झुलन गोस्वामी : तुफान एक्स्प्रेसची रिटायरमेंट

इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.

खेळाडूच्या जीवनात रिटायरमेंटचा क्षण कधी ना कधीतरी येत असतो. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच रिटायर होणं, हा नेहमीच आदर्श निर्णय मानला जातो. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेली झुलन हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून रिटायर होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमधे भारतीय टीम इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात लॉर्ड्स मैदानावर होणारा सामना हा तिच्या कारकिर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

तिची सहकारी मिताली राज हिने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलीय. भारतीय महिला क्रिकेटसाठी या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंची उणीव निश्चितपणे जाणवणार आहे. तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठीच या दोन्ही खेळाडूंनी योग्य वेळीच आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या मर्यादा ओळखल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलीय. तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळावी अशीच यांची क्रिकेट कारकीर्द झाली आहे, त्यामुळेच की काय, या दोन्ही खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमा निर्माण करण्यात आले आहेत.

झुलनची अतुलनीय कामगिरी

लहानपणी मुलांबरोबर एखादी छोटी मुलगी क्रिकेट खेळायला आली, तर तिची टिंगलटवाळी केली गेली. ‘क्रिकेट हे तुझं काम नाही. तू घरी जाऊन तुझ्या आईला घरकामात मदत कर किंवा सागरगोटे खेळत बस.’ असे सल्ले तिला अनेक वेळा ऐकायला मिळत. डायना एडलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी इत्यादी अनेक खेळाडूंनी महिलाही चांगल्या क्रिकेटपटू म्हणून नाव कमावू शकतात, हे दाखवून दिलं तरीही अनेक वेळा क्रिकेट खेळण्यावरून मुलींची उपेक्षा आणि अवहेलनाच केली जाते. झुलन त्याला अपवाद नाही.

लहानपणापासूनच कमालीची जिद्दी असलेल्या झुलन हिने क्रिकेटमधेच करिअर करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी कमाई करण्याचं खणखणीत नाणं असलं, तरीही महिलांसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या खूपच मर्यादित असते. हे लक्षात घेतलं, तर स्थानिक सामन्यांमधे अडीचशेपेक्षा जास्त बळी तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे साडेतीनशेहून जास्त बळी घेण्याची तिची कामगिरी खरोखरीच अतुलनीय आहे.

क्रिकेटपटू व्हायची स्वप्नं

क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणापासून अनेक लहान मुलांमुलींना आपणही क्रिकेटपटू व्हावं, असं वाटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. झुलनबद्दल असंच पाहायला मिळालं. १९९२मधे आयोजित करण्यात आलेल्या महिला आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहून, आपणही मोठेपणी क्रिकेटपटू व्हावं, अशी ती स्वप्नं पाहू लागली.

१९९७ला कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्या वेळी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि खर्‍या अर्थाने तिच्या स्वप्नांना बळ मिळालं. या सामन्यातल्या श्रेष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचा तिच्यावर खूपच सकारात्मक प्रभाव पडला.

नाडिया जिल्ह्यामधल्या ‘चकदाहा’ या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली झुलन, लहानपणी फुटबॉलबरोबरच इतर मुलांबरोबर अधूनमधून क्रिकेटही खेळायची. ती टाकत असलेल्या हळू चेंडूवर प्रतिस्पर्धी बॅट्समन चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत असत, त्यामुळे इतर मुलं तिला बॉलिंग देणं बंद करत असत.

अनेक वेळा तिला मैदानाबाहेर बसण्याचा सल्ला दिला जायचा. एखादा खेळाडू आला नाही, तर तिला संधी मिळायची. पण, तेव्हाही शेवटच्या फळीतच बॅटिंग करावी लागत असे आणि तिला चेंडू टाकण्याची संधी दिली जात नसे. झुलन हिने या टीका निमूटपणे सहन केल्या कारण केव्हातरी आपली कामगिरी चांगली होईल आणि आपले मित्र-मैत्रिणी कौतुक करतील, असं तिला वाटायचं. त्यामुळे तिने धीर सोडला नाही. घराजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात ती वेगाने चेंडू टाकण्याचाही सराव करायची.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

क्रिकेटमधल्या करिअरचा दृढनिश्चय

वयाच्या पंधराव्या वर्षी तिने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवायला सुरवात केली. तिच्या गावात अव्वल दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा नव्हती. चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, तर दररोज कोलकाता शहर गाठण्याशिवाय पर्याय नाही, हे तिने ओळखलं होतं. तिच्या गावापासून कोलकाता हे ८० किलोमीटर अंतरावर होतं.

घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत तिने हा सराव सुरू केला. सरावासाठी तिला दररोज पहाटे चार वाजताच रेल्वेगाडी पकडावी लागायची. काही वेळेला ही गाडी चुकली किंवा या गाडीला वेळ झाला, तर आपोआपच सरावाच्या ठिकाणी पोचायला तिला उशीर व्हायचा. उशिरा झाल्यानंतर प्रशिक्षकांकडून होणार्‍या शिक्षाही तिला सहन करावी लागायची. संघर्ष केल्याशिवाय चांगली फळं मिळत नाहीत, हे तिला पक्कं ठाऊक होतं.

