‘कांतारा’ला राजाश्रय, मग दशावताराला का नाही?

‘कांतारा’ या सिनेमानं भूत कोला, यक्षगान या लोककलांमधल्या नृत्यप्रकारांना लोकांपुढे आणलंय. आज कर्नाटक सरकारनं या लोककलावंतांसाठी पेन्शन योजनाही जाहीर केलीय. पण या ‘कांतारा’एवढ्याच पारंपरिक आणि लोकप्रिय असलेल्या दशावताराला आज राजाश्रयाची गरज आहे. त्याबद्दल दशावतारी रंगभूमीवरचे लोकप्रिय कलावंत आबा कलिंगण यांच्याशी साधलेला संवाद.

साधारणतः ऐंशीच्या दशकातलं हे चित्र आहे. कोकणात पडलेली कडाक्याची थंडी आणि सगळीकडं जत्रेचा माहोल. पालखीच्या रात्री थंडी लागू नये म्हणून कांबळ करकचून अंगाभोवती आवळलेले थोरले-धाकले दशावतारी नाटक बघण्याच्या गर्दीत बसलेत. इतक्यात ७८ किलो वजनाचा ५ फूट उंचीचा आडदांड शरीरयष्टी असलेला भीम जोरजोरात आरोळ्या ठोकत धावत येतो. त्याच्या आवाजानं आणि आवेशाने इथे प्रेक्षकांच्या उरात धडकी भरते.

आपल्या भीमाच्या भूमिकेतून ही धडकी भरवणारा, दशावतारी नाटकं गाजवणारा नटवर्य नटसम्राट म्हणजे बाबी कलिंगण. या बाबी कलिंगण यांना प्रेक्षकांमधे बसलेले गावकरी नाटक संपल्यानंतर गमतीनं म्हणायचे, ‘मी काय तुझ्यासोबत घरी जाऊचंय नाय!’ खरं तर हीच त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली अस्सल दाद. असा हा रंगीबेरंगी दशावतार म्हणजेच कोकणचं वैभव. जे कर्नाटकातल्या ‘कांतारा’इतकंच लखलखतं आहे.

पण, कर्नाटक सरकारनं कांतारामधे नाचणाऱ्या नर्तकांना पेन्शन जाहिर केलीय. पण कोकणातल्या लोकाश्रयावर चालणाऱ्या या कलेला राजाश्रय कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. अशा अनेक मुद्द्यांवर खुद्द बाबी कलिंगण यांच्या नातावाशी म्हणजेच आबा कलिंगण यांच्याशी चर्चा केली. त्यामधून आबा कलिंगण यांनी उलगडलेली दशावतारी रंगभूमीची सद्यस्थिती.

कोकणात दशावताराची सुरवात

कोकणातल्या दशावताराला सुमारे आठशे वर्षांची परपंरा आहे. कोकणातल्या किनाऱ्यावर व्यापार व्हायचा. अनेक दिवस समुद्र प्रवास करून आलेले व्यापारी कोकणात समुद्रकिनाऱ्यावरच्या गावात थांबायचे. त्यांच्या मनोरंजनांसाठी दशावातार व्हायचा. शिवाजी महाराजांच्या काळातही महाराजांसमोर मनोरंजानासाठी दशावतार सादर केले जायचे, असं म्हणतात.

रामदासस्वामींनी ‘नेटके खेळता दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळकुसरी, परि ते अवघे धटिंगण.’ असं दासबोधात लिहिलंय. त्यावरून शिवकालात दशावतार होता, एवढं तरी नक्की सांगता येतं.

हेही वाचा: लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

बाबी कलिंगण यांचा भीम

त्या काळी कोणत्याही आधाराशिवाय चालू न शकणारे बाबी कलिंगण दशावतारात पात्राची वेशभूषा करताच त्यांच्यावर रंगदेवता अशी काही प्रसन्न व्हायची की, ते थेट त्या भूमिकेत शिरायचे. त्या आवेशात त्यांना ना कोणाचा आधार लागायचा, ना त्यांना आजूबाजूच्या वातावरणाचं भान असायचं. इतके ते त्या भूमिकेत एकरुप होऊन जायचे.

म्हापण गावात त्यांची दशावताराच्या प्रयोगात हनुमानाची भूमिका होती. आम्ही त्यांना हाताला धरत मंदिराच्या मागं नेलं. पण त्यांनी हनुमानाचा वेश धारण करताच प्रेक्षकांमधे अशी काही धमाल उडवून दिली की, हेच आमचे ते काहीवेळापूर्वी हात धरुन चालणारे आजोबा का? असा प्रश्न आम्हाला पडला.

