भगवानी देवी: खेळाचं मैदान गाजवणारी ९४ वर्षांची तरुणी

सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्‍ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.

ही कहाणी आहे एका ९४ वर्षीय तरुणीची! भगवानी देवी डागर हे त्यांचं नाव. चेहर्‍यावर सुरकुत्यांचं जाळं. पण उत्साह आणि चिकाटी दुर्दम्य म्हणता येईल, अशी. त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्या जिंकल्यासुद्धा!

फिनलंडच्या रटिनान इथं २९ जून ते १० जुलैदरम्यान पार पडलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमधे १०० मीटर स्प्रिंट अर्थात वेगात चालणं प्रकारात भगवानी देवी यांनी बावनकशी सोनेरी कामगिरी बजावली आणि सार्‍या देशाने त्यांना अदबीने सलाम केला. ही स्पर्धा १९७५ला सुरू झाली आणि ३५ पेक्षा जास्त वय असलेले खेळाडूच त्यात भाग घेऊ शकतात.

९४ वर्षीय तरुणीचा विक्रम

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, कोणतीही व्यक्‍ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. काहींना जास्त अंतर चालणंही जमत नाही. भगवानी देवींना मात्र थकणं कशाला म्हणतात, हे माहीतच नाही.

ज्येष्ठतेच्या सगळ्या निकषांना टाटा करत त्यांनी १०० मीटर अंतर अवघ्या २४.७४ सेकंदात पार केलं. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शंभर मीटरचं अंतर जोशात पार केल्यानंतर त्यांनी गोळाफेक प्रकारातही भाग घेतला. तिथंही त्यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली. पाठोपाठ थाळीफेकीत त्यांनी आणखी एका कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.

या स्पर्धेत त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी वयाचे अ‍ॅथलिट पदक जिंकण्याच्या ऊर्मीने उतरले होते. पण भगवानी देवी यांनी सुसाट धाव घेत सर्वांना मागे टाकलं. त्यांच्या रूपाने जणू लयबद्ध धावणारं हरणच मैदानात अवतरलं होतं. एकाच धडाक्यात त्यांनी तीन पदकं जिंकली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचं अपार कौतुक सुरू झालं. आजही त्यात खंड पडलेला नाही.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

प्रेरणादायी कामगिरी

त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्‍वासाला लोकांनी भरभरून दाद दिली आहे. एवढंच नाही, तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा खात्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचं विशेष अभिनंदन केलंय.

मंत्रालयाने लिहिलं, ‘भारतातल्या ९४ वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, वय फक्‍त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकलं, ही खरोखर प्रेरणादायी कामगिरी आहे.’ जगभरातल्या क्रीडा स्पर्धांमधे भारतीय तरुण आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना, भगवानी देवीही वाढत्या वयाला वाकुल्या दाखवून, आता त्याच मालिकेत चमकू लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, चेन्‍नई इथं झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदकं जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमधे प्रवेश मिळवला. त्याआधी दिल्ली राज्य अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिपमधे १०० मीटर चालणं, भालाफेक आणि गोळाफेकीत एक नाही, तर तब्बल तीन सुवर्णपदकं जिंकली होती. अर्थात, हे यश त्यांना साडे-माडे-तीन अशा पद्धतीने  मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीला जबरदस्त इच्छाशक्‍तीची जोड दिली आणि त्यानंतर त्यांनी यशोशिखर गाठलं.

फिनलंडमधे दोन पदकं जिंकल्यानंतर भगवानी देवी डागर यांचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. हे द‍ृश्य पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले कारण आपल्या कौतुकासाठी एवढ्या प्रचंड संख्येने चाहते उपस्थित असतील, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मग कुणीतरी ढोल आणला आणि आजींनी त्या ठेक्यावर विमानतळावरच झिंगाट डान्स केला. घरी निघताना आपल्या सगळ्या चाहत्यांना त्या मनोमन धन्यवाद द्यायला विसरल्या नाहीत.

