गौराई पूजताना तिचं लोकजीवनातलं स्थान जाणून घ्यावंच लागेल!

गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो.

भाद्रपद महिना सुरु झालाय. गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरुय. गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराई येणं ही प्रथा प्रामुख्यानं दक्षिण भारतामधे आणि विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आहे. गौराईची प्रथा जेवढी महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी येतात म्हणजे काय होतं?

आपल्याकडचं सगळे सण हे निसर्गचक्राशी बांधलेत. भाद्रपद महिना हा पावसाळा संपत असताना आलेला महिना आहे. यावेळी सृष्टीत एक प्रकारची सुबत्ता, समाधान आलेलं असतं. माणसांची अन्न आणि पाण्याची चिंता मिटलेली असते. माणसाला ज्यात आनंद वाटतो, त्याला त्यानं देव म्हटलंय.

एक आनंद, समाधान, सुख देणारे देव आहेत आणि दुसरे उपद्रव देणारे देव. गणपतीतही असेच प्रकार आपल्याला दिसतात. गणपती हा सुरवातीला विघ्नकर्ता आणि नंतर तो विघ्नहर्ता झालाय. तसंच गौरीचं झालंय.

भूमातेचं प्रतीक गौराई

गौरी म्हणजे आपल्याला परिचित असणारी बाहुलीसारखी, पूर्णपणे साजशृंगार केलेली अशी मूर्ती. तिला आपण गौरी म्हणतो. तिला कपडे घातले जातात. सुंदर साड्या नेसवल्या जातात. दागिने घातले जातात. मुखवटे ठेवले जातात. गौरी ज्यावेळी आपल्याकडे येतात, त्यावेळी त्यांना आपण बाहेरपासून घरापर्यंत ‘या’ म्हणून आमंत्रण देतो.

विशेषत: महिलांचा हा महत्त्वाचा उत्सव आहे. कारण स्त्री आणि भूमी यांना आपल्या परंपरेनं परस्पर रूपात पाहिलंय. या दोघी सृजक म्हणजे निर्माण करणार्‍या आहेत. भूमीमुळे आपल्या पोटापाण्याची, तर स्त्रीमुळे वंशसातत्याची चिंता मिटते. त्यामुळे सृष्टीचं आणि मानवी जीवनाचं चक्र अव्याहतपणे सुरु असतं. गौरी ही भूमातेचं प्रतीक आहे.

लक्ष्मी म्हणजे काय? सोनं-नाणं हे नंतर आलंय. मुळात लक्ष्मी म्हणजे भू-लक्ष्मी. कारण जमिनीतून आपल्याला उपजीविकेच्या सर्व गोष्टी मिळत असतात. संपत्तीचं मूळ कारण भूमीच आहे. भूमीतून आलेली फुलं, फळे, पानं यातून व्यापार होतात. त्यातून भांडवल उभं राहतं. बाकी संपत्ती कितीही वाढली आणि शोध कितीही लागला, तरी भूमीमधून निर्माण होणारी उत्पादनंच आपल्या लक्ष्मीचं मूळ रूप आहेत. तिचं मानवी प्रतीक म्हणून आपण गौराई आणतो.

हेही वाचा: देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

वेगवेगळ्या प्रकारची गौराई

आपण त्यांना लक्ष्मी म्हणतो. काही ठिकाणी तिला महालक्ष्मी म्हणतात. महाराष्ट्रात बहुजन समाजामधे ‘गौराई’ असं म्हटलं जातं. ही गौरी म्हणजे शिवशंकराची पत्नी. तिला गणपतीची आई म्हटलं जातं. ज्यावेळेला श्रीगणेश आपल्याकडे येतो, त्याच्यापाठोपाठ गौरीही येते. तिला हिमगौर, महालक्ष्मी असं म्हटलं जातं. या महालक्ष्मी आपल्याला दोन प्रकारच्या दिसतात.

त्यांचे मुखवटेही निरनिराळ्या प्रकारचे असतात. काही ठिकाणी पितळेच्या, तर उच्चभ्रू घराण्यामधे चांदीच्या असतात. सर्वसामान्यांच्या घरामधे कुंभारानं बनविलेल्या मातीच्या गौरी असतात. काही ठिकाणी तांब्या-पितळेच्या असतात. त्याच्यावर मानवाकृती डोळे वगैरे चित्रित केलेले असतात. स्त्रीच्या चेहर्‍याचा आभास निर्माण केलेला असतो.

