जोशीमठचा इशारा.. निसर्गाची हत्या ही आत्महत्याच!

जोशीमठ हे उत्तराखंडमधलं शहर तिथल्या इमारतींना पडलेल्या तड्यांमुळे आणि खचत चाललेल्या जमिनीमुळे प्रचंड गाजतंय. तिथल्या लोकांना राहतं घर सोडून निर्वासित व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जागतिकीकरणानंतरचं विकासाचं मॉडेल कसं बेगडी ठरतंय, त्याचा हा पुरावा आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आपल्या फेसबुक वीडियोमधून या खचलेल्या भूगोलाचा इतिहास मांडलाय. त्याचं हे शब्दांकन.

जोशीमठ गाव अक्षरशः खचतंय. सुमारे ४५०० घरांपैकी ६०० घरं खचलेली आहेत. त्यांच्याखालची जमीन दुभंगतेय. घरांना भेगा पडल्यात. लोकांचं राहणं अशक्य झालंय. आणि आता असं लक्षात येतंय की ही केवळ जोशीमठची परिस्थिती नाही. त्याच्याबाजूचं कर्णप्रयाग असेल किंवा नैनिताल या आजूबाजूच्या गावांमध्ये हीच अवस्था दिसून येतेय. बालकवींची एक कविता यावेळी आठवते.

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

असं उध्वस्त धर्मशाळेचं बालकवींनी जे वर्णन केलंय, ते शब्दशः जगणं जोशीमठच्या नागरिकांच्या आयुष्यात आलंय. पण जोशीमठचं हे वर्तमान बघण्यासाठी आणि तिथला हा भूगोल बघण्याआधी आपण इतिहासात डोकावून बघितलं पाहिजे.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

चिपको आंदोलनाचा इतिहास

गोष्ट आहे १९७०ची. उत्तराखंडचा आत्ताचा चमोली हा जिल्हा त्यावेळी उत्तरप्रदेशमधे होता. चमोलीला पहिला पूर १९७०ला आला. त्यावेळेलाच तिथले गांधीवादी चंडीप्रसादजी भट हे जागे झाले. त्यांनी १९६४ला त्या भागात गांधीवादी पद्धतीने विकास करण्यासाठी, शिक्षण घडवण्यासाठी ‘दशौली ग्रामस्वराज मंडळ’ स्थापन केलं होतं. त्यांच्या वतीने ते गावोगावी हिंडायला लागले. तिथल्या गावकऱ्यांना सांगू लागले,

‘आपल्या भागामध्ये निसर्गसंपन्न जंगल आहे. या जंगलात अक्रोड, भूर्जपत्र, देवदार असे हजारो वर्षांचे वृक्ष आहेत. अतिशय उपयुक्त अशा वनस्पती आहेत. त्यांची तोड होणं हे आपल्यासाठी घातक आहे. निसर्ग हे आपलं जीवन आहे. निसर्गावर आपली उपजीविका आहे. त्यामुळे तुम्ही गप्प बसून चालणार नाही. हे सांगितल्यानंतर त्यांनी गावातल्या महिलांचं मंगलदल स्थापन केलं.

या संघटनेनं पन्नास वर्षांपूर्वी एक इतिहास घडवला. रैणी गाव. २३ एप्रिल १९७३. गावातले सगळे लोक बाजारासाठी गावाला निघून गेले होते. जेव्हा गावातल्या महिलांना वृक्षतोडीचा, कुऱ्हाडीचा, करवतींचा आवाज ऐकू आला, तेव्हा त्या सपासप पळत एकमेकांना सांगून जंगलाकडे गेल्या आणि बघताबघता त्यांनी वृक्षांना मिठी मारली.

‘माँ का घर नही उजाडने देंगे’ असं म्हणत एकेकजणी जाऊन त्या वृक्षांना मिठी मारू लागल्या आणि बघताबघता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कुऱ्हाडी वरच्यावर थांबल्या. भारतात पर्यावरणासाठीची ही पहिली चळवळ होती. प्रसिद्ध अशा ‘चिपको आंदोलना’चा उदय त्यापासूनच झाला होता.

नैसर्गिक आपत्तींचा धोका

या भागामधल्या जंगलाचा, निसर्गाचा विनाश झाला तर हा त्या भूभागाचा विनाश आहे हे समजल्यामुळे त्या काळातल्या केंद्र सरकारने १९७६ला जी समिती नेमली होती, तिने तेव्हाच सांगितलं होतं की इतर भागांसारखा विकास करण्याचा विचार या भागात करू नका. हिमालयातला खडक हा अतिशय तरुण आहे. तो ठिसूळ आहे. इथं इतर ठिकाणच्या सारखी विकास कामं करू नयेत.

