सोनाली फोगाट: राजकीय खून की नाईट लाईफचा बळी?

टिकटॉक स्टार आणि राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांचा गेल्या आठवड्यात गोव्यात मृत्यू झाला. त्यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने गोव्यातल्या ‘नाईट लाईफ’वर प्रकाश टाकणारा जेष्ठ पत्रकार सुरेश गुदले यांचा हा लेख.

नवरीवानी नटून थटून मी तुमापुढं बसते 
अन् सांगा राया. सांगा, मी कशी दिसते?

टिकटॉक हा जागतिक दर्जाचा कलाविष्कार आपण पाहतो. काही सेकंदात विरेचन. सांस्कृतिक भरणपोषण. बघता बघता खल्लास! डोक्याला ताप नाही. कित्येकदा मूळ कलाविष्काराची कत्तल करून ही निर्मिती होते. ‘मी कशी दिसते?’ हे आपण सांगायचं! आपण म्हणजे अर्थातच पुरुषी मानसिकतेनं. पुरुषी व्यवस्थेनं. सौंदर्याची आपली संकल्पना पारंपरिकच. 

सौंदर्याच्या संकल्पनेचा प्रारंभ आणि शेवट शरीरापासून शरीरापर्यंतच. त्याचं प्रदर्शन. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी. त्यामुळेच प्रश्न येतो, ‘सांगा, मी कशी दिसते?’ आणि जर आपल्याला ती चांगली दिसली नाही, तर? मग आपल्याला चांगली दिसेपर्यंत नटते. थटते. सजतं. नाचतं. शृंगारतं. आपल्यासाठी कायपण? ‘पैसा फेको, तमाशा देखो’ अर्थकेंद्रित व्यवस्थेमधील ही बाईची पायरी. 

सोनाली फोगाट यांचा मृत्यू

टिकटॉक अभिनेत्री आणि राजकीय पक्षाच्या नेत्या सोनाली फोगाट अशाच एका पायरीवर उभ्या होत्या. अशा पायर्‍यांवर असंख्य सोनाली फोगाट उभ्या आहेत. मुकाट. काल-आज-उद्या. सोनालींचा खून झाला. सध्याचं तरी हेच वर्तमान. त्यांचा मृत्यू हृदयविकारानं झाला, असं भलत्याच घाईत पहिल्यांदा जाहीर केलं. विरोधक म्हणतात, ही घाईही संशयास्पदच. सोनाली यांचा भाऊ गोव्यात आला. म्हणाला, ‘बहिणीचा खून झालाय. ’

यंत्रणा प्रारंभी ढिम्मच. नंतर हलली. एका महिलेच्या मृत्यूनंतर यंत्रणा इतक्या गतीनं हलताना आणि संशयितांना गजाआड होताना पाहणं, तसं धक्कादायकच. इतर गुन्ह्यांच्या वेळी पोलिसांसह सर्व यंत्रणांची आणि या प्रकरणातली गती चक्कीत जाळ पेटवणारीच. वरून आदेश आला. हरियाणाहून आला. दिल्लीहून आला. पक्षातून आला. यांसारख्या चर्चेचा धूर आजही निघतोय. आग असल्याशिवाय धूर नाही निघणार. 

संशयितांना अटक होते. ते पोपटासारखी कबुलीही देतात. लागलीच पोलिस अधिकारी पत्रकार परिषदही घेतात. असं कसं झालं? मग सर्वच बळींच्या नशिबी भोगाची अशी ललाटरेषा का नसते? सोनाली यांचा व्यवस्थेनं घेतलेला शोकात्म बळी हे एक उदाहरण. अशा अनेक सोनालींचे बळी गेलेत. जातायत. जात राहतील. ही वेदनादायी सल. ठसठसणं काही चुकत नाही.

चंगळवादाचे बळी

कळंगूटच्या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी सिद्धी नाईक या सुंदर, गरीब तरुणीचा अर्धनग्न मृतदेह पहाटे मिळालेला. सोनालीच्या साधारण वर्षभर अगोदरचं उदाहरण. पुराव्याअभावी सिद्धीची फाईल बंद करतोय, असं पोलिसांनी अलीकडेच जाहीर केलं. या प्रकरणात बड्या धेंड्यांच्या, राजकीय नेत्यांच्या सहभागाची चर्चा, जी हवेतच विरली. फाईल बंद झाली.

सोनाली यांच्या फाईलला मात्र गतीनं पाय फुटले. या विसंगतीमुळेच चक्कीत जाळ. सम आर मोअर इक्वल. सोनाली काय, सिद्धी काय, स्कार्लेट काय. नावं घेणार तरी किती? सर्वांच्या मृत्यूमधे समान धागे. चंगळवाद, उपभोग, ड्रग, संपत्तीची लालसा. त्याच्याच आधारावर सुखा-समाधानाच्या संकल्पनांसह जगण्याची आकांक्षा.

सध्याचा भवताल पाहता, असे बळी जातच राहतील. काळ सोकावलेलाच आहे, त्यामुळे कित्येक सोनालींचे बळी ठरलेलेच आहेत. असं होणं खटकतच नाही. स्वीकारलं जातं. ज्यांना खटकतं, ते बदलासाठी घाव घालत राहतात. त्यांचा आवाज आहे; पण कमालीचा क्षीण. तरीही आहे हा आशावाद.