मानवाच्या आकाराचा एक साचा करून त्याच्यावर तिला बसवण्यात येतं. गौरी दोन प्रकारच्या असतात. काही ठिकाणी एक असते. कोकणातल्या बहुजन समाजात खूप मोठी, उंच अशी मूर्ती बनवलेली असते. महाराष्ट्रामधे मानवी रूपात केलेल्या, सजवलेल्या साच्यात तिला बसवलेली असते.

गौराईचं आगमन

पहिला दिवस तिच्या येण्याचा असतो. त्या ज्या दिवशी घरी येतात, त्या दिवशी माहेरवाशिणी घरी आल्या, असं समजलं जातं. यावेळी बायकांमधे फार उत्साह असतो. सासरहून येणार्‍या माहेरवाशिणींचं जसं कोडकौतुक होतं, तसं गौराईचं केलं जातं. तुळशीजवळ रांगोळी काढलेली असते. तिथं तिची पाऊलं चित्रित करतात. त्याच्या पाठीमागे हळद-कुंकवाचे हाताचे ठसे उमटवतात.

घरात येताना ‘लक्ष्मी आली, सोन्याची पाऊली!’ असं म्हटलं जातं. नंतर तिची पूजा केली जाते. ओटी भरली जाते. त्या दिवशी तिला बर्‍याच ठिकाणी भाजी-भाकरीचा, दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी तिची आरती केली जाते आणि मग प्रसाद वाटला जातो.

बायकांना बोलावलं जातं, जागरण घातलं जातं. बायका खेळ खेळत असतात. निरनिराळी गाणी म्हटली जातात. म्हणजे पंचमीच्या वेळेला बायका झिम्मा-फुगडी खेळतात, तसंच गौराईच्यावेळी करतात. माणसाचे जे जे म्हणून उपचार आहेत, ते ते देवावर आरोपित केलेले पाहायला मिळतं.

हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

गौराई पूजनाच्या पद्धती

दुसर्‍या दिवशी गौराईला जेवण घातलं जातं. तो महत्त्वाचा दिवस गौरी जेवणाचा असतो. त्या दिवशी तिला निरनिराळे नैवेद्य दाखवले जातात. गोडधोड जेवण केलं जातं. सुवासिनी बोलावल्या जातात. प्रामुख्यानं माहेरवाशिणींना जेवायला बोलावलं जातं. जेवणाचे नैवेद्यही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. महाराष्ट्रामधे सामान्यपणे आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, कोकणामधे घावण केलं जातं. कर्नाटक, गोव्यामधे भाताचे निरनिराळे प्रकार केले जातात.

आपल्याकडच्या सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय-कायस्थ-प्रभू यांच्यात तर तिला मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. आत चांदीच्या पेल्यात रेडवाईन ठेवलेली असते. काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य असतो. कोकणच्या पट्ट्यावर बर्‍याच ठिकाणी माशांचा नैवेद्य असतो. जे मांसाहार करत नाहीत, ते साधा नैवेद्य दाखवतात. लोकभाषेत गोडे आणि खारे नैवेद्य असं म्हटलं जातं. जसा माणूस तसा त्याचा देव, हे लोकपरंपरेतलं सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे.

गौरीचे प्रकार महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगवेगळे असतात. काही ठिकाणी मुखवटे नसतातच. कोकणात, गोव्यात महिला नदीवर जातात. त्या नदीवरच्या वाळूचे खडे आणतात आणि ते खडेच गौर म्हणून पूजले जातात. गोव्यातल्या काही ठिकाणी तेरड्याची फुलं, रोपं कलशात ठेवून गौराई म्हणून पूजल्या जातात.

तिसर्‍या दिवशी तिची बोळवण केली जाते. बरेच दिवस राहायला तिला परवानगी नाही. कारण तिच्या नवर्‍यानं तिला राहायची परवानगी दिलेली नाही, अशा प्रकारची गाणीसुद्धा म्हटली जातात.

