरू म्हणून प्रसिद्ध

हे मानव गुरू म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर अंगडी मूळचे कर्नाटकच्या बागलकोटचे. सुरवातीला ते कंत्राटदार होते. त्यानंतर काही काळ या गुरूंनी ‘रियल इस्टेट’मधे काम केलं. त्यानंतर स्वत:ची कंपनी सुरू केली. ते काम करता करता त्यांना वास्तूशास्त्राची गोडी लागली. वास्तूशास्त्राचे मार्केट लक्षात घेता त्यांनी तोच व्यवसाय ताकदीने सुरू केला. ‘सरल वास्तू’ नावाने त्यांनी वास्तूशास्त्राचे मार्गदर्शन चालू केलं.

वास्तूशास्त्राच्या व्यवसायात त्यांना भरभराटी आली. ते चंद्रशेखर अंगडीचे ‘चंद्रशेखर गुरूजी’ झाले. पुढे जावून त्यांच्या नावापुढे ‘मानव गुरू’ ही उपाधी लागली. मानवाचं कल्याण करण्यासाठी या मानव गुरूची भ्रमंती सर्वत्र सुरू होती. ते देशभर प्रसिध्द झाले होते.

हूबळी इथं एका हॉटेलवर दोन व्यक्तींनी चाकूने भोसकून त्यांची हत्या केली. या हत्येची कारणं अजून समजली नाहीत. त्यांना का मारलं? कुणी मारलं? या गोष्टी पोलिस तपासात पुढे येतील. पण त्यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत त्या प्रश्नांचा विचार समाज करणार का?

भोंदूंचं मार्केट तेजीत

बुवाबाजीचा बाजार प्रचंड तेजीत आहे. समाजात अनेक गुरू, बाबा, मौलवी आणि पाद्र्यांचा हैदोस सुरू आहे. शिकल्या-सवरल्या लोकांना ही मंडळी गंडा घालत आहेत. गत आठवड्यात गुप्तधन काढून देतो म्हणत सोलापुरच्या भोंदू बुवांनी सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या एका कुटुंबाला विष पाजून मारलं. त्या आधी गुप्तधन काढून देतो म्हणत ऐंशी लाखाचा गंडा घातला होता.

या कुटुंबाने पैशाची मागणी करताच गुप्तधनाचा विधी करण्याचे नाटक करत अख्या कुटूंबाला विष पाजून मारले. तब्बल नऊ जणांची हत्या सदर भोंदूबाबांनी केली. समाजात गाजर गवतासारखे बुवा-बाबा उगवतात. देवा-धर्माच्या नावाखाली लोकांचं आर्थिक, मानसिक शोषण करतात. असे रोज नवववे प्रकार घडतात. यातून खून होतात, बलात्कार होतात, लुटमार होते पण समाज शहाणा होत नाही.

काहीही झालं तरी या भोंदूंचं मार्केट कमी होत नाही. आसाराम बलात्कार करून तुरूंगात गेला तरी त्याचे मार्केट तेजीत आहे. रामरहीमने नंगानाच घातला, कित्येक मुलींवर बलात्कार केले, कित्येकांचे खून केले. त्याला पोलिस पकडायला गेल्यावर त्यांच्यावरही हल्ले केले तरी त्याचं मार्केट तेजीत आहे. अनेक प्राध्यापक, प्राचार्य, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी उच्चविद्या विभुषीत मंडळी या लोकांच्या पायाशी लोळण घेताना दिसते.

हेही वाचा: ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

दांभिक बाबा, दांभिक भक्तही

सगळ्या धर्मात ही बजबजपुरी माजली आहे. माणसं शिक्षणाने शहाणी होतात असं म्हटलं जातं. हा बुवाबाजीचा तमाम बाजार बघता ते पटत नाही. शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध असतो असं वाटत नाही. समाजातला प्रतिष्ठीत वर्ग, वरचा वर्ग या सगळ्यात पुढे असतो.

नेतेमंडळी तर प्रचंड अंधश्रध्दाळू असल्याचं दिसून येतं. सत्तेला चटावलेले हे बोके मेंदू नावाचा अवयव न घेता जन्माला आलेत की काय? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही. सरकारी कामातल्या योजनांवर, सरकारी पैशावर टक्केवारीचा दरोडा टाकणारी ही मंडळी बुवा-बाबांच्या नादी लागून पुजा-पाठ करते, व्रत-वैकल्य करते तेव्हा हसू येतं.

सामान्य लोकांना नाडणारे, पिळणारे, देशाच्या सार्वजनिक संपत्तीला लुटणारे हेच महाभाग भक्तीचा आव आणून बुवा-बाबांच्या भक्तीत तल्लीन होतात. पूजा-पाठ, विधी करतात. खुपच सात्विक असल्यासारखे वागतात, तेव्हा या बुवा-बाबांची आणि त्यांच्या या दांभिक भक्तांचीही किव येते. जेवढे भोंदू बाबा दांभिक तेवढेच त्यांचे भक्तही दांभिक असल्याचं जाणवतं.

