प्रेम केल्यानंतर लग्न करायला हवंच का?

डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे.

पार्टी म्हटलं की सगळे मित्रमैत्रिणी झाडून हजर राहणार हे ठरलेलं असतं. मागच्या महिन्यात असाच एका मित्राचा बड्डे होता. जंगी पार्टी झाली. पण या अशा पार्ट्यांमधे कायम आघाडीवर असलेल्या मित्र सुधीरची कमी जाणवली. त्याचा फोनही लागेना. घरचा फोनही बंद होता. नेहमीच्या पार्टीच्या ठिकाणापासून त्याचं घर जवळ असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा थेट त्याच्या घरी वळवला.

घरी पोचलो. पण एरवी सगळे मित्रमैत्रिणी घरी आल्यावर उत्साही असलेला सुधीर आम्हा सगळ्यांना बघताक्षणी बावरला. डोळे अगदी खोलवर गेलेले होते.  डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं दिसत होती. सुधीर आम्हा सगळ्यांना त्याच्या रूममधे घेऊन गेला. त्याची आई आम्हा सगळ्यांची चांगली दोस्त. पण यावेळी त्याही काहीशा अस्वस्थ दिसल्या. त्यांनी प्यायला पाणी विचारलं. आम्ही भरपेट खाऊन आल्याचं सांगून नेहमीप्रमाणे गप्पांचा फड जमवायला सुरवात केली.

सुधीरचं मन मात्र लागत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या शैलीत त्याला चार शिव्या दिल्या. शिव्यांना कायम भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सुधीरचं लक्ष मात्र कुठंतरी दुसरीकडेच होतं. तितक्याच त्याची आई आली. एरवी त्याच्याविषयी प्रेमानं बोलणाऱ्या काकू यावेळी मात्र काहीशा आक्रमक मूडमधे होत्या. कुणालाच काही कळेना. आणि अचानक काकू एकाएकी रडू लागल्या.

नेमकं चाललंय काय? सगळ्यांच्याच मनात प्रश्नांचं काहूर. काकूंना शांत केलं. तशा त्या बोलू लागल्या. ‘हे पोरगं. याच्यावर माझा किती विश्वास होता. पण यानं माझा विश्वासघात केला.’ पुन्हा तेच. आम्हाला कुणालाच काही कळेना. तशा काकू पुन्हा एकदा बोलू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ‘सुधीर त्या सृष्टीकडे जाऊन दोन दोन महिने राहतोय. तिचं अर्ध घरभाडंही देतोय. वरती असंही म्हणतोय की, माझं तिच्यावर प्रेम आहे. तिच्यासोबत रहायला आवडतंय. पण आम्हाला लग्न करायचं नाहीय’ हे सांगताना काकू पुन्हा रडू लागल्या.

हेही वाचा: हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

आई आणि ‘तिच्या’ कचाट्यात सुधीर

काकूंना शांत केलं. आम्ही सगळे खरंतर शॉकमधे होतो. नेमकं चाललंय काय त्याचा थोडाफार अंदाज येऊ लागला. काकू रडत रडतच आतल्या खोलीत गेल्या. सुधीर मात्र काहीतरी विचार करण्यात मग्न होता. आई आत गेली तसं तोही अचानक रडू लागला. असं रडताना त्याला आम्ही सगळेच पहिल्यांदा वपाहत होतो. त्याला शांत केलं. पण नेमकं झालंय काय हे सांगायला मात्र तो तयार नव्हता.

सुधीर हा आमचा सगळ्यांचा जिगरी दोस्त. प्रचंड हुशार आणि टॅलेंट ठासून भरलेला. घरी तो, एक भाऊ आणि आई असं छोटं कुटुंबं. सगळ्यात मोठा असलेला सुधीर एका आयटी कंपनीत कामाला. पगारही काही कमी नाही. त्यामुळे घरं डिस्टर्ब होण्याइतकं नेमकं झालंय काय हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. त्यात काकूंनी सृष्टीचा विषय काढला. 

सुधीर अचानक बोलू लागला. ‘सृष्टी आणि मी गेले काही महिने एकमेकांसोबत राहतोय. आमचं प्रेम आहेच. एकमेकांची सोबतही हवीहवीशी वाटतेय. आम्हाला दोघांनाही एकत्र रहायचंय. पण लग्न वगैरे करायचं नाहीय हे आम्ही दोघांनी ठरवलंय.’ सृष्टी ही सुधीरची ऑफिसमधली सहकारी. दोनेक वर्ष ते एकमेकांना चांगलं ओळखतायत, त्यांच्यात चांगली मैत्री आहे हे माहीत होतं. सुधीरही तिच्याबद्दल भरभरून बोलायचा. पण ते दोघं एकत्र राहतायत हे मात्र माहीत नव्हतं.

आधीच्या पिढीचा आदर पण…

आईला न सांगताच सुधीर अचानक सृष्टीच्या घरी जायचा. त्यावरून दोघांमधे खटके उडायचे. एकदा सुधीरच्या आईनं सृष्टीला कॉन्टॅक्ट करत थेट तिचं घर गाठलं. तिथं सुधीरही होता. सुधीरची आई सृष्टीला काहीबाही बोलली. दोघांमधे वादावादी झाली. तिथूनच सुधीर आणि आईत अधिकच दुरावा आला. एकीकडे सृष्टी आणि दुसरीकडे आई. या मधल्या कचाट्यात सुधीर अडकला.

