महाराष्ट्रातलं सध्याचं वास्तव मराठीपणाला वेदना देणारं

महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते असतील, एस. एम. जोशींसारखे नेते असतील, ही महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत आहेत. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.

आपण मराठी लोक सध्याच्या काळात फार उत्सवी झालो आहोत. साहित्य संमेलनात साहित्यापेक्षा त्याच्या निमित्ताने जो उत्सव करायचा असतो तो वाढत चालेला आहे. आणि तो अतोनात वाढला आहे. जवळजवळ तो बटबटीत होत आलेला आहे. आणि हे सगळ्याच क्षेत्रांत आहे. मला रस असलेला एक परवाचा एक इवेंट म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा. मी ती बारकाईने आणि जवळून पाहिली, कारण मला खेळाच्या क्षेत्रामधे रस आहे.

कुस्तीगीर वगैरे तिथं दुय्यमच होते. जे संयोजक असतील, कोण मंत्री असतील, परिषदेचे अध्यक्ष असतील ते त्या ठिकाणी प्रमुख होते असं एकूण माध्यमांचं वर्तन होतं. साधनं ज्याच्या हाता आहेत, ते वेगळे लोक आहेत, त्यांना जे पाहिजे असतं ते माध्यमं करतात. जी अत्यंत शक्तिमान अशी तरुण खेड्यातली मुलं त्यांनी किमान वर्षभर कष्ट केले आहेत. अतिशय अव्वल दर्जाची कुस्ती तिथं झाली. पण तिला महत्त्वच नव्हतं, त्या ठिकाणी. एकुणामधे जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात हे असं झालेलं आहे. तर त्याच्यापासून दूर राहाणं, मी पसंद करतो.

राजकारणाला बटबटीतपणा आलाय

लिहिणार्‍यांनी फार बोलू नये. फक्त लिहावं, झालाच काही उपयोग तर ठीक आहे. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात वावरणार्‍या लोकांच्या हातामधे निदान ज्यांना काही जी संवदेनाक्षम अशी माणसं आहेत, त्याच्यापैकीच लिहिणारे असतात. एखादा चांगला वक्ता असेल तर तो भाषण करून बोलून मोठ्या समूहाशी संवाद साधून तो आपलं मत व्यक्त करतो. लिहिणारा एका अर्थाने या प्रकारची विधानं शोधत असतो. मी आयुष्यभर एक प्रकारे जीवनाविषयी विधान शोधण्याचा प्रयत्न केला.

राजकारण हे स्वाभाविक आहे, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. पण एक बटबटीतपणा आला आहे. समजा खेळ आहे, तर खेळाचं उद्दिष्ट क्रीडावृत्तीचा वाढ होणं, आपल्यात क्रीडावृत्ती संबंधी आस्था निर्माण होणं याच्या ऐवजी एखादा इवेंट करावा, इवेंट मॅनेजमेंटही नवीच गोष्ट आपल्याकडे आलेली आहे आणि ती फार प्रचंड वाढलेली आहे. याचं एक बटबटीत चित्र मला अनुभवायला आलं. हे मला प्राजंळपणाने वाटतं. मला व्यक्तिशः कुणावर टीका करायची नाही. आपण सगळेच त्याला जबाबदार आहोत.

हेही वाचा: मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

साहित्यिकांचा धाक उरलेला नाही

कोबाड गांधी यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीने नक्षलवादाचा प्रचार असं काही नाही. तो माणूस डाव्या चळवळीशी संबंधित होता, त्यांनी सामान्य माणसांत काम केलेलं आहे. अत्यंत सधन घरात जन्मून, सगळ्या प्रकारचे रोग अंगात मुरवत तो जगलेला आहे. अत्यंत प्रांजळ असं हे आत्मकथन आहे. प्राप्त परिस्थितीत इतक्या गोष्टी होतात, त्याचा तो भाग आहे, असं मी मानतो. याच्यात मी शासनापेक्षाही आपण वाचक, आपण नागरिक यांच्यामधे त्या संबंधाने काही प्रतिक्रिया आहेत? तर त्या अत्यंत वरवरच्या आहेत.

शेवटी आदर्श लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असतो. तो ज्या वेळी काही मांडतो, व्यक्त करतो, त्याला महत्त्व कोणतीही शासकीय व्यवस्था कधी देईल, तर तिच्यात तेवढी ताकद असली पाहिजे. तिची जी क्षमता आहे, तिचा आदर करण्याच्या स्थितीत शासनाला आणणं हे आपलं काम आहे.

हे आपण करत नाही. आपणही फार वरवरची प्रतिक्रिया देतो. राजीनामे दिली ती चांगली प्रतिक्रिया आहे, पण तिचा काही परिणाम आपल्याला दिसतो का? तर दिसत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या संस्कृतीमधेच लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञानी यांच्याविषयी तितका आदरयुक्त धाक तो उरलेला नाही. समृद्ध भाषेत अशी स्थिती असते.