अनेकदा त्यांची भीमाची भूमिका पाहून त्यांना गाडीतून किंवा रिक्षातून घरी आणणाऱ्या गावातल्या व्यक्ती आज बाबीसोबत रिक्षाने यायची भीती वाटतेय, असं गमतीनं म्हणायचे. ते लहानपणी आम्हाला गोष्टी सांगायचे. मार्गदर्शन करायचे. दशावताराबद्दल मार्गदर्शन करताना त्यांच्यात आणि आमच्यात कुठलंही नातं नव्हतं. ते आमच्याकडे कलाकार म्हणून पहायचे. मला वाटतं त्यांची ही गोष्टच मला प्रेरणा देते.

‘गरुडझेप’ या नाटकात ते कोकणात बाबूंपासून जे सुप तयार केलं जातं त्याचे पंख तयार करून हाताला बांधायचे. ही भूमिका जवळपास तासभर चालायची. ही सुपं बरीच वजनदार असतात. त्याचे पंख हाताला बांधून काम करणं, हे प्रचंड कठीण आहे. पण ते वेड होतं. त्यांच्यातलं हे दशावताराचं वेडच आजही मला बेभान करतं आणि भूमिकेत शिरायला उद्युक्त करतं.

आबांचा दशावतार प्रवास

मी सुरवातीला दशावतारात थेट कलाकार म्हणून काम केलेलं नाही. मी सुरवातीला झांज वाजवायचो. मग आजोबांनी मला पखवाज वाजवायला शिकवलं. दशावतारात आडदशावतार म्हणजेच रिद्धी-सिद्धी, गणपती, ब्राह्मण, ब्रह्मदेव, भट संकासूर, विष्णू असे पात्र असतात, त्यात तबलजी आणि झांजवादक असतात.

हे आजोबा मला रोज घरी बसून शिकवायचे. त्यानंतर मी रिद्धी-सिद्धी, विष्णू या भूमिका केल्या. त्यानंतर मी कृष्णाच्या मुलाची म्हणजेच सांबांची भूमिका करायचो. मी सध्या राजपात्राची भूमिका साकार करतो. यामधे माझे काका सुधीर कलिंगण आणि भाऊ शांती कलिंगण यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेलं.

या थोरामोठ्यांचे अनुभव फार महत्वाचे होते. दशावतारात जसं पौराणिक कथांचं ज्ञान आवश्यक असतं, तसंच अनुभवही महत्वाचा असतो. हा अनुभव दशावातारात संवादफेक करताना कामी येतो. दशावतारी नाटकाची संहिता नसते. संवाद प्रत्येक कलाकार ठरवतो. यात आम्ही काही रिहर्सल करत नाही.

त्यामुळे हजरजबाबीपणा, ज्याला आम्ही दशावतारात व्यवहार असं म्हणतो तो महत्वाचा आहे. एखादा संवाद सुरु असताना समोरचा काय विचारेल, हे नक्की नसतं त्यामुळे त्याला उत्तर देण्याची पूर्ण तयारी आपल्याकडे असावी लागते.

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

रात्रीचो राजा, सकाळी बोजा

पूर्वी रात्री दशावताराचा प्रयोग झाला की सकाळी सगळे कलाकार एका गावातून दुसऱ्या गावी डोक्यावर पेटी घेऊन जायचे. आता पेटी जाऊन सुटकेस आलीय. प्रत्येक दशावतार कंपनीकडे स्वत:ची गाडी असते. कलाकारांकडे स्वत:ची गाडी असते.

पण, ‘रात्रीचो राजा सकाळी कपाळावर बोजा’ हेच उत्तम होतं की काय? असं वाटू लागलंय. कारण त्याकाळी कलाकार रात्री डोक्यावरुन पेटी घेऊन पायी रस्ता तुडवताना चर्चा करत. त्यात प्रत्येकाच्या भूमिकेची चर्चा व्हायची. एकमेकांच्या चुका समजायच्या. प्रवेश कसा व्हावा अशा कल्पनांवर बोललं जायचं.

पूर्वीचे कलाकार जत्रेच्या सीझनमधे दशावताराचे प्रयोग करुन, त्यातले पैसे जमवून ठेवायचे आणि घरी द्यायचे. प्रयोगांच्या काळात त्यांच्या बायका मोलमजुरी करत. आता वर्षभराचे पैसे, प्रयोगाआधी आगाऊ रक्कम घेतली जाते. सध्या स्पर्धा वाढलीय.

कोकणातच दशावताराच्या आता १००पेक्षा जास्त कंपन्या असतील. त्यांचे १५०पेक्षा जास्त प्रयोग होतात. त्यामुळे कलाकारांसमोरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या सीझन नसताना, संयुक्त दशावतार होतो. ज्यात वेगवेगळ्या कंपन्यांमधले दशावतारातले नावाजलेले कलाकार एकत्र येऊन काम करतात.

