आता ऑस्करलाही लागलंय ‘नाटू नाटू’चं येड!

अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.

‘या गावठी लोकांना काय कळतं नाचातलं? काय रे, तुला फ्लेमिंको येतो? स्विंग येतो?’

रखरखीत उन्हात भरलेल्या त्या पार्टीत नाचतानाचता खाली पडलेल्या अख्तरवर कुत्सितपणे हसत जेक त्याचं नृत्यकौशल्य दाखवतो आणि आजूबाजूचे लोकही त्याला उत्स्फूर्तपणे दाद देतात. इतक्यात राम खाली पडलेलं एक ताट आपल्या पायाने उडवून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. शेजारच्या ड्रमरकडून त्याच्या हातातल्या काठ्या घेत राम ते ताट वाजवू लागतो आणि अख्तरला हुरूप येतो.

त्या पार्टीत जमलेले सगळे ब्रिटीश रामचा तो आवेश पाहूनच थक्क होतात. अख्तरला हात देऊन उठवत राम जेकला विचारतो, ‘सालसा आणि फ्लेमिंको सोड, तुला ‘नाटू’ येतो?’ पहिल्यांदाच हा शब्द ऐकलेला जेक गोंधळून जातो. त्याचा हा गोंधळ दूर करण्यासाठी राम आणि अख्तर पुढची साडेचार मिनिटं जो धुमाकूळ घालतात, आज तोच धुमाकूळ ऑस्करला पोचलाय.

देशात वाजलं, जगात गाजलं!

२०२२चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणजे ‘आरआरआर’. एस. एस. राजामौली दिग्दर्शित हा तेलुगू सिनेमा मार्च २०२२मधे इतर भारतीय भाषांमधेही डब करण्यात आला होता. ‘भारतीय सिनेमाचं वैभव’ या बिरुदावलीसकट प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाने फक्त भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या प्रेक्षकांवर आपली छाप पाडलीय. त्यातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललीय.

२०२१मधे ‘आरआरआर’चं प्रमोशन दणक्यात सुरु झालं. आंतरराष्ट्रीय मैत्रीदिनाचं औचित्य साधून सिनेमातलं पहिलं ‘दोस्ती’ हे गाणं यूट्यूबवर रिलीज केलं गेलं. या वीडियोमधे ‘आरआरआर’चे दोन्ही हिरो राम चरण तेजा आणि ज्युनियर एनटीआरसोबतच ‘आरआरआर’ची सांगीतिक जबाबदारी सांभाळणारी सगळी टीम दिसली होती. त्यात ‘आरआरआर’चे संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवाणीही होते. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

’दोस्ती’च्या अगदी शेवटच्या काही सेकंदांसाठी आलेले दोन्ही हिरो हे मुळातच उत्तम डान्सरही आहेत. त्यामुळे त्या दोघांनीही एकातरी गाण्यात एकत्र नाचावं अशी त्यांच्या चाहत्यांची मागणी या गाण्यामुळे जास्तच वाढली. ही मागणी पूर्ण करणारं ‘नाटू नाटू’ नोव्हेंबरमधे यूट्यूबवर आलं. त्यातल्या हूक स्टेपवर असंख्य रील बनवले गेले. त्यानंतर कुठेही प्रमोशनला गेल्यावर ही हूक स्टेप करणं शास्त्रच बनलं होतं.

देशभर वाजलेल्या या गाण्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही सिनेरसिकांना आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं. क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्डसारख्या प्रतिष्ठीत सिनेपुरस्कार सोहळ्यांमधे सर्वोत्कृष्ट गाण्याच्या पुरस्कारावर ‘नाटू नाटू’ने आपलं नाव कोरलं. आता तर या गाण्याने थेट ऑस्करच्या अंतिम यादीत जागा मिळवल्याने सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय.

हेही वाचा: ऑस्करच्या आयचा घो!

देशीपणा जपणारं ‘नाटू नाटू’

‘नाटू नाटू’ त्याच्या उडत्या चालीसाठी, नृत्यासाठी नावाजलं गेलंच पण ते ज्या पार्श्वभूमीवर वाजतं, ती पार्श्वभूमी आणि गाण्याचे बोल एकत्रितपणे त्याचं महत्त्व वाढवतात. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी निव्वळ एक डान्स नंबर म्हणून प्रचलित होऊ लागलेलं हे गाणं सिनेमातल्या त्याच्या समयोचित वापरामुळे आणखीनच लोकप्रिय झालं. त्यामुळे ‘नाटू नाटू’च्या लोकप्रियतेची कारणं शोधताना त्याच्या पार्श्वभूमीचाही विचार करणं योग्य ठरतं.

