झेपावे चंद्राकडे: माणसाच्या आगामी अवकाश मोहिमांचा ध्यास

‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे.

अनेकांच्या भावजीवनाचा हळवा भाग असलेल्या चंद्रावर माणसानं पुन्हा एकदा स्वारी करण्याचं निश्चित केलंय. ‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या, कोणतीही तांत्रिक अडचण ऐनवेळी उभी राहिली नाही, तर अमेरिकेच्या नासाचं स्पेस लाँच सिस्टीम म्हणजेच ‘एसएलएस’ रॉकेट यशस्वीपणे अवकाशात झेपावलं असल्याचं वृत्त एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचलं असेल.

इतिहास चंद्रावरच्या स्वारीचा

या रॉकेटनं आपल्याबरोबर ‘ओरायन’ नावाची स्पेस कॅप्सूल घेऊनच आपला प्रवास चंद्राच्या दिशेनं सुरु केला असेल. १९७२मधे ‘अपोलो १७’नं अमेरिकेच्या अवकाशवीरांना चंद्रावर नेऊन परत आणलं होतं. १९६९मधे ‘अपोलो ११’तून नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलन्स आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावरच्या स्वारीवर गेले होते. पैकी आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन चंद्रावर उतरले होते.

या यशस्वी मोहिमेनंतर अमेरिकेनं लागोपाठ सहावेळा ‘अपोलो’ यानाच्या मदतीनं चंद्रावर स्वारी केली. त्यातली ‘अपोलो १३’ची मोहीम अपयशी झाली. पण ऐनवेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं लागतं, याचं ज्ञान या मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना मिळालं. त्याद़ृष्टीनं विचार केला, तर ही मोहीमसुद्धा यशस्वी झाली, असं म्हणावं लागतं. या अपयशानंतरसुद्धा ‘अपोलो’ मोहीम सुरुच राहिली.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

ओबामांचा सल्ला नाकारला

१९७२च्या ‘अपोलो १७’च्या यशानंतर पण अमेरिकेनं पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट २०१०मधे त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या एका भाषणात म्हटलं होतं की, ‘आता अमेरिकेनं चंद्राच्या पल्याड आपली द़ृष्टी वळवणे आवश्यक आहे. लघुग्रहांवर जाऊन त्यांचा अभ्यास करणं आणि मंगळावर स्वारी करणं याला आता अमेरिकेनं प्राधान्य द्यायला हवं.’

पण, बराक ओबामा यांचं सांगणं मनावर न घेता चंद्रावर जाण्याच्या मोहिमा आखण्याचा विचार बळावत गेला. आता ज्या मोहिमेची सुरवात झालीय आणि २०२५मधे चंद्रावर आपल्या अवकाशवीरांना उतरवण्याचं अमेरिकेनं नक्की केलंय, त्या मोहिमेचं ‘आर्टेमिस मोहीम’ असं नामकरण ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत करण्यात आलं.

आर्टेमिस मोहिमेचा पहिला टप्पा

या योजनेचा पहिला टप्पा आता सुरु झालाय. एसएलएस रॉकेटबरोबर ओरायन स्पेस कॅप्सूल चंद्राच्या दिशेनं पाठवण्यात आलीय. यापुढच्या आर्टिमिसच्या मोहिमांमधे अवकाशवीर ओरायनमधे बसून चंद्रावर जातील आणि नंतर हीच स्पेस कॅप्सूल नंतर त्यांना पृथ्वीवर घेऊन येईल. आताच्या मोहिमेतही चंद्राजवळ पोचल्यानंतर एसएलएस ओरायनला चंद्रभूमीच्या दिशेनं पाठवेल.

ओरायन चंद्राच्या भूमीवर नियोजित ठिकाणी उतरेल. तिथे ती सहा दिवस राहील आणि परत पृथ्वीवर येईल. एका परीनं ही भविष्यातील मोहिमांची रंगीत तालीम आहे. २०२४मधे आर्टेमिस मोहिमांतर्गत चार अवकाश वीरांगनांना ओरायनमधून एसएलएसने अवकाशात पाठवलं जाईल. पण हे अवकाशवीर चंद्राच्या भूमीवर उतरणार नाहीत.

