कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.

सांगली आणि कोल्हापूर ही महाराष्ट्रातली दोन ऐतिहासिक शहरं. या शेकडो वर्षांच्या इतिहासात या शहरांनी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे कित्येक पूर आणि महापूर बघितलेत. पण, २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षांमधे कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या महापुराने जे रौद्ररूप दाखवलं, तसं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. इतिहासातसुध्दा कुठं या भागात इतका प्रलयंकारी महापूर आल्याच्या नोंदी नाहीत.

२००५ला अलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि तिथली पाणी साठवण क्षमता ५१९ मीटरपर्यंत वाढवल्यानंतरच महाराष्ट्राला सातत्याने अशा पद्धतीच्या महापुराचा सामना करावा लागतोय. याचं कारण अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर हेच आहे, असं अनेकवेळा सप्रमाण सिद्ध झालंय. अलमट्टीतून पाणी सोडलं की, इथला महापूर ओसरतो, हेही स्पष्ट झालंय. त्यामुळे आता जर अलमट्टीची उंची वाढली, तर हा महापूर फार धोक्याचा ठरू शकतोय, हे लक्षात घ्यायला हवं.

सांगली-कोल्हापूरला धोका

सांगलीत कृष्णानदीची तळपातळी ५२७.६ मीटर तर कोल्हापूरात पंचगंगेची तळपातळी ५३०.१८ मीटर इतकी आहे. हिप्परगी धरणाची तळपातळी ५१० मीटर, तर महत्तम पाणीसाठा पातळी ५१६.६१ मीटर आहे. पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं तरी सांगली, कोल्हापूरला कोणताही धोका जाणवत नाही किंवा तिथंपर्यंत या धरणाचं बॅकवॉटर जात नाही. अलमट्टी धरणाची तळपातळी ४९८.९४ मीटर इतकी आहे. हे धरण जसजसं भरत जाईल तसतसं त्याचं बॅकवॉटर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या माध्यमातून सांगली-कोल्हापूरकडे सरकायला सुरवात होते.

अलमट्टी धरण ५१९ मीटरपर्यंत भरताच सांगलीतील पाण्याची पातळी ५२७ वरून ५४६ पर्यंत म्हणजे १९ मीटरने वाढते. याच प्रमाणात कोल्हापूरातील पंचगंगेच्या पाणीपातळीतही ५३० वरून ५४९ मीटरपर्यंत वाढ होणार, यात शंकाच नाही. याचाच परिणाम म्हणून २०१९ आणि २०२१ च्या महापुरावेळी सांगलीत कृष्णेची पातळी ५७.६ व ५४.६ फुटावर गेली होती. याच काळात कोल्हापुरात पंचगंगेची पातळी ५६.३ आणि ५५.७ फुटावर गेली होती.

या दोन्ही शहरातली जवळपास निम्मी नागरी वस्ती पाण्याखाली गेली होती. शिवाय प्रमुख बाजारपेठांमधेही पाणी शिरलं होतं. याशिवाय या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती.

शेकडो गावं पाण्याखाली जातील

अशा परिस्थतीत कर्नाटकने आता अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने म्हणजे १६.५ फुटाने वाढवण्याचा विचार चालवलाय. तसं झालं आणि त्यानंतर महापुराची परिस्थिती उद्भवली तर या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पातळीही त्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे २०१९ आणि २०२१ च्या महापुरात या दोन शहरांमध्ये आणि जिल्ह्यात जेवढी पाणीपातळी होती, त्यामध्ये किमान १६ फुटांची वाढ होणार.

या सगळ्याची नुसती कल्पना केली तरी सहज लक्षात येतं की, तशी परिस्थिती निर्माण झाली तर सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरातल्या झाडून सगळ्या नागरी वस्त्या आणि बाजारपेठा महापुराच्या कचाट्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरची शेकडो गावं होत्याची नव्हती होतील.

हेही वाचा: मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित

उद्याचा महापूर, आजचं गणित

उद्या कदाचित महापूर आलाच, तर या धरणाच्या बॅकवॉटरचा फुगवटा सांगली-कोल्हापूर शहरं, तसंच शिरोळ आणि मिरज तालुक्यातल्या आजुबाजूच्या गावांमधे घुसल्याशिवाय राहणार नाही. अलमट्टीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय हा बॅकवॉटरचा फुगवटा कमी होणार नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, अलमट्टीतून प्रचंड मोठ्या म्हणजे किती प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार? तज्ज्ञांच्या मते अशी स्थिती उद्भवल्यास अलमट्टीतून प्रतिसेकंद ३० लाख क्युसेकने विसर्ग करावा लागेल. पण अलमट्टी धरणाची सध्याची सर्वाधिक विसर्ग क्षमता १० लाख क्युसेक एवढीच आहे.

ही क्षमता आणि २०१९ला आलेल्या महापुराची तीव्रता विचारात घेता, अलमट्टीच्या बॅकवाटरचा फुगवटा ओसरायला नव्या उंचीमुळे किमान एक महिना लागेल. या कालावधीत हे बॅकवॉटर शिरलेल्या गावांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.

अलमट्टीचा फुगवटा ओसरला नाही तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या नद्यांना आलेल्या महापुराच्या पाण्यालाही पुढे चाल न मिळाल्याने या नद्यांचं पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरून जो काही हाहा:कार माजेल, त्याची कल्पनाच करता येत नाही. या सगळ्यात अब्जावधी रूपयांचं नुकसान होईल ते वेगळंच. त्यामुळे भविष्यातला हा जलप्रलय रोखण्यासाठी अलमट्टीच्या उंचीला विरोध करावाच लागेल.

कृष्णेचं पाणी कसं पेटलं?

