पोन्नियीन सेल्वन: चोळ साम्राज्याचा इतिहास सांगणारी सिनेगाथा

सप्टेंबरच्या शेवटी प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नमचा ‘पोन्नियीन सेल्वन’ रिलीज होतोय. आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणी रत्नम चोळ साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. ए. आर. रेहमानचं संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे ‘पोन्नियीन सेल्वन’ बघण्यामागचं विशेष कारण ठरणार आहे.

एखाद्या मराठी माणसाला त्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांग असं विचारलं तर आपसूकच त्याची गाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाऊन थांबते. अर्थात, मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त शिवकालाशी संबंधित नसला तरी जे आकर्षण मराठी माणसाला शिवकालीन इतिहासाबद्दल आहे, ते इतर कशाबद्दल दिसत नाही. तमिळ जनसमुदायालाही असंच आकर्षण चोळ-चेरा-पांड्या साम्राज्यांबद्दल आहे. 

कादंबरीची क्रेझ

त्यातही चोळ साम्राज्याबद्दल तमिळी जनतेला विशेष आकर्षण असल्याचं दिसून येतं. याचं प्रमुख उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार कल्की कृष्णमूर्ती लिखित ‘पोन्नियीन सेल्वन’ ही लोकप्रिय कादंबरी. तमिळ साहित्यात या कादंबरीला मानाचं पान आहे. कल्की कृष्णमूर्ती यांनी आपल्या ‘कल्की’ नावाच्या साप्ताहिकात ही कादंबरी एका लेखमालेच्या स्वरुपात छापायला सुरु केली होती. 

या लेखमालेला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. २९ ऑक्टोबर १९५० ते १६ मे १९५४ या साडेतीन वर्षांच्या काळात अव्याहतपणे सुरु असलेल्या या लेखमालेची वाचक आवर्जून वाट बघायचे. या लेखमालेमुळे साप्ताहिकाचा खप इतका वाढला होता की आठवड्याला सत्तर हजारहून अधिक प्रतींची विक्री अगदी सहज व्हायची.

निव्वळ संशोधनासाठी श्रीलंकेच्या असंख्य वाऱ्या करून कृष्णमूर्ती यांनी हा ऐतिहासिक काळ आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर उभा केला होता. तब्बल पन्नासहून अधिक पात्रांचा भरणा असलेल्या या कादंबरीत चोळ साम्राज्यातलं लोकजीवन अगदी बारकाईने लिहलं गेलं होतं. एकेका पात्रावर वेगळी कादंबरी निघावी इतका मोठा तिचा आवाका होता. आजही तमिळ वाचक चोळ साम्राज्याकडे पाहताना ‘पोन्नियीन सेल्वन’च्या चष्म्यातूनच पाहतात. 

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

कथा अरुलमोळी वर्मनची

‘पोन्नियीन सेल्वन’चा अर्थ होतो पोन्नीचा मुलगा. प्राचीन तमिळ साहित्यानुसार, पोन्नी हे कावेरी नदीचंच दुसरं नाव आहे. पोन्नी म्हणजेच कावेरी नदी ही चोळ साम्राज्याची जीवनदायिनी होती. या नदीच्या कुशीत वाढलेल्या चोळ राजपुत्र अरुलमोळी वर्मन म्हणजेच  पहिला राजराजा चोळ याची ही कथा आहे. मध्ययुगीन इतिहासात चोळ राजगादीसाठी चाललेल्या संघर्षाचं वर्णन ‘पोन्नियीन सेल्वन’मधे केलं गेलंय.

विजयालय आणि पहिला आदित्य चोळ यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रकुट, पल्लव राजघराण्यांचा पराभव करून वैभवाच्या शिखरावर चढलेलं चोळ साम्राज्य पहिला राजराजा चोळ याने सामर्थ्यशाली आरमाराच्या जोरावर पराक्रमाची शर्थ करत आणखी बळकट केलं. दक्षिण भारतातला सर्वाधिक शक्तिशाली राजा म्हणून तो लोकप्रिय होता.

कादंबरीची सुरवात चोळ साम्राज्याची राजधानी पळयारैमधे होते. चोळ राजगादीसाठी सुरु असलेल्या कटकारस्थानांची चाहूल लागताच, अंथरुणाला खिळलेला चोळ राजा दुसरा परांतक म्हणजेच सुंदर चोळ हा कांचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच दुसरा आदित्य चोळ याला साम्राज्याची जबाबदारी घेण्यासाठी बोलवून घेतो. त्याचा दुसरा मुलगा, अरुलमोळी वर्मन तेव्हा श्रीलंकेत एका युद्धात व्यस्त असतो.

