समुद्रातलं पाणी वाढतंय आणि मुंबई बुडण्याचा धोकाही!

मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होतेय. त्यामुळे जगभरातली अनेक महत्वाची शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय.

२६ जुलै २००५. मुंबईकर हा दिवस कधीच विसरणार नाहीत. २५ जुलैच्या रात्रीच मुंबईसमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपलं होतं. वस्त्या, इमारतींना पाण्यानं वेढलं होतं. लाखो मुंबईकर वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात अडकले होते. अगदी उपनगरंही पाण्याखाली गेली होती. पावसाने मुंबईला वेढा घालत अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

ढगफुटीचं हे संकट अनुभवलेल्या मुंबईकरांच्या डोळ्यात तो दिवस आठवताना आजही नकळत पाणी येतं. अर्थात दरवर्षी पाऊस आला की मुंबईतला बराचसा भाग तुंबलेला असतो. पण २६ जुलै २००५ हा मुंबईच्या स्पिरीटची अग्निपरीक्षा पाहणारा दिवस होता. हजारो मुंबईकर या दिवशी बेघर झालेच शिवाय शेकडो लोकांचा मृत्यू झाला. पण हळूहळू मुंबई सावरली.

मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनग वितळतोय. अशावेळी समुद्राचा जलस्तरही वाढत चाललाय. त्यामुळे जगभरातली अनेक शहरं लवकरच पाण्याखाली जाण्याची चिन्ह आहेत. त्यात मुंबईचा नंबर वरचा असल्याचं हा रिपोर्ट सांगतोय.

हेही वाचा: पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका

जागतिक हवामान संस्था ही हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊन त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांचा अभ्यास करत असते. १९५०ला स्थापन झालेल्या या संस्थेनं आजपर्यंत पूर, भूकंप, दुष्काळ अशा आपत्तीच्या आधीच जगभरातल्या देशांना त्या संबंधीचे इशारे दिलेत. त्यामुळेच या संस्थेचा नुकताच आलेला ‘जागतिक समुद्रपातळी वाढ आणि परिणाम’ हा रिपोर्ट फार महत्वाचा आहे. त्यामुळेच त्यातल्या मुद्यांकडे अधिक गांभीर्याने पहायला हवं.

१९०१ ते १९७१ दरम्यान समुद्र पातळीतली वाढ १.३ मिलिमीटर होती. तर २०१३ ते २०२२ या केवळ दहा वर्षांच्या काळात समुद्राची पातळी दरवर्षी ४.४ मिलिमीटरने वाढलीय. हे असंच कायम राहिलं तर त्यामुळे वादळ आणि पुरांच्या घटनांमधेही वाढ होईल. त्याचा सर्वाधिक धोका हा किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येला आणि परिसंस्थेला बसू शकतो असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिलाय.

या सगळ्याचा मोठा फटका बसण्यात नेदरलँड, बांगलादेश, भारत आणि चीन हे देश आघाडीवर असतील. तसंच शांघाय, बँकॉक, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ढाका या जगातल्या महत्वाच्या शहरांसोबत मुंबईतलाही समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका आहे. वादळ आणि पुरांमुळे साहजिकच माती आणि भूगर्भातलं पाणी दूषित होईल. त्याचा थेट परिणाम अन्नसुरक्षेवर होईल. त्यामुळे या शहरांची आर्थिक आणि सामाजिक रचना बिघडण्याचा धोका आहे.

तापमान वाढतंय, हिमनद्या वितळतायत

या सगळ्याच्या मुळाशी हिमनद्या वितळणं हे महत्त्वाचं कारण आहे. जगभरात सातत्याने हवामान बदलावर काथ्याकूट होतोय. हवामानविषयक परिषदा भरतात पण त्यातल्या तामझामच्या पलीकडे नेमकं काय होतं हा प्रश्न आहेत. मागच्या वर्षी नोव्हेंबरमधे इजिप्त इथं कॉप २७चं आयोजन करण्यात आलं. तिथंही जागतिक तापमानवाढीवर चर्चा झाल्या. चिंता व्यक्त करण्यात आल्या. काही ठरावही झाले. पण या ठरवांमधली विकसित देशांची भूमिका कायमच दुटप्पी राहिलीय हे विसरता नये.

हिमनद्या वितळतायत त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, या शतकाच्या शेवटी जगाचं तापमान २.४ ते २.६ डिग्रीनं वाढू शकतं. ही तापमानवाढ १.५ डिग्रीपर्यंत सीमित रहायला हवी असं जगभरातले पर्यावरणतज्ञ सांगतायत. या तापमानवाढीचा फटका आपण दैनंदिन आयुष्यातही सगळेच अनुभवतोय. उन्हाळ्याला आता कुठं सुरवात झालीय पण मुंबईसारखी शहरं आताच अक्षरशः घाम फोडतायत. जीवाची काहिली होतेय. असं सगळं वातावरण आपण अनुभवतोय.

