फुलटायमर : गॉर्कीच्या आईचा मराठी अवतार

कम्युनिस्ट पक्षाचे जालना जिल्ह्यातले कार्यकर्ते अण्णा सावंत यांचं फुलटायमर हे आत्मकथन लोकवाङ्मय गृहनं प्रकाशित केलंय. खरं तर हे एका चळवळीचं, प्रामाणिक आणि तळमळीच्या कार्यकर्त्याचं आत्मकथन आहे. कम्युनिस्ट कार्यकर्त्याचं इतकं तपशीलवार चित्रण मराठीत इतरत्र कुठ नसावं. त्या दृष्टीनं हे पुस्तक मराठी वाचकांसाठी अनोखं आहे. यावर भाष्य करणारी इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट.

जालन्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते अण्णा सावंत यांचं फुलटायमर हे आत्मकथन मला अनेक अर्थानं आवडलं. एक तर ते मराठवाड्यातल्या माणसानं लिहिलेलं असल्यामुळे त्यात हा मराठवाड्याचा भाग येतो. ओळखीचा प्रदेश, ओळखीची माणसं इथं भेटतात. आणि त्याच माणसांची नवी ओळख होते.

जालना म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर यायचं त्यात हे काहीच नव्हतं. या पुस्तकाच्या वाचनातून मला जालन्याची नवीच ओळख झाली. अण्णा सावंत हे नावही प्रथमच मनावर कोरल्या गेलं. प्राचार्य डॉ. गजानन जाधव, सुनील केंद्रेकर, गणेश चौगुले या नेहमीच्या माणसांची नवी ओळख इथं झाली.

शिवाय अण्णा सावंत यांचं जरी हे आत्मकथन असलं तरी त्यात स्वतः अण्णा सावंत कमी येतात. खरं तर हे एका चळवळीचं आत्मकथन आहे. कम्युनिस्ट चळवळ मला जितकी समजली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला या पुस्तकाच्या वाचनातून समजली. हे एका प्रामाणिक आणि तळमळीच्या कार्यकर्त्याचं आत्मकथन आहे.

निष्ठावान माणसाचं आत्मकथन

हातचं काहीच राखून न ठेवता तो चळवळीसाठी जीव तोड काम करतो. इतर लोक अंग चोरून काम करतात तर अण्णा झोकुन देऊन काम करतात. जीवाची, भविष्याची कधीच परवा करत नाहीत. वडील, आईच्या निधनप्रसंगीही ते आंदोलनामुळं तिथं उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी बायकोला कधी वेळ दिला नाही. पुढं मुलं आणि नातवंडाकडेही लक्ष देता आलं नाही.

रात्रंदिवस त्यांना एकच ध्यास होता आणि तो म्हणजेच चळवळीचा. आणि एक दिवस पक्षही त्यांच्यावर चौकशी समिती नेमतो. पण अण्णांची पक्षनिष्ठा आणि सामान्य माणसाविषयीचा कळवळा तसूभरही कमी होत नाही. कारण ‘बुडती हे जन । न देखवे डोळा । तेणे कळवळा । येत आहे’ ही घराण्यातून लाभलेली वारकरी परंपरा युगधर्मानुसार खऱ्या अर्थानं पुढं चालवणारा हा एक आधुनिक वारकरीच म्हणावा लागेल. 

हे पुस्तक वाचल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा जसा सर्वसामान्यांना नव्यानं परिचय होतो तसाच कम्युनिस्टांनाही त्यांचा त्यांना नव्यानं परिचय होईल, असा आरसा या प्रामाणिक आत्मकथनानं त्यांच्यासमोर धरलेला आहे. कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पक्षाच्या, चुकाही अण्णा त्यांच्या पदरात घालतात. हा धीटपणा त्यांचं नाणं खणखणीत असल्यामुळंच त्यांच्याकडं आलेला आहे.

असं असलं तरी पक्षाची परवानगी घेऊनच त्यांना हे आत्मकथन प्रकाशित करावं लागलेलं आहे. कारण ते काही कुणा माजी कम्युनिस्टाचं आत्मकथन नाही. अजूनही पक्षावर तितकीच निष्ठा असणाऱ्या माणसाचं ते आत्मकथन आहे. पक्षानंही उदारपणे त्याला संमती दिलेली आहे. इतकच नाही तर पक्षाच्या वतीनेच चालवल्या जाणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेच्या वतीनं ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे.

हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

पक्षांचा विस्तार, सामान्यांचं हित

न पटणाऱ्या गोष्टींना अण्णा घरापासूनच विरोध करायला सुरवात करतात. अगदी लहानपणापासून गावात आंबेडकर जयंती साजरी करणं, गुराख्यांची रात्र शाळा सुरू करणं, अस्पृश्यांनाही रेशनची साखर मिळावी म्हणून भांडणं या गोष्टींना त्यांना घरातूनही कधी पाठिंबा नव्हता. तरी नेटानं त्यांनी या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रामाणिकपणाचा अप्रामाणिक माणसांना त्रास होत होता. म्हणून साहजिकच ते अण्णांचे वैरी होत होते. मग ते घर असो, गाव असो, समाज असो, की संघटना, चळवळ असो. सगळीकडं त्यांच्या वाट्याला प्रेमाइतकंच वैरही आलं. किंबहुना वैर काकणभर जास्तच वाट्याला आलं. ज्यांच्यासाठी सगळा जीव जाळला तेही कधी कधी वैरी होऊन बसले.

बरं लेखकाला श्रेय न घेण्याची, अलिप्त राहण्याची सवय इतकी की इतकं सगळं करूनही, कधीही, कुणाकडूनही, काहीही अपेक्षा त्यांनी केलेली नाही. आत्मचरित्र म्हटल्यावर त्यात खंडीभर फोटो असतातच. निदान आई-वडील, नेते, मार्गदर्शक, आदर्श, गुरु यांचे तरी फोटो असतातच. इथं ते तर नाहीच नाही पण मलपृष्ठावरही लेखकाचा साधा फोटोही नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचं कर्तृत्व लक्षातही येत नाही. झाकून राहतं.

जालन्यात पक्षाचं कार्यालय झाल्याशिवाय स्वतःचं घर बांधायचं नाही असली वेडी प्रतिज्ञा हा माणूस करतो आणि ती शेवटाला नेतो. नोकरीवाली बायको मिळाल्यावर पक्षाकडं फारसा निधी नाही म्हणून मिळणारं नाममात्र मानधनही घ्यायचं नाकारतो. याउलट पक्षाकडं गंगाजळी कशी निर्माण होईल यासाठी धडपडत राहतो.त्यामुळंच ते स्थानिक, प्रादेशिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांच्या, लोकांच्या चुकांची चर्चा मोकळेपणानं करू शकतात. त्यांच्यासमोर एकच ध्येय, पक्षांचा विस्तार आणि सामान्यांचं हित.

पक्षाच्या कामासाठी सायकल फेऱ्या

रक्तात सरंजामदारी मुरलेल्या मराठा समाजात जन्माला येऊनही अण्णा उपजतच समाजवादी, समतावादी, कठोर विचारनिष्ठावादी होतात. हीच मुळात आश्चर्याची गोष्ट. खरंतर शेतीत रस असलेला हा माणूस. शेती करत पक्षाचं काम करूयात म्हणजे पक्षावर आपला बोजा पडणार नाही असं ठरवतो. पण पक्ष जेव्हा जालन्याची आणि वेगळी जबाबदारी देतो तेव्हा तीही तेवढ्याच प्रामाणिकपणानं लेखक निभावतो. पुढं किसान सभेची जबाबदारी मिळाल्यावर, त्याला शेतीशी संबंध येणार याचा आनंदच होतो. तिथेही तो आपलं काम वाढवत नेतो. पण पक्ष पुन्हा जबाबदारी बदलून देतो.

ही सगळी कामं पायपीट करतच अण्णा करतात.पुढे त्यांची ही पायपीट पाहून एक स्थानिक कामगार नेताच त्यांना सायकल घेऊन देतो. पुढे आणखी कामं वाढतात पण तरीही सायकल पळवतच सावंत ती काम करतात. मग कामगारांनाच त्यांची दया येते. ते लुना घेऊन देतात. पक्षाच्या कामासाठी अण्णा पुढं चालून तीही विकतात. नंतर पक्षच गाडी घेऊन देतो आणि इंधनासाठी पैसे देतो. जालन्याला जागा घेऊन अण्णा पक्षाचं कार्यालय उभं करतात त्याचा प्रत्येक तपशील वाचण्याजोगा आहे. ते पूर्ण झाल्याच्या नंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून झालेल्या कौतुकानं त्यांना पूर्ण भरून पावल्यासारखं वाटतं.

किसान सभेची जागा शेतकरी संघटना घेते,कामगार संघटनेची जागा शिवसेना घेते, तेव्हा सावंतांचा जीव तळमळतो. धर्मावर टीका केल्यामुळं असं होतं का? असं सावंतांना वाटतं. पण सावंतांना वाटतं आपण लोकांचं प्रबोधन करण्यात कमी पडतो. पक्षानं प्रबोधनाकडं लक्ष दिलं पाहिजे.

