मराठी माणसाच्या डोक्यावरची काळी टोपी कुणी झटकायची?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त भूमिकेवरून कायमच चर्चेत असतात नुकतंच एका कार्यक्रमात ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी विचारला. यावरून वाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी माफीही मागितलीय. पण त्यांची ही खोड जिरणार कधी?

‘मुंबई फक्त आमचीच’ असं मराठी लोकांनी कधीही म्हटलेलं नाही. पण ज्यांना मुंबई ही धर्मशाळाच वाटते, ते नानाप्रकारे मराठींना डिवचत असतात. मुंबईत जन्म घालवायचा, इथल्या मराठी मुलीशी लग्न करायचं, मुंबईतल्या मराठी मतांवर निवडून येऊन वर आम्ही भाषिक अल्पसंख्य आहोत, असं म्हणत मराठी भाषेवर, मराठी माणसावर कुरघोड्या करण्याचे नीच डाव महाराष्ट्राला नवीन नाहीत.

अशांना आमदारक्या, खासदारक्या, बरोबरच मंत्रिपदंही मिळतात. पक्ष नेत्यांना पैसा आणि मोटारी पुरवल्या की अशांना मराठी माणसाच्या तोंडावर थुंकत मुंबईत मिरवता येतं, ही गोष्ट एकदा नाही, तर अनेकदा दिसलीय. अशांना कधी रजनी पटेल, कधी मुरली देवरा, मुकेश पटेल, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा, संजय निरुपम यांच्यासारखा अमराठी तारणहार गवसतो.

वादाच्या भोवऱ्यातले राज्यपाल

या साऱ्यांना मागं टाकण्याचं काम राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेली तीन वर्षं करतायत. ‘मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,’ असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न त्यांनी एका कार्यक्रमात विचारला. तो वादग्रस्त ठरला. राज्यपालांना अनाठायी वाद निर्माण करून क्षमायाचनेचं शेण खाण्याची खोडच असावी.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘रामदास स्वामी गुरू नसते, तर शिवाजी छत्रपती झाले असते का?’ असा प्रश्न उपस्थित करून शब्दांचा यथेच्छ मार खाल्ला. हा वाद शमत नाही, तोच पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमात ‘जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला, तेव्हा त्यांचं वय १३-१२ वर्षांचं होतं. ये उमर मे बच्चे लोग क्या करते है?’ असा प्रश्न विचारून राज्यपालांनी वाद ओढवून घेतला होता.

हेही वाचा: यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

सतत वादग्रस्त भूमिका

अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधल्या इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांनी या हॉस्टेलला वीर सावरकर यांचं नाव द्यावं, अशी सूचना केली. राज्यपाल हे राज्यातल्या सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपतीही असतात. त्यांच्या सूचनेचा मान राखायचा असतो. पण त्यांच्या या सूचनेला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला.

छात्रभारतीच्या रोहित ढालेच्या नेतृत्वाखाली आंदोलनही झालं. त्याचं म्हणणं, ‘सावरकरांचा हॉस्टेल व्यवस्थेशी संबंध काय? भारतात विद्यार्थी हॉस्टेल व्यवस्थेचा पाया कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी रचला. त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरु आहे. हे लक्षात घेऊन शाहूराजांचं नाव मुंबई विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेलला देणं उचित ठरेल.’

विद्यार्थी संघटनांचा हा आग्रह योग्य आहे. शाहूराजांनी गरीब-कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मांडलेला हॉस्टेलचा मोठा पसारा आजही कोल्हापूरच्या दसरा चौक परिसरात पाहायला मिळतो. मराठी-अमराठी अशी भांडणं लावून देणाऱ्या राज्यपालांनी मराठींमधेही जमेल तिथं भांडण लावण्याचा, फूट पाडण्याचा हलकटपणा केलाय. ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपने जितक्या कारवाया केल्या त्यालाही हातभार लावला.

केंद्र सरकारसाठी पेंद्यागिरी

राज्यपाल हे संविधानात्मक पद आहे. ते राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतात. संविधानानुसार राज्यकारभार चालतो की नाही, ते पाहण्याची व त्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवण्यापुरतीच त्यांची मर्यादित जबाबदारी आहे.

पण मोदी-शहा सरकारच्या आजवरच्या कार्यकालात भाजपविरोधी राज्य सरकारना अडचणीत आणण्यासाठी राज्यपालांचा वापर केला जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. सत्तेच्या वाटा अडवणारी ही पेंद्यागिरी राजकारणापुरती ठीक आहे.