नजीकच्या भूतकाळामधे फ्रेंच किंवा रशियन या भाषांमधे, भाषिक संस्कृतीमधे राजकर्त्यांमधे या प्रकारचा धाक असायचा. अनेकदा रशियात स्टॅलिन हा लेखकांनी काय लिहिलं आहे, हे तो हस्तलिखित वाचून पाहायचा आणि मग छापायला परवानगी द्यायचा. असलं काही आपल्याकडे नाही. त्यामुळे उत्तम चालू आहे!

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचं काय?

मी अभिजात भाषा समितीचा अध्यक्ष होतो. माझ्या समितीला जे काम दिलं होतं, ते दोन वर्ष काम करून योग्य तो प्रस्ताव बनवला. आपल्या ज्ञानी पूर्वजांनी मुळामधे यात भरपूर काम केलं होतं. त्यांना काही कुणाकडे अभिजात दर्जा मागायचा नव्हता. पण त्यांनी म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर असतील, राजारामशास्त्री भागवत असतील, वी. बी. कोलते असतील या लोकांनी इतकं काम करून ठेवलं आहे की ते उचलून एकत्र करणं एवढंच काम आम्ही केलं.

महाराष्ट्र सरकारने ते केंद्र सरकारला सादर केलंय. केंद्र सरकारने केंद्रीय साहित्य आकादमी आहे, तिच्याकडे मागणीचं मूल्यमापन करण्यासाठी पाठवलं. त्यावर देशभरातल्या विद्वानांची समिती नेमण्यात आली. या समितीनेही मान्यता दिली. आता ते केंद्र सरकारकडे गेलं. केंद्र सरकारने औपचारिक निर्णय घेणं बाकी आहे, तिथं तो अडवला आहे. याच्यासाठी आता राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या प्रतिनिधींनी जोर लावणं आवश्यक आहे.

आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे, त्यांच्याशी तुलना करता फारच सशक्त असा दावा असलेली मराठी भाषा आहे. प्राचीनता असू दे, मौलिकता असू दे, किंवा उत्तम दर्जाच्या लेखनाची परंपरा असू दे ते सगळं आपल्या भाषेत आहे. शक्तिशाली पाठपुरावा आपल्याकडून होऊन केंद्र सरकारला या प्रकारे निर्णय घ्यायला भाग पाडावं अशी परिस्थिती अजूनही तयार झालेली दिसत नाही. दहा वर्षं होत आली तरी ते बाजूला पडलेले आहे. नागरिक म्हणून मी फक्त खंत व्यक्त करू शकतो.

हेही वाचा: सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

वैचारिक गोंधळाची स्थिती

माझी ताम्रपट राजकीय कादंबरी आहे. १९४० ते १९८० च्या दशकापर्यंतचा कालखंड त्यात घेतला आहे. राजकीय, सामाजिक बदल कसे झाले, मतपेटीच्या राजकारणामुळे जातींना महत्त्व कसं आलं, चांगला कार्यकर्ता असेल आणि तो विशिष्ट जातीचा नसेल तर तो मागे कसा पडत गेला, आणि त्याच्यातून काय नेमकं झालं, जातीय पातळीवर विभाजन होत जाऊन दुःखद स्थिती निर्माण झाली.

विकास तर झाला पण जे सांस्कृतिक उत्थान व्हायला हवं होतं, ते पुरसं झालं नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. ताम्रपटचा शेवट ही सुरवात घेऊन आजपर्यंत जर कुणी लिहिलं तर फार नवं काही नक्की निर्माण करता येईल. तुम्ही म्हणाल ते मी करायला पाहिजे. मला आवडेल ते करायला, मी कदाचित करेन ही. पण माझ्यापेक्षा त्याच्यानंतर जन्मलेला जर एखादा लेखक असेल ज्याने या प्रकारचं पाहिलेलं अनुभवलेलं असेल तर तो जास्ती ताकदीने हे करू शकेल असं मला वाटतं.

त्यांनी ते केलं पाहिजे. किंवा आपली सामाजिक गरज तशी असेल तर ते केलं जाईल. पण मी प्रयत्न करेनच, मी वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो आहे. मला असं वाटतं कदाचित करेन पण खात्रीने सांगता येत नाही. कादंबरीच्या बाबतीत कधीही खात्री देता येत नाही की ही होईल. कारण डोक्यात अनेक गोष्टी असतात, काही तरी निर्माण होतं. ते एखाद्या हिमनगासारखं असते.

भौतिक समृद्धीच्या बरोबर सांस्कृतिक प्रगल्भता आपण जी मिळवायला हवी होती, तिथं आपण कमी पडलो आणि त्याच्यामुळे आजची वैचारिक गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मी ज्या भागात घडलो, तो केंद्रस्थानी ठेऊन मी वेध घेण्याचा प्रयत्न करतो.

वेदना देणारं वास्तव

महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते असतील, एस. एम. जोशींसारखे नेते असतील, ही महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत आहेत. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत.

गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा अनेक क्षेत्रातली मंडळी करताना दिसतात. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठीपणाला वेदना देणारं, दुःख देणारं असं आजचं वास्तव आहे.

हेही वाचा:

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?

( लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय या लेखाचं शब्दांकन दिलिप शिंदे आणि अनुपमा गुंडे यांनी केलंय )

0 Shares:
You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…