पृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम

प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्‍या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय.

२६ सप्टेंबरला अवकाशात एक थरारक नाटक झालं. नाटकाचं नाव होतं, ‘डबल ऍस्ट्रॉयड रिडिरेक्शन टेस्ट.’ अर्थात डार्ट. खरं तर ते नाटक नव्हतं, तर एक रंगीत तालीम होती. आपल्या बहुरत्ना, सतत स्पंदनशील, चैतन्यानं मुसमुसलेल्या, प्रचंड प्रमाणात विविध जीवजाती असणा-या, नवनिर्मितीक्षम पृथ्वीच्या दिशेनं एखादा लघुग्रह येऊ लागला, तर त्याची दिशाच बदलून आपल्या वसुंधरेला वाचवता येईल ना, याची ती रंगीत तालीम होती.

याची सुरवात जवळपास १० महिन्यांपूर्वीच झाली. म्हणजे असं की गेल्या वर्षीच्या २३ नोव्हेंबरला डिमॉर्फस या लघुग्रहावर प्रचंड वेगानं जाऊन आदळणारं यान अवकाशात सोडण्यात आलं. ते ज्यासाठी पाठवण्यात आलं, त्या रंगीत तालमीच्या केंद्रस्थानी होते डिडिमॉस आणि डिमॉर्फस हे दोन लघुग्रह. डिडिमॉस हा मोठा लघुग्रह आहे. त्याचा व्यास आहे ७८० मीटर, तर डिमॉर्फसचा व्यास आहे, १६३ मीटर! हा धाकटा लघुगह डिडिमॉस या आपल्या मोठ्या भावाच्या भोवती फिरतो आहे.

दोघांपैकी कुणाहीमुळं आपल्या पृथ्वीला धोका नाहीये. पण तरीही या जोडीवर, विशेषतः डिमॉर्फसवर, आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याची कक्षा बदलता येते का याचा अंदाज घेण्याचं नक्की करण्यात येऊन त्याच्या दिशेनं यान सोडण्यात आलं. कोट्यवधी किमीचा प्रवास करून २७ जुलै २०२२ला हे यान नियोजित डिमॉर्फस आणि तो ज्याच्याभोवती फिरतो आहे, त्या डिडिमॉस या लघुग्रहांच्या जोडीपासून तीन कोटी ८० लाख किमीवर पोचलं. आणि मग रंगीत तालमीचा पहिला अंक सुरू झाला.

एक यशस्वी प्रयोग

लघुग्रहांच्या या जोडीतला डिमॉर्फस लघुग्रहावर यान आदळणार असं नक्की करण्यात आलं होतं. त्यामुळं यानावरच्या कॅमेर्‍यानं त्याचे फोटो घ्यायला सुरवात केली आणि डिमॉर्फससच्या भ्रमणाची कक्षा निश्चित केली. लघुग्रहावर आदळायला १५ दिवस असताना, म्हणजे ११ सप्टेंबरला, यान डिमॉर्फसपासून ८० लाख किमीवर होतं. त्यावेळी यानावर असलेला इटुकला उपग्रह यानापासून मोकळा करण्यात आला.

यान आदळायला चार तास असताना ते पूर्णपणे स्वयंचलित झालं. त्याच्यामधे निश्चित करून ठेवलेल्या कार्यक्रमानुसार ते आपलं काम करू लागलं. आणखीन एक तासानं यानानं ज्याच्यावर जाऊन आदळायचं आहे, त्या डिमॉर्फसची बारकाईनं ’पाहणी’ केली. डिमॉर्फसपासून ३८ हजार किमीवर असताना यानानं आपला मार्ग निश्चित करून टाकला. आणि नंतर सेकंदाला ६.६ किमी अशा अतिप्रचंड वेगानं ते डिमॉर्फसवर जाऊन आदळलं. या आघातातून तीन टन टीएनटी इतकी प्रचंड ऊर्जा मुक्त झाली.