अलमट्टी धरणाची वाढती उंची ही कृष्णा खोरं पाणी वाटप कराराशी निगडीत आहे. कृष्णा खोऱ्यातल्या पाणी वाटपाचा हा विषय नवीन नाही. त्याला जवळपास १५० वर्षाहूनही अधिक काळाची पार्श्वभूमी आहे. १८५५पर्यंत कृष्णा खोर्‍यात एकही नाव घेण्याजोगा असा मोठा पाटबंधारे प्रकल्प नव्हता. १८५५ नंतर निरा, मुठा, कर्नुल, कुडप्पा कालवा आणि वाणी विलाससागर या प्रकल्पांची निर्मिती झाली होती. तोपर्यंत जलवापर आणि जलवाटप हा विषय कुणाच्या ध्यानातही नव्हता.

१९३५ च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार, आंतरराज्य पाणी विषयक वाद सोडवण्साठी एक आचारसंहिता निश्चित करण्यात आली. दरम्यानच्या काळात देश स्वतंत्र झाला आणि कृष्णा खोऱ्याचा भूभाग म्हैसूर, हैदराबाद, मद्रास आणि मुंबई इलाका अशा चार प्रांतात विभागला गेला. कृष्णा खोर्‍यात किती पाणी उपलब्ध आहे, याचा विचार न करताच या चार प्रांतांनी कृष्णा खोऱ्यातल्या आपापल्या भागातलं पाणी अडवण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आखायला सुरवात केली आणि तिथूनच खर्‍या अर्थाने कृष्णेचं पाणी पेटायला सुरवात झाली.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

राज्यकर्त्यांची उदासीनता

भाषावार प्रांतरचनेनुसार आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर १९६३ला कृष्णा-गोदावरी कमिशनने कृष्णा खोर्‍यातल्या पाण्याचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांना अनुक्रमे ४००, ६०० आणि ८०० टीएमसी पाण्याचं वाटप करून टाकलं. पण हे वाटप तीनही राज्यांना मान्य नव्हतं. तिन्ही राज्यांच्या मागणीनुसार पाण्याच्या फेरवाटपासाठी न्या.आर. एस. बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला गेला. या लवादाने २४ डिसेंबर १९७३ ला आपला अहवाल देऊन, महाराष्ट्राला ५६०, कर्नाटकला ७०० आणि आंध्रला ८०० टीएमसी पाणी देण्याची शिफारस केली.

हे पाणी तिन्ही राज्यांनी २०००पर्यंत अडवून त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याची त्यात अट होती. कालांतराने २००० सालानंतर कृष्णा खोर्‍यातल्या फेर पाणीवाटपाचा मुद्दा पुढे आला. त्यासाठी न्या. ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला गेला. या लवादापुढे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांना जाग आली ती २००३ला. त्यावेळी न्या. ब्रिजेशकुमार लवादापुढे आपल्या राज्याची बाजू मांडण्यासाठी एक कक्ष स्थापन केला गेला. या कक्षामधे होते ५ परप्रांतीय वकील आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या काही अधिकाऱ्यांसह १४ अधिकार्‍यांचं एक पथक. या पथकाने आपल्या राज्याची काय बाजू मांडली असेल ते न्या. ब्रिजेशकुमार यांच्या निर्णयावरून दिसतंच.

आपल्या या पथकाने कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याच्या हक्काबाबत जर प्रभावीपणे आणि वेळेत आपली बाजू मांडली असती, तर आज अग्रहक्क असतानाही राज्याच्या वाट्याला सर्वात कमी पाणी मिळालं नसतं. न्या. ब्रिजेशकुमार लवादाने महाराष्ट्राला ६६६, कर्नाटकला ७११ आणि आंध्रला १००१ टीएमसी पाणी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय करणारी तर आहेच, पण आपल्या राज्यकर्त्यांची या उदासिनता अधोरेखित करणारी आहे. राज्यकर्त्यांची ही उदासिनताच आजकाल अलमट्टीच्या रूपाने कृष्णा-पंचगंगा काठच्या मानगुटीवर बसू लागली आहे.

अलमट्टी, महापुराचा थेट संबंध

मूळच्या ५०० मीटर उंचीच्या अलमट्टी धरणाची उंची कर्नाटकने वेळावेळी आणि वेगवेगळी कारणं देत ५०५ मीटर, ५१२ मीटर, ५१९ मीटर अशी वाढवत नेली आणि आता ती ५२४ मीटर करण्याचा त्यांचा मानस आहे. या धरणात केवळ ५१७ मीटरपर्यंत पाणीसाठा केला तरी सांगली-कोल्हापूरची कशी वाताहत होते, ते २००५,२०१९ आणि २०२१च्या महापुराने स्पष्ट झालंय. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला पूर किंवा महापूर नवीन नाहीत. मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढत गेल्यापासून या भागात महापुराने जो कहर केला आहे, तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.

यापूर्वी या भागातले पूर किंवा महापूर फार फार तर एक-दोन दिवस असायचे, त्यानंतर लगोलग पूर ओसरून परिस्थिती पूर्वपदावर यायची. पण मागच्या तीन वर्षात पहिल्यांदाच महापुराचं पाणी थेट नागरी वस्त्या आणि बाजारपेठांमधे घुसलं. नुसतं घुसलं नाही तर महापूर नदीकाठच्या अनेक गावांमधे आठ-पंधरा दिवस मुक्कामच ठोकून होता.

जसजशी अलमट्टी धरणाची उंची वाढत गेली, तसतशी या भागाला महापुराची मगरमिठी आवळत गेलेली दिसते. हे सगळं पाहता, आता तरी महाराष्ट्राने डोळे उघडावेत आणि कृष्णामाईचा प्रकोप आपल्या राज्यावर ओढावणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

हेही वाचा:

एका झाडाची किंमत शोधली कशी?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…