नातवाची आजीला प्रेरणा

भगवानी देवींचा नातू विकास डागर हा पॅराअ‍ॅथलिट असून, त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आलंय. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदकं जिंकून आपणही कमी नसल्याचं दाखवून दिलंय.

खरं सांगायचं, तर भगवानी देवी यांनी आपल्या नातवापासूनच क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्याची प्रेरणा घेतली. विकास जेव्हा विविध स्पर्धांत पदकं जिंकायचा, तेव्हा त्याच्यासारखीच कामगिरी आपण का करू शकत नाही? असा प्रश्‍न त्यांना सतत पडत असे. त्यामुळेच त्यांनी वयाची नव्वदी पार केल्यानंतर चक्‍क अ‍ॅथलिट होण्याचा निर्णय घेतला.

घरातल्या लोकांना त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवला, तेव्हा कोणीच ही गोष्ट गंभीरपणे घेतली नाही कारण ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पाहत होत्या. त्यांच्यातली ही जिंकण्याची ऊर्मी नातू विकास याने ताडली.

फिनलंडमधली स्पर्धा जवळ येऊ लागली, तसतसं विकासने आपल्या आजीला त्यासाठी विशेष प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. त्यामुळे भगवानी देवी यांनाही पदकांची खुणावू लागली. अखेर तो दिवस आला आणि त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने अभूतपूर्व कामगिरी बजावली. तीन आंतरराष्ट्रीय पदकं खिशात टाकून त्या चालत्या-बोलत्या परिकथा बनल्या.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

कुटुंबाच्या अभिमानाची गोष्ट

१९२८ला हरियाणातल्या खिडका या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या भगवानी देवी यांचं बालपण हलाखीत गेलं. त्यांचं फारसं शिक्षणही झालं नाही. याचं कारण म्हणजे, लहान वयातच त्यांच्या पालकांनी त्यांचं लग्न लावून दिलं. पतीचं अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली; मात्र त्या डगमगल्या नाहीत. कठीण परिस्थितीला त्यांनी आपल्यापुढे वाकायला लावले.

त्यांना हवासिंह नावाचा मुलगा असून, त्या दिल्लीतल्या नजफगढ भागात वास्तव्य करून आहेत. मुलगा, सून, नातवंडं असा त्यांचा मोठा परिवार आहे. डागर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला भगवानी देवी यांच्या कामगिरीचा अभिमान नाही, तर गर्व आहे. एवढी असामान्य कामगिरी बजावूनही भगवानी देवी यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.

युवा पिढीपुढे आदर्श

भगवानी देवी यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. रोज किमान तीन किलोमीटर चालणं आणि त्यानंतर इतर व्यायाम करून त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवलंय. दिल्ली आणि चेन्‍नईतल्या स्पर्धांमधे पदकं जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला. जोडीला नातू विकास याच्याकडून टिप्स घेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न पाहिलं.

विकास यालाही आपल्या आजीच्या मेहनतीबद्दल शंभर टक्के खात्री होती. त्यानेच आजीला प्रोत्साहन दिलं. इथं हेही सांगितलं पाहिजे की, नातू विकास याची अनेक विक्रम, पदकं पाहून अवघ्या वर्षभरापूर्वी भगवानी देवी यांनी प्रेरणा घेतली. ‘हम भी कुछ कम नही’ हे सिद्ध करण्याचा ध्यासच त्यांनी घेतला होता.

त्यांनी सुरवात केली तीच मुळी विश्‍वविक्रम रचण्याच्या हेतूने. त्यात त्यांना काही शतांश सेकंदांनी अपयश आलं. मात्र, राष्ट्रीय विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. यश आणि वय यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो, हे सप्रमाण सिद्ध केलेल्या भगवानी देवी यांनी आजच्या युवा पिढीपुढे आगळा आदर्श ठेवला आहे, यात शंका नाही.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा ‘षटकार’

हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…