१६३ मीटर व्यासाच्या डिमॉर्फसवर १९ मीटर व्यासाचं यान आदळल्यानं त्या लघुग्रहाचे किती टवके उडाले, त्याच्या मार्गात किती बदल झाला, ते नेमकेपणाला समजायला आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे. मात्र आपल्या गतीनं दूरस्थ अवकाशात फिरणार्‍या लघुग्रहाचा वेध घेऊन त्याच्यावर आपलं यान नेऊन आपटायचं आणि त्याच्या मार्गात बदल घडवून आणायचा, हा प्रयोग यशस्वी झाला.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

लघुग्रहांचे धोक्याचे इशारे

या सगळ्या प्रयोगासाठी अमेरिकेच्या ’नासा’ला ३२ कोटी डॉलर खर्च आला. पृथ्वीच्या जवळ एखादा लघुग्रह आला आणि तो पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे, असं नासातर्फे सांगण्यात येत आहे. अशी तयार करण्याची आवश्यकता वाटायला लागली आहे, याचं कारण पृथ्वीला ज्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकण्याची संभाव्यता आहे, अशा जवळपास १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केली आहे.

या लघुग्रहांची भीती वाटण्याचं कारण त्यांची कक्षा पृथ्वीपासून ७५ लाख किमीपर्यंत अंतरावर आहे. त्यांचा निश्चित आकार आपल्याला कळू शकलेला नाही. मात्र त्यांचा ब्राइटनेस लक्षात घेतला तर या सर्वच लघुग्रहांचा व्यास १०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ ते पृथ्वीवर येऊन आदळले तर त्या आघातातून होणारं नुकसान मनात भय निर्माण करणारं आहे. असा एखादा लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्याचा धोका आताच आपल्यापुढं उभा ठाकला आहे किंवा येत्या काळात होणार आहे, असं नाही. पण त्याचबरोबर एक गोष्ट खरी आहे की हा धोका कधीही निर्माण होऊ शकतो.

१५ फेब्रुवारी २०१३ला रशियाच्या अवकाशात एकाएकी प्रचंड प्रकाशमान अशी एक ‘वस्तू’ दिसली. पृथ्वीच्या वातावरणात शिरलेल्या आणि रशियावरच्या अवकाशात दिसलेल्या त्या अशनीच्या प्रचंड प्रकाशानं दूरवरच्या अनेकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं. त्या अशनीपातानं रशियातल्या शेकडो किमीवरच्या क्षेत्रातल्या इमारतींचं नुकसान झालं. शेकडो माणसं जखमी झाली. ती अशनी खूपच लहान होती, तरीही तिच्यामुळं नुकसान व्हायचं, ते झालंच. अशनीमुळं हे घडलं तर ज्या लघुग्रहाचा व्यास १०० मीटरपेक्षा जास्त आहे. तोच  जर पृथ्वीवर आदळला, तर एक ते दोन किमी व्यासाचं मोठं विवर तयार होऊ शकतं, शेकडोजण जखमी होऊ शकतात, एखादं शहरच्या शहर नष्टप्राय होऊ शकतं.

मोहिमेची गरज का पडली?

नजीकच्या काळात असा लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता कमी आहे. मात्र एखादा लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागलाच, तर त्याची खबरबात आपल्याला लगेच कळेल. याचं कारण आता जेम्स वेब ही अवकाशातच राहून काम करणारी महाशक्तिशाली दुर्बीण आपलं काम करत आहे. शिवाय इतर दुर्बिणीसुद्धा इतक्या शक्तिशाली आहेत.

असा एखादा लघुग्रह आपली वाट सोडून पृथ्वीच्या दिशेनं यायला लागला तर ते आपल्याला लगेचच समजेल. पण तो अगदी लागलीच ध्यानात आला, तरी त्याला रोखण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी तयारी करणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणायला घेण्यासारखंच होईल. तशी फसगत होऊ नये, यासाठी ही खर्चिक मोहीम हाती घेण्यात आली.

हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

ओबडधोबड आकाराचे लघुग्रह

पृथ्वीला धोका निर्माण करू शकणारे हे लघुग्रह आपल्या सौरमालेत आहेतच. मंगळ आणि गुरू यांच्यामधे लहानमोठ्या आकाराच्या लघुग्रहांचा एक मोठा थोरला, म्हणजे १५ कोटी किमी रुंदीचा, पट्टा आहे. या पट्ट्यात लक्षावधी लघुग्रह आहेत. हे लघुग्रह आकारानं इतर ग्रहांसारखे गोलाकार नसतात. त्यांना निश्चित असा आकार नसतो. ओबडधोबड आकाराचे हे लघुग्रह इतर ग्रहांसारखेच सूर्याभोवती फिरत आहेत.

लघुग्रहांचा हा पट्टा आणि त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर सतत बदलत असतं. याचं कारण पृथ्वीसुद्धा आपल्या सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळंच पृथ्वी आणि लघुग्रहांचा हा दांडगा पट्टा यांच्यातलं अंतर कधी १८ कोटी किमी, तर कधी ते ३३ कोटी किमी असतं!