१९९० पर्यंत चिपको आंदोलनाने सुंदर काम केलं होतं. त्यावर्षी उपग्रहाच्या मदतीने जी छायाचित्रे घेतली गेली, त्यात या भागातलं जंगल वाढल्याचं दिसून आलं होतं. तिकडं टिहरी धरण सुरू झालं होतं. उत्तराखंडचा हा भाग अतिशय संवेदनशील असल्याने याला सुंदरलाल बहुगुणा विरोध करत होते. डेहराडूनचे वैज्ञानिकही त्यांना साथ देत होते.

२०००ला उत्तराखंड राज्य हे स्थापन झालं. १९९०नंतर जगभरात निसर्गालाच शत्रू समजून कार्य चाललंय. निसर्गाची हत्या ही आत्महत्या हे त्यातून वारंवार सिद्ध होतंय. त्यातलाच एक भाग हा जोशीमठ आहे. पण हा केवळ एवढ्यापुरता मर्यादित नाही. २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात याच चमोली जिल्ह्यातल्या धौलीगंगाचा जलविद्युत प्रकल्प पुरामधे वाहून गेला होता.

म्हणजे या भागाला भूकंपाचा धोका आहे. भूस्खलनाचा धोका आहे. हिमस्खलनाचा धोका आहे. जगाचं जे तापमान वाढतंय त्यामुळे हिमालयातल्या हिमनद्या वितळतायत. त्या सगळ्याचं पाणी मोठ्या पुरासारखं जेव्हा येतं, तेव्हा इथं काहीही टिकत नाही.

हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

निसर्गापेक्षा विकासाला प्राधान्य

२०१४ला या भागामधे धरण होऊ नये अशी जेव्हा याचिका दाखल केली गेली त्यावर सर्वोच्च न्यायालयाने धरण न बांधण्याचा निर्णय दिला होता. २०१९ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली, तिनेही इथून पुढे उत्तराखंडमधली धरणं थांबवायला सांगितलं होतं. तरीही आजमितीला उत्तराखंडमध्ये ९८ छोटी आणि मध्यम धरणं आहेत.

ही धरणं करताना त्या भागामधल्या खडकाची पर्वा न करता, सुरुंग लावले गेले. खोदकाम केलं गेलं. त्यामुळे तो आधीच ठिसूळ असलेला भूभाग अधिकाधिक ठिसूळ होत गेलाय. तिथं चारधाम यात्रा करण्यासाठी रस्ते मोठे केले गेले, बोगदे खणले गेले. या सगळ्या विकासकामांची परिणती म्हणून जोशीमठ खचतंय. आजूबाजूची गावं खचतायत. हा धोका पूर्णपणे हिमालयाच्या भागावर आहे.

विकासाचं अर्थशास्त्र, जोशीमठचा धडा!

दरवेळेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेते विचारतात की विकास की पर्यावरण? त्यांना असं वाटतं की किती बिनतोड प्रश्न विचारलाय. पण विकासाचं अर्थशास्त्र सांगताना फक्त तातडीचा फायदा आणि तोसुद्धा निव्वळ पैशांतला फायदा मोजला जातो. अर्थशास्त्रज्ञ खर्च लाभ विश्लेषण मांडतात. पण त्यामागच्या तोट्याचा, नुकसानीचा विचार कधी कुणी केलाय का? आत्ता जोशीमठचं जे झालंय याचा विचार केला होता का?

तो जर केला असता तर गणित वेगळं आलं असतं. जगामध्ये जे सध्या पर्यावरणीय अर्थशास्त्र विकसित होतंय, झालंय, त्यात भारतीय शास्त्रज्ञच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यात केम्ब्रिज विद्यापीठातले पार्थोदास गुप्ता आहेत, स्वित्झर्लंडमधले पवन सुखदेव आहेत; जे निसर्गाचं छुपं अर्थशास्त्र सांगतायत. ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला विकास टिकाऊ करता येईल. शाश्वत विकास करता येईल.

आत्ताचा विकास हा टुकार आणि पोकळ आहे. थोड्याशा पावसामधे पूर येतो. बेंगलोर, पुणे पाण्यामधे तुंबून जातं. हा आपला विकास आहे का? आपण जेव्हा प्रश्न विचारू तेव्हा खऱ्या अर्थाने विकासासोबत पर्यावरणाला कसं पुढे न्यायचंय, निसर्गाला जपून कसा विकास करायचाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. त्यासाठी त्या दिशेनं आपल्याला जावं लागेल.

आपण निसर्गाची जी हत्या करतोय, त्याचे अनेक रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळतायत. त्यापैकी एक गिफ्ट आता या नव्या वर्षात आपल्याला मिळालं आणि ते जोशीमठ आहे. यावर सावध होऊन विचार करावा लागेल. आज ही आपत्ती फक्त जोशीमठवर आहे पण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जे विकासकार्य चाललंय त्यातून कुठली ना कुठली आपत्ती येणार आहे, हाच जोशीमठचा धडा आहे.

हेही वाचा:

पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

पाहुण्या पक्ष्यांचा भारतावर ‘रुसवा’ पण का?

मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

( शब्दांकन: प्रथमेश हळंदे )

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…