जागतिक तापमानवाढ १.५ डिग्रीपर्यंत सीमित राहणं काळाची गरज आहे. ती सीमित राहिली तर समुद्राची पातळीही २ ते ३ मीटर इतकी राहील. पण पुढच्या काळात ही वाढ २ डिग्रीवर पोचली तर मात्र समुद्राची पातळी २ ते ६ मीटरने वाढेल असं हा रिपोर्ट सांगतोय. अंटार्क्टिका हे जगातलं सगळ्यात जास्त बर्फ असलेलं ठिकाण आहे. इथं हिमनद्या वितळण्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढण्याचा धोकाही अधिक आहे. त्याबद्दल सातत्याने पर्यावरणतज्ञ चिंता व्यक्त करतायत.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

भारताच्या किनारपट्टी भागाला धोका

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी नुकतंच सुरक्षा परिषदेला संबोधित केलं होतं. विषय होता ‘समुद्र पातळीत वाढ : आंतराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर परिणाम’. यावर बोलताना गुटेरस यांनी जगातलं सर्वात मोठं बेट असलेल्या ग्रीनलँडचं उदाहरण दिलं होतं. ग्रीनलँडवरचा बर्फ वेगाने वितळून वर्षाला २.७० कोटी टन इतक्या बर्फाचं नुकसान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लहान बेटं असलेले विकसनशील देश आणि जगभरातल्या सखल किनारपट्टी भागातल्या लाखो लोकांसाठी ही चिंतेची गोष्ट असल्याच्या मुद्याकडे गुटेरस यांनी लक्ष वेधलंय.

समुद्राच्या पातळीत वाढ होणं भारतातल्या किनारपट्टी भागाला परवडणारं नाही. 'ओआरएफ' या थिंक टॅंकच्या एका रिपोर्टनुसार, आज भारतातले जवळपास १७ कोटी लोक किनारपट्टी भागात राहतायत. समुद्राच्या पातळीत वाढ होणं म्हणजे ही लोकसंख्या उध्वस्त होण्यासारखं आहे. कारण १९९० ते २०१६ दरम्यान जवळपास २३५ स्क्वेअर किलोमीटर इतका जमिनीचा पट्टा केवळ समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आपण गमावलाय. तर २००८ ते २०१८ या काळात पूरसारख्या आपत्तींमुळे ३६ लाख लोकांना स्थलांतर करावं लागलंय.

गुटेरस यांनीही हिमालयीन नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या लाखो लोकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केलीय. येणाऱ्या काळात हिमनद्या कमी होत जातील आणि गंगा, ब्रम्हपुत्रा, सिंधू अशा नद्या आकुंचित होतील असाही धोका त्यांनी बोलून दाखवलाय. खरंतर मागच्या काही वर्षांमधे तोक्ते, यास, आम्फन, निसर्ग अशी अनेक चक्रीवादळं भारताने पाहिलीत. या वादळांनी कोट्यवधींचं नुकसान केलंय.

मुंबई दुहेरी संकटात

बंगालचा उपसागर, हिंदी महासागरासोबत अरबी समुद्राचं वेगाने वाढत असलेलं तापमानही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. हे संकट जसं निसर्गनिर्मित आहे तसंच ते मानवनिर्मितही आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ म्हणजे थेट मानवी जीवन धोक्यात हेसुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरांना मोठा धोका निर्माण होत असल्याच्या मुद्याकडे जागतिक हवामान संस्थेचा रिपोर्ट लक्ष वेधतोय.

जगातल्या ज्या शहरांचं अस्तित्व धोक्यात आहे त्यात मुंबईचा नंबर अगदी वरचा आहे. किनारपट्टी भागातल्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे २०१९चा किनारी नियमन क्षेत्र कायदा आहे. पण या कायद्यातल्या नियमांना धाब्यावर बसवून अनेक प्रोजेक्ट आणले गेलेत. त्यातला मुंबईचा कोस्टल रोड हा प्रोजेक्ट आहे. पण या प्रोजेक्टमुळे इथली सागरी परिसंस्था धोक्यात आलीय शिवाय या किनारपट्टी भागात मच्छिमारी करणारे कोळी बांधवही संकटात आलेत.

मुंबई शहर आणि उपनगराला ११४ किलोमीटरचा सागरी किनारा आहे. जागतिक हवामान संस्थेच्या रिपोर्टनुसार, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणं म्हणजे समुद्र किनारी राहणाऱ्या ९० टक्के लोकांच्या जीविताला धोका. अशावेळी मुंबईची स्थिती नेमकी काय असेल? आधीच विकासाच्या नावाखाली सागरी किनारपट्टी उध्वस्त केल्या जातायत. दुसरीकडे समुद्राच्या पाणी पातळीत एकाएकी होणारी वाढ मुंबईला दुहेरी संकटात टाकणारी असेल हे आपण विसरायला नको.

हेही वाचा:

जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

पालघरचा भूकंप… कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटाताईची गोष्ट

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…