पृथ्वी भोवतालच्या वातावरणातच ओरायनच्या कसून चाचण्या घेण्यात येतील. त्या संपल्या की, ती कॅप्सूल चंद्राच्या भोवती प्रदक्षिणा घालेल आणि मग पृथ्वीवर परत येईल. आपल्या अवकाशवीरांना घेऊन ही कॅप्सूल चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे जाण्याची, तिथं काही काळ घालवण्याची आणि परत पृथ्वीवर सुखरूपपणे येण्याची ती तालीम असेल.

हेही वाचा: ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

गुंतागुंतीच्या मोहिमा

त्यानंतर २०२५मधे आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत चार अवकाशवीरांना चंद्रावर पाठवलं जाईल. ही मोहीम गुंतागुंतीची आहे. तिचा पुरेसा तपशील अजून प्रसिद्ध झालेला नाही. पण जी माहिती उपलब्ध आहे, त्यावरून असं दिसतं की, या ‘आर्टेमिस ३’ मोहिमेत पहिल्यांदाच कृष्णवर्णीय अवकाशवीरांगना असणार आहे. ती चंद्रावर उतरेल. चंद्रावर पाय ठेवणारी ती पहिलीच महिला आणि तीसुद्धा कृष्णवर्णीय महिला असेल.

त्या द़ृष्टीनं ही मोहीम महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. या मोहिमेपूर्वी एक वेगळी मोहीम हाती घेण्यात येईल. त्यामधे चंद्राजवळच्या रेक्टिलिनियर हॅलो ऑर्बिटच्या कक्षेत ह्यूमन लँडिंग सिस्टीम म्हणजेच ‘एचएलएस’ स्थापित करण्यात येईल. ती यशस्वीपणे स्थापित झाली की, त्यानंतर ओरायनला घेऊन जाणारं एसएलएस रॉकेट अवकाशात झेप घेईल आणि एचएलएसशी जोडलं जाईल.

ओरायनमधले दोन अवकाशवीर एचएलएसमधे जातील. नंतर एचएलएस चंद्राच्या भूमीवर उतरेल. पृथ्वीच्या कालमापनाच्या हिशेबात अवकाशवीर तिथं साडेसहा दिवस राहतील. आणि नंतर ओरायनमधून पृथ्वीवर येतील. यानंतर पुन्हा दोनदा चंद्रावर स्वारी करण्याची योजना आखण्यात आलीय. शेवटची स्वारी २०२७मधे असेल.

चंद्रावरच्या मोहिमांचा उद्देश

अधिकृतपणे सांगण्यात येतं की वैज्ञानिक संशोधन, आर्थिक फायदे आणि नवीन पिढीला अवकाश संशोधन करण्यास स्फूर्ती मिळावी, हेच या मागचं ध्येय आहे. शिवाय या मोहिमांमुळे नवीन उद्योग उभारले जातील, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, कुशल कामगारांना आणि तंत्रज्ञांना भरपूर वाव मिळेल, याची नासाला पूर्णपणे खात्री वाटते.

महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्‍यांच्या मदतीनं आणि व्यावसायिकांच्या साहाय्यानं नासाला चंद्राच्या भूमीचं अधिक संशोधन करता येईल. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत.

शिवाय चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. आपल्या सौरमालेतल्या ग्रहांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचा आजवरचा प्रवास कसा घडत गेला, यावरही त्यातून प्रकाश पडू शकणार आहे. हे सर्व खरंच आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे. 

हेही वाचा: विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चीनची अवकाश संशोधन मोहीम

अवकाशविषयक संशोधनातही चीन आता मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. त्यानं आतापर्यंत तीन चंद्रमोहिमा यशस्वी करून दाखवल्यात. भारत आणि इस्राईलनेही चंद्रमोहिमांचा ध्यास घेतलाय. चीन तर २०३०च्या दशकात चंद्रावर आपला तळ उभारण्याच्या तयारीत आहे. त्यात जर तो यशस्वी झाला, तर ‘चंद्रावरचा हा भूभाग फक्त आमचा आहे’ अशी भूमिका तो घेईल की काय, अशी भीती आता अमेरिकेला वाटू लागलीय.