आम्ही काकू आणि सुधीरला बाय केलं आणि बाहेर पडलो. आताही डोक्यात प्रश्नांचं काहूर होतं. आम्ही निघताना सुधीर बोलला ‘मी आईला कुठं सोडतोय? तिची जबाबदारी मी टाळत नाहीय. मग तिनं मला थोडंफार समजून घेतलं तर काय होणार आहे? तिला जातीतली मुलगी हवीय. मला तसं नकोय. मुळात मला ही लग्नसंस्थाच मान्य नाही.’

एकीकडं सुधीर बरोबरही वाटत होता आणि दुसरीकडे त्याच्या आईचा तो रडवेला चेहरा समोरून जात नव्हता. ‘जातीतली मुलगी हवीय…’ या एका वाक्यात त्यांनी सुधीरला बरंच काही सांगितलंय. पण ही कोणतीच गोष्ट सुधीरला मान्य नाही. त्याचं सृष्टीवरही कोणतं दडपण नाहीय. आणि त्यांना दोघांनाही कोणत्याच चौकटीत अडकून पडायचं नाही.

सुधीर-सृष्टीचा अनुभव घेत असलेले असे असंख्य पोरंपोरी आपल्या आजूबाजूला आहेत. प्रेमाच्या कल्पना बदलतायत. आधीच्या पिढीचं प्रेम वेगळं होतं. सुधीर-सृष्टी म्हणजे आमची पिढी प्रेम, रिलेशनशिप, लिव इनकडे फार म्हणजे फार वेगळ्या पद्धतीने पाहतेय. ते पाहणं मागच्या पिढीला खटकत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणून त्यांना आम्हाला दुखवायचं नाहीय. खरंतर हाच सांगावा आजूबाजूच्या असंख्य सृष्टी-सुधीरचा आहे.

हेही वाचा: आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

आम्हाला कोणतीच चौकट नकोय

सोशल मीडियात आम्ही अग्रेसर असतो म्हणजे आम्ही वाह्यात गेलो आहोत किंवा आमचं प्रेमाकडं बघणं सोशल मीडियातून आलंय हे म्हणणं आता मागे पडायला हवं. सोशल मीडिया असेल बरा-वाईट पण त्याचे धोकेही आम्ही खुल्या मनानं मान्य करतो. पण त्याचवेळी अनेक गोष्टी मोकळेपणानं स्वीकारायला याच सोशल मीडियानं मदत केलीय हेसुद्धा आम्ही नाकारत नाही.

‘एक दुजे के लिये’ या पलीकडे जाऊन आम्ही प्रेमाची व्याख्या केलीय. आम्ही प्रेम करतो, निभावतो. पण हे केवळ तडजोडीवर येऊन थांबत नाही. त्यापलीकडे प्रेमाची नवी वाट आम्ही शोधतोय. त्या वाटेत रिलेशनशिप आहेच आणि लिव इनसारखे वेगळे मार्गही. अशा प्रत्येक मार्गावर आम्ही स्वतःला पडताळून पाहतोय. स्वतःला आजमावतोय. त्यातून जे काही अस्सल म्हणून शिल्लक राहतंय बुद्धीला पटतंय तेवढंच आम्ही घेतोय. तोच खरंतर आमचा मार्गय.

आम्हा मुला-मुलींना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतोय. तो केवळ शारीरिक आहे असं नाही. कधी तो निखळ मैत्रीच्या पातळीवर असेल तर कधी त्यापलीकडे. त्यातली गुंतागुंत आम्हाला मान्य आहेच. पण त्यात फार काळ अडकून पडायचं नाहीय. अडकून पडणाऱ्यांचं स्वातंत्र्यही आम्ही अमान्य करत नाही. अशा असंख्य सृष्टी-सुधीरचा हा प्रवास अनेकांना खटकतो. त्या मागचं कारण डोळे झाकून मान्य केलेली सामाजिक चौकट.

वर्चुअल प्रेमाच्या पलिकडे रिलेशानी

सुधीरच्या आईसारखे अनेक पालक आज आपल्या अवतीभवती आहेत. त्यांची एक पिढी होती. त्या पिढीचे काही सामाजिक, कौटुंबिक असे नीतिनियम होते. आताच्या पिढीचं वेगळं आहे. काळ बदलतोय. त्यामुळे ‘आमच्यावेळी असं नव्हतं…’ हे कुठपर्यंत ऐकत बसायचं? आम्ही या काळाप्रमाणे पुढे चाललो आहोत. त्यातली आदिम प्रेम भावना आम्ही मान्यच केलीय. पण नव्या जगात तिची नवी परिभाषा आम्ही मांडू पाहतोय.

सृष्टी-सुधीर वेगळी वहिवाट शोधू पाहणाऱ्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी आपलं करिअर पणाला लावून प्रेम केलेलं नाही. फक्त वेगळा मार्ग निवडला आहे. तो मार्ग या दोघांना जोपर्यंत योग्य वाटतोय तोपर्यंत त्यात तिसऱ्यानं पडू नये. लग्न करायचं की नाही हे ठरवायला आमची पिढी सक्षम आहेच की! त्यासाठी आमच्या मागे तगादा लावणं हे कितपत योग्य आहे? 

खरंतर आईवडील सांगतील तोच पार्टनर हे आमच्या पिढीला मान्य नाही. ज्यांना मान्य आहे त्यांचं स्वातंत्र्य आम्ही मान्य केलं आहेच ना! त्यामुळे वर्चुअल प्रेमाच्या पलिकडे घेऊन जाणारी ही रिलेशानीची वेगळी वाट आम्हाला हवीय. त्यासाठी संघर्ष करायची आमची तयारी आहेच आणि हिंमतही.

हेही वाचा: 

लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का

आजची पिढी कमिटमेंट देते, पण अडकून पडत नाही

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…