लोकाश्रय आहे, राजाश्रय नाही

दशावतारी कलेला लोकाश्रय आहे असं आपण म्हणू शकतो, पण राजाश्रय नाही. आजही दशावतार कलेवर म्हणावं तसं संशोधन झालेलं नाही. ज्यांनी संशोधन किंवा लिखाण केलंय, त्यांनी दशावताराच्या समस्या मांडलेल्या नाहीत. मुळात त्यापैकी अनेक जणांना दशावतारातल्या समस्या माहीतच नाहीत.

आजही लहान दशावतार नाटक कंपन्यांना दशावताराचं साहित्य, वेशभूषा, माईक, रंगभूषेसाठी चांगल्या दर्जाचे रंग अशी सामग्री जमवणं कठीण होतं. चांगले कलाकार चांगलेच पैसे मागतात, त्यामुळे कमी पैशात नाटक कंपनी चालवणं कठीण होतं.

कोरोनाकाळात दशावतार बंद पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी गावोगावच्या जत्रा बंद पडल्या होत्या. अनेक दशावतार कंपन्यांचे हप्ते थकले होते. त्यावेळी काही नेत्यांनी हप्ते भरण्यासाठी जास्त कालावधी मिळावा, यासाठी नक्कीच पाठपुरावा केला होता. पण दशावतार ही लोककला इतकीही कमकुवत नाही की इतक्या सहजासहजी बंद पडेल.

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला ‘फटका’वणारा तमासगीर कीर्तनकार

कलेत बदल व्हावा

दशावतारी कलाकारांचं आर्युमान कमी असतं. अनेकदा अभिनय करताना बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. अभिनयाचा आवेश इतका जबरदस्त असतो की, काहीवेळा तो करताना आतड्यांना पीळ बसतो. अनेक कलाकार कमी वयात आजारी पडतात.

त्यांना उतारवयातला आजारांचा खर्च उचलणं जिकिरीचं जातं. आजकाल लोकांची चलचित्र असलेले दशावतार बघण्याची मागणी वाढलीय. काळानुसार कलेच्या सादरीकरणात बदल होणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारा पैसा उभा करणं, हे दशावतार कंपन्यांसमोर सध्या आव्हान ठरतंय.

प्रबोधन घटले, विनोद वाढला

पूर्वीच्या काळी केल्या जाणाऱ्या दशावतारी नाटकांमधे विनोद मर्यादित होते. समाजप्रबोधन, संदेश यालाही तितकंच महत्व होतं. आता लोकांना जास्तीत जास्त विनोदच हवे असतात. विनोद कमी असले तर नाटकात काय मजा नाय, असे सुस्कारे लोक सोडतात.

चलचित्र असलेल्या नाटकाला आयोजकांकडून विशेष किंमत दिली जाते. या आणि अशा काही बदलांमुळे सध्या नाटक कंपन्यांमधे स्पर्धा सुरु झालीय. या सगळ्यामधे कलेचा मुख्य उद्देश बाजूला राहतो. पैशासाठी काही नाटक कंपन्या कलेशी तडजोड करतात. लहान नाटक कंपन्यांचे यात नुकसान होतं.

एकच किंमत नियमित केली तर, आयोजक आणि कंपन्या या दोघांसाठी ते फायद्याचं असेल. पण हे लक्षात घ्या, आपली कला टिकवण्यासाठी आपल्याला सकारात्मक बदल करावेच लागतील. कारण शेवटी हे लक्षात ठेवलंच पाहिजे की, काळाच्या पुढ्यात कुणाचं काहीच चालत नाही.

हेही वाचा: 

‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक 

शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ

प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

जुन्या संसद भवनाचा इतिहास जपला गेला पाहिजे!

प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी…
संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दप्रतिभेचा गणपती बाप्पा

‘ॐ नमो जी आद्या। वेदप्रतिपाद्या।  जयजय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा…
संपूर्ण लेख

पर्यावरणपूरक विसर्जन हाच योग्य पर्याय

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी, त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं, म्हणजे गणेशोत्सव. त्यातही…
संपूर्ण लेख

नारायण सुर्वे यांच्या घामेजलेल्या कवितेची गोष्ट

नारायण सुर्वे यांचे जे कवितासंग्रह आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) अभिनव प्रकाशनचे वा.…
संपूर्ण लेख

नव्या पिढीनं संतांकडं कसं पाहावं? हे शिकवणारं रिंगण

रिंगण नावाचं एक वारकरी संतांवर निघणारं वार्षिक आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात प्रकाशित होत असतं.  पत्रकार सचिन परब…