त्या द़ृष्टीनं विचार केला, तर अमेरिकेच्या ‘आर्टेमिस चंद्रमोहिमा’ हा ‘अवकाशावर वर्चस्व कोणाचं?’ हे सिद्ध करण्याचाच एक भाग आहे. १९६०च्या दशकात अमेरिका आणि त्यावेळच्या सोविएत युनियनमधे अशी स्पर्धा होती. सुरवातीच्या काळात तरी या स्पर्धेत सोविएत युनिनयनं अमेरिकेला मागे टाकलं होतं. पण नंतर अमेरिकेनं ‘अपोलो’ मोहिमा यशस्वी करून चंद्रावर आपले अवकाशवीर उतरवले.

त्यानंतर गोर्बाचेव सत्तेवर येईपर्यंत आणि सोविएत युनियनचं रूप पालटेपर्यंत या दोन देशांमधे अवकाशविषयक संशोधनाबद्दल, अण्वस्त्रांबद्दल तीव्रतम स्वरूपाची स्पर्धा होती. आता सोविएत युनियन अस्तित्वात नाही; पण चीनच्या रूपानं एक नवीन प्रतिस्पर्धी अमेरिकेसमोर उभा ठाकलाय. शिवाय जपान, इस्राईल, भारत हे देशही अवकाशविषयक संशोधनात भरारी घेतायत.

साहजिकच, अवकाशविषयक संशोधनामधे आपलंच नाणं कसं आणि किती खणखणीत आहे, हे सगळ्या जगाला दाखवून देण्याची गरज अमेरिकेला अतिशय तीव्रतेनं वाटू लागलीय. आर्टेमिस चंद्रमोहिमांना या स्पर्धात्मक भावनेतून येणार्‍या अनिश्चिततेचीसुद्धा एक किनार आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आर्टेमिस मोहिमा यशस्वी झाल्या, तर चंद्राबद्दलच्या आणि आपल्या सौरमालेतल्या इतर ग्रहांबद्दलच्या माहितीत मोलाची भर पडेल, यात शंकाच नाही.

चंद्रावरची अफाट श्रीमंती

चंद्रावरच्या मातीमधे असलेली मूलद्रव्यं महत्त्वाची आहेत. या मूलद्रव्यांमधे ७.३ टक्के अ‍ॅल्युमिनियम, ८.५ टक्के कॅल्शियम, ०.२ टक्के क्रोमियम, १२.१ टक्के लोह, ४.८ टक्के मॅग्नेशियम, ०.२ टक्के मँगेनिज, ४०.८ टक्के ऑक्सिजन, ०.१ टक्के पोटॅशियम, १९.०६ टक्के सिलिकॉन, ०.३ टक्के सोडियम आणि ४.५ टक्के टिटॅनियम यांचा समावेश होतो.

याशिवाय चंद्रावर हेलियम-३ आहे. अणुभट्ट्यांसाठी हेलियम-३ अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ते चंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात चीन, रशिया आणि भारत या तीनही देशांना विलक्षण रस आहे. अर्थात अमेरिकाही यात मागे नाही.

याशिवाय चंद्रावर ‘रेअर अर्थ मटेरिअल’ म्हणजेच आरईएमसुद्धा आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक, बॅटर्‍या, इलेक्ट्रिक मोटर यासाठी आरईएम अतिशय मोलाची आहेत. सध्या या क्षेत्रात चीनची मक्तेदारी निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि ते अमेरिकेसह इतर देशांच्या डोळ्यात खुपतंय. या आरईएमसाठीही चंद्रावर जाणं आवश्यक आहे, याची जाणीव आता होऊ लागलीय.

हेही वाचा: 

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…