वेगवेगळ्या प्रथा आणि समजुती

आणखी एक प्रथा आपल्याकडे आहे. सामान्यपणे ज्येष्ठ मुलगा ज्या घरात असेल, त्या ठिकाणी गौर बसवली जाते आणि बाकीचे पाहुणे त्या घरात जातात. एका कहाणीमधे म्हटलंय की, पहिल्या दिवशी येते ती कुमारिका असते. दुसर्‍या दिवशी सुफलनास योग्य अशी तरुणी होते आणि नंतर तिला सर्व घरभर फिरवलं जातं. तिसर्‍या दिवशी ती वृद्धा होते. मानवी जीवनातल्या तिन्हीही अवस्था यातून प्रतिबिंबीत झाल्यात.

गौरी घरात आली की घरात कुठं काय आहे, हे तिला दाखवलं जातं. समज असा आहे की, त्या गौरी जिथं जिथं जातात, तिथले कोपरे समृद्ध होतात. तिची नजर जिथं पडेल, त्या ठिकाणी भाकरीचा भानोस भरलेला असतो. धान्याचं पोतं भरलेलं असतं. जीवनातल्या सर्व गोष्टी तिला दाखवल्या जातात आणि मग तिला साच्यावर बसवलं जातं. मग नैवेद्य, दुसर्‍या दिवशी जागरण असं केलं जातं.

हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

लोकदैवतांची प्रतीके

गौरी दोन का असतात, याच्याही काही समजुती आहेत. अभिजन परंपरेत असं म्हटलं जातं की, गौरी या ज्येष्ठा आणि कनिष्ठा असतात. ज्येष्ठा म्हणजे थोरली आणि कनिष्ठा म्हणजे धाकटी. एक सोवळ्यातली आणि एक ओवळ्यातली असते. म्हणजे देवीची रूपंही दोन प्रकारची असतात. एक शांत, समृद्ध अशी आनंद, सुख देणारी आणि दुसरी कनिष्ठा. ती उपद्रवकारक असते. आज आपण जरी मानत नसलो तरी गौरीचे उगम जे झाले, ते या दोन रूपांमधे आहेत.

आपल्याकडे बाळांना रोगराई व्हायची आणि या सगळ्या रोगराई करणार्‍या देवता या स्त्रीदेवता आहेत. मरीआई, जानाई, जोखाई, गौराई तसंच कृष्णाला दूध पाजून मारण्याचा प्रयत्न करणारी पुतना हीसुद्धा देवताच आहे. बाळाला गोवर आला तरी कोणत्या तरी देवतेच्या कोपामुळेच आला, असं म्हटलं जातं. डोळे आले तरी देवीच्या कोपामुळेच आले, असं समजलं जातं. मग त्या उपद्रवकारक देवींना नवस बोलले जातात. ते आजही काही ठिकाणी सुरु आहे.

कोकणात हल्लीचे जे रोग आहेत, त्याचेही नवस बोलले जातात. म्हणजे डोळे आले असतील, तर ‘मी तुला डोळा वाहीन. कपडे वाहीन. पाळणा वाहीन. बाळाचं चप्पल वाहीन.’ असे नवस बोलले जातात आणि त्याची पूर्तता नवसाच्या रूपानं केली जाते. माणसाच्या या ज्या श्रद्धा आहेत, त्या आदिम स्वरूपाच्या असतात. त्या माणसाच्या मनात खोलवर रुतून बसल्यात. त्या श्रद्धेची प्रतीके म्हणून ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी येतात.

जन्मभराचा उत्सव

गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. तिचं पहिलं रूप यक्ष आहे. तिला धन देणारी म्हटलं जातं. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. ‘हरिती’ म्हटलं जातं. अलक्ष्मी होती, तिला ‘लक्ष्मी’ करायचं यासाठी गौराईचा सण केला जातो. हा माणसाचा जन्मभराचा उत्सव आहे.

सौंदर्याची उपासनासुद्धा आहे. गौरी आली की सजवणं, जेवण करणं असे प्रकार केले जातात. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’ देवतेमधे पाहतो. यानिमित्तानं कुरूपा हे रूप बाजूला टाकून सुरुपा हे रूप आपण पाहत असतो. म्हणून गौरी आली की म्हणतात, ‘लक्ष्मी आली, सोन्याची पाऊली!’

हेही वाचा: 

‘फँड्री’च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा ‘स्वयंभू’ महिमा

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…