ती मराठी माणसाचा अपमान करणारी ठरणार असेल, तर ह्या आगाऊपणाला विरोध हा होणारच! तसा राज्यपालांच्या ताज्या विधानावर झाला. त्यावर त्यांनी ‘असे बोलून माझ्याकडून चूक झाली. राज्यातील जनतेने विशाल अंतःकरणाने क्षमा करावी,’ अशी माफी मागितलीय.

ही क्षमायाचना विस्मरणात जाण्यापूर्वीच राज्यपाल मराठींची नवी खोड काढतील आणि आपला खोडसाळपणा दाखवतील, याची खात्री असावी. पण त्याने इतिहास आणि वर्तमान बदलत नाही. 

हेही वाचा: आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

इतिहास आणि वर्तमान

मराठींनी जी मुंबई ५ वर्षांचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन महाराष्ट्रात राखली, ती आर्थिक राजधानीच्या मोहापायी नाही. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार मुंबई मराठी भाषिक प्रदेशात आलीय. ती सर्वांची आणि सर्वांसाठी आहे, पण ती मराठी भाषिक महाराष्ट्राची आहे. हा इतिहास आहे! त्यात १०६ जणांचे हौतात्म्य आहे.

वर्तमान मात्र भयाण आहे. काळ हा घोड्यासारखा असतो त्यावर हुकमतीने स्वार झालात, तर तो तुमचा होतो. तुम्हाला पाहिजे तिथे पोचवतो. अन्यथा फरफट अटळ असते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठींनी जिंकला. मुंबईसह मराठींचा महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. पण लगाम कुणाच्या हाती राहिला?

काँग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद देवरा, सोमय्या, लोढा, संजय निरुपम यांच्याकडे द्यावंसं वाटतं, यातच या प्रश्नाचं उत्तर दडलंय. आज आर्थिक उलाढालीचं एकतरी क्षेत्र मराठी माणसाच्या ताब्यात आहे का? मोठे व्यवसाय जाऊ देत. मच्छी विक्री वा फळ-फूल-भाजी बाजारातील पारंपरिक हक्काचे धंदेही मराठींच्या हातून निसटलेत. औद्योगिकीकरण, शिक्षण, सहकार यातून असंख्य कुटुंबांना आर्थिक स्वस्थता लाभलीय. पण सामाजिक व मानसिक प्रगतीचं काय?

मराठींची खुंटलेली मानसिकता

अस्पृश्यता संपली पण जातीधर्माचा अहंकार माजत चाललाय. ६०-७० वर्षांपूर्वी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यासारखे संत भक्तीच्या माध्यमातून अंधश्रद्धांचं निर्मूलन करीत होते. खचलेल्यांना जगण्याचं बळ देत होते. आज श्रद्धावंतांवर अंधश्रद्धांचा संस्कार करणाऱ्या स्वयंघोषित परमपूज्य सद्गुरू मंडळींचा आणि टीवी मालिका, सिनेमांचा सुळसुळाट आहे.

विज्ञान आहे, पण त्यासोबत कॉम्प्युटर-लॅपटॉपचा प्रारंभ नारळ फोडून करणारं अज्ञानही आहे. धनाची श्रीमंती आहे, तशी ज्ञानाची गरिबीही आहे. नामवंत सज्जनाला निवडणूक उमेदवारी स्वीकारण्यासाठी राजकीय नेत्यांनी विनंती करण्याचे दिवस खूप मागे पडलेत. सध्या उमेदवारीसाठी ‘फिक्सिंग’ करण्याचे दिवस आहेत. पूर्वी राजकारणी लोक गुंड पाळायचे. आता गुंडच राजकारणी पाळतात. पोलीस, न्यायाधीश, तुरुंगाधिकारी, पत्रकार, कलाकारांना विकत घेऊ शकतात.

भ्रष्टाचाराने तर प्रसूतिगृहापासून ते स्मशानापर्यंतच्या जीवनप्रवासाला स्पर्श करणारं एकही क्षेत्र सोडलेलं नाही. डोळे दीपवणारी प्रगती महाराष्ट्रात खूप झालीय, तरीही पाऊल टाकताच मराठी माणूस अडखळत असेल, तर कोश्यारींसारखे खोडसाळ राज्यपाल मराठींच्या डोक्यावर आपली ’काळी टोपी’ झटकणारच ना?

हेही वाचा:

दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’

सदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्रः नवं राज्य जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठीच

यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्र: भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…