हेही वाचा: तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

आत्मकथनात जिवंतपणा, खरेपणा

कम्युनिस्ट कार्यकर्त्याचं इतकं तपशीलवार चित्रण मराठीत इतरत्र कुठ नसावं, असं मला वाटतं. त्या दृष्टीनं हे पुस्तक मराठी वाचकांसाठी अनोखं आहे. तसा उल्लेख स्वतः पक्षाचे एक नेते भालचंद्र कांगो या पुस्तकाच्या प्रस्तावनेत करतात. हे पुस्तक वाचताना मला सतत मॅक्झिम गॉर्कीची आई ही कादंबरी आठवत होती. लेखकावर त्या कादंबरीचा प्रभाव असणारच. प्रत्येक लढ्याचं अगदी तपशीलवार चित्रण गॉर्कीच्या आईसारखंच इथंही आलेलं आहे.

हे आत्मकथन असलं तरी त्याला कादंबरीचंच रूप प्राप्त झालेलं आहे. कोणतीही गोष्ट सावंत रुक्षपणे सांगत नाहीत. प्रसंग, संवाद, भाषा यांची नीट मांडणी करूनच ते सगळं लेखन करतात. इथं उत्कटता आहे, उत्कंठा आहे आणि लालीत्यही या लेखनात आहे. ललित वाङ्मयाचे सर्व गुण या लेखनात आहेत. भाषा साधीच पण अत्यंत वाचनीय झालेली आहे.

आवश्यक ते सर्व तपशील लेखकाला संवाद, तारखेसह आठवतात. त्यामुळं त्यात जिवंतपणा आणि खरेपणा आलेला आहे. हे पुस्तक एकदा वाचायला घेतलं की हातातलं सोडवत नाही. तहानभूक विसरायला लावतं. वाचकाला अक्षरशः ओढत नेतं हे लेखन.

लहानपण घेऊन आत्मपरीक्षण

सतत आत्मपरीक्षण हा या लेखकाचा एक फार मोठा गुण आहे. लेखक वेळोवेळी आत्मपरीक्षण करतो. चळवळीचं, समाजाचं, पक्षाचंही त्याचं आत्मपरीक्षण सतत सुरूच असतं. त्यामुळं तो सतत अस्वस्थ आणि तळमळत असतो. स्वतःकडं सतत लहानपण घेत राहतो. चळवळीतलेच लोक खलनायकासारखं वागतात, पक्ष चौकशी समिती नेमतो, इतर पुरोगामी चळवळीतले लोक चेष्टा करतात, मत्सर करतात, तरी लेखक स्वतःकडं लहानपण घेऊन आत्मपरीक्षणच करत राहतो.

लेखक पक्षाच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करायला सांगतो. धीटपणे स्वतःतल्या, चळवळीतल्या, नेत्यांमधल्या, पक्षामधल्या आणि पटणाऱ्या गोष्टी बैठकामधून सांगत राहतो. काही सहकारी पक्ष सोडून जातात पण लेखकाची निष्ठा आढळ राहते. पक्षातलेच सहकारी सतत भवितव्याचा विचार करून काही गोष्टी करायला सांगतात पण लेखक त्याकडं कायम दुर्लक्ष करून स्वतःला सतत कामात झोकून देत राहतो.

पुस्तकाची सुरवात लॉकडाऊनच्या काळात जालण्याजवळच झालेल्या रेल्वे अपघातात, रुळावर झोपलेल्या कामगारांच्या मृत्यूतांडवाने होते. तिथून फ्लॅशबॅक पद्धतीने लेखक पक्ष कार्यात सक्रिय झाल्यापासूनची कहाणी सांगतो. मध्यंतरी पुन्हा दोन-तीन वेळा फ्लॅशबॅकच्या पद्धतीनंच लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या गावातल्या लहानपणापासून पुढं विद्यापीठातलं शिक्षण, तिथला विद्यार्थी चळवळीतला सहभाग या गोष्टी येतात.

१९८० ते ८५ सावंत औरंगाबादेत असतात. नंतर जालन्याला येतात. नेमका त्याच वेळी मी शिक्षणासाठी औरंगाबाद इथं जातो. त्यांनी उल्लेख केलेली सगळी माणसं नंतर वेगवेगळ्या निमित्तानं मलाही पाहायला मिळतात, भेटतात. त्यांचे चळवळीतले सहकारी आदिनाथ इंगोले तर माझ्यासोबत वस्तीगृहातही होते. डॉ.अशोक गायकवाड त्यांच्याकडं नेहमी यायचे. हे पुस्तक वाचताना मला ते सगळं आठवत होतं आणि मी वाचनात अधिकच रंगून जात होतो.

पुस्तकाचं नाव : फुलटायमर
लेखक : अण्णा सावंत
प्रकाशन : लोकवाङ्मय गृह, मुंबई
पानं : ३१०
किंमत : ३२५/-

हेही वाचा: 

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…