त्यावेळी दुसऱ्या परांतकाची मुलगी कुंदवै पिराटी ही आपल्या भावाला म्हणजेच अरुलमोळीला निरोप देण्यासाठी वल्लवरायन वंदीयदेवन या शूर आणि धाडसी योद्ध्याची निवड करते. वंदीयदेवन अरुलमोळीला भेटून त्याला बहिणीचा निरोप देतो. यात पुढे राजगादीसाठी होणारा रक्तरंजित संघर्ष, त्यातून अरुलमोळीचा राजराजा चोळ बनण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला ‘पोन्नियीन सेल्वन’मधे वाचायला मिळतो. 

नाटक ते सिनेमा

‘पुदू वेल्लम’, ‘सुलरकाट्र’, ‘कोलई वाल’, ‘मणीमकुटम’ आणि ‘त्याग शिकरम’ या पाच खंडांमधे विभागल्या गेलेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चं नाटकात रुपांतर करणं अवघडच काम होतं. याआधीही कादंबरीतले विशिष्ट प्रसंग नाट्यरुपात सादर केले गेले होते. पण पूर्ण कादंबरीलाच नाटकात बसवण्याचं हे शिवधनुष्य मॅजिक लँटर्न या नाट्यसंस्थेने लीलया पेललं आणि १९९९मधे चेन्नईतल्या वायएमसीए मैदानावर चार तासांचं नाट्य रूपांतरण सादर केलं गेलं.  

त्याहीआधी, ‘पोन्नियीन सेल्वन’वर सिनेमा बनवायच्या चर्चेला जोर आला होता. यात प्रमुख नाव होतं ‘मक्कल तिलकम’ एम. जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांचं. या सिनेमात एमजीआर वंदीयदेवनच्या भूमिकेत दिसणार होते. त्याचबरोबर जेमिनी गणेशन, सावित्री, पद्मिनी, नंबियार, वैजयंतीमाला, वी. नागय्या, टी. एस. बालय्या अशी मोठी नावंही या सिनेमासोबत जोडली गेली होती. पण एमजीआर यांच्या अपघातामुळे हा सिनेमा कधी आलाच नाही.

त्यानंतर काही वर्षांनी अभिनेता कमल हासनने आपण ‘पोन्नियीन सेल्वन’वर सिनेमा बनवत असल्याची घोषणा केली. त्यासाठी त्याने या कादंबरीचे आवश्यक हक्कही विकत घेतले. पण कलाकारांची जुळवाजुळव करण्यातच चारेक वर्षं निघून गेली. त्यानंतर या सिनेमासाठी लागणाऱ्या एकंदर खर्चाचा आवाका बघता त्याने हा प्रोजेक्ट गुंडाळण्यातच धन्यता मानली.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

मणी रत्नमचा ड्रीम प्रोजेक्ट

बहुतांश तमिळ दिग्दर्शकांना चोळ साम्राज्य आणि त्यातही ‘पोन्नियीन सेल्वन’वर सिनेमा काढायची इच्छा होतीच. याला मणी रत्नम तरी कसा अपवाद असेल. १९९४मधेच मणीने आपण ‘पोन्नियीन सेल्वन’वर सिनेमा काढत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कमल हासनची एका प्रमुख भूमिकेसाठी निवडही करण्यात आली. पण तेव्हाही बजेटअभावी हा सिनेमा रखडला. त्यानंतर २०१०मधे मणीने पुन्हा एकदा नव्याने ‘पोन्नियीन सेल्वन’ सुरु करत असल्याची घोषणा केली.

यावेळी तमिळ अभिनेता ‘दलपती’ विजयसोबत तेलुगू सिनेसृष्टीचा ‘प्रिन्स’ महेशबाबूही यात झळकणार होता. त्याचबरोबर आर्या, सत्यराज, सूर्या तसंच प्रियांका चोप्रा, अनुष्का शेट्टी, ज्योतिका अशा मोठमोठ्या नावांचाही विचार केला गेला होता. १०० कोटींचं बजेटही यासाठी ठरवण्यात आलं होतं. पण नंतर मूळ ऐतिहासिक स्थळांवर चित्रीकरणाची परवानगी न मिळाल्याने सेट उभारणी आणि वीएफएक्सपायी वाढत जाणारा खर्च बघून मणी रत्नमने प्रोजेक्ट रद्द केला.