समाज अंधश्रद्धेच्या चिखलात

या सगळ्या परस्थितीत सामान्य माणूस भरडला जातो. तो थोरा-मोठ्यांची नक्कल करतो. ते जसं वागतात तसंच तो वागतो. आपला नेताच जर या भोंदूंच्या नादाला लागला असेल तर त्यांचे कार्यकर्तेही या भोंदूंच्या फशी पडतात. त्यात फसतात. त्यांची लुटमार होते. मोठे लोक लुटले तर ते पेलण्याची त्यांच्यात क्षमता असते. पण सामान्य माणूस कोलमडून पडतो, उध्वस्त होतो.

यात आर्थिक, मानसिक शोषण होतंच होतं पण कित्येक वेळा बुवाबाजीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषणही होतं. अशी अनेक उदाहरणं घडतात पण समाजाला शहाणपण येत नाही.

संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात या सगळ्यावर जोरदार प्रहार केले. त्यांनी अभंगातून ही सगळी भोंदूगिरी नाकारली. त्यावर कोरडे ओढले. संत गाडगेबाबांनी हयातभर तेच काम केलं तरीही समाज अजून या भोंदूगिरीच्या तावडीतून का सुटत नाही? समाजाची विवेकबुद्धी का जागी होत नाही? अंधश्रद्धेच्या चिखलातून समाज का बाहेर येत नाही?

हेही वाचा: फेसबुक झालंय ‘बुक्ड’!

महाराष्ट्रात बुवाबाजीचं पीक

अंधश्रद्धेच्या चिखलात रूतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी नरेंद्र दाभोळकरांनी आपलं बलिदान दिलं. भोंदू बुवा-बाबाच्या राष्ट्रीय गँगने त्यांचा गोळ्या घालून खून केला. समाजाचं प्रबोधन करता करता तो माणूस जीवानिशी मेला.

या अंधश्रद्धेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला अजून किती लोकांचे बळी घ्यायचे आहेत? अजून किती लोकांचे मुडदे पाडायचे आहेत? समाज कधी शहाणा होणार? शिकली-सवरलेली माणसं स्वत:ची बुद्धी चालवणार की नाही? शिक्षणाच्या कसोटीवर मेंदू नावाचा अवयव घासत स्वत:चा विवेक जागवणार की नाही?

घरा-घरातला महिलावर्ग या भोंदू बाबांच्या आहारी जात असतो. महिला स्वत: आहारी जातात पण नवरा नावाचा बैलही त्यांच्या दावणीला नेवून बांधतात. असे अनेक बैल बायकोच्या मागे मागे जात बाबांचे भक्त होताना दिसतात. घरा-घरात हेच चित्र आहे. लोक अजिबात विचार करत नाहीत. भुलतात, फसतात आणि परत नशिबाला दोष देत बसतात.

महाराष्ट्राची भूमी ही संताची, प्रबोधनकारांची आणि समाजसेवकांची. त्यांनी या गोष्टी नाकारल्या. आपल्या वाणीतून, कामातून यावर प्रहार केले. समाज पिंजून काढला. आज त्याच महाराष्ट्रात बुवाबाजीचं पिक जाम फोफावतंय. याचं वाईट वाटतं.

दिव्यज्ञान कुठं गेलं?

नऊ जणांच्या कुटुंबाला विष पाजून मारणारी म्हैसाळ इथली घटना आणि मानव गुरू म्हणवल्या जाणाऱ्या चंद्रशेखर अंगडी यांची हत्या या दोन घटना वेगवेगळ्या आहेत. एका घटनेत भोंदू बाबानेच नऊ जणांचा खून केलाय तर दुसऱ्या घटनेत ‘मानव गुरु’चा खून झालाय. या दोन्ही घटनांचा साकल्याने, मेंदू जाग्यावर ठेवून आणि विवेक जीवंत ठेवून विचार केला तर अंधश्रध्देचा बाजार आणि व्यापार लक्षात आल्याशिवाय रहात नाही.

जगाचं कल्याण करणारे, विश्वशक्तीच्या संपर्कात असणारे चंद्रशेखर स्वत:च्या मृत्यूबाबत का सजग झाले नाहीत? दोन व्यक्ती येतात, त्यातला एकजण त्यांच्या पाया पडतो तोवर दुसरा पोटात चाकू मारतो. पाया पडणाराही उठतो आणि चंद्रशेखर यांच्या पोटात चाकूचा वार करतो. दोघेही चंद्रशेखर यांना चाकूचे सपासप वार करत संपवतात.

घटना अतिशय दु:खद आहे. चंद्रशेखर यांची हत्या वाईट आहे. अशी हत्या होवू नये. पण चंद्रशेखर यांचं दिव्यज्ञान या ठिकाणी उपयोगात का आलं नाही? त्यांना या घटनेची चाहूल का लागली नाही? याचा विचार त्यांच्या साधकांनी, भक्तांनी आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या समाजाने जरूर करावा.

हेही वाचा: 

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…