सिनेमात अख्तरची भूमिका साकारणाऱ्या ज्यु. एनटीआरला त्याची नवी मैत्रीण जेनी एका पार्टीला बोलावते. रामची भूमिका साकारणाऱ्या राम चरण तेजाला सोबत घेऊन अख्तर या पार्टीत येतो. जेनीला अख्तरसोबत नाचताना पाहून जेक चिडतो आणि अख्तरला खाली पाडून त्याचा सगळ्यांसमोर अपमान करतो. त्यावेळी राम अख्तरच्या मदतीला धावून येतो आणि दोघेही मिळून अस्सल देशीपणा जपणारं ‘नाटू’ सादर करून जेकचा ब्रिटीश माज उतरवतात.

‘नाटू’ म्हणजे एखाद्याला नाच असं म्हणणं. धुरळा उडवणाऱ्या बैलासारखं, देवीच्या जत्रेतल्या पोतराजासारखं, हिरव्या मिरचीसारखं, धारदार सुऱ्याच्या सळसळत्या पात्यासारखं, ज्वारीची भाकरी-ठेच्यातल्या ठसकेदार चवीसारखं, छातीत धडकी भरवणाऱ्या ढोलाच्या नादासारखं बेभान होऊन नाचायचं असं हे गाणं सांगतं. नाचताना शरीरातलं रक्त उसळून धरणीकंप होईल असं नाचायचं आवाहन अख्तर आणि राम ब्रिटिशांना करतात.

या दोघांनी गाण्यात दाखवलेली हूक स्टेप करताना ब्रिटीशांची पुरती दमछाक होते. एकही ब्रिटीश छोकरा राम आणि अख्तरच्या तोडीचं नाचत नाही. हूक स्टेप करणाऱ्या जेकला राम ‘आता कशी जिरली’ असं निव्वळ आपल्या हावभावातून दाखवून देतो, तो खऱ्या अर्थाने या गाण्याचा मनी शॉट आहे. एकदम पैसा वसूल! ब्रिटीशांचा माज मोडणारं हे गाणं लोकप्रिय ठरलं नसतं तर नवलच!

जुन्या समीकरणांचं सुपरहिट यश

या गाण्याच्या लोकप्रियतेसाठी पडद्यावर धुरळा उडवणारे राम चरण तेजा आणि ज्यु. एनटीआर जितके कारणीभूत आहेत, तेवढेच पडद्यामागे राबणारे हातही कारणीभूत आहेत. त्यात दिग्दर्शक राजामौली, सिनेमेटोग्राफर के. के. सेंथिल कुमार, गायक काला भैरवा-राहुल सिप्लीगंज आणि नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित, त्याचबरोबर ‘नाटू नाटू’च्या लोकप्रियतेत सिंहाचा वाटा असणारे संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस ही नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील.

राजामौलीने २००१मधे आलेल्या ‘स्टुडंट नं १’ या आपल्या पहिल्या सिनेमापासून ते आत्ताच्या ‘आरआरआर’पर्यंत या ठराविक नावांसोबत वारंवार काम केलंय. यातले किरवाणी पहिल्यापासूनच राजामौलीसोबत आहेत तर इतरांना काही सिनेमांमधे राजामौलीसोबत काम करण्याची संधी मिळालेली नाही. असं असलं तरी राजामौलीचे आजवरचे सगळेच सिनेमे सुपरहिट ठरलेत. त्यांच्या यशात राजामौलीसोबतच्या या ठराविक समीकरणांचा मोलाचा वाटा आहे.

हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

किरवाणी-राजामौलीची हिट जोडी

या सगळ्या समीकरणांमधे विशेष समीकरण आहे ते किरवाणी-राजामौली या जोडीचं. १९९०पासून प्रामुख्याने तेलुगू सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या किरवाणींनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दशकात तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी सिनेमांनाही संगीत दिलंय. ‘अन्नामय्या’ या १९९७च्या तेलुगू सिनेमासाठी त्यांना संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. आजवर १८८हून अधिक सिनेमांना संगीत देणाऱ्या किरवाणींना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

२००१मधे राजामौलीसारख्या नवख्या दिग्दर्शकावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख कायमच चढता राहिला. भक्तीगीतं आणि लोकगीतांवर उत्तम पकड असलेल्या किरवाणींचा आवाज तर जबरदस्त आहेच, पण एक दर्जेदार गीतकार म्हणूनही त्यांनी आपली वेगळी प्रतिमा उभी केलीय. ‘बाहुबली २’मधली ‘कन्ना निदुरींचरा’ ही अंगाई असेल किंवा ‘आरआरआर’चं मर्म सांगणारं ‘जननी’ असेल; किरवाणींची लेखणी कायमच सरस ठरलीय.

राजामौलीशी हातमिळवणी केल्यानंतर किरवाणींनी इतर सिनेदिग्दर्शकांसोबतही संगीत दिग्दर्शक म्हणून अगदी सारख्याच समर्पणभावाने काम केलंय पण जे यश आणि नाव त्यांनी राजामौली दिग्दर्शित सिनेमांमधून मिळालंय, त्याची सर इतर कुठल्याही सिनेमाला आलेली नाही, हे विशेष. अगदीच नवख्या असलेल्या राजामौलीवर त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं, हे ‘नाटू नाटू’ला जागतिक पातळीवर मिळालेल्या प्रसिद्धीतून स्पष्ट होतं.

गाणं आणि बरंच काही!

यावर्षीच्या ८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळवणारं ‘नाटू नाटू’ हे फक्त भारतातलंच नाही, तर आशिया खंडातलंही पहिलंच गाणं ठरलंय. टेलर स्विफ्ट, लेडी गागा आणि रिहानासारख्या नामांकित स्पर्धकांना मात देऊन ‘नाटू नाटू’ने हा पुरस्कार मिळवला. याचीच पुनरावृत्ती क्रिटीक्स चॉईस पुरस्कार सोहळ्यातही घडली. तिथं सर्वोत्कृष्ट गाण्यासोबतच सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमाच्या पुरस्कारावर ‘आरआरआर’ने आपलं नाव कोरलंय.

ब्रिटीशांच्या वसाहतवादाचे शिकार ठरलेले देश हा अनेक देशीविदेशी सिनेमांच्या कथानकांचा विषय आहे. ‘आरआरआर’ही एक असाच सिनेमा आहे, जो ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या खऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची काल्पनिक गोष्ट पडद्यावर आणतो. अशा सिनेमांमधे वीररसयुक्त आणि देशभक्तीपर गाणी असणं स्वाभाविकच आहे. ‘आरआरआर’मधेही ‘कुमुरम भिमुडो’, ‘एत्तारा जेंडा’सारखी गाणी आहेतच. पण ‘नाटू नाटू’ मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळं ठरतं.

या गाण्यात सुरवातीला एक कृष्णवर्णीय ड्रमर दिसतो. पूर्ण गाण्यात अगदी काही सेकंदापुरता दिसलेला हा ड्रमर वसाहतवाद आणि वर्णभेदाचाच एक बळी असल्याचं राजामौली सुचवतो. ब्रिटिशांनी इथल्या मातीत मिसळताना आपली तथाकथित संस्कृती कशी उच्च, सभ्य आहे असं भासवत स्थानिकांना कमीपणाचा दर्जा दिला. पण ‘नाटू नाटू’मधून राम आणि अख्तर ही भिन्नधर्मीय पात्रं स्थानिक संस्कृतीचा गौरव करताना आपल्याला दिसतात.

२०२१मधे ऑस्करने ‘सरदार उधम’ हा सिनेमा ब्रिटीशांविषयी द्वेष पसरवत असल्याचं सांगून त्याला स्पर्धेबाहेर काढलं होतं. पण वेगळ्या पद्धतीने ब्रिटीशांची खोड जिरवणारं ‘नाटू नाटू’ मात्र आता ऑस्करच्या अंतिम यादीत ठाण मांडून बसलंय. याला ऑस्करने केलेलं दुर्लक्ष म्हणायचं, दुटप्पीपणा म्हणायचा की देशीपणाचं झूल पांघरलेली राजामौलीची चाणाक्ष युक्ती हा एक प्रश्नच आहे.

हेही वाचा:

उत्तरेतली फिल्म सिटी ठरणार का बॉलीवूडचं नवं घर?

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…