या पट्ट्यातले काही लघुग्रह हे उनाड, चंचल स्वभावाच्या मुलासारखे आहेत. ते आपल्या पट्ट्यात न राहता गुरू ग्रहाजवळ किंवा पृथ्वीजवळ आहेत. ’जवळ’ म्हणजे काही कोटी किमी अंतरावर! जे लघुग्रह वसुंधरेच्या जवळ आहेत, त्यांना ’पृथ्वीसमीप वस्तू’ असं म्हणतात. ज्या डिमॉर्फस या लघुग्रहावर यान जाऊन आदळलं, तो आपल्या पृथ्वीपासून एक कोटी १० लाख किमी अंतरावर होता. मात्र यान थेट त्याच्याकडं जात नाही. यानाची कक्षा नियोजित लक्ष्याला लंबवर्तुळाकार अशी असते. त्याच मार्गानं आताचंही यान गेलं आणि त्यानं आपल्यावर सोपवलेली कामगिरी पार पाडली.

विस्मयकारक प्रचीती

एक लक्षात घ्यायला हवं की चकित व्हावं अशा अवकाशातल्या करामती माणूस १९८०च्या दशकापासूनच करत आला आहे. त्या दशकाच्या उत्तरार्धात अवकाशातला एक उपग्रह नादुरुस्त झाला होता. तेव्हा स्पेस शटलमधून अंतराळवीर त्या उपग्रहाच्या जवळ गेले आणि त्या उपग्रहामधे निर्माण झालेला दोष त्यांनी काढून टाकला. तो उपग्रह पुन्हा आपलं काम करू लागला. नंतर निरुपयोगी झालेल्या आपल्या उपग्रहाच्या दिशेनं क्षेपणास्र सोडून तो उपग्रह अवकाशातच चीननं नष्ट करून टाकला.

चीनकडं असणारं हे विस्मयकारक तंत्रज्ञान आपल्याकडंसुद्धा आहे, हे नंतर अमेरिकेनं, रशियानं आणि भारतानंही सिद्ध करून दाखवलं. अमेरिकेनं या रीतीनं आपल्या मालकीचे ३० तर रशियानं आपले स्वतःचे २७ अवकाशातले उपग्रह याच रीतीनं नष्ट करून टाकले. भारतानं मात्र हा प्रयोग आतापर्यंत एकदाच केला आहे. आता नासानं हाती घेतलेली ‘डार्ट’ ही मोहीम म्हणजे त्याच्यापुढची पायरी आहे.

एका अर्थानं ही रंगीत तालीम म्हणजे अवकाशातल्या सतत फिरत असणार्‍या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी आपण विकसित केलेलं तंत्रज्ञान कितपत सक्षम आहे, ते अजमावून पाहण्याची आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सोडलेलं यान पृथ्वीच्या दिशेनं येणार्‍या लघुग्रहावर प्रचंड वेगात आदळवलं तर त्या लघुग्रहाची दिशा बदलेल ना, याची घेतलेली चाचणी होती. तिच्यामधे किती यश आलं आहे, हे समजण्यासाठी आपल्याला दोन महिने थांबावं लागणार आहे. मात्र प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती या रंगीत तालमीमुळं आली, हे नक्की.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
संपूर्ण लेख

पर्यंटकांच्या गर्दीला युरोप नाही म्हणतंय, भारताचं काय?

कधी कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर रडावसं वाटतं. ज्या ठिकाणी आपण आनंद घेण्यासाठी जातो त्या सर्व ठिकाणांची आजची…
संपूर्ण लेख

शाहरुखचा ‘जवान’ हिट का झाला?

२०१७ मधे शाहरुखचा ‘रईस’ रिलीज झाला. एक चांगला ऍक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

आशा भोसले : फक्त ९० वर्षांचा हिरवागार स्वरऋतू!

कल्पना करा, तुम्ही कोणत्या तरी कारणानं अत्यंत अस्वस्थ आहात, बैचेन आहात. मन लागत नाही आणि तितक्यात एक गाणं…
संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

गांधीजींच्या शेवटच्या माणसाचा शोध घेणारी दोन पुस्तकं!

१९४० च्या दशकात महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेसाठी विनोबा भावे यांची पहिला लढवय्या म्हणून निवड केली. दुसरे…