उशिरा पोचल्यामुळे बुडलेले व्यायाम प्रकार किंवा सराव ती जास्त वेळ थांबून पूर्ण करायची. साहजिकच घरी पोचायलाही तिला वेळ व्हायचा. तिची ही धावपळ आणि दगदग पाहून क्रिकेट सोडण्याचा सल्ला पालकांकडून दिला जायचा. हा वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दिलं तर चांगल्या प्रकाराची नोकरी मिळेल, असाही उपदेश तिला घरच्यांकडून मिळायचा. मात्र, क्रिकेटमधेच करिअर करण्याबाबत तिचा दृढनिश्चय होता. त्यामुळे तिने घरच्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्षच केलं.

भावी कारकिर्दीची पायाभरणी

स्थानिक स्तरावरच्या सामन्यांमधे सतत तीन वर्ष तिने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, तिला बंगाल टीमकडून आणि त्यानंतर पूर्व विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली. २०००मधे भारतीय टीममधे काही खेळाडूंचा समावेश असलेल्या, एअर इंडियाविरुद्धच्या सामन्यात तिने दहा षटकांमधे केवळ १३ धावांमधे तीन गडी बाद केले.

या कामगिरीमुळे तिला काही दिवसांनंतर एअर इंडियाकडूनच खेळण्यासाठी विचारणा करण्यात आली. याच क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती. या सोनेरी संधीचा फायदा घेत तिने सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि तिथूनच तिच्या भावी कारकिर्दीची पायाभरणी झाली. त्यानंतर तिने मागे पाहिलंच नाही आणि भारतीय टीमकडून खेळण्याचं स्वप्न साकार झालं.

हेही वाचा: आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

कामगिरीने निवड सार्थ ठरवली

२००२ हे इंग्लंडविरुद्ध टेस्ट आणि वनडे सामन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय करिअरमधे पदार्पण करण्याची संधी तिला मिळाली. इंग्लंडविरुद्ध २००६ला झालेल्या टी-२० सामन्याद्वारे तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. २००६-२००७ मधे इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत तिच्या प्रभावी कामगिरीमुळेच भारतीय महिला टीमने ऐतिहासिक मालिका विजय साकारला. या मालिकेतल्या पहिल्या कसोटीत ‘नाईट वॉचमन’ म्हणून भूमिका पार पाडताना तिने अर्धशतक टोलावलं.

पाठोपाठ दुसर्‍या टेस्टमधे दोन्ही डावांत प्रत्येकी पाच गडी बाद करताना सामन्यात दहा विकेट्स घेण्याची किमयाही करत आपली निवड सार्थ ठरवली. वनडे सामन्यांमधे न्यूझीलंडविरुद्ध २०११ला केवळ ३१ धावांमधे सहा बळी, ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१२ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांमधे पाच गडी करत टी-२० मधेही प्रभावी यश मिळू शकते, हे तिने दाखवून दिलं.

२००८ ते २०११ या काळात तिच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने वनडे बारा सामने, तर टी-२० चे आठ सामने जिंकले आहेत. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे दोनशे बळी घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळाला. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिला सर्वोच्च स्थान आहे.

२००७ला आयसीसी सर्वोत्कृष्ट  महिला खेळाडू, तर २०११मधे एम. ए. चिदंबरम स्मृती सर्वोत्तम महिला खेळाडू या पारितोषिकाने तिला गौरवण्यात आलंय. ‘पद्मश्री’ हा सन्मान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले असले तरी चाहत्यांचं प्रेम हाच आपल्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार असतो, असं ती सांगत असते.

अष्टपैलू कौशल्य प्रेरणादायी

द्रुतगती बॉलिंगमधला श्रेष्ठ बॉलर कपिल देव, ग्लेन मॅकग्रा, जवागल श्रीनाथ यांच्यासारख्या बॉलिंगच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करत त्यांच्यासारखी अचूकता आणण्यासाठी तिने नेहमीच प्रयत्न केला आहे. चेन्नई इथल्या अकादमीत डेनिस लिली या ऑस्ट्रेलियाच्या श्रेष्ठ द्रुतगती बॉलरकडूनही द्रुतगती बॉलिंगचं बाळकडू तिला मिळालं. आपल्या बॉलिंगमधे भेदकता, अचूकता, योग्य दिशा ठेवून चेंडू टाकणं अशा विविधता आणण्यासाठी तिने नेहमीच एकाग्रतेने सराव केला आहे.

सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे आपले सहकारी किंवा कधीकधी प्रतिस्पर्धी बॉलरकडून काही महत्त्वपूर्ण टीपा ती घेत असते. तसंच टीमचे वेगवेगळे प्रशिक्षक यांच्याकडून जे काही मौलिक मार्गदर्शन केलं जाईल, त्यानुसार आपल्या शैलीत योग्य तो बदल करत आपल्या बॉलिंगमधे अधिकाधिक परिपक्वता येण्यासाठी ती प्रयत्नशील असते. वैयक्तिक कामगिरीपेक्षा आपल्या टीमला कसा विजय मिळवून देता येईल, हेच तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. वयाच्या ३९ व्या वर्षीही तिचं अष्टपैलू कौशल्य तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायीच आहे.

हेही वाचा: 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…