हेही वाचा: विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहे

गोव्यातलं नाईट लाईफ

कोणत्या व्यवस्थेनं घेतला सोनाली यांचा बळी? साधं सोप्पं एका वाक्यातलं उत्तर – त्यांनी स्वीकारलेल्या जीवनशैलीनं. नंतर विश्लेषण. अनंत अशा महाकाय अर्थव्यवस्थेनं. टोकाच्या चंगळवादानं. या अर्थव्यवस्थेच्या सोनाली एक बळी. गोव्यातल्या नाईट लाईफचं अपत्य. काय आहे गोव्यातलं नाईट लाईफ?

हिप्पी आले गोव्यात, ते १९६०च्या दशकात. एका विनाशाकडं वाटचालीचा हा प्रारंभबिंदू. त्यांचं वर्तुळ खूप मर्यादित. खा-प्या-मजा करा. रात्री-मध्यरात्री. अगदी उत्तररात्रीपर्यंत. इतकंच काय, सूर्योदयानंतरही झिंगाट. विवस्त्रही. या हिप्पींमुळे गोव्यातल्या सुशेगाद समुद्र किनार्‍यांना जाग आली. ही जाग किती जीवघेणी असू शकतं ते सोनाली, सिद्धी, स्कार्लेट आदींनी दाखवलं. काही नावं बाहेर आलीच नाहीत. बेपत्ताच.

किनारपट्ट्यांतल्या पार्ट्यांमधे सदेह बेपत्ता तरुणींना तर वाली कोण? ना जिवंत, ना मृत. मग गेल्या कुठं? किनारपट्टीत पार्टीत ड्रगनं मृत्यू होऊनही कागदावर तो शब्दच येऊ दिला नाही. कारण – अर्थकारण. इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवात ड्रगनं किती जणांची इहलोकीची यात्रा संपवली असेल. सांगणं कठीणच. हिप्पींचं जे वर्तुळ होतं, त्यात स्थानिक माणूस नव्हता. चुकून-माकूनचा अपवाद मोजायचा नसतो, तो सिद्धांत नाही होत.

हिप्पींचं नाईट लाईफ साधारणत: १९९०च्या दशकानंतर रंगारंग होऊ लागलं. ते हातपाय पसरू लागलं. त्याची पर्यटकांनाही चांगलीच चटक लागली. हळूहळू राज्याची सर्व किनारपट्टी वाद्यांच्या दणदणाटानं उत्तररात्रीपर्यंत जागू लागली. अर्थकारणानं विलक्षण वेग पकडला. अमली पदार्थ हा मिळमिळीत शब्द झाला. ड्रग या शब्दाला भलताच रुगोष्ट प्राप्त करून दिला. कोट्यवधी शब्द किरकोळ झाला. खेळ अब्जावधींचा रंगू लागला.

राजकीय नेत्यांचा वरदहस्त

विधानसभा निवडणुकीत किनारपट्टीतला एक वजनदार नेता निवडणूक रिंगणात होता. त्यांनी जाहीर केलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता होती, एक अब्ज रुपयांची. बाकीची, दडवलेली विचारायची नाही. ते ड्रगच्या व्यवहाराची संबंधित आहेत, असा आरोप विरोधकांनी जाहीरपणे अनेकवेळेला केलेला. ते निवडून आलेत.

गेल्या १२ ऑगस्टला गोव्यात १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. किनारपट्टीतल्या पंचांचा भाव नेहमी मोठाच. मोरजी पंचायत. किनारपट्टीची पंचायत. महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गच्या शेजारच्या पेडणे तालुक्यातल्या पंचायत निवडणुकीत पंच होण्यासाखी एकानं पन्नास लाख उधळले. कशावरून? माजी मुख्यमंत्र्यांनीच हा आकडा जाहीर केला.

आपण हा खर्च म्हणतो. तो पंच त्याला म्हणतो गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हटलं की, नफेखोरी आलीच. एखाद्या अवैध किंवा दोन नंबरच्या प्रकरणात मांडवली केली की, पैसा वसूल. ड्रग, नानाविध परवाने. त्यात किनारपट्टी म्हणजे दहा नाही, शरीराची वीसही बोटे तुपात! त्यामुळेच प्रश्न पडतो की, पडद्यामागे दररोज चालणारा खेळ काय थोडाच लाखांत असणार आहे?

हेही वाचा: ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

जीवघेण्या ड्रगची नशा

एका प्रख्यात टीवी चॅनलवर एक मालिका गाजलेली. विषय होता आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. ते या गुन्हेगारांच्या मुलाखती दाखवत. अर्थातच चेहरे ओळखता येणार नाहीत, अशी मोडतोड करून. कथित संपादन म्हणूया. काही गुन्हेगारांना ‘गोवा’ आणि ‘ड्रग’ या अनुषंगानं प्रश्न विचारलेले.

