नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. नुकताच त्यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रम रचला.
मराठी सिनेमात आणि रंगभूमीवर प्रशांत दामले यांची कारकीर्द १९८३मधे सुरू झाली. त्यांची ही कारकीर्द आता १२ हजार ५०० नाट्यप्रयोग होईपर्यंत सातत्यानं सुरु आहे. त्यांची ही विक्रमी कारकीर्द अभिनेत्यांना प्रेरणादायी आहे.
हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला ‘फटका’वणारा तमासगीर कीर्तनकार
नाटक, सिनेमा आणि मालिका
‘टुरटूर’ या मराठी नाटकापासून दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम सिनेमांमधे आणि २६ नाटकांमधे अभिनय केला.
यातली ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही नाटकं आणि ‘वाजवा रे वाजवा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘तू तिथं मी’ हे सिनेमे विशेष प्रसिद्ध झाले.
छोटा पडदा म्हणजेच टीवीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांमधे भाग घेतला. यातल्या ‘काय पाहिलंस माझ्यात’, ‘घरकुल’, ‘बे दुणे तीन’ या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरची ‘आम्ही सारे खवय्ये’ ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.
कमी वयात मोठी कामगिरी
प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. त्यांचं तेजश्री प्रधानसोबतचं ‘कार्टी काळजात घुसली’ राहुल देशपांडेसोबतचं ‘संशयकल्लोळ’ तसंच शुभांगी गोखलेसोबतचं ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटकही विशेष लोकप्रिय आहे. ‘चार दिवस प्रेमाचे’ या त्यांच्या नाटकाचे तर १०२६ प्रयोग झालेत.
आम्ही दोघं राजा राणी, ओळख ना पाळख, चल काहीतरीच काय, टुरटूर, नकळत दिसले सारे, पाहुणा, प्रियतमा, प्रीतिसंगम, बहुरूपी, ब्रह्मचारी, बे दुणे पाच, माझिया भाऊजींना रीत कळेना, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, लेकुरे उदंड झाली, व्यक्ती आणि वल्ली, शू कुठं बोलायचं नाही, श्री तशी सौ, सासू माझी ढासू, सुंदर मी होणार अशा नाटकांमधेही दामले यांनी काम केलंय.
याशिवाय जवळपास ३७ मराठी सिनेमांमधून प्रशांत दामले यांनी आपली अभिनयाची कारकीर्द सादर केलीय. ५ एप्रिल १९६१चा त्यांचा जन्म. म्हणजे आता त्यांचं वय ६१ आहे. फक्त ३९ वर्षांत त्यांनी इतकी सर्व कामगिरी करून दाखवलीय.
हेही वाचा: तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
कलेशी प्रामाणिक राहणारा नाट्यकर्मी
सदा हसतमुख असणार्या या कलाकाराबद्दल जितकं बोलावं तेवढं थोडं आहे. माझा त्यांचा संबंध ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकामुळे आला. मी लिहिलेल्या या नाटकाचे त्यांनी जगभर प्रयोग केले. ते स्वत: नाट्य निर्माते आहेत.
माझा त्यांच्याबद्दलचा वैयक्तिक अनुभव असा की, बरेच निर्माते आपली या निर्मितीत पैशाची गुंतवणूक आहे म्हणून आपल्याला हवे तसे नाट्य संहितेत बदल करून घेतात. पण प्रशांत दामले यांनी ‘लेखक आणि दिग्दर्शक’ जे म्हणतील तेच मी अभिनेता म्हणून स्टेजवर सादर करणार, अशी स्वच्छ भूमिका घेतली.
नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असतं याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमधे राहिली पाहिजे, असं त्यांचं वागणं असतं. सगळ्या कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो.
नव्या पिढीने काय शिकावं
हल्लीची पिढी नाटकाचा उपयोग सिनेमात, सीरियलमधे आपल्याला काम मिळावं म्हणून करते आणि भरकटत जाते. मी नाटकही करतो, सिनेमात जमलं तर काम करतो, जाहिरातीत काम मिळालं तर बघतो, असं म्हणत एक ना धड भाराभर चिंध्या करतात आणि अपयशाची पायरी नाही तर जिनाच चढत राहतात.
याबद्दल त्यांनी प्रशांत दामले यांच्याकडून धडा घ्यायला हवा. आपण अभिनय करणार आहोत आणि त्यात आपल्याला प्रथम प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आपल्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली पाहिजे. म्हणून कामात सातत्य हवं. कामातले सातत्य हेच इतिहास घडवत असतं.
गेली कित्येक वर्षं, किंबहुना नाट्य निर्माता झाल्यानंतर दामले यांनी सिनेमा वगैरे करणं पूर्ण सोडून दिलं होतं. याही वयात ते ज्या उत्साहानं काम करतात, त्यावरून ते मराठी नाटकातले देव आनंद आहेत, असं म्हटलं पाहिजे. नाटकातला आणि सिनेमातला त्यांचा सहजाभिनय हा प्रेक्षकाला सहजपणे भावतो. त्यांची अभिनय कारकीर्द सर्व नवोदित अभिनेत्यांसाठी स्फूर्तिदायक आहे.
हेही वाचा:
ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य