जानेवारी २०१९मधे लायका प्रोडक्शनने पैसा लावायची तयारी दाखवली आणि मणी रत्नमच्या या ड्रीम प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. यावेळी चियान विक्रम दुसऱ्या आदित्यच्या, जयम रवी अरुलमोळीच्या तर कार्ती वंदीयदेवनच्या भूमिकेत झळकणार आहे. त्रिशा कुंदवैची भूमिका साकारत असून ऐश्वर्या राय यात नंदिनी आणि नंदिनीची आई अशी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या परांतकाच्या भूमिकेत अभिनेता प्रकाश राजची निवड केली गेलीय.

संगीतकार ए. आर. रेहमान आणि मणी रत्नम ही जोडी एकत्र आली, तर काय कमाल होते हे सिनेरसिकांनी आधीही बऱ्याचदा अनुभवलंय आणि याहीवेळी रेहमानच्या जादुई स्वरांनी सजलेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’च्या अल्बमने कसलीही निराशा केली नाही. त्याचबरोबर ‘रावणन’नंतर पुन्हा एकदा चियान विक्रम आणि ऐश्वर्या आमनेसामने येत असल्याने या सिनेमाला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय.

पिरीयड ड्रामाची लाट

‘बाहुबली’नंतर आलेल्या इतिहासपट आणि पिरीयड ड्रामा सिनेमांच्या लाटेवर स्वार होऊन ‘पोन्नियीन सेल्वन’ही तमिळ सिनेसृष्टीत मोठा इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. ‘बाहुबली’च्या यशाने प्रेरित होऊन गेल्या काही वर्षांत बरेच हिट आणि फ्लॉप सिनेमे येऊन गेलेत. त्यात ‘पुली’पासून ते आत्तापर्यंतच्या ‘बिंबीसार’पर्यंतचा समावेश आहे. बॉलीवूडमधेही ‘तान्हाजी’, ‘पद्मावत’, ‘पानिपत’सारखे हिट-फ्लॉप सिनेमे येऊन गेलेत.

वास्तवाला कल्पनेची जोड लाभलेल्या या सिनेमांच्या आडून इतिहासाचं केलं जाणारं सोयीस्कर गौरवीकरण प्रेक्षकांना आवडतंय, यात आता कसलीही शंका नाही. मराठीतही हा प्रयोग सध्या शिवकालीन इतिहासाला हाताशी धरून केला जातोय आणि काही सिनेमांचा अपवाद वगळता, प्रेक्षकांनीही ते डोक्यावर उचलूनही घेतलेत. प्रवीण तरडेचा ‘हंबीरराव’, दिग्पाल लांजेकरचं शिवराज अष्टक, नागराज-रितेश देशमुखची आगामी ‘शिव’त्रयी याचंच उदाहरण आहे. 

तमिळ सिनेसृष्टीत आधीही चोळांचा इतिहास मांडला गेलाय. ‘राजराजा चोळन’, ‘अंबिकापती’, ‘पुंपूकार’ आणि ‘मदुरै मित्त सुंदरपांडियन’चा त्यात समावेश होतो. सेल्वाराघवन दिग्दर्शित आणि कार्तीची प्रमुख भूमिका असलेला २०१०चा ‘आयिरातील ओरुवन’ हा या प्रकारातला वेगळा पण कल्ट सिनेमा होता. लवकरच याचा दुसरा भागही येतोय. आता यात मणी रत्नमच्या बहुप्रतीक्षित ‘पोन्नियीन सेल्वन’ची भर पडतेय.

हा सिनेमा ‘बाहुबली’सारखाच दोन भागांमधे विभागला जाणार असून, त्याचा पहिला भाग येत्या सप्टेंबरमधे थियेटरमधे येतोय. ‘पोन्नियीन सेल्वन’ मोठ्या पडद्यावर येणं हे तमिळ सिनेरसिकांचं जुनं पण अपूर्ण स्वप्न असल्याने तमिळ सिनेसृष्टीसाठी हा फार महत्त्वाचा सिनेमा असणार आहे. मणी रत्न्मचं दिग्दर्शन, ए. आर. रेहमानचं संगीत आणि प्रतिभावंत कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अशी अनोखी पर्वणी ‘पोन्नियीन सेल्वन’च्या निमित्ताने सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.

हेही वाचा: 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…