त्यांचं जे उत्तर होतं, ते गोव्याचा नशिला, विद्रूप चेहरा पुरेपूर दाखवतं. ‘जगभरात कुठंही मिळत नाही, इतकं भारी ड्रग गोव्यात मिळतं,’ असं त्यांचं उत्तर होतं. भारी म्हणजे अर्थातच विलक्षण नशा आणणारं. बेधुंद करणारं. सोनाली निवास करत असलेल्या हॉटेलमधे, नृत्य करताना बारमधे तिला असं ड्रग दिलं गेलं.

पहाटे साडेचार वाजेपर्यंत पार्टी रंगलेली. साडेचारनंतर दोघा संशयित सहकार्‍यांनी तिला बाथरूममधे नेलं. ते तिथं दोन तास होते. त्यानंतर तिला हॉटेलमधे नेलं. तिथून रुग्णालयात. तिथं मृत घोषित केलं. महिलांसाठीच्या बाथरूममधे दोघा पुरुष सहकार्‍यांनी तिला आणखी ड्रग पाजलं असू शकतं. बाथरूममधे ड्रगचे अंशही सापडले. अर्थातच, ते महाघातक. जीवघेणे. 

स्थानिकांचा सहभाग

गोव्यातल्या अशा घटनांचा अन्वयार्थ लावताना बोरूबहाद्दर, दांडकेबहाद्दरांचा एक लाडका सिद्धांत आहे. गोव्यात बाहेरून येणारे म्हणजेच परप्रांतीय लोक, तसंच पर्यटकांमुळे गोव्याची जास्त बदनामी होते, हाच तो लाडका सिद्धांत.

खरं तर स्थानिक लोक, पोलिस यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व यांच्या अभद्र युतीशिवाय ड्रगसह कोणताही दोन नंबरचा धंदा उभाच राहू शकत नाही.

सोनाली प्रकरणातही पकडलेले दोन ड्रग पेडलर स्थानिक आहेत. गोव्यातल्या काही गावांमधे ड्रग पोचल्याची, काही शाळांमधे ड्रग पोचल्याची चर्चा विधानसभेत होते, याचा अर्थ काय? स्थानिकांच्या सहभागाशिवाय हे कसं शक्य आहे?

हेही वाचा: ‘ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

पर्यटन, गुन्हेगारी आणि ड्रग

गोव्याचं स्वतःचं असं पर्यटन धोरण अलीकडेच कागदावर अवतरलंय. त्याची सतत चर्चा होत होती. गोवा म्हणजे बीच. मंदिरे. चर्च! संपलं पर्यटन. हा गोड गोड गैरसमज सर्वदूर आहे. सरकार म्हणतं, हा समज बदलणार आहोत.

त्यासाठी गोव्याच्या गावागावांमधल्या अंतर्गत पर्यटनावर सरकार भर देईल, असं किमान एक तप तरी जाहीर केलं जातं. आंतरग्राम, वैद्यकीय, साहस, क्रीडा अशा प्रकारच्या पर्यटनांवर भर देऊ आणि दर्जेदार म्हणजे जास्त खर्च करणारे पर्यटक वाढतील यासाठी प्रयत्न करू, असंही सरकार म्हणतं. ते जेव्हा होईल, तो सुदिन!

सध्या गोव्याला, पर्यटनाला ड्रगच्या विळख्यातून कसं सोडवणार? वेश्या व्यवसाय आणि गोवा हे चित्र कसं बदलणार? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचं निवांत राहण्याचं घर म्हणजे गोवा? यांसारखी आव्हानं ‘आ’ वासून आहेत. या आव्हानांवर सोनाली खून प्रकरणानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं.

नवं प्रकरण, जुनेच प्रश्न

सोनाली फोगाटची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी, तिची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याचं संशयितांनी म्हटलंय. मागे वळून तिची राजकीय कारकीर्द पाहिल्यास, हे कारण कितपत खरं असेल याचा संशयच येतो. तसंच संपत्तीच्या कारणांबद्दलही. तिचे काही आर्थिक व्यवहार जर संशयितच पाहत असेल, तर मालमत्ता हडप करण्याच्या हेतूविषयी मग प्रश्न निर्माण होतात.

हा राजकीय खून आहे का? असेल, तर संबंधित राजकीय व्यक्तीपर्यंत पोलिसांचं हात पोचू दिले जातील का? ड्रगचं विलक्षण व्याप्ती असणारं, जबरदस्त आर्थिक ताकदीचं जाळं पोलिसांना भेदू दिलं जाईल का? ड्रगबद्दल आजवर इवल्या इवल्या चिंगळ्या मच्छीच बक्कळ पकडल्या आहेत.

अगदी सोनाली प्रकरण उजेडात आल्यावर लागलीच वीस लाखांवर किमतीचा ड्रग पकडला. काही जणांना गजाआड केलं. हा योगायोग की समयसूचकता? की सापडलेला मुहूर्त? राजकीय खून, संपत्ती आणि ड्रग अशा कोनांतून प्रकरण तडीस लागणार का? यांसारख्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं अनुभव जमेस धरता मिळणे महाकठीणच. 

हेही वाचा: 

जमाना मीमचा आहे!

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं?

सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…