आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते. यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडे थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो.

प्रसिद्ध स्विस भूगर्भशास्त्रज्ञ अरनॉल्ड हीम आणि त्यांचे ‘सहकारी आगस्टो गॅस्टर यांनी १९३६ मधे हिमालयाच्या भूरचनेचा अभ्यास करण्यासाठी अभियान सुरू केलं. त्यांनी अभ्यासाअंती १९३८ मधे प्रसिद्ध केलेल्या अहवालात चमोली गढवालच्या हेलंगपासून तपोवनपर्यंचा भाग संवेदनशील असल्याचं सांगितलं होतं. या अहवालाचं महत्त्व भूगर्भशास्त्रज्ञांसाठी एखाद्या धर्मग्रंथापेक्षा कमी नाही. या अहवालाचा संदर्भ घेतच आतापर्यंत मध्य हिमालयाच्या भूगर्भ स्थितीवर अभ्यास करण्यात आला. पण आता सततच्या भूस्खलनामुळे किंवा जमीन खचण्याच्या घटनांमुळे जोशीमठ शहराचं अस्तित्व धोक्यात आलंय.

हेही वाचा: जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

जोशीमठ ऐतिहासिक शहर

जोशीमठ हे तपोवन आणि हेलंग यांदरम्यान वसलेलं आहे. १९७६ मधे मिश्रा समितीने जोशीमठच्या अस्तित्वावर अभ्यास करून तो भाग संवेदनशील असल्याचं जाहीर करत उपाययोजना सुचवल्या. यानंतरही जोशीमठ वाचवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. उलट गेल्या काही वर्षांत या भागात सिमेंटचं जंगल वाढतच गेलं. वाढत्या लोकसंख्येमुळे जोशीमठच्या परिसरात पाण्याचा उपसा अधिक झालाय. आज या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा दिसत आहेत.

भारताच्या सर्वोच्च धार्मिक पीठांपैकी एक असलेल्या ज्योतिपीठच्या भितींला तडे गेले. भारत-चीन सीमेवरचं देशाचं शेवटचं शहर डोळ्यांदेखत खचताना दिसतंय. भुगर्भशास्त्रज्ञांनी यापूर्वीही जोशीमठ रिकामं करण्याचा इशारा दिला होता. जोशीमठ शहर आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असताना उत्तराखंडचं सरकार खडबडून जागं झालं. केंद्र सरकारनेही याबाबत उच्च स्तरीय बैठक बोलावली होती.

पंतप्रधान नोंद्र मोदी यांनी अलीकडेच सीमेवरचं गाव माणा याला देशातलं पहिलं गाव म्हणून जाहीर केलं. या दृष्टीने जोशीमठ हे देशातलं पहिलं शहर मानलं पाहिजे. हे काही सामान्य ठिकाण नाही. चार सर्वोच्च धार्मिक पीठांपैकी एक ज्योतिपीठ जोशीमठ इथं आहे. उत्तराखंडची प्राचीन राजधानी म्हणून जोशीमठकडे पाहिलं जातं. इथं कत्युरी वंशाने सुरवातीच्या काळात राज्यकारभार पाहिला. चार धामपैकी एक असणाऱया बद्रीनाथ यात्रेची औपचारिकता जोशीमठ इथं पूर्ण होते. कारण शंकराचार्य यांची गादी याच शहरात आहे.

रंगबिरंगी फुलांचं खोरं आणि नंदादेवी बायोस्फीयर रिझर्व बेस म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. हेमकुंडाच्या यात्रेवर ‘जोशीमठातून देखरेख ठेवली जाते. नीती-माणा खिंड आणि बाडाहोती पठारावरून चिन्यांच्या कुरापतींवर या भागातून लक्ष ठेवण्यात येतं. चीनकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होतात आणि सीमेवर अशांतता राहावी यासाठी आटापिटा करत राहतात, तेव्हा त्यावर लक्ष ठेवणारी आयटीबीपीची तुकडी आणि त्याचे माऊंटेन ट्रेनिंग सेंटर जोशीमठ इथं आहे. याच ठिकाणी गढवाल स्काऊटचं मुख्यालय आणि ९ माऊंटेन ब्रिगेडचं मुख्यालय आहे. यावरून या स्थानाची भौगोलिक आणि आध्यात्मिक तसंच सामरिक महती लक्षात येईल.

भूस्खलनप्रवण भूभागावर जोशीमठ

सध्या जोशीमठातली शेकडो घरं, रुणालय, सैनिक मुख्यालय, मंदिर, रस्ते यांच्यावर खचण्याची टांगती तलवार आहे. २० ते २५ हजार लोकसंख्येचं शहर अनियंत्रित वाढ आणि अदूरदर्शीपणाच्या विकासाच्या भोवर्‍यात अडकलेलं आहे. एकीकडे तपोवन विष्णूगाड प्रकल्पासाठी तयार केलेला ‘एनटीपीसीच्या भुयारी मार्गाने जमिनीतला आतला भाग पोकळ झाला आहे; तर दुसरीकडे बायपास कामामुळे जोशीमठच्या मुळावर दिवसेंदिवस घाव घातले जात आहेत. चोहोबाजूंनी जोशीमठ अधांतरित होण्याच्या मार्गावर आहे.

भूगर्भशास्त्रांच्या मते, जोशीमठ हे प्रामुख्याने जुन्या भूस्खलनप्रवण भागावर वसलेलं असून इथं पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नाही. जमिनीत मुरणार्‍्या पाण्याबरोबरच माती वाहून जात असल्याने खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२१ मधे धोलीगंगामधे आलेल्या महापुरामुळे अलकनंदाच्या किनार्‍यावरची जमीन खचली. त्यानंतर या समस्येनं आणखीच उग्र रूप धारण केलं.

जमीन खचणं अणि भूस्खलनाच्या कारणांचा अभ्यास करणार्‍या तसंच उपाय योजना आखण्याच्या दृष्टीने राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक आणि भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. पीयूष रौतेला यांच्या नेतृत्वाखाली जुलै २०२२ मधे तज्ज्ञांची समिती नियुक्‍त करण्यात आली. या समितीने शहरातलं सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करणं, जोशीमठच्या पायथ्याशी असलेल्या अलकनंदामुळे भूगाग खचणार नाही, याची काळजी घेणं तसंच मोठे प्रकल्प थांबवण्याच्या शिफारशी केल्या. पण या अहवालावर अद्याप बैठकांचं सत्र सुरू आहे.

हेही वाचा: मान्सून खरा की आभासी हे ओळखायचं कसं?

मिश्रा समितीच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष

वास्तविक १९७० च्या अलकनंदाच्या पुरानंतर उत्तर प्रदेश सरकारने १९७६ मधे गढवालचे तत्कालीन आयुक्‍त महेशचंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रज्ञांची समिती नेमली होती. या समितीकडून जोशीमठच्या संवेदनशीलतेवर अभ्यास करण्यात आला.

या समितीत सिंचन आणि बांधकाम विभागाचे इंजिनिअर, रुरकी इंजिनिअरिंग कॉलेज तसंच भूगर्भ विभागाच्या तज्ज्ञांबरोबर पर्यावरणवादी चंडीप्रसाद भट्ट यांना सामील केलं होतं. या समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, जोशीमठ हे स्वत:च एका भूस्खलनप्रवण भूभागावर आहे. त्यामुळे त्याच्या परिसरात मोठ्या प्रकल्पाची उभारणी हे अत्यंत जोखमीचं ठरू शकतं.

या समितीने ओलसर भागाला धक्का न लावण्याची सूचना केली. यानुसार ‘जोशीमठच्या वरच्या भागात भूस्खलन होणार नाही किंवा नदीला पूर येणार नाही. जोशीमठच्या वरच्या भागात असलेल्या औलीकडून पाच ओढे येतात. हे ओढे कालांतराने अक्राळविक्राळ रूप धारण करू शकतात आणि जोशीमठ इथं २०१३ च्या केदारनाथसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात.

धोक्याची घंटा वाजलीय

जोशीमठसाठी मास्टर प्लॅन नसल्यानं त्याचं संरक्षण करणार्‍या पर्वतरांगावर आणि जंगलावर सिमेंटचं जंगल उभं राहात आहे. जंगलांची बेसुमार तोड केली जातेय. हजारोंच्या संख्येनं बांधण्यात येणार्‍या इमारतीचं ओझं तसंच २५ हजार नागरिकांच्या घरातून बाहेर पडणारं पाणी हे नाल्याचं रूप धारण करत आहेत. त्यामुळे जमिनीखाली एकप्रकारे दलदल निर्माण होतेय.

वरच्या भागात असलेलं लष्कर आणि आयटीबीपीच्या छावण्यांचं सांडपाणीही जमिनीखाली मुरत आहे. धोक्याची सतत सूचना देऊनही आयटीबीपीने विशाल भवन उभारण्याबरोबरच सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था केली नाही. अनेक क्यूसेक अशुद्ध पाणी जोशीमठच्या पोटात जात आहे. हीच स्थिती ही लष्करी छावण्यांचीही आहे. या सर्वांमुळे जोशीमठ आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलंय.

अलीकडच्या काळात पर्यावरण की विकास या प्रश्‍नाच्या उत्तराभोवती नियोजनाची संकल्पना नेहमीच येऊन थांबते; पण यामधे नेहमीच पर्यावरणाचं पारडं थिटं ठरतं आणि विकास भाव खाऊन जातो. वाढती लोकसंख्या, तिची गरज आणि मानवाची एकंदरीतच वाढलेली भूक या सर्वांमुळे निसर्गाचं अपरिमित दोहन होतंय. हे दोहन मान्य नसल्याचे निसर्ग वेळोवेळी रौद्र रूप घेऊन दाखवून देत असतो; पण त्यातून धडा घेण्याचे शहाणपणही आपण दाखवत नाही ही शोकांतिका आहे.

प्रत्येक वेळी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहणं हा आपल्या व्यवस्थेचा स्वभाव बनला आहे. जोशीमठाने ती वेळ येण्यापूर्वीची धोक्याची घंटा वाजवली आहे. तिचा निनाद फलदायी ठरतो का हे पाहायचं!

हेही वाचा:

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!

मेट्रोसाठी झाडं कशी वाचवायची, ते मुंबईने दिल्लीकडून शिकायला हवं.

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…