आंतरिक ऊर्मीचा साक्षात्कार घडवणारी कविता

मनीषा सबनीस यांच्या ‘ऊर्मी’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.

कविता वाचणं, कविता जाहीर सादर करणं हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कवितांविषयी जाहीर बोलण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. एकदा वाचून चटकन संपवावा किंवा प्रत्येक दोनचार ओळींनंतर ‘वा क्या बात है!’ अशी खुली दाद देत देत रिचवावा असा हा संग्रह नाही.

एकेक कविता सावकाश तीनचार वेळा वाचून हळूहळू आत मुरत जाताना अनुभवावा अशाच या सर्व कविता आहेत. काही क्वचित ठिकाणी थोडी कविता लांबलीय का? असं वाटतं पण ती भावना फार काळ टिकत नाही. पाहता पाहता या कविता तुमचा ताबा घेतात.

बंडखोरीच्या प्रश्नांचं आशयसूत्र

कातरवेळ या पहिल्याच कवितेत प्रकटणारी अधीरता, अस्वस्थता संग्रहभर अधूनमधून जाणवत राहते, पण ती सोबत जगण्यातले विविध पैलू घेऊन येते. ही कविता सहज लिहिली गेलेली नाही. ती अनुभवसिद्ध असावी, जी टप्प्याटप्प्याने अधिक प्रगल्भ होत जातेय. एलिसबाबाचं बोट धरून ती जगण्याचा स्वीकार सांगते. स्पर्शानं मृदावणारं आणि शब्दानं चेतवणारं स्त्री पुरुषाचं नातं कवयित्रिला उमगलंय.

मला त्यांची ही कविता आजच्या काळाची कविता वाटते. विखंडीत जगण्यातलं सूत्र शोधणारी वाटते. भोगलेल्याची उकल करणारी चावी वाटते. तशीच त्यांची कविता जगण्याचा कल्लोळ अधिक गडद करून काहीशा गूढाकडे नेणारीही वाटते. या कवितांमधून प्रवाहीत होणार्‍या विचाराला चिंतनाची डूब आहे. चिकित्सेची जोड आहे. अन्न-वस्त्र-निवारा, उपजीविकेचं साधन मिळालं की जगणं बाह्य रुपाने स्थिरस्थावर होतं पण आंतरिक ऊर्मी उचंबळून येतच असते.

प्रत्येकाच्याच मनात या ना त्या प्रकारची बंडखोरी असते का? असा प्रश्न मला नेहमी पडतो. फक्त तेवढाच नाही तर जगण्याला, नात्याला, संबंधाना जोडून इतरही अनेक प्रश्न माझ्या मनात वारंवार उफाळून येत असतात. त्या प्रश्नांचं आणि कवितेतल्या आशयसूत्राचं गोत्र एकच आहे असंही मला जाणवतं म्हणूनच या कविता मला माझ्या खूप जवळच्या वाटतात. तशाच त्या इतरांनाही वाटतील याची मला खात्री आहे.

हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

नात्याच्या कवितेतला आनंदयात्री

या कविता टप्प्याटप्प्याने वाचत गेलो आणि समोर नात्याच्या कविता आल्या. या प्रांतात अनुभवदृष्ट्या मी तसा नवखा आहे आणि इथे कवितेत अठ्ठावीस वर्षांचं मुरवलेपण आहे. देह, संबंध, नातं, तृप्ती, समाधान या सगळ्याचाच गोफ विणणारा आनंदयात्री कवितेत सापडतो तेव्हा त्याला कडकडून भेटावंसं वाटतं, पण त्या आधी,

‘पण खरं सांगते सख्या मला वाटतात अभागी,
एकाच विषयाची प्रश्नपत्रिका
पुन्हा पुन्हा सोडवणारे नापास विद्यार्थी’

या ओळी खटका पडल्यासारख्या मला अडवतात. कवयित्री एका तत्वज्ञानाचा पैल दाखवू पाहते आणि कवितेची वाट बदलते. रोजच्या आयुष्यातली प्रतीकं, रूपकं वापरुन आपलं म्हणणं अधिक ठाशीव करत जाते.

आयुष्याचं वळण आखणाऱ्या कविता

संग्रहाच्या मध्यावर पोचतापोचता बाईपण आणि शून्य, दरवळ, निरोप, प्रकृती-पुरुष या कविता येतात. या कविता मध्यावर येणे हा योगायोग आहे की हे जमवून आणलंय याची मला कल्पना नाही. पण संग्रहाच्या या टप्प्यावर या कविता वाचताना मला असं वाटलं की पुढे आयुष्यात ज्या वळणावरून मला चालायचंय, त्यावरच्या खाचाखोचांचं पुरतं भान मला या कविता करून देतात.

कदाचित या वळणवाटा ज्यांनी ओलांडल्या आहेत त्यांना या कविता वाचताना त्यांच्या जगण्यातलं किंवा बघण्यातलं काही वाचतोय असं वाटेल.

‘त्याचा माणूस होण्याची आणि माझ्या-त्याच्या मधल्या माणसाची दोस्ती होण्याची मी वाट बघतेय,’

‘पुरुष-प्रकृती’ या कवितेतल्या ओळी वाचताना थोडं थांबून कवयित्री नेमकं काय म्हणू पाहतेय ते समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

प्रत्येक कवितेत आंतरिक ऊर्मी

आतली बंडखोर ऊर्मी उसळी मारत राहते असं मी म्हणालो त्याचं प्रत्यंतर ‘आर्त’ या कवितेतल्या या दोन ओळीत येईल,

‘फालतूचे संयम सारे प्रत्यक्षात व्यर्थ!’

एक सणसणीत चपराक मारण्यासाठी अवाढव्य किंवा धिप्पाड असावं लागत नाही, तर त्यासाठी लागते ती आंतरिक ऊर्मी जी या संग्रहातल्या प्रत्येक कवितेत ठासून भरलीय.

‘सुरू झाली आता आयुष्याची भैरवी, माझ्या आत पण आत्ता उमलतीये नांदी’

या ओळींमधे उत्साह आहे का? खिन्नता नक्की नाही, पण निरोपाची तयारी झालेली नाही याची नक्की जाणीव आहे आणि बाईला पुढचा जन्म चुकलेला नाही याची जाण. तसंही एकाच जन्मात कितीतरी जन्म बाई जगत असते, भोगत असते, उपभोगत असते.

सामावून घेणारी कविता

सगळं भोगणं, उपभोगणं, जीवनाचा रसास्वाद, अधूनमधून टोचत राहणारी बोच, नाती, त्यांची एकमेकांत गुंतलेली टोकं या सगळ्याची निःशेष उकल करण्याच्या मागे न लागता मनीषा सबनीस यांची कविता या सगळ्याला स्वतःत सामावून घेऊन आणि तरीही त्रयस्थपणे सगळ्याकडे एका विशिष्ट उंचीवरून पाहते.

कधी हळवी होते, कधी आतून बाहेरून पेटून उठते. एक ठिणगी टाकते. पण ती जाळत जाणारा वणवा नक्की नाही. असहमती आहे पण बंडाचा उगरलेला झेंडा नाही. विरोध आहे, द्वेष नाही. असं बरंच काही असूनही नसणारी ही कविता तुम्हाला आतल्या उर्मीचा साक्षात्कार नक्की घडवते.

हेही वाचा: 

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या, पण यात नक